अजित दादांनंतर प्रश्नच प्रश्न...



अजित दादांनंतर प्रश्नच प्रश्न...

अजित दादा अचानक गेले…
खरं सांगायचं तर २८ जानेवारीच्या सकाळी साधारण पावणे नऊच्या सुमारास ही बातमी कळली आणि मन अक्षरशः हादरून गेलं. नियती एवढा क्रूर धक्का कसा देऊ शकते, हाच विचार सतत मनात घोळत राहिला. दुपारी कुटुंबासह बारामतीकडे निघालो. संध्याकाळी पोहोचल्यानंतर अजित दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि आठवणींचा पूरच मनात दाटून आला.

त्यानंतर सोशल मीडिया उघडला आणि जे दृश्य दिसलं, त्याने प्रचंड चीड निर्माण झाली. जे लोक कालपर्यंत अजित दादांना शिव्या घालत होते, त्यांच्यावर एकेरी टीका करत होते, तेच लोक आज छातीठोकपणे दादांच्या कर्तृत्वाच्या गाथा गाताना दिसत होते. गंमत म्हणजे अगदी दहा–पंधरा दिवसांपूर्वी ज्या आमदार महोदयांनी अजित दादांचा उल्लेखही एकेरीत केला होता, त्यांनी अचानक सोशल मीडियावर श्रद्धांजलींचा महापूर आणला.

मी सोशल मीडियावर घडणाऱ्या गोष्टी अत्यंत बारकाईने निरीक्षण करतो. याच संदर्भात त्याच आमदारांनी सुरुवातीला एक औपचारिक पोस्ट टाकली होती , “मतभेद असले तरी एखाद्या व्यक्तीचं मरण अयोग्य आहे” अशा आशयाची. मात्र नंतर आपण आपल्या लायकीपेक्षा जास्त काहीतरी बोलून गेलो आहोत, हे लक्षात आल्यानंतर ती पोस्ट तातडीने डिलीट करण्यात आली. त्यानंतर मात्र “अजित दादा लोकनेते होते”, “पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार होते” अशा पोस्टचा अक्षरशः धडाका सुरू झाला, जो आजतागायत सुरूच आहे.

खरं तर या ढोंगीपणाचा मला प्रचंड संताप आहे. कारण या सगळ्याच्या मागे एकच कावा आहे , अजित दादा गेल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेल्या प्रचंड पोकळीत आपले हातपाय कसे पसरवता येतील, हाच क्रूर आणि निर्दयी प्रयत्न.

अजित दादांचा अपघात घातपात होता का, हा प्रश्न चौकशीअंती स्पष्ट होईल किंवा होईलच याची खात्री नाही. निष्पक्ष चौकशी होईल का, हा देखील प्रश्नच आहे. जर विमान नादुरुस्त होतं, तर ते नादुरुस्त विमान अजित दादांच्या ताफ्यात का ठेवण्यात आलं? पायलटचा ट्रॅक रेकॉर्ड खराब असताना त्याच्यावर ही जबाबदारी का सोपवण्यात आली? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
असो… जे घडून गेलं ते घडून गेलं. कितीही माथा-फोडी केला तरी अजित दादा पुन्हा येणार नाहीत, हे त्रिवार सत्य आहे. हे सत्य अजित दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक समर्थकाने स्वीकारलं पाहिजे.

शिव–शाहू–फुले–आंबेडकरांची विचारधारा सोडून जेव्हा अजित दादा भारतीय जनता पक्षासोबत महायुतीत गेले, तेव्हा मनात राग आला होता. पण प्रॅक्टिकल पॉलिटिक्सच्या दृष्टीने पाहिलं, तर सत्तेत राहिल्याशिवाय कार्यकर्त्यांना बळ देता येत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे अजित दादांचा निर्णय कालसापेक्ष होता. मात्र ते जर महाविकास आघाडीत राहिले असते, तर आजचं चित्र काहीसं वेगळं असतं, असं वाटल्यावाचून राहत नाही. पण आता या सगळ्या गोष्टींना फारसा अर्थ उरलेला नाही.

आज निवडून आलेल्या आमदार आणि नगरसेवकांपुढे एकच यक्षप्रश्न आहे ; आपली कामं कोण करणार? पुणे असो वा पिंपरी-चिंचवड, सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे. ज्या अपेक्षेने आणि आशेने ही मंडळी अजित दादांशी जोडली गेली होती, तीच आशा आता मावळताना दिसते.

