मराठ्यांनो , व्यावहारिक भूमिका घ्या अर्थात 'प्रॅक्टिकल' व्हा.!


मराठ्यांनो , व्यावहारिक भूमिका घ्या अर्थात 'प्रॅक्टिकल' व्हा.!


स्व.संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणाची राळ एव्हाना शांत झाली आहे. पेटलेला मराठा पुन्हा 'कोषात' गेला आहे. मराठा आरक्षण 'बिना इंजिनाच्या' रेल्वे प्रमाणे रुळावर थंडावले आहे. अश्या परिस्थितीत गोवो-गावच्या मराठे 'यात्रा-उत्सव' तर काहींना आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत.मी यापूर्वी देखील मराठा समाजावर अनेकदा लिहले आहे. पूर्वी दोन लेखांच्या मालिकेच्या रूपाने आपल्यासमोर व्यक्त झालो होतो . अनेकजणांनी ते ब्लॉग्स वाचले देखील असतील , ज्यांनी नाही वाचले त्यांच्यासाठी लिंक कमेंट मध्ये सोडतोय. 


असो , मुख्य मुद्द्यावर येऊ , मराठा आणि मराठा समाज याची या ना त्या मार्गाने होणारी अवहेलना आत्ता 'एक मराठा तरुण' म्हणून मला अत्यंत जिव्हारी लागत आहे. कधी मराठे 'फेक अट्रोसिटी' ला बळी पडतात कधी स्व.संतोष देशमुख यांच्या सारख्या गरिबांसाठी लढणाऱ्या माणसाला जीव गमवावा लागतो. मराठा तरुण व्यसनाधीन होत आहे आणि जे व्यसनाधीन नाही झाले ते हिंदुत्वाच्या गुंगीने आणि कडव्या उजव्या विचारांच्या , द्वेषाच्या 'भगव्या' गुलालात माखले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ३५० वर्षांपूर्वी जाज्वल्य इतिहास आठवत किंबहुना त्यातच रमत , आपण आपला भविष्यकाळ तर कापून काढत नाही आहोत ना ? याचा 'व्यावहारिक' विचार मराठा तरुण आणि तरुणींनी करण्याची आवश्यकता आहे. 


राजपूत (राजस्थानी) लोकांचा इतिहास मराठ्यांच्या तुल्यबळ असून देखील ते लोकं कोणताही बडेजाव न करता आपले राज्य सोडून , आपल्याच राज्यात मोबाईलचे कव्हर विकण्यापासून ते मेडिकल , फर्निचर , मिठाई , हार्डवेअर इत्यादी क्षेत्रात का आले आहेत ? याचा आपण डोळसपणे विचार करणार आहोत की नाही ?  केवळ श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून , परीक्षांच्या काळात गडकोट किल्ले यात्रा करून किंवा अंधभक्ती प्रमाणे ३५० वर्षांपूर्वी घडलेल्या बलिदानाचे स्मरण करत , बलिदान मास पाळण्याने नेमका आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे ? याचा विचार मराठयांनी निश्चित करायला हवा. 


ज्या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपल्याला ह्या धार्मिक आणि ऐतिहासिक उन्मादाचे 'डोस' दिले जात आहेत , तेच , छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हयात असताना त्यांचे 'श्राद्ध' घालू शकतात तर , महाराज किती 'व्यावहारिक' होते हे सिद्ध होत नाही काय ? ह्यातील व्यवहार एवढाच की , 'शंभूराजे निवर्तले' असे समजून मुघल शिथिल व्हावेत आणि शंभूराजे मुघलांच्या तावडीतून सहीसलामत राजगडावर परत यावेत. मग महाराजांचे उठता-बसता नाव घेणाऱ्या मराठ्यांना आपले 'हित' नेमके कशात आहे हे कळत का नाही ? छावा चित्रपट बघून , औरंगजेबाची कबर उखडून टाका म्हणणारे मराठे हे खरे मराठे नाहीत तर ते ,  'सिझनल' मराठे आहेत. 


मुख्य मुद्दा हा आहे की , आपली मराठ्यांची पोरं दंगलीत पुढे , आपली मराठ्यांची पोरं तुळजापूर , रायगड वरून पळत जाऊन ज्योत आणायला पुढे  , आपली मराठ्यांची पोरं पुढाऱ्यांच्या मागे-पुढे करायला पुढे , डिझेल - पेट्रोल घालवून , दर आठवड्याला अमुक - तमुक देवस्थानाच्या नाईट-आऊट पध्दतीने फेऱ्या मारण्यात आपली पोरं पुढे , खोट्या प्रतिष्ठेपाई लग्नात - वाढदिवसाला अनावश्यक खर्च करण्यात आपण मराठे तर सर्वांत पुढे.! 

