शिवछत्रपतींचे दैवत्व योग्य की अयोग्य ???
लेखक :- निखिल सुभाष थोरवे
छत्रपती शिवाजी महाराज !!
नावातच अक्खा महाराष्ट्र सामावला आहे नव्हे तर , ह्या नावामुळेच अक्खा महाराष्ट्र घडला कारण , 12 व्या शतकातील यादव कालीन राजा कृष्णदेवराय यांच्या नंतर तब्बल 300 वर्षे महाराष्ट्र हा इस्लामी जुलमी राजवटींच्या अधिपत्याखाली जखडून होता . मुळात त्या वेळेस महाराष्ट्र म्हणावे का ? हाच मुळात प्रश्न निर्माण व्हावयास हवा !! कारण बहुतांश पराक्रमी सरदार निझामाच्या , आदिलशहाच्या , कुतुबशाहच्या आणि नुकतेच बाळसे धरत असलेल्या मोघलशाहीच्या चाकरी करण्यात व्यस्त होता . गावगाडा पारंपरिक पाटील , देशमुख मंडळी ह्यांच्या पुढारीपणाच्या अधिपत्याखाली होता . त्यांच्ये काम कर वसुली करून देणे आणि जे नवीन राज्यकर्ते येतील त्यांच्याशी इनाम राखणे हेच होते . जुलमी राजवटी आपआपसