मानवी जीवनात धर्माची आवश्यकता

माणूस हा मुळतः विकसनशील प्राणी आहे अगदी अश्मयुगात जरी आपण डोकावून पाहिले तरी याचे पुरावे आपल्याला सापडतील . गुहेत राहणारा  , वल्कले नेसणारा , दगडाची हत्यारे वापरून शिकार करणारा , माणूस !!  ते आत्ता आकाशाला गवसणी घालणाऱ्या गगनचुंबी इमारती बांधणारा माणूस !!
"चार्ल्स डार्विन " नावाच्या वैज्ञानिकाने जेव्हा सजीव उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला असेल , तेव्हा माझी ठाम खात्री आहे त्याच्या डोळ्यापुढे , माणसाने अश्मयुगापासून ते आत्तापर्यंत साधलेली प्रगती नक्कीच डोळ्यापुढे असणार !! कारण , विकास साधने हा मनुष्याचा स्थायी भावच  !! विकास हा शब्दच मुळी गुणात्मक प्रवृत्ती दर्शवितो आर्थिक सामाजिक व्यक्तिमत्व संस्कृती राजकीय भौतिक शेती अशा अनेकाविध रूपांमध्ये विकास ही संकल्पना आपणास भेटत असते
                            पण मग मानवी विकासात  , जो "विकास" वर चर्चिल्या गेलेल्या सर्व मुद्द्यांना ओघाने स्पर्श करतोच कारण,  माणूस हा नेहमी स्वतःच्या स्थायी स्वभावानुसार ,  स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असतोच . मग असे असताना मानवी विकासात धर्माची नेमकी आवश्यकता का बरं  असेल ??  निधर्मी अथवा ज्यांना आपण नास्तिक असे म्हणतो अशा लोकांचा विकास झाला नसेल काय ?? किंवा अशा प्रकारची लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाली नसतील काय ??  अशा प्रकारचा युक्तिवाद बुद्धिनिष्ठ आणि टोकाचे व्यवहारवादी विचारसरणीचे लोक नक्कीच करतात , मग धर्म असे नेमके कोणते योगदान मानवी विकासामध्ये देत असणार ?? असा साहजिक प्रश्न प्रत्येकाला पडत असणार ह्यात शंकाच नाही  माझ्या काही दिवसापूर्वी एक वाक्य वाचनात आले होते . अर्थात ती एक प्रेम कथा होती ,  प्रियकराला सोडून जाणाऱ्या प्रियसीला प्रियकर म्हणतो " प्रिये तू नसलीस माझ्या जीवनात  तरी काय मला फरक पडत नाही !! ,  पण तू माझ्यासोबत असली असतीस  तर मात्र नक्कीच फरक पडला असता !! 
                            माझ्यामध्ये मानवी जीवनात धर्माचे स्थान असेच काहीसे आहे कदाचित काही निधर्मी लोकांना त्यांच्या जीवनातील धर्माच्या अनुपस्थितीमुळे काही फरक पडत नसेल पण सांप्रत वैश्विक जनमाणसात असणाऱ्या धर्माच्या निढळ स्थानामुळे खूप अधिक प्रमाणात धर्म मानवी जीवनाच्या विकासामध्ये अनन्यसाधारण योगदान प्रदान करत आहे .वैश्विक पातळीचा विचार करता एकूण 4200 धर्म या जगात अस्तित्वात आहेत  तर एकूण मुख्य असे 12 धर्म आहेत ज्यात एकूण जगातील मानवी सभ्यतांपैकी 83 % लोक याच 12 धर्माचे अनुयायी आहेत त्यामध्ये हिंदू , मुस्लिम , शीख , ख्रिश्चन बहा टाय सोम , शिंतो , बुद्ध , जैन यासारख्या प्रमुख धर्माचा समावेश होतो जर , सर्वाधिक प्राचीन धर्माचा मागवा आपण घेतलात तर आपणास इसवीसनाच्या दोन हजार वर्षांपूर्वीची हिंदूधर्माची प्राचीनता ज्याला ,  आपण " सनातन धर्म "  म्हणतो , अशी  आढळून येईल त्यामुळे सहाजिकच प्राचीन धर्म म्हणून आणि स्वतः हिंदुधर्माचा पाईक म्हणून हिंदू धर्माच्या अनुषंगाने मानवी जीवनातील धर्माची आवश्यकता या विषयाचा उपापोह मी या निबंधाद्वारे करणार आहे
                           " धर्म " या संज्ञेविषयी आपल्या मनात द्वंद्व नेहमी चालू असते पूजाअर्चा , व्रतवैकल्य , मूर्तिपूजा , यात्रा~जत्रा  कुंभमेळा , पारायणे या  बाबींना आपण धर्म या संज्ञेत जरी गणत असलो तरी , त्यापलीकडे जाऊन धर्म ही अतिशय व्यापक अशी संकल्पना आहे. माझ्या मते आदर्शवत जगण्याची धर्म ही एक उत्तम आचारसंहिता आहे .अश्मयुगीन जीवन जरी स्वैर असले तरी काळाच्या ओघात माणसाच्या ही लक्षात आले की , " बळी तो कान पिळी "  या रानटी प्राण्यांसारखी जीवनपद्धती मानवाच्या हिताची नाही त्यामुळे माणूस समाजशीलतेला आदर्शवत ठरेल आणि सर्वांना समान संधी ,  बुद्धिनिष्ठता याला अनन्यसाधारण महत्त्व असलेली जीवनधारा आणि या जीवनधारेवर नियंत्रण म्हणून अनाकलनीय बाबी ह्या "ईश्वर" या संकल्पनेशी जोडून त्यापुढे नतमस्तक होण्याचा प्रघात हा धर्म संकल्पने शी निगडीत असावा , असे माझे मत आहे . काळानुरूप धर्मांमध्ये अनेक बाबी या वर्धित होत गेल्या. त्यामध्ये काळानुरूप लिहिले गेलेले प्राचीन वेद , विविध संतांद्वारे रचली गेलेली ग्रंथसंपदा , संतांनी केलेले लिखित अथवा मौखिक उपदेश या सगळ्या बाबींनी धर्म हा अधिक परिपक्व आणि मानवी जीवनाला अधिक पूरक ठरला यात शंका नाही