बारामतीचं उदाहरण घ्यायचं झालं, तर हा धनगरबहुल मतदारसंघ आहे. आता उपजत धनगर इच्छुक उमेदवार डोकं वर काढतील. बारामतीचं विकासचक्र थांबेल का? निधी मिळेल का? सक्षम नेतृत्व उभं राहायला किती वेळ लागेल? अडलेली कामं पूर्ण होतील का? गुंडगिरी वाढेल का? राजकीय महत्त्वाकांक्षा उफाळून येतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे , अजित दादांनी उभारलेली स्वच्छ, सुंदर बारामती किमान मेंटेन तरी राहील का? वेळेत पाणी मिळेल का? असे अनेक प्रश्न अजित दादांनी मागे सोडले आहेत.

याचं एकच कारण आहे , अजित दादांनंतर ठोस असं नेतृत्व आज उभं दिसत नाही. त्यांच्या दोन्ही चिरंजीवांची योग्यता, क्षमता आणि विश्वासार्हता सगळ्यांसमोर उघडी पडलेली आहे. सध्या जी घाई दिसते आहे, ती काही नेत्यांनी आपली स्पेस वाचवण्यासाठी सुरू केलेली धडपड आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य असेल, तर काही नेत्यांचं वागणं आश्चर्यकारक वाटत नाही. कारण एकत्रीकरण झालं, तर त्यांचं महत्त्व कमी होणार आहे आणि ते त्यांना मान्य नाही.

या पार्श्वभूमीवर, अजित दादांच्या सुविद्य पत्नींना एक कळकळीची विनंती करावीशी वाटते , ही वेळ वैयक्तिक स्वार्थ पाहण्याची नाही. उपमुख्यमंत्रीपद किंवा राष्ट्रीय अध्यक्षपद स्वतःकडे ठेवणं दीर्घकालीन हिताचं ठरणार नाही, असं एका बारामतीकर म्हणून प्रामाणिकपणे वाटतं. राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेत गेली, तरी उपमुख्यमंत्रीपद योग्य आणि सर्वमान्य व्यक्तीकडे राहणं पक्षासाठी हिताचं ठरेल.

पार्थ आणि जय पवार यांच्या राजकीय मर्यादा लक्षात घेता, त्यांनी राजकारणात न पडलेलंच बरं, असं अनेकांचं मत आहे. मात्र रोहित पवारांसारखं नेतृत्व आज बहरत आहे. त्यांना वाव दिला, उद्याची बारामती त्यांच्या हातात दिली, तर पुढील दहा–पंधरा वर्षांत खऱ्या अर्थाने नेतृत्व घडू शकतं आणि राष्ट्रवादीची विचारधारा जिवंत राहू शकते.

अर्थात , हे सगळं होईलच याची खात्री नाही. उलट जर दादांच्या पत्नीने मी  म्हंटल्याप्रमाणे काही निर्णय घेतले तर पवार कुटुंब भाजपचं बाहुलं बनण्याची भीती मनात आहे. दादांचा चाहता म्हणून ही अनामिक भीती सतत रुंजी घालत आहे.

दादा गेल्यानंतर होणाऱ्या हारतुऱ्यांना फारसा अर्थ नाही. ज्यांनी हयातीत दादांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याकडून आज होणाऱ्या स्तुतीला काहीच किंमत नाही. अजित दादा नेमके कसे होते, हे ज्यांनी अनुभवले आहे, त्यांच्यासाठी ते काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

अजित दादांच्या जाण्याचं खरं नुकसान कळायला चार–पाच वर्ष जातील. जेव्हा निधी अडेल, कामं थांबतील, मंत्रालयात अ‍ॅक्सेस मिळणार नाही, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला कळेल ; अजित दादा नेमकी काय चीज होते.

अजित दादांसारखं नेतृत्व शंभर वर्षांत एखादंच घडतं. ते पुन्हा येणार नाही, पण त्यांची उणीव भरून काढण्याची जबाबदारी आता संपूर्ण पवार कुटुंबावर आहे. जर स्वार्थ बाजूला ठेवून निर्णय घेतले, तर त्यातून अनेकांचं कल्याण होऊ शकतं.
शेवटी एवढंच ; 
अजित दादांना अश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.

✍🏻 निखिल सुभाष थोरवे

Comments