माझ्या गावातील कलंदर माणूस
माझ्या गावातील कलंदर माणूस
खरं म्हणजे प्रत्येक गाव खास असतं , त्या प्रत्येक गावाला त्याचा असा खास फ्लेवर आहे , कोल्हापूरचा रांगडेपणा तुम्हाला पुण्यात दिसणार नाही .. पुण्याची शिस्तप्रिय जमात तुम्हाला साताऱ्यामध्ये आढळणार नाही .. मुंबई सारखी मन मोकळं कौतुक करायची पद्धत तुम्हाला नाशिकमध्ये आढळणार नाही .. ह्या माणसांमुळे ह्या सगळ्या गावांना स्वतःचा असा एक बाज येतो .. फ्लेवर येतो आणि या सगळ्यांवर
" Cheery on the Cake "असं इंग्लिश मध्ये म्हणतात अशी काही लोकं असतात ज्यांना त्या गावाच्या नावाने नाही तर काही गावांना ह्या कलंदर व्यक्तिमत्त्वमुळे ओळखले जाते ....
कलंदर शब्द मुळचा फारशी वैगेरे आहे .. "जो ईश्र्वराशी एकरूप झालाय , आणि जो संसाररुपी गाडा ओढायच्या मनःस्थितीत नाहीये ! वैगेरे ... वैगेरे अर्थ निघू शकतीलही !!..
पण माझ्या मते कलंदर जो असतो ज्याच्याकडे , सामान्य माणसाने बघित्यावर , त्या सामान्य माणसाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते ... आणि तो म्हणतो
" यार हा जे करतोय ते ग्रेट आहे !! , ते आपल्याला जमणार पण नाही !! "
कदाचित ,
"तो काय तरी हटके जगतोय यार , अशी लाईफ पहिजेन भाऊ !!"
ही आर्त किंकाळी सर्व सामान्य पामराने " काढली तर समजायचं आपण कलंदर माणूस बघितलाय........
असाच एक कलंदर मी पण बघितलाय , गेले अनेक वर्ष ज्याला मी जवळून अनुभवतोय तो म्हणजे
सतीश रामचंद्र ननावरे
गाव ~ बारामती , जिल्हा ~ पुणे
बारामती ~ नीरा रोडला वैष्णवी ग्राफिक्स नावाचे शोरूम आहे , मोठे भव्य शोरूम , डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग ची मोठी फर्म , Advertising , Publicity ची मोठी फर्म ते चालवतात...
साधारण साडे 5 फूट उंचीचा , गोरा रुंद चेहरा , दाट मिश्या , बारीक काडीचा चष्म्यातून डोकावणारी तीक्ष्ण पण तितकीच आश्वासक नजर .. कलाकाराला शोभून दिसणारा दिलखुलास अंदाज , पण तितकाच लवकर बदलणारा वेग~वेगळा मूड असे दिव्य पार करत करत आपण ह्या माणसाला जाणून घेऊ शकतो
तसे म्हणायला गेलं तर माझे दाजी पण त्यांच्या परवानगीने मी ह्या लेखात तटस्थपणे त्यांना चितारायचे असल्याने मी त्यांना अरे तुरे संबोधनार , अर्थात त्यांच्या परमिशन नुसारच !!
बारामती गाव तस कुणाला ओळख करून द्यायची गरज नाही .. महाराष्ट्राची राजकीय राजधानी .. किंबहुना देशाच्या राजकारणातील एक महत्वाचा केंद्रबिंदू म्हणा हवं तर ... !!
सतीशचा जन्म सोनगाव , जिथं निरा आणि कऱ्हा नदीचा संगम होतो ते ठिकाण . बारामती शहरापासून 8 ~ 9 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं गाव ...नदीमुळे शेतीची अवस्था ठीक ठाक असली तरी 1 ते दीड एकरच्या शेतात सुबत्ता नांदेल , ही बाब त्याही काळात कठीणच होती आणि आताही परिस्थती काही वेगळी नाहीये....असो
वडील शेती जमेल तशी रेटायचे आणि आई माऊली भाजी विकायची एक भाऊ आणि एक बहिण असा तुटपुंजा उत्पन्नावर हे कुटुंब उदरनिर्वाह करायचं आणि अश्या वेळेस एक शेतकरी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आपल्या धाकट्या पोराला शिकवायला पुण्यात पाठवतो .
