आश्चर्यकारक निकालाचे कंगोरे

महाराष्ट्र विधानसभेचा आजवरचा सर्वांत धक्कादायक निकाल लागला. अवघ्या ६ महिन्यांपूर्वीच्या लोकसभेला जयजयकार झालेल्या महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला .


महाविकास आघाडीच्या पराभवाला अनेक कंगोरे असले तरी , एवढा सुपडा साफ होईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निश्चित नव्हती. मग नेमके हे अघटित घडले कसे याच्या खोलात गेले तर , त्याची काही उत्तरे मिळतील.


१) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ट्रॅप करणे शेवटपर्यंत महाविकास आघाडीला जमलेच नाही :- 


सुरुवातीला या योजनेला , आर्थिक उधळपट्टी हिणवुन पुन्हा त्याच योजनेचे पैसे आपल्या जाहीरनाम्यात वाढवून एकप्रकारे महाविकास आघाडीने आपल्या डोक्यातील गोंधळ जगजाहीर केला. आणि तोच खरे म्हणजे नडला. महाविकास आघाडीचा जाहीरनामा आणि त्यातील आश्वासने ही लबाडाच्या घरची आमंत्रणे आहेत हे लाडक्या बहिणींनी ओळखले.


२) हिंदुत्व इज न्यू नॉर्मल इन महाराष्ट्र :- 


हो..! कधीकाळी महाराष्ट्रात धार्मिक सहिष्णुता पाळली जायची. स्वतःच्या धार्मिक बाबींचा उच्छाद मांडला जात नव्हता. कितीही नाकारले तरी , धार्मिक बाबींना एक सांकेतिक 'चौकट' होती. यंदाच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत ही 'चौकट' अक्षरशः अरबी समुद्रात बुडाली. 

आत्ताची हिंदुत्व मानणारी पिढी विशेषतः (वय वर्षे २४-२५ मधील) पिढी ही त्यांची मते ६० सेकंदाच्या रील वर निश्चित करणारी आहेत. शाहू , फुले ,आंबेडकरांचा समतेचा सहिष्णुतेचा विचार त्यांना 'निधर्मी' अथवा हिंदूविरोधी वाटतो. त्यातच सर्व पानिपत झाले. वफ्फ बोर्डाचा महाविकास आघाडीला मिळालेला जाहीर पाठिंबा हा जनमत विरोधी जाण्याला कारणीभूत ठरला. 

महायुती म्हणजे हिंदू आणि महाविकास आघाडी म्हणजे हिंदू विरोधी असे सरळसरळ चित्र निर्माण झाले.


३) महाविकास आघाडीत समनव्याचा अभाव :- 


अगदी २२ तारखेपर्यंच्या रात्री पर्यंत महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री कुणाचा होणार याची कुरघोडी करत होते. उलट स्पष्ट निकाल लागूनसुद्धा राज्यातील सर्वोच्च संख्या प्राप्त केलेले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला मान देऊन , त्यांनाच पत्रकार परिषदेच्या मध्यभागी बसविले.

फडणवीस स्वतः नागपूर ला दाखल झाल्यानंतर देखील पत्रकारांनी हरतऱ्हेने घेरून सुद्धा स्वतः च्या मुख्यमंत्री पदाबाबत चकार शब्द काढला नाही. आपला संयम कायम ठेवला. निवडणुकीच्या सुरुवातीला वेळच्या वेळी उमेदवारी याद्या भाजपने जाहीर केल्या. त्यांना प्रचाराला भरपूर वेळ मिळाला. ह्या गोष्टी नाकारून चालणार नाही. 


४) पक्षफुटीची सहानुभूती हवेत विरवली. 


सहानुभूती ही कापुराच्या वडी सारखी असते. वेळ जाईल तशी ती कमी कमी होते. गेल्या २ वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या फुटीची सहानुभूती हवेत विरली असून ; यंदाच्या विधानसभेत सहानुभूतीचा शून्य फायदा या दोन्ही पक्षांना झाला. येणाऱ्या काळात नवीन ध्येयधोरणे आखून या पक्षांना जनतेसमोर जावे लागेल. 


एकंदरीत प्रत्येक महाराष्ट्रभिमानी नागरिकाला हा निकाल क्लेशदायक आहे. भाजप जिंकली ह्याचे दुःख तर आहेच मात्र , त्यांनी १५०० रुपयांत जनतेला विकत घेतले. धार्मिक ध्रुवीकरण साधले आणि महाराष्ट्रातील जनतेने ह्याबाबीं कडे पाहून कल दिला ह्याचा जास्त त्रास होतो आहे. ज्या महाराष्ट्राची ओळख पुरोगामी महाराष्ट्र अशी होती. त्या महाराष्ट्रात जनता अश्या प्रकारच्या धार्मिक प्रलोभनांना आणि उत्तरप्रदेश बिहार सारख्या 'फुकट वाटप रेवड्या संस्कृती ' भुलली ह्याचा क्लेश अधिक होतो आहे.


येणाऱ्या काळात उद्याच्या महाराष्ट्राची नव्याने घडी तुम्हाला-आम्हाला बसवावी लागणार आहे . एवढे नक्की..!! 

....✍🏻 निखिल सुभाष थोरवे 

शनिवार , २३ नोव्हेंबर २०२४.






Comments