                           धर्माच्या साधनेचा आणि मानवी जीवन विकासाचा दुवा साधणारा सर्वोत्तम घटक म्हणजे संतांच्या द्वारे लिखित ग्रंथसंपदा !! त्यामध्ये अगदी अग्रक्रमाने उल्लेख हा ज्ञानेश्वर महाराज लिखित " ज्ञानेश्वरीचा " आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज लिखित " तुकाराम गाथा " यांचा करावा लागेल खरं म्हणजे ज्ञानेश्वरी ही श्रीकृष्ण कथित भगवद्गीतेचे निरूपण आहे मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाचा आपल्या अवतार कार्यात मनसोक्तपणे आस्वाद घेणाऱ्या  भगवान श्रीकृष्णाने आपला शिष्य आणि जग जिंकण्याची पात्रता असलेल्या अर्जुनाला सांगितलेला उपदेश आहे . खरं म्हणजे ज्ञानेश्वरी हा मॅनेजमेंटचा ग्रंथ आहे , जीवनात उत्तम मॅनेजमेंट कसे करावे याचा सार ज्ञानेश्वरी मध्ये दिलेला आहे. जीवनाचे मॅनेजमेंट आणि जीवन कसे उत्कर्षशीत करावे याचा वस्तुपाठ जणू  ज्ञानेश्वरी ही देत असते ज्ञानेश्वरी मधील  ही ओवी बघा... 
                           ज्याने केले पेरणें|
                           तयासाठी गोड होणें|
                           पिळणाऱ्यासी कडू होणें
                           न ठाऊक ऊसा ||
ज्ञानेश्वर महाराज हे समतत्व बुद्धीबद्दल किती सुंदर सांगतात. ज्ञानेश्वरी माझ्यामते ही  " कर्म हेच प्रधान आहे !! " हे वाक्य मनावर प्रभावीपणे ठसवणारी ग्रंथसंपदा आहे .ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान निवृत्तीचं , वैराग्यचे नाहीच . जर संपूर्ण ज्ञानेश्वरी तुम्ही वाचलीत तर त्यामध्ये कुठेही तुम्हाला जीवनाशी फटकून वागण्याचा सल्ला वगैरे आढळणार नाही त्यामध्ये तुम्ही कुठेही साधू बनून संसाराचा त्याग करण्याचा उपदेश तुम्हाला आढळणार नाही ,  उलट जीवनाला आनंदाने सामोरे जाण्याचा आणि त्याद्वारे मानवी जीवनाचा उत्कर्ष साधण्याचा वस्तुपाठच माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे . असे माझे मत आहे . निराशेच्या गर्तेत अडकलेल्या ,  स्पर्धेच्या युगात दबून गेलेल्या , आणि सुरुवातीलाच हातपाय गाळून बसलेल्या तरूणाईने आवर्जून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे . " मानवी जीवन विकास " हा ज्ञानेश्वरीच्या रचने मागे उद्देश असावा असे मला वाटते.
                          जी गोष्ट ज्ञानेश्वरीची तेच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेची !! भौतिक उदाहरणाद्वारे अध्यात्माची गोडी,  धर्माची गोडी लावणारा सर्वोत्तम ग्रंथ म्हणजे "तुकोबांची गाथा" कर्मकांड , यज्ञ व्रत~वैकल्य यांनी काळानुरूप दुरावलेला व्यापक बहुजनसमाज हा तुकोबांच्या गाथेमुळे त्यातील सहजसोप्या अभंगामुळे परत मुख्य धर्मगंगेत उडी घेत अलगद प्रवाहित झाला... हे तुकारामगाथा चे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल. अगदी साध्या~साध्या उदाहरणांनी तुकोबांनी धर्मातील सार समाजाच्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवले नाही तर ते वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ते लोकांच्या प्रत्यक्षपणे जीवन पद्धतीचा भाग बनले . थोतांड , कर्मकांड , अंधश्रद्धा यावर कठोर हल्ला चढवतानाच तुकोबांनी विज्ञाननिष्ठतेचा पुरस्कार केला
                          पोर होय नवससी     
                          तर, का करावा लागी पती ?