बरं , तो काय शिकणार ??
त्याने नेमका आपल्या परिस्थितीमध्ये काय बदल होणार ??
तो क्लर्क होणार का मामलेदार होणार ??
का बँकेत चिकटणार ???
याची सुतराम शक्यता नसलेला तो बाप .. पोरावर विश्वास टाकतो ....
आणि तुला काय करायचं आहे ते नीट कर फक्त एवढ्या दोन वाक्यावर तो पुण्याला पाठवतो , हे मोठे विस्मयकारक आहे आणि आत्ताचे JEE आणि CET आणि NEET साठी आपल्या पाल्यांना pressurise करणारे पालक पाहिले की काळजात धस्स होते !!
मन मारून जगायला लावायची एक वेगळीच पिढी आपण आपल्या हाताने बेलामुणपणाने वाढवतोय आणि एक मुर्दाड जमात लॉट च्या संख्येने तयार करतोय .. त्यांच्यात असलेल्या कॅलिबेरचा विचार न करता त्यांना पुढे ढकलतो आहे अगदी निर्दयी कसायासारखे ... !!
साधारण 18 ते 19 वर्षांपूर्वीचा काळ असेल GD ARTS ची पदवी उत्तम मार्कने पास करून पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातुन एक तरुण बाहेर पडला ..घरी आला
तोवर गरिबीने चटके देणे जरा जास्तच प्रखर केले होते . बहिणीचे लग्न उरकले होते त्यामुळे भावा पाठोपाठ आपला धाकटा मुलगा पण स्थिरस्थावर होईल ही माफक अपेक्षा ठेवून वडिलांनी सरकारी नोकरी किंवा एखाद्या शाळेत कला शिक्षकाची नोकरी पकडावी असा तगादा लावला .. सतीशने त्याला नकार दिला नाही , झालं ... पुढाऱ्यांचे घराचे उंबरे झिजवणें चालू झाले , 5 ~ 6 महिने गेले यश अजून हातात येत नाही असं दिसताच सतीशने , घरी थोडं मागे लागून , नोकरी लागेपर्यंत का होईना असं रिकामा बसण्यापेक्षा आपण एक स्वतःचा असा व्यवसाय काढू आणि जशी नोकरी लागेल तसं व्यवसाय बंद करू या सर्वमान्य फॉर्मुल्यावर एकमत होऊन थोडे भांडवल जोडून व्यवसायचा प्रवास चालू केला , बरं घरून आईची भाजी विकायची पार्श्वभूमी सोडली तर तसा काही व्यवसाय आणि धंदा यांच्याशी काही फारसा संबंध नव्हता ...!!
एक कॉम्प्युटर आणि एक प्रिंटर आणि भाड्याने घेतलेला एक गाळा आणि सावली सारखी साथ होती ती माझी बहीण सपना .. हिची पुण्याने जसे सतीशला GD आर्ट्स ची पदवी दिली तशी त्याला सपना पण भेट दिली ..त्यांचे प्रेम फुलले , वाढले आणि एकमेकांच्या साथीने बहरले
मराठा मुलगी आणि माळी मुलगा यांचा हा आंतरजातीय विवाह असूनसुद्धा सुरुवातीच्या अडचणी वर मात करून ते सगळ्यांना पुरून उरले .
त्यांचं प्रेम वासू~सपना सारखं भेकड जीव देणारा नव्हतं ते एकमेकांना जीव लावणारं होतं .. खरं म्हणजे सपना शिवाय सतीश आणि सतीश शिवाय सपना अपूर्णच आहे , जसा काटकोन त्रिकोण 90 अंशा विना अपूर्ण तसाच काही तरी प्रकार असावा बहुदा ....
