निजामुद्दीन , राग आणि आपण ....

लेखक -: निखिल थोरवे 

निजामुद्दीन प्रकरण झाले ... संतापजनाकच प्रकार होता तो ... अखंड राष्ट्र , हिंदू , ख्रिश्चन जवळ जवळ सगळे धर्म राष्ट्रीय आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपली प्रार्थना स्थळे तत्परतेने बंद करीत होती .. लॉक डाउन सदृश्य स्थिती होती तेव्हा काही हजार लोकं जमून मेळावा घेत होती ... नंतर सुद्धा गेल्या 2 दिवसात डॉक्टर आणि नर्सेस यांच्या हल्ले झाल्याची बातमी , किंवा आजची नर्सेस शी अश्लील चाळे केल्याची बातमी समजली आणि साहजिकच माझ्या सकट सगळ्यांमध्ये संतापाची लाट उसळली , आपण सगळे जण लॉक डाउन चे पालन करीत असताना अश्या प्रकारे , येऊन कुणी संबंध सामाजिक आरोग्य धोक्यात घालत असेल तर त्यांना कठोर शासन हे झालेच पाहिजे त्या बद्दल सहानभूती दाखवण्याचे काहीच कारण नाही आणि कुठल्याही धर्माने ह्या मध्ये भावनेचा प्रश्न करण्याचा देखील काही संबंध नाही ... हे 100 % स्पष्ट .... 
                                ह्या परिस्थितीचा फायदा अनेक अल्पसंतुष्ट लोकांनी विशेष करून उजव्या विचार सरणीची पिलावळ जी भाजप आणि संघांच्या आश्रयाने वाढत आहे त्यांनी पद्धतशीरपणे घ्यायला सुरुवात गेली ... जुन्या क्लिप्स योग्य रीतीने काढून त्याची काटछाट करून सर्वसामान्य आणि बहुसंख्य असलेल्या हिंदूंमध्ये असलेला संताप कसा टोकाच्या पातळीवर जाईल ह्या कडे हेतुपरस्पर लक्ष दिले गेले ... आणि दुर्दैवाने त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी देखील झाले ... आज कुठल्याही मित्राशी , नातेवाईकांशी फोन वर बोला , तोच जमात च्या त्या वर्तनाने संतप्त झालेला तर आहेच पण त्या वेगळ्या वेगळ्या खऱ्या , खोट्या क्लिप्स असतील ह्यांनी अधिक चवताळलेला आहे .. 
                                मी 2 दिवसांपूर्वी तरुणांना ह्याच अपप्रचाराला बळी तुम्ही पडू नका अश्या आशयाची पोस्ट लिहली ... जे हुशार होते त्यांना त्या पोस्टचा मतितार्थ समजला पण निजामुद्दीन प्रकरणात मी जाणीवपूर्वक मौन बाळगले असा त्यांचा एकंदरीतच सगळा सूर होता , साधक बाधक अनेक वेळ त्या विषयी चर्चा झाली ... त्यात मत मतांतरे होती ... ज्यांनी पातळी सोडून टीका केली त्यांना मी फेसबुक वरून पद्धतशीरपणे मी नारळ देखील दिला ... 
                                ह्या सगळ्यात मी कुणीतरी टोकाचा पुरोगमी आहे , किंवा आंधळा सेक्युलर आहे अश्या पद्धतीचा एकंदरीत सूर निघताना मी बघत होतो .. आणि खरं म्हणजे मनातल्या मनात एक प्रकारे हसत देखील होतो ... कारण कुठलीही एक विचारसरणी कायमस्वरूपी स्वीकारावी ह्या वयाच्या टप्प्यापर्यंत मी आलो नाही किंवा अजून पर्यंत अशी विचारसरणी मला सापडली नाही , मी लहानपणी संघाच्या शाखेत जायचो , सुरुवातीच्या काळात शिव प्रतिष्ठान ह्या संघटनेशी जोडला गेलो होतो , दुर्गा माता दौड ह्या उपक्रमाचा मी व्यक्तीशः मी चाहता आहे . दरम्यानच्या काळात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असताना शाहू , फुले , महर्षी शिंदे , राजा राम मोहन रॉय आणि आंबेडकर ह्यांच्या कार्याचा आणि विचारांचा खूप सखोल परिणाम झाला आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन विस्तृत झाला . शिव प्रतिष्ठान ची " म्लेंच्छक्षयदीक्षित " अशी शिवरायांची प्रतिमा मनास भावात नाही , संभाजी ब्रिगेड ची शिवधर्माची भूमिका मनात बसत नाही , पुरोगामी लोकांची अति टोकाची नास्तिकता डोक्यात जात नाही , समतोल आणि मुख्यत्वे व्यावहारिक असा दृष्टीकोन एकंदरीत ह्या दिवसात विकसित झाला आहे . आणि माझाच कशाला ? आपल्या संपूर्ण समाजाची तिच भूमिका असते त्यामुळे माझा विचार हा काही जगावेगळा नक्कीच नाही , तो सर्वसामान्य लोकांनी स्वीकारलेला सर्वसामान्य पण रूढ अर्थाने असामान्य असा विचार आहे . 