ही आणि अश्या प्रकारची किती उदाहरणे द्यायची.! 


आपली पोरं कधी जर्मनचा , फ्रेंच भाषेचा क्लास करताना दिसणार नाहीत , आपली पोरं कधी संगीत , नाटक , नृत्य , अभिनय करताना दिसणार नाही. गावातल्या चौकात तीन तास थांबून राहतील मात्र , त्याच चौकात वडापाव - पाणीपुरीची गाडी लावायला त्यांना लाज वाटते. मी अगदी ठामपणे सांगतो , महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या पोरांची थोड्या-बहुत फरकाने हीच परिस्थिती १००% आहे. 


बरं , आपल्या तरुण पोरांची रखडलेली लग्ने हा तर एक गंभीर विषय आहे. स्थावर मालमत्ता आणि सुपीक शेती गडगंज असणारे , नापीक शेती गडगंज असणारे , स्थावर मालमत्ता आणि सुपीक शेती अत्यल्प असणारे , नापीक शेती अत्यल्प असणारे शेतीच नसणारे मात्र थोडीफार स्थावर मालमत्ता असलेले आणि सर्वांत वाईट शेती आणि स्थावर मालमत्ता दोन्ही नसलेले असे प्रकार मराठा समाजात आहेत. मी मागे एकदा म्हणालो होतो की , 'टोकाची श्रीमंती' आणि 'टोकाची गरिबी' असे दोन्ही समाजरचनेचे प्रकार आपल्या मराठा समाजात आहेत. विशेष म्हणजे मराठा समाजातील मुलींच्या पालकांच्या अवास्तव अपेक्षा आपल्याच पोरांची लग्ने रखडवायला कारणीभूत आहेत. चांगला मुलगा वाटला की मुलगी देऊन टाकावी ही व्यावहारिक भूमिका मुलीच्या पालकांनी घ्यावी असे माझे प्रामाणिक मत आहे. अर्थात या सगळ्यावर व्यापक सामाजिक जागृती मराठा समाजात होणे आवश्यक आहे.


मराठ्यांच्या या दैन्यावस्थेवर सरळधोपट प्रश्न विचारला जातो , आजवर मराठी जातीचे मुख्यमंत्री सर्वाधिक झाले , अगदी आजही आणि पूर्वीसुद्धा मराठा जातीचे आमदार महाराष्ट्रात अधिक आहेत . ही जात 'राज्यकर्ती' आहे . मग तरीही आज गाव-खेडी मराठा समाजाच्या तरुणांची दुर्दैवी अवस्था का झाली आहे ? वरील सर्व प्रश्न अतिशय रास्त आहेत मात्र , ह्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधत आपण गेलो तर , आपल्याला उमजेल की , मराठा समाजातील अगदी नगरसेवक , आमदार , खासदार , मंत्री अथवा मुख्यमंत्री आदी मंडळींनी सर्वांगीण समाजाचा विचार करतात. कधी जातीभेद करत नाही. मी अगदी माझेच उदाहरण देतो माझे एक 'प्रतिष्ठित' नातेवाईक आहेत. एका सहकारी बँकेत मी नोकरीसाठी जेव्हा , प्रयत्न करत होतो तेव्हा , परीक्षेला मार्क्स चांगले पाडून सुद्धा शिफारशीची वेळ आली तेव्हा , मात्र त्या प्रतिष्ठित नातेवाईकाने ओबीसी समाजाच्या एका मुलाला संधी दिली . का तर ? व्होट बँक .! 


मुळात मराठा ही जातच पूर्वीपासूनच राज्यकर्ती असल्याने त्यांनी सर्वसमावेशक भूमिका स्वीकारली आहे. एक जात म्हणून मराठ्यांनी कधी स्वतःच्या जाती पुरता विचार कधीच केला नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिकण्यासाठी मदत करणारे , बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड असतील किंवा कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज असतील , या सर्वांनीच सर्वसमावेशक विचार करत सामाजिक सलोखा वृद्धिंगत केला. 


मात्र , आधुनिक काळात या सलोखा दुर्दैवाने व्होट बँक मध्ये परावर्तित झाला. त्यामुळे काही 'सन्मानीय' उदाहरणे सोडली तर , मराठा प्रस्थापित मंडळींनी आपल्या सोबतच्या मराठ्यांना अक्षरशः गृहीत धरले. याचाच अर्थ श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना कधी 'जातबंधू' म्हणून पहिलेच नाही. त्यांनी कमावलेल्या धनसंपत्ती , आस्थापना यांवर गरीब मराठा समाजाची पोरं कामासाठी / नोकरीसाठी अभावानेच आढळतात ही वस्तुस्थिती आहे. जी कुणीही नाकारू शकत नाही.