साधारण 2000 सालचा काळ होता , आरटीओ बदलत होता त्यात काळानुरूप सुसुत्रता येत होती White Borad वर ब्लॅक नंबर असावे , त्याला ठराविकच फॉन्ट असावा असे अनेक नियम त्या काळी येत होते .. सतिशची जातकुळी कलाकाराची होती पण आई सोबत भाजी विकायला लहानपणी तो पण बसायचा त्यामुळे व्यवसायाचे बाळकडू त्याने त्या मंडईमधल्या गलबलाटात , गोंधळात अलगद पिलं आणि आत धमण्यामध्ये साठवून ठेवले होते आणि ते सुद्धा कायमचे .. सतीश सारख्या कलाकाराला ह्या घडणाऱ्या बदलामध्ये व्यवसायिकता दिसली नसती तरी नवलच होते म्हणा ... !!
आणि सतीश चा ट्रेण्ड सेटर हा प्रवास सुरू झाला ... तो कधीही न थांबण्यासाठीच....
" 20 मिनितामध्ये नंबर प्लेट बनवून मिळेल !! "
या घोषणेचा सतीश उद्गाता होता !! होय , ज्या जमान्यामध्ये नंबर प्लेट बनवायला 2 दिवस लागायचे सतीशने ते बारामती सारख्या ठिकाणी 20 मिनिटांवर आणून ठेवले होते.. हँड मेड नंबर प्लेट मधली त्याची सुबकता पाहून लोक हैराण होयचे .. त्यानंतर 25 ~ 30 फुटांचे थोर नेते मंडळी आदी लोकांचे कार्ड्स शिट्स आणि फेविकॉलने बनवलेले कट आऊटस् आणि त्यावर आक्ररॅलीक पैंट चे पेंटिंग ह्यावर सतिशचा चांगलाच हात बसला ... त्यात अजून perfection येत गेलं , कामं चालून यायला लागली ते पण गुणवत्तेवर....!!!
आणि काही वर्षाने डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंगचा उदय झाला , काळानुसार बदलणं भाग होतंच त्यामुळे आवश्यक ती सामग्री उभारणे गरजेचे आहे हे त्याने ओळखले आणि त्यासाठी
घरून भांडवल उभे करणे दुरापास्त असेल हे तो जाणूनच होता
म्हणून प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून पैसे त्याने उभे केले लोन काढले आणि डिजिटल फ्लेक्स चा प्रिंटर आला बघताबघता आवश्यक असणारी सगळी सामग्री पूर्ण झाली , स्वतःचा व्यवसाय चालवताना अजून 5 ~ 6 जणांना रोजगार मिळाला ...आत्ता कला शिक्षक होयचा विचार अलगद मागे पडला होता एका उद्योजक सतीश चा जन्म झाला होता .. जो नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत होता , नवीन गोष्टी शिकत होता , नवीन वाटा चोखळत होता .. त्यात अभ्यास करून उतरत होता . ठेस लागली तरी त्यातून सावरत होता .. कामात चिकाटी आणि प्रामाणिक पणा ठेऊन आपले चांगले काम हीच आपली जाहिरात ह्या वृत्तीने चालत होता ...
आणि त्याच्या मुलीच्या नावाने सुरू केलेला व्यवसाय ज्याचे नाव " वैष्णवी ग्राफिक्स " आत्ता एक मोठा आणि विश्वासार्ह ब्रँड तयार झाला होता ... मागे सोनगाव चा उत्सवामध्ये भिंती रंगवून देणाऱ्या काम हौसेने करून देणाऱ्या सतीशचा प्रवास
Wall to Mall ... असाच झाला
डिजिटल फ्लेक्स चा अनुषंगाने पब्लिसिटी फर्म काढली ..त्याला धाकट्या मुलाचे अभिषेकचे नाव दिले कामाच्या चांगल्या दर्जमुळे चांगली लोक सोबत होती त्यातून कामे वाढत गेली मग ते पोलिसांच्या गाड्यांना ग्राफिक्स लावून दयायचे काम असो किंवा एखाद्या प्रॉडक्ट अथवा त्याच्या उत्पादनाचा प्रसार करणाऱ्या ट्रक चे काम असो .. तो यशाची एक एक पायरी चढत गेला सोबत सपनाची साथ होतीच ... जीवाला जीव देणारा कामगार वर्ग सुद्धा वाढत होता
5 वर्षापूर्वी हा सगळा व्यवसाय त्याने आत्ता स्वतःच्या मॉल मध्ये सुरू केलाय अतिशय दुर्मिळ आणि बारामतीच्या ग्रामीण भागाची नस ओळखून एक~एक वस्तू ज्या घर सजावटीच्या किंवा गिफ्ट आर्टिकलसाठी वापरता येतील अश्या त्याने खास चीन आणि रशिया आणि काही युरोप इथून आणल्यात ...