                                ह्याच विचाराने जर मी प्रस्थापित धार्मिक द्वेषाविषयी काही बाबी सावधानता म्हणून सांगितल्या आणि त्यासाठी माध्यमं कशी काम करतायेत हे जर बोललो तर तर मी टोकाचा पुरोगामी कसा ??? मुळात एक गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे की , जसा कडवटपणा मुस्लिम धर्मात , ख्रिश्चन धर्मात आहे तसा तो हिंदू धर्मात नाही ही वस्तू स्थिती आहे .. 
                                मुळात हिंदू धर्माला कोणत्याही चौकटी मध्ये बांधून ठेवणे हेच मुळात अश्यक प्राय !!! बहुदेवता , बहू पंथ , असलेला हा धर्म कदाचित जगातील सर्वात लवचिक धर्म म्हणून ओळखला जातो इथं संतांच्या रूपात देवतेंची संख्या ही वाढत असते आणि नुसती वाढत नाही तर जनमानसात स्वीकारली जाते .. फार लांब जायचे झाले तर सती बंदी विरोधात उभे राहिलेले राजा राम मोहन रॉय आठवून बघा , आगरकर आठवा ... महात्मा फुले , ब्राह्मणेतर चळवळ ज्यांनी पुढे नेली ते गोपाळबाबा वलंगकर , महात्मा फुले , जाती स्पृश्यता कामी योगदान दिलेले आंबेडकर , सावरकर हे कोण होते हिंदूच ना !!! 
अगदी अलीकडचे दाभोलकर , श्रीराम लागू ही मंडळी हिंदूच !! म्हणजे धर्मसुधारणेची ही चळवळ हिंदू धर्मात नवीन नाही . जो धर्म अनेक नवीन देवता सहज स्वीकारतो तो धर्मसुधारणा देखील अलगद पोटात घेतोच ... आणि पुढे प्रवाहित होतो म्हणून तर मी ह्याला लवचिक धर्म म्हणतो ... आत्ता ह्या मध्ये खरा प्रश्न हाच आहे की , हिंदुत्ववादी लोकांना अभिप्रेत असणारा हा कडवटपणा हिंदू धर्मात येत नाही आणि बहुतकरून येणे शक्य देखील नाही ..भविष्यात आला तर देव जाणे !!  त्यामुळे अश्या विचारसरणीचे लोकं अश्या निजामुद्दीन सारख्या संधी सहसा सोडत नाही .. शक्य तितकी जागृती करण्याचा त्यांचा ह्या निमित्ताने नेहमीच प्रयत्न असतो , गेल्या 2 दिवसात जे घडले तो त्याचाच परिपाक !! जे निजामुद्दीन प्रकरणावर , त्या मुस्लिम धर्मांध लोकांविरुद्ध बोलले नाही ते पुरोगामी , दुटप्पी अशी भावना ह्या मंडळींची होत असेल तर त्यात त्यांचा काही दोष आहे असं मला वाटत नाही .. त्यांचा समग्र प्रयत्नांचा तो भाग आहे . 
                       मग आत्ता प्रश्न असा उत्पन्न होतो की , द्वेष व्यक्त करून साध्य काय होणार ?? आपल्याला राग तर आलेला आहेच , समोर घडतंय ते अतिशय संतापजनक देखील आहे . मग आपण व्यक्त होणे हा उत्तम मार्ग !! दोषींच्या कठोर शिक्षेची मागणी करणे हा उत्तम मार्ग !! पण ह्या पुरतं ते मर्यादित राहत नाही ते जातं पूर्ण मुस्लिम धर्माला !! आणि निर्माण होते धार्मिक तेढ जी पुढच्या दंगली , संघर्ष यांना आमंत्रण ठरते . वास्तविक मी वर सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्मची रचना ही एक पदरी असती तर त्या संघर्षाला अधिक धार राहिली असती ,अधिक स्पष्ट करतो हिंदू धर्म एकाच कुणाच्या तरी उपदेशावर आधारित असता तर हे सगळे कार्य अधिक सोप्पे देखील झाले असते पण दुर्दैवाने म्हणा अथवा सुदैवाने म्हणा तसे होत नाही . परिस्थिती सामान्य झाल्यावर बहुसंख्य हिंदू आणि मुस्लिम सुद्धा परत खेळीमेळीने रहातात ... ह्यातील काही जण झालेल्या बाबी विसरतात काही जण लक्षात ठेवतात आणि ह्या मध्ये काहींचे मैत्रीचे संबंध आयुष्यभरासाठी खराब होतात .. आणि त्या दोन अश्या व्यक्ती असतात ज्या देश पातळीवर घडलेल्या घटनांशी ना प्रत्यक्ष ना अप्रत्यक्ष संबंधित असतात .. तरी त्यांच्यात दुरावा तयार होतो .. बर धर्मांध मुस्लिमांमध्ये देखील आहेत किंबहुना जास्त प्रमाणात आहेत आणि दहशतवाद हे त्याचे दृश्य स्वरूप तर आपण पाहतोच म्हणून त्यांची तीव्रता जास्तच आहे  .. 