सामाजिक , आर्थिक नाड्या वरील प्रस्थापित मंडळींकडे असल्याने गरीब मराठा या प्रस्थापितांच्या विरोधात जाण्याचे धाडस करत नाही . परिणामी श्रीमंत मराठे अधिक समृद्ध आणि गरीब मराठे अत्याधिक गरीब बनत चालले आहेत. ही त्यामधील खरी मेख आहे. 


आत्ता , तुम्ही म्हणाल या सगळ्यावर उपाय काय ? मी म्हणेल "मराठ्यांनो , व्यावहारिक भूमिका घ्या अर्थात प्रॅक्टिकल व्हा.!"

आत्ता , तुम्ही म्हणाल 'प्रॅक्टिकल' व्हा म्हणजे नेमके काय करायचे ? अधिक तपशीलवार समजावतो. 


१) आपला भविष्यात फायदा होईल ह्या अपेक्षेने कोणत्याही युवा नेता , भाऊ , दादा , आबा , आण्णा , नगरसेवक , आमदार अगदी मंत्री - मुख्यमंत्री सुद्धा यांच्या मागे पुढे करू नका. एकतर त्यांचे प्राधान्यक्रम हे त्यांच्या सोयीने बदलतात ज्यात गरीब मराठ्याला 'शून्य' स्थान असते. दुसरे म्हणजे , व्यक्तिगत 'इगो' मुळे ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यांना 'पाणी' लावत बसण्यापेक्षा स्वाभिमानाने 'चार' पाऊले टाकण्यास सुरुवात करा थोड्या दिवसांनी तुमच्या लक्षात येईल चिकाटीने , जिद्दीने खूप मोठा पल्ला तुम्ही गाठलेला आहे.


२) धर्म , जात , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , हिंदू , मुस्लिम द्वेष , ब्राम्हण द्वेष , ख्रिश्चन द्वेष अश्या कोणत्याही जाती-धर्माबद्दल माथी भडकवणाऱ्या संघटना / व्यक्ती / मित्रमंडळी यांपासून मराठ्यांनी 'चार हात लांब' राहावे. आजवर 'शिवसेना' असेल किंवा मनोहर कुलकर्णी ची 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' संघटना असेल या सर्वांनीच 'भोळ्या भाबड्या' आणि मुख्य म्हणजे 'गरम डोक्याच्या' मराठा समाजातील तरुणांची माथी भडकावून आपले ध्येय साध्य केले. 

यापेक्षा , जिथे चार - पैश्याचा फायदा होतो तिथेच वेळ द्या ,  लक्षात ठेवा , "आपण इतके हलके नाही की , कुणीही सहज आपला फायदा उचलेल..!"


३) शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे . मराठ्यांनी सरसकट आत्ता शिक्षण प्रधान जात बनण्यास प्राधान्य दिले पाहिजे. सध्याच्या आरक्षण प्रक्रियेमुळे विषमता निर्माण झाली आहे हे निश्चितच खरे असले तरी , हाताला काम मिळणारे शिक्षण घेणे. विविध क्षेत्रात जाण्यासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहित करणे हे येणाऱ्या काळात क्रमप्राप्त ठरणार आहे. स्किल्ड बेस्ड एज्युकेशन सिस्टीम राबवून आपण खूप मोठे परिवर्तन घडवू शकतो.


४) मतांची ताकद निर्माण व्हावी - राज्यात बहुसंख्येने असणारी एक जात एकजुटीने राहिली तर , राज्यात मोठा 'दबावगट' निर्माण करू शकते. पण , आपली पारंपरिक अडचण एकजूट नसणे हीच आहे. चंद्रराव मोरे पासून ते अनादी काळापासून हा आपल्याला शाप आहे. मात्र , त्यावर मात ही करावीच लागेल . श्रीमंत मराठ्यांना द्या सोडून , किमान गरीब मराठ्यांनी तरी एकमेकांच्या मदतीला उभे राहिलेच पाहिजे. तरच हे साध्य होईल. 


याशिवाय बऱ्याच गोष्टी दृष्टिक्षेपात आहेत. बघू आई जगदंबा जो मार्ग दाखवेन त्या मार्गाने विचार करू. 


तूर्तास एवढेच..!


....✍🏼 निखिल सुभाष थोरवे 

दि.१५ एप्रिल २०२५

Comments