Never Depend On One Income हे तत्त्व त्याने जपले ते रुजवले आणि त्याच तत्वाने त्याचा उद्धार केला तो आर्थिक दृष्ट्या प्रबळ झाला .. तुम्ही याला लेखाचा इंटर्वल म्हणा हवं तर कारण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ... कलंदर पणा अजून बाकी है !!! सोनगावच्या वॉल पासून मॉल पर्यंत्तर तर आपण आलो आत्ता .........त्यापुढे बरेच काही घडणार होते जे सतीशने सुद्धा विचार केलेला नसेल कदाचित !!
Iron Man सतीश.....
आर्थिक सुबत्ता आल्यावर लोक (माझ्यासकट) ढेरपट्या झालेली मी पाहिलं आहे , थोडीशी स्थिरता आल्यावर माणूस सुस्त पडतो .. ही जणू जगराहाटीच आहे म्हणा ...
पण ह्याही बाबतीतही सतीश कलंदरच निघाला !!
व्यायामाची आवड त्याला तशी लहानपणा पासूनच होती म्हणा... त्याच्या वडिलांना सुद्धा कुस्तीची आवड होती त्यामुळे घरात असे वातावरणच होते पण त्यात अशी काय आग्रहपूर्वक दंडक वैगेरे नसायचा , जुजबी आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक आहे एवढंच काय ते त्यातला मुद्दा .
कारण वर मी म्हंटल्याप्रमाणे टोकाच्या श्रीमंतीमध्ये आणि टोकाच्या गरिबीमध्ये आरोग्याची हेळसांड होईची शक्यता जास्त , त्यामुळे पुढे जाऊन आयर्न मॅनला भाग वैगेरे सतीश घेईल अश्या प्रकारचे वातावरण नक्कीच घरात नव्हते आणि तसे जर आपण म्हंटले तर ही अतिशयोक्ती होईल खरं तर ...!!
पण एका रेग्युलर जिम ला जाणाऱ्या व्यवसायिक ते ऑस्ट्रिया 2018 चा आयर्न मॅन हा प्रवास नक्की घडला तरी कसा ??
असे नेमकं घडलं काय असेल ???
....साधारण २२ जुलै आली किंवा 12 डिसेंबर आला की बारामती मध्ये अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते 22 जुलै अजितदादांचा वाढदिवस तर 12 डिसेंबर पवार साहेबांचा त्यामुळे साहजिकच अनेक कार्यक्रम यानिमित्ताने बारामती मध्ये होतात
त्यापैकीच एक म्हणजे सौ.सुनेत्रावहिनी पवार यांच्या तर्फे भरवली जाणारी पुणे व बारामती दरम्यान भरवली जाणारी सायकल स्पर्धा पुण्याच्या बारामती हॉस्टेल पासून चालू होणारी ही स्पर्धा साधारण 120 किमी चे अंतर कापून स्पर्धक पार करतात , दिवे घाट नीरा मार्गे ही स्पर्धा बारामतीत दाखल होते अजूनही ही स्पर्धा 22 जुलै च्या दिवशी होत असते वेगवेगळ्या ठिकाणचे हौशी आणि व्यवसायिक सायकलेपट्टू या मध्ये सहभागी होत असतात त्यामुळे सतत नव्याची आवड असलेला सतीश याकडे आकर्षित झाला नसता तर नवलच होते ...
