महाराष्ट्रभिमानी जनता 'एक' व्हा , भाजपला हद्दपार करून 'सेफ' व्हा..!!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला रंग चढत आहे. यंदा लढाई ही महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही तुल्यबळ प्रतिस्पर्धी यांच्यात होत आहे. लोकसभेतील पराभवाने महायुतीला चांगलेच जमिनीवर आणले असले तरी , ते लाडक्या बहिणींच्या लाटेवर स्वार होऊन , सध्या आघाडीवर असल्याचे भासवत आहेत. पण तितकेसे खरे नाही कारण ; फक्त लाडक्या बहिणींची जाहिरातबाजी करून जिंकता येणार नाही याची स्पष्ट कल्पना भारतीय जनता पार्टीला आहे.
विशेषतः गेल्या निवडणुकीत मराठवाड्यात बसलेल्या जरांगे फॅक्टरचा फटका कमी करण्यासाठी आणि मुस्लिम सोडून सर्व हिंदू 'व्होट बँक' आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी पुन्हा १९९० च्या दशकातील 'गर्व से कहो हम हिंदू है .! चे पुढील आक्रमक व्हर्जन - ' बटेंगे तो कंटेंगे ' आणि सॉफ्ट व्हर्जन 'एक है तो , सेफ है' लॉन्च केले आहे. अर्थात तो त्यांच्या निवडणुक रणनीतीचा भाग आहे.
विकासकामांच्या नावावर सगळी बोंबाबोंब असल्याने भाजपने त्यांची लोकप्रिय 'धर्माच्या अफूची गोळी' पुन्हा 'नवे पॅकिंग' करून बाजारात आणली आहे. ही गोळी विकत घ्याल तर , पुन्हा गुजरातचे ढोकळे खात बसाल..!
कोविडची २.५ वर्षे वगळून टाकली तर , नंतर फोडाफोडी करून सत्तेत आलेल्या आणि पुन्हा फोडाफोडी करून मजबूत झालेल्या महायुतीने विकासाच्या नावाखाली फक्त 'गुजरातची तळी उचलण्याचे' काम केले. उद्योग व्यवसायात आघाडीवर असलेले आपले राज्य आज क्रमांक ०७ वर जाऊन पोहोचले आहेत. राजरोसपणे उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रातील तरुणांना अनेक उद्योग व्यवसाय गुजरात मध्ये जाताना बघावे लागत आहेत. शहरे बकाळ होत आहेत. ट्रॅफीक मध्ये लोकांचा जीव गुदमरून जातोय. अगदी १० किमी अंतराच्या प्रवासाला २-२ तास मोडत आहेत. शेतकऱ्यांना तर वाली उरला नाही अशी परिस्थिती आहे. मुली-महिलांवर शाळा महाविद्यालयात अत्याचार होत आहेत. खुलेआम कोयते हल्ले आणि गोळीबार होत आहे. कायदा सुव्यवस्था 'व्हेंटिलेटरवर' असताना , भाजप आणि सत्ताधाऱ्यांना
' बटेंगे तो कंटेंगे ' किंवा 'एक है तो , सेफ है' अशी चिंता सतावत आहे.
महाराष्ट्रातील उपजत असलेला सामाजिक सलोखा बिघडण्याचे काम महायुती करत आहे. त्यांनी काढलेले 'धर्मवीर' सारखे प्रपोगंडा सेट करणारे चित्रपट असुदेत किंवा नेते मंडळींची मी किती कट्टरतावादी हिंदुत्व मानतो हे दाखविण्यासाठीची धडपड असुदेत. ह्या सगळ्या याच मोहिमेचा भाग आहेत.
ह्यांच्या 'पवित्र भगव्या टिळ्यामागे ' सत्तापिपासू बुद्धी कार्यरत आहे. त्यामुळे ; महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने हा कावा ओळखण्याची आवश्यकता आहे.
' बटेंगे तो कंटेंगे ' किंवा 'एक है तो , सेफ है' पेक्षा महाराष्ट्राला खरी गरज आहे पुन्हा सुजलाम सुफलाम बनविण्याची आणि नवे उद्योग व्यवसाय आणून , प्रादेशिक समतोल साधण्याची..!
खरे तर , ह्यांच्या भडकाव्याला भूलणाऱ्या विशेषतः २००० नंतर जन्मलेल्या पिढीने , विकासाच्या आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला स्मरून मतदान करण्याची आवश्यकता आहे. कारण अशी ५-५ वर्ष आपली जर वाया गेली तर महाराष्ट्र टॉप १० च्या देखील खाली फेकला जाईल आणि आज जी भरभराट , मॉल , चकाचौंद दिसते आहे ती नष्ट होईल. सगळा सत्यानाश होईल.
तेव्हा , विचार करा एक व्हा आणि भाजपला हद्दपार करून सेफ व्हा..!!
....✍️ निखिल सुभाष थोरवे
दि. १४ नोव्हेंबर २०२४.
Comments
Post a Comment