हा एक प्रकारचा त्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध केलेला वज्राघातच !!  याप्रमाणे तुरटी फिरवल्यावर गढूळ पाणी स्वच्छ होते तशा धर्मातील सुधारणा ह्या  तुकोबांनी केल्या आणि मानवी विकासाला धर्माच्या द्वारे एका वेगळ्याच उंचीवर नेऊन बसविले
                           संत साहित्य धर्मग्रंथ यांचे मानवी जीवनाच्या विकासात योगदान तर आहेच पण धर्म अधिकाधिक समृद्ध होण्यास आणि आणखीन लोकांना धर्मात येण्याची प्रेरणा देण्यास संत साहित्याचे योगदान अमुलाग्र अशा स्वरूपाचे आहे याबाबत कोणाचे मनात दुमत असू शकत नाही. धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांवर नेहमी निधर्मी किंवा नास्तिकां कडून  त्यांच्या देवभोळेपणा बद्दल टीका केली जाते जर आपण या लोकांच्या टीकेच्या  अतिशय खोलात जाऊन विश्लेषण केले तर , आपल्या असे लक्षात येईल की त्यांचा मुख्य रोख त्या संबंधित धर्माच्या बाबतीत नसून , तो ईश्वराच्या साधन पद्धतीमध्ये आहे त्यात प्रामुख्याने मूर्तिपूजा , कर्मकांड ,  नवस-सायास , अंधश्रद्धा यांचा अंतर्भाव असतो . बऱ्याच अंशी हिंदू धर्म हा प्राचीन असल्याने त्यात काळाच्या ओघात अनेक अंधश्रद्धेसारख्या  विकृती आल्या आहेत पण त्या वगळून जर आपण बोललो तर ह्या निधर्मी लोकांच्या चळवळीला व्यापक यश प्राप्त झाले आहे असे अजिबात नाही. 
                           सबंध पृथ्वी वरील मानवजात ही " धर्म आणि ईश्वर " या एकाच तत्वावर ती श्रद्धा ठेवून आपली वाटचाल दिमाखात करत आहे . पृथ्वीतलावर एकही खंड,  देश अथवा मानवी वस्ती असलेला भूभाग नसावा जेथे धर्म ही संकल्पना  स्वीकारली गेली नसेल . कुठल्या ना कुठल्या प्रकारे पृथ्वी ग्रहावर धर्म ही संकल्पना स्वीकारली गेली आहे . त्यामुळे धर्म हा एक वैश्विक बाब आहे यावर आपसूकच शिक्कामोर्तब होत असते. आणि याच धर्माच्या साह्याने अखंड मानवी विकास हा देखील घडत असतो.
                           लोकशाही शासनव्यवस्थेत " लिखित संविधान " असते . कल्याणकारी राज्य ,  न्याय , समता , बंधुता  सर्वांना समान संधीची उपलब्धता या बाबी त्यात अंतर्भूत असतात आणि याच लिखित संविधानाला अभिप्रेत असणारे राज्य हे संबंधित राज्यकर्त्यांना चालवणे क्रमप्राप्त असते. मग हाच प्रश्न आहे की ही कल्याणकारी राज्याची तत्वे नेमकी आली कुठून असतील ??  माझ्या मते ती आली असतील ती  जगभरातल्या " धर्मापासून " कारण धर्म ही संकल्पनाच मुळी हजारो करोडो वर्षापासून आणि मानवी सभ्यतेच्या उदयापासून अस्तित्वात आहे . त्यामुळे " अप्रत्यक्षपणे अलिखित संविधानाप्रमाणे मानवाच्या कल्याणकारी जीवन विकासाचे धर्मही मार्गदर्शक तत्व आहे  !! "    
                           म्हणूनच निबंधाच्या शेवटाकडे जात असताना "आवश्यकता " या शब्दात बदल करावासा वाटतो कारण मानवी जीवन विकासात " धर्माची "  फक्त आवश्यकताच नसून ती "अपरिहार्यता " आहे याबद्दल माझ्यासारख्याच्या मनात दुमत नाही आणि धर्माची हीच अपरिहार्यता मानवी जीवन विकासाचा उत्कट बिंदू गाठून देईल आणि केवळ मानवच नाही तर सबंध प्राणी जातीचे कल्याण त्यामधून साध्य होईल ही मला खात्री आहे. म्हणूनच पसायदानाचा पंक्ती नुसार ...
                           जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात  
                           या उक्तीवर आधारित "धर्म "  ही संकल्पना मानवी जीवनात सर्वांगीण विकास पूरक वाटते .
                           तूर्तास लेखणीस पूर्णविराम !!
                                    आपला
                              निखिल सुभाष थोरवे                                              

Comments