सायकल स्पर्धाच्या निमित्ताने या गोष्टीचा श्री गणेश झाला सायकल स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला थोडी प्रॅक्टिस सुद्धा केली पण सायकल स्पर्धा काय पूर्ण झाली नाही... एखाद्या जखमी वाघाचे कसे होते तसे सतीशचे झाले असावे कदाचित.. "आपल्याला जमणार नाही असे अशक्य असे काहीच नाही , आपल्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही ह्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारा हा कलंदर माणूस ",
झालं गाडी इरेला पेटला ... आणि जणू इतिहास घडायला सुरुवात झाली ...
काहीही करून ही स्पर्धा पार करायचीच हा निश्चय झाला .. आणि पुढच्याच वर्षी ह्यात यश आले , सतीश आणि त्याच्या सायकल प्रेमी सहकाऱ्यांनी मिळून बारामती सायकल क्लब ची स्थापना केली , आपल्या व्यवसाय आणि नौकरी सांभाळून दार रविवारी 10 ते 15 कमी चा टप्पा सकाळी सकाळी पार करायचा आणि नाष्टा वैगेरे करून रिटर्न फिरायचे हा शिरस्ता ह्यांनी बारामती मध्ये रुजवला ..
अगदी 8 ते 10 वर्षे वयोगटापासून ते 50 वर्षे वयोगटातील लोकं आत्ता ह्या क्लब ला जॉईन आहेत , त्याचा विस्तार अजूनही होतोय ...
तुमचा जर आत्मविश्वास कुणी वाढवू शकत असेल तर ती व्यक्ती तुम्ही स्वतः आहात हे प्रसिद्ध वाक्य सतीशने जर मनावरच घेतले होते म्हंटल्यावर त्याला रोखणारे कोण होतं ??
सायकल स्पर्धा असेल किंवा व्यवसायिक कामाच्या निमित्ताने कोल्हापूरला सतीशचे ये जा असायचे त्यामुळे साहजिकच अनेक लोकांशी भेटी गाठी होत राहायच्या आणि ती प्रेरणेची ठिणगी त्याने भेटलीच
वैभव बेळगांकर साधारण 2014 सालचा आयर्न मॅन , आत्ता आयर्न मॅन स्पर्धे विषयी थोडे ...
आयर्न मॅन म्हणजे जगातील सर्वात कठीण शारीरिक श्रमचा कस पाहणारी स्पर्धा ही एक ट्रायथेलॉन म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा. यात मुख्यतः पोहणे, सायकलिंग आणि धावणे या स्पर्धांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रीडाप्रकार सलग पार पाडायचे असून , स्पर्धेचा अवधी 16 तासांचा असतो...
हा नेमका प्रकार काय आहे हे सतीशने त्यांना विचारले त्याने सविस्तर माहिती दिल्यावर सतिशच्या डोक्यात calulation चालू केव्हाच झाले होते...
सायकल तर आत्ता आपलिशी झालीच होती , सोनगावच्या कऱ्हा आणि निरेच्या संगमावर पोहताना नदी आणि पाणी यांच्याशी संग होताच पण मुख्य अडचण व्यवसायिक प्रशिक्षणाची होती कारण 120 किलोमीटर सायकल चालवणे किंवा अर्ध्या तासाची स्प्रिंट नदीत मारून येणे ह्यातला फरक खूप होता शिवाय धावण्याचा सराव हा तर यक्ष प्रश्न होताच त्यामुळे ही वस्तुस्थिती लक्षात आल्यावर एखाद्या सर्व समान्याने माघार घेतली असती
सर्व सामान्य माणूस आणि असामान्य अवलिया अर्थात कलंदर यांच्यातला फरक कळतो किंवा तुमचे चारित्र्य तो फरक दाखवते आपला व्यवसाय ठीक ठाक चालत असला आणि तरी सुद्धा 30 लाखांचा खर्च स्वबळावर करायचा आणि तो पण एका डोक्यात चमकून गेलेल्या केवळ कल्पनेसाठी हा बहुदा मुख्य फरक असतो सामान्य आणि असामान्य या मध्ये आणि सतीश निर्विवाद पणे ह्या असामान्य कॅटेगारी मध्ये जाऊन बसला ..