                       मग आपल्या कडे आत्ता 2 पर्याय उरतात एक तर कट्टर हिंदू बनणे किंवा मध्यममार्गी विचारसरणीशी निगडित राहणे ... आणि नेमके अश्याच परीक्षा निजामुद्दीन सारख्या रूपात आपल्या समोर येतात .. ज्यात आपल्याला योग्य निर्णय सद्सद्विवेक बुद्धीला स्मरूण घ्यायचा असतो ... संताप व्यक्त करणे अतिशय सोप्पे आहे , पण त्यावर कायम राहणे आपल्या सारख्या सर्वसामान्यांना सहज साध्य होत नाही .. संताप व्यक्त करणे यापेक्षा त्यावर कायम राहून पुढची वाटचाल करणे हे अधिक काठीण काम आहे .. आणि हिंदू धर्माच्या लवचिकते मुळे ते सहज साध्य होत नाही . उदाहरण सांगतो ... निजामुद्दीन प्रकारामुळे आपल्याला टोकाचा संताप आला आहे आणि आपणाला राष्ट्रद्रोही म्हणून  मुस्लिमांशी पूर्ण संबंध तोडायची भूमिका घ्यावी लागेल आपल्याला ते जमणार आहे का ?? ह्याचा ज्याचा त्याने विचार करावा ... आणि तो मार्ग जरूर चोखळावा , हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे . प्रसंगी व्यक्तिगत संबंधांना दूर सारण्याची देखील तयारी त्यांना ठेवावी लागेल .. ही एकदा भूमिका पक्की झाली की पुढचा निर्णय सोप्पा होतो .. 
पण तुम्ही जर अधे-मध्ये असाल , जी अवस्था सध्याच्या बहुतांशी जणांची आहे , जी कदाचित त्यांना समजत नसावी अश्या वेळेस तुम्ही वेगळ्याच कात्रीत सापडून जाता .. 
                        मग आत्ता प्रश्न येतो , असे प्रकार घडत असताना आम्ही मूग गिळून गप्प बसायचे का ??? व्यक्तिगत संबंधासाठी आम्ही समोर जे चुकीचं घडतंय ते सहन करायचे का ??? प्रश्न अतिशय नैसर्गिक तर आहेच , पण त्या पेक्षा त्याच उत्तर खूप सोप्पे आहे ... त्यासाठी , आपले म्हणणे मांडत असताना जर स्वतःच्या शब्दात मांडू शकत नसाल तर किमान कोणत्याही टोकाच्या फॉरवर्ड केलेल्या मॅसेज चा तरी किमान आधार घेऊ नका , त्यात लपला आहे तो द्वेष ज्याला तुम्ही नकळतपणे बळी पडत आहात ... राग येतोच .. तो यालाच हवा पण गरज आहे तो योग्य शब्दात व्यक्त करण्याची आणि जर तुमची मानसिकता टोकाची हिंदुत्ववादी झालेली असेल किंवा आधीपासूनच असेल मग मात्र तुमच्यासाठी सध्याचा काळ दुग्धशर्करा योग आहे फक्त त्या बांधवाना एकच विनंती आहे , सध्या जे काठावर आहेत आणि जे ह्या सगळ्या बाबतीत संतुलन साधू इच्छित आहेत त्यांना पुरोगामी आणि दुटप्पी अशी अवहेलना करू नका  , कारण कुठलीही विचारधारा ही कायम स्वरूपी नसते कदाचित भविष्यात, तुमच्या प्रयत्नांना यश येऊन  हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व होऊ शकते  ... लोकशाही मध्ये जर ठरवले तर ते अश्यक नाहीच ... भारतातल्या लोकांनी हा निर्णय भविष्यात घेतला तरी तो स्वीकारावा लागणार आहे त्या मध्ये दुमत नाही पण सध्य स्थितीला जर धार्मिक तेढ कमी करता आली तर लोकशाही बळकटीकरणा साठी तो एक उत्तम उताराच ठरू शकतो ... मी राग का येतो ह्याच्या मानसशास्त्रीय खोलात जाऊ इच्छित नाही पण आलेला राग जर योग्य शब्दात मांडला गेला तर पुढील अनर्थ नक्कीच आपण टाळू शकू !! 
                                जमलं तर बघा !! नाहीतर आहेच आपलं चालू आहे तसं !!!
                                

Comments