बारामतीकरांच्या नजरेतून : सुनेत्रा पवारांची निवड, सत्तेची गणितं आणि त्यामागचे संभाव्य राजकीय परिणाम


बारामतीकरांच्या नजरेतून : सुनेत्रा पवारांची निवड, सत्तेची गणितं आणि त्यामागचे संभाव्य राजकीय परिणाम


एक बारामतीकर म्हणून सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड मला सुतराम आश्चर्यकारक वाटत नाही. कारण एक बारामतीकर म्हणून त्यांच्या कार्यशैलीचा, स्वभाववैशिष्ट्यांचा आणि राजकीय महत्त्वाकांक्षेचा मी जवळून साक्षीदार आहे.


सत्ता केंद्रे आपल्या हातात असावीत, सत्तेच्या स्पर्धेत आपण कधीच मागे राहू नये, हा त्यांचा स्वभाव अगदी सुरुवातीपासूनचा आहे. त्यांच्या मागील वाटचालीकडे पाहिलं, तर ही भूमिका सातत्याने दिसून येते. सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीत अगदी बिनविरोध विजयी होतीलच . पार्थ पवार सुद्धा राज्यसभेवर अलगद जातील. पण , लॉंग टर्मचा विचार या मागे काय ? ह्याचा विचार करायची सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची मानसिकता दिसत नाही.  


अगदी , सुनेत्रा पवारांचा सुरुवातीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला, तर पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीमागे सुनेत्रा पवार यांचाच ठाम आग्रह होता. त्याच आग्रहामुळे पवार साहेबांना माढा लोकसभेची उमेदवारी सोडून पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी द्यावी लागली, हा इतिहास आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे आज जे काही घडत आहे, ते पाहून मला काहीही नवीन वाटत नाही. 


मात्र, या सगळ्या निर्णयांचे नेमके परिणाम काय होतील, याचा सखोल विचार सुनेत्रा पवार यांनी केल्याचे जाणवत नाही. आजच्या घडीला प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, छगन भुजबळ ही सर्व मंडळी भाजपच्या वळचणीला जाण्यास इच्छुक आहेत. त्यांना सत्तेचा वाटा कायम ठेवायचा आहे. दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास या मंडळींचे राजकीय महत्त्व कमी होईल, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि जरी त्या सत्तेत सहभागी झाल्या, तरी राज्यातील सत्तेचं केंद्र जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्याकडेच राहील, तर केंद्रातील सत्तेचं वजन सुप्रिया सुळे यांच्याकडेच असेल, ही वस्तुस्थिती आहे.


आजच्या घडीला अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये शरद पवार हेच एकमेव बळकट आणि सर्वमान्य नेतृत्व उरलेले आहे. त्यामुळे भविष्यात विलिनीकरण झालंच, तर त्यांचं राजकीय वजन पक्षात टिकून राहणार, हे उघड सत्य आहे. याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा डाव आखला आणि तो यशस्वी देखील झाला. 


अर्थात या सगळ्या राजकीय घडामोडींचा अंतिम फायदा हा भारतीय जनता पक्षालाच आणि विशेषतः फडणवीसांच्या राजकीय रणनीतीला होणार, हेही तितकंच खरं आहे. सुनेत्रा पवार यांना ना पक्ष संघटनेचा प्रत्यक्ष अनुभव आहे, ना प्रशासनाचा. त्या हलक्या कानाच्या आहेत, त्यांच्या भोवती कायम विशिष्ट मंडळींचं कोंडाळ असतं, हे सर्वसामान्य बारामतीकरांना चांगलंच माहित आहे. ‘मलिदा गॅंग’ , लाभार्थी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडळींचा प्रभाव त्यांच्या निर्णयांवर कायम राहिलेला आहे.


अशी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रभावी व सक्षम नेतृत्व करू शकणार नाही, याची पूर्ण जाणीव सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना आहे. त्यामुळेच सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःची सत्ता, स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा जपण्याचा हा प्रयत्न आहे.


अर्थात सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याची तीव्र इच्छा सुनेत्रा पवारांची होती, हे सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळेच अगदी सुतक न संपताच, तिसऱ्याच दिवशी त्यांनी पवार साहेबांना न सांगता मुंबई गाठली. 


अर्थात सत्ता कुणाला नको असते? मात्र या स्वार्थी निर्णयामुळे पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याहून महत्त्वाचं म्हणजे पवारांचं राजकीय अस्तित्व पुसून टाकण्याच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे गती मिळाली आहे, हे कटू वास्तव आहे.


बाकी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नाही, हे मी आत्ताच ठामपणे सांगू शकतो. कारण अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची सध्याची मानसिकता तशी दिसत नाही.


शेवटी, अजित पवारांचा खरा वारसदार कोण, हे ठरवण्याचा अधिकार हा कुणाही नेत्याचा नाही, तर तो थेट जनतेचाच आहे आणि तो निर्णय जनता योग्य वेळी देईल, याबाबत मात्र कोणतीही शंका नाही.


सत्ता मुबारक हो ...! सुनेत्रा पवार.


✍🏻 निखिल सुभाष थोरवे

Comments