निर्णय झाला अर्थात तो तर पक्का होताच, आत्ता थांबायचं नाही 2 वर्षे रोज 5 तास सराव आणि ह्या सगळ्यात शोरूम ची जबाबदारी अर्थात माझ्या बहिणीवर सपनावर आली अर्थात सतीश दाजी लक्ष देतच होते पण सपना दिदीची खंबीर साथ नसली असली तर सतीश ननावरे आयर्न मॅन झालाच नसता हे त्रिकालाबाधित सत्य आहे , सपना दिदीची व्यवसाय सांभाळला आणि मुलांची जबाबदारी , वैष्णवी चे 12 वीचे वर्ष तिच्या ऍडमिशन ची धावपळ , धाकटा मुलगा अभिषेक ची शाळा देखील या काळात बदलण्यात आली या सगळ्या प्रापंचिक अडचणी दीदीने स्वतःच्या खांद्यावर समर्थपणाणे पेलल्या आणि त्यांना पुरून दीदी उरली...
आयर्न मॅन होयचे म्हणजे काही खायचे काम नक्कीच नव्हते संपूर्ण बॉडी ही carohydread पेक्षा प्रोटीन orinted balance वर न्यावी लागते , stamina gain करण्यासाठी वेगळे वेगळे प्रोटीन , जेल घावे लागतात दिवसभरात प्रोटीनची मात्रा ठराविक वेळात शरीरात घावी लागते , पळाल्या नंतरची शरीराची झिज भरून काढण्यासाठी ओट्स , पनीर , चिकन , बदाम , बॉडी मसाज वाला
त्याच बरोबर custum , 9 लाख रुपयांची सायकल त्याच्या वेग वेगळ्या accessories अगदी सगळा लवाजमा सतीशच्या सोबत कामाला लागला होता ... सराव जोरात सुरू सुद्धा झालता
आणि घात झाला ज्या माणसाला आयुष्याने सहजा सहजी काही दिले नव्हते त्याला ह्या वेळेस तरी नशीब कसे सहजा सहजी काही मिळू देणार होते तेही संघर्षशिवाय नियतीच्या मनात वेगळेच चालले होते ...
पायाचा स्नायू दुखावला आणि pratice मध्ये खंड पडला तोही चांगला महिन्याभराचा अश्विन भोसले जे कोल्हापूर चे coach यांनी सतीशला थांबण्याचा सल्ला दिला .. बारामतीचे स्विमिंग चे कोच सुभाष बर्गे यांचे देखील हेच म्हणणे पडले
पण हा गाडी ऐकतोय तो कसला ??
दीपक राज नावाचे ऑस्ट्रिलिया देशातले coach जे या आयर्न मॅन स्पर्धेविषयी ऑनलाइन कोचिंग देतात त्या विषयी त्याला समजले आणि हा वेळ वाया जाण्यापेक्षा तो सार्थकी लागावा ह्या साठी त्यांनी तोच ऑनलाइन कोर्सेस जॉईन केले
पण ह्या संकटापेक्षाही एक मोठे संकट सतीश च्या मागे उभे होते ह्याची न कल्पना त्याला होती ना नियतीला...
रामचंद्र अण्णा म्हणजे त्याच्या वडिलांची तब्येत बिघडायला लागली व मधुमेहाच्या जुन्या दुखण्याने डोके वर काढले , पायाचे गांग्रीन उग्र रूप धारण करू लागले 4 महिने प्रॅक्टिस आजारपण , अण्णांकडे लक्ष देणे , कोल्हापूर ते बारामती वाऱ्या , डायट साठी पुण्याला होणारी धावपळ , दिदीची होणारी दमछाक , मुलांच्या शाळा , व्यवसाय या सगळ्या मध्ये माझ्या आईचा सुद्धा त्यांच्या डायट मध्ये हातभार लागला ह्याचा मला सार्थ अभिमान आहे
अण्णांची तब्येत प्रचंड बिघडू लागली आणि एके दिवशी स्पर्धेला जेम तेम महिना शिल्लक असताना अण्णा निघून गेले ......
