रोहितदादा आरंभशूर होऊ नका ; हात जोडून विनंती.!


रोहित दादांची पावणे दोन तासांची स्फोटक पत्रकार परिषद पाहिली… आणि मनातली एक शंका, जी आजवर साधारण ७० टक्के होती, ती थेट १०० टक्क्यांवर जाऊन ठेपली.


अजित दादांचा अपघात होता, की तो घातपात होता ही शंका गेल्या १३ दिवसांपासून काही नवीन नाही. बारामतीचा व्यक्ती म्हणून अनेक चांगल्या चांगल्या व्यक्तींनी मला याबाबत विचारणा केली होती. मात्र कोणताही ठोस पुरावा नसताना बेजबाबदार वक्तव्य करणं माझ्या बुद्धीला कधीच पटलेलं नाही. त्यामुळे मी अनेकांना खाजगीत, स्पष्टपणे सांगत आलो की हा अपघातच असावा.


पण…

रोहित दादांच्या सविस्तर, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण पत्रकार परिषदेनंतर मात्र ती भूमिका टिकवून ठेवणं अशक्य झालं.

आज खात्रीने सांगता येईल हा अपघात नव्हताच.

हा घातपातच होता.


अजित दादांसारखा लढणारा, न झुकणारा, न थकणारा नेता कुणाच्या डोळ्यात खुपत नसेल, तरच नवल. मागील काही महिन्यांतील अजित दादांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला, तर जे घडलं त्यामागे कोणत्या “महाशक्ती” असतील, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज भासत नाही.


रोहित दादांनी घातपाताची संपूर्ण प्रोसेस अत्यंत क्रमवार समजावून सांगितली. मात्र ; सूत्रधारांवर थेट वाच्यता टाळली, पण पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्याचं नाव त्यांनी घेतलं आणि ते नावच पुरेसं बोलकं आहे.


आज तोच नेता कुणाची तळी उचलतोय, हे अख्ख्या महाराष्ट्राने अजित दादांच्या अंत्यविधीनंतर पाहिलं आहे. इतकंच नव्हे, तर एका पॉलिटिकल कन्सल्टंटचं नावही रोहित दादांनी घेतलं.

अनेक गोष्टी मांडल्या.

अनेक संदर्भ दिले.

अनेक धागेदोरे जोडले.


म्हणूनच अभ्यासूंनी, सजग नागरिकांनी आणि राजकारण समजून घ्यायची इच्छा असलेल्या प्रत्येकाने ही पावणे दोन तासांची पत्रकार परिषद नक्की पाहावी त्यातून बोध होईल, दिशा मिळेल.


मात्र माझ्यासारख्या शिव–शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीवर श्रद्धा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात एक शंका अजूनही रेंगाळते आहे.


ज्या “महाशक्तीं”विरोधात हा लढा आहे, त्या लढ्यात पवार फॅमिली नेहमीच कुंपणावर उभी राहिलेली दिसते. राहुल गांधी ज्या प्रसिद्ध उद्योगपतीचं नाव खुलेआम घेतात, राज ठाकरे ज्या उद्योगपतीबाबत बेधडक बोलतात, त्याच उद्योगपतीची गाडी रोहितदादा चालवतात, पवार कुटुंबीय स्वागताला हजर राहतात,

सुप्रिया ताई त्यांना मोठ्या भावाचा दर्जा देतात. आणि हाच उद्योगपती , ज्यांचे खरे “आका” म्हणजेच त्या 'महाशक्ती' आहेत. त्यांच्याविरोधातच रोहित दादांच्या आजच्या पत्रकार परिषदेचा रोख कालांतराने जाणार आहे, हे आता स्पष्टपणे दिसतंय.


आज जरी रोहित दादांनी थेट राजकीय भाष्य टाळलं असलं,

तरी एक गोष्ट मात्र नक्की , आज ना उद्या, त्यांना या सूत्रधारांची नावं घ्यावीच लागणार आहेत. कारण ; विमान कंपनी मध्ये कितीही अनियमितता असली कितीही झोल-झाल , प्रवाश्यांच्या सुरक्षेमधील त्रुटी असल्या तरी त्या 'किलर कॉन्ट्रॅक्ट' अश्या स्वयंप्रेरणेने घेऊ शकत नाही. हे सुज्ञ माणसाला निश्चितच समजते.


मात्र इथेच रोहितदादांचा मला एक वेगळाच पॉलिटिकल अजेंडा दिसतोय. ज्या पद्धतीने रोहित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सुप्रसिद्ध “चांडाळ चौकडी”ला थेट टार्गेट करत आहेत आणि त्याचवेळी सुनेत्रा काकी, पार्थ पवार, जय पवार यांच्याबाबत सॉफ्ट भूमिका घेत आहेत, त्यातून एक शंका मनात येते , कदाचित , रोहितदादा यांना सत्तेत बसायचे तर आहे मात्र , स्वतःच्या टर्म वर.!


या घातपात प्रकरणावरून त्यांना स्वतःची सत्तेमधील बार्गेनिंग पॉवर तर वाढवायची नसेल कश्यावरून ..? कारण ; एवढ्या बलाढ्य महाशक्तीला शिंगावर रोहितदादा घेणार नाहीत असा माझा (खरा) समज आहे .! कारण ; या महाशक्तीला शिंगावर घेतले तर काय होते हे एव्हाना सर्वांनाच कळून चुकले आहे. तेवढा त्याग , त्रास ते सहन करतील आणि ते सुद्धा या नाजूक टप्प्यावर असे काही मला वाटत नाही. आणि खरे सांगायचे तर ते राजकीय शहाणपणाचे सुद्धा नसेल..! 


त्यामुळे राज्य सरकारच्या सत्तेच्या अधिक जवळ जाण्यासाठीच ही खेळी तर नाही ना हा प्रश्न  माझ्यासारख्या एका तळमळीच्या, प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मनात ही शंका येणं साहजिक आहे.


कारण ; इतिहास साक्षी आहे ; महाशक्तींविरोधातील लढ्यात पवार कुटुंबीय नेहमीच काठावर राहिलं आहे. म्हणूनच गेल्या ११ वर्षांपासून ते आजवर या लढ्याला कधी अपेक्षित धार मिळाली नाही.


असो , सध्यातरी शंका-कुशंका बाजूला ठेवू आणि सर्व खरे-खरे आहे असे घडीभर मानून चालले तर ; आजची रोहित दादांची पत्रकार परिषद ही सुरुवात नक्कीच आहे.

पण ती शेवटापर्यंत जाईल का.?


अजित दादांवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे ; जर हा लढा खरा असेल, तर तो पूर्णत्वास न्यावा.


रोहित दादा,

सुरुवात केली आहे…

पण शेवटही पूर्ण करा.

आरंभशूर होऊ नका 

एवढीच कळकळीची, मनापासूनची हात जोडून विनंती.

✍🏻 निखिल सुभाष थोरवे


Comments