हा तोच बाप सतीशला सोडून गेला ज्याने त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला पुण्याला पाठवले होते , हा तोच बाप होता ज्याने त्याच्यामध्ये व्यायामाची आवड जोपासली , हा तोच रांगडी बाप होता ज्याचे सतीश कणखर Raw मटेरियल होता जो समुद्रापार झेंडा रोवयला सिद्ध झालता , तसे तर सगळे संपले होते ऐन स्पर्धेला एक महिना शिल्लक असताना स्वतःचा बाप गेलेला असताना सुद्धा कुणी या स्पर्धेच्या विचार करेल का ??
सगळे शत्रू गाठून आले , निर्णय सतीशला घायचा होता आणि त्याने तोच कलंदरपणाने घेतला जो त्याला साजेसा होता , ज्या तत्वावर तो आजवर जगलाय , आणि त्यात तोच यशस्वी झालाय
फांदी तुटो वा पारंबी आत्ता माघार नाही !!!!
स्वतःच्या बापाच्या मातीवरून आल्यावर तो 20 किमी पळायला गेला , दहव्यावरून वरून आल्यावर कोल्हापूरला रांकळ्यावर पोहोयला गेलेला मी त्याला पाहिलाय ...
कमाल आणि फक्त कमाल ह्याला शब्दच नाही !!!
सचिनचे तेंडुलकरचे वडील वारले होते तेव्हा सुद्धा तो अंत्यविधी करून तो परत worldcup खेळायला इंग्लंडला परत आला होता कदाचित इतिहास परत घडत होता पण , सचिन तर एक व्यवसायिक खेळाडू होता आणि सतीश तर मूळचा व्यावसायिक जो केवळ एका औसुक्यातून ह्या स्पर्धेकडे आकर्षित झालता आणि बघता बघता त्याने सर्वस्व ह्या स्पर्धेला दिले , स्वतःच्या बापाचे दुःख सुद्धा !!
बर संकटं ही फक्त घरगुती पातळीवरील नव्हतीच मुळी !!
काही आर्थिकही होतीच आणि परत सगळा खर्च ,
आणि तो गेला 30 लाखाच्या घरात हे विस्यांकरक काम होते . कुणाकडे देणगीसाठी आर्जव नाहीत किंवा मदतीची याचना नाही आपले काम आपण झोकात करायचे ही दुर्दयम एकच शक्ती आली तरी कुठून ?? हा माझ्या सारख्याला सतावणारा प्रश्न ,
की एवढ येते कुठून ??
स्पर्धेच्या आधी 2 दिवस मी भेट घायला त्यांच्या कडे गेलतो custom ची फिटमेंट आणि तो custom अंगवळणी पडावा यासाठी सराव म्हणून ते दिवस भर custom घालूनच बसलेले होते , थोडी औपचारिक चर्चे नंतर माझे लक्ष custom वरच्या काही लोगो कडे गेले , नीट बघितले तर त्यावर आजवर ज्या ग्राहकांनी त्यांना कामे दिली त्या परिसरातील सर्वांचे लोगो काढले होते त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता , बर मी विचारलं ह्या पैकी कुणी किती किती दिले ??
तर ते थोडे चिडले आणि नेहमीच्या style ने मला सुनावले मी कुणाचा मिंधा नाहीये मी कमवायला नाही घडवायला चाललोय मी एकटा नाही पळणार माझ्या बरोबर त्या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातल्या तो तरुण पळेल ज्याला आजवर आधुनिकतेची टिमकी मिरवणाऱ्या प्रत्येकाने त्याच्या गावठी मराठी इंग्लिश वर हिनवले त्याच्यावर हसले...
त्यांच्या fashion सेन्स वर ज्यांना हसू आले , ग्रामीण भागातली पोरं असलं काही करूच शकत नाही , त्यांचा हा घासच नाही हा ज्या लोकांचा ठाम समज झालाय त्यांच्या नाकावर टिचुन मी जिंकणार आणि ज्यांनी आज वर मला व्यवसायामध्ये साथ दिली त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी मी त्यांचे लोगो माझ्या custom वर अभिमाने लावलेत ...
बरं , माझे लक्ष गेले पवार साहेबांच्या लोगो वर जे पाठीमागे लावले होते ...
मी म्हंटलं , " दाजी आपण पवार साहेबांची , बारामतीचे माणसं आपण साहेबांचा लोगो पुढे नको होता का लावायला ?? "
त्यावर ते हसले आणि बोलले ,
" अरे मुद्दामूनच मी साहेबांना पाठीमागे लावले आहे "
" मी म्हंटलं मुद्दामुन का बरं ?? असे "
ते म्हंटले , "अरे ज्यांच्या मागे साहेब असतात ते कधीच हरत नाही "
खरं म्हणजे मी खळखळून हसलो आणि वातावरण हलके फुलके झाले ..
पण मराठी पोरांनी उद्योजक व्हायला हवे हा पवार साहेबांचा नेहमी विचार आणि त्याच विचाराशी पाईक असणारा हा उमदा तरुण सातासमुद्रापार एक अवघड स्पर्धा पार करायला निघालाय ह्याने माझा ऊर भरून आला
आणि तो दिवस उजाडला
सतीशने इतिहास घडवला १ जुलै २०१८ रोजी युरोप ऑस्ट्रिया येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये
१२ तासाच्या विक्रमी वेळात त्याने स्पर्धा पूर्ण केली , ग्रामीण भागातल्या पहिल्या आयर्न मॅन चा किताब त्याने मिळवला
आत्ता थांबणार तोच सतीश कसला ??
मध्यंतरी अजित दादांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा वहिनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाठयाने तब्बल 46 तासांमध्ये दिवस रात्र सायकल चालवून अष्टविनायक पूर्ण केला , अभिषेकची म्हणजे धाकट्या मुलाची ह्या मध्ये सपोर्ट स्टाफ म्हणून साथ लाभली ... शेवटी शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी असे तुकोबांनी म्हंटलाय ते उगीच नाही म्हणा !!
माझी बहिण सपना दीदी पण सातारा हाल्फ मॅरेथॉन पूर्ण करून आली 21 किलोमीटरची , मोठी वैष्णवी सुद्धा 5 ~ 6 किलोमीटर च्या मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करतेय ...
त्यामुळे "सतीश ननावरे" यांचे आख्य कुटुंबच
"RUN" नावरे झालाय असे म्हंटले तर वावगे ठरणार नाहीये ...
आख्या बारामयी आणि परिसराला सतीश ननावरे यांनी फिटनेस , सायकलिंग , रनिंग यांचे येड लावलाय आणि हे येड दिवसेन दिवस वाढतच जाणार आणि त्याची एक सामाजिक चळवळ उभी राहणार ह्यात काहीच शंका नाही ...
त्यांचे आख्खा कुटुंबच आता सर्वांचे फिटनेस आयकॉन बनलय
आणि ह्या कलंदर माणसाला भेटायला आणि त्याच्या कुटुंबाला भेटायला जाताना मी माझे वाढलेले पॉट आत घेऊन जायचा केविलवाणा प्रयत्न नेहमी करतोय ...!!
खरच अशी काही कलंदर लोकं आपल्या आजूबाजूला असली की जगायची एक वेगळी ऊर्जा मिळते , आपल्या पुढची संकटं छोटी लावतात आन परिस्थितच भाउ कारण सोडून देतो आणि नव्या उमेदीने कामाला लागतो
हेच सतीश सारख्या कलंदर माणसाचे मोठे यश
म्हणायचे !!!
तूर्तास लेखनास पूर्णविराम , धन्यवाद !!
....✍️निखिल सुभाष थोरवे
Comments
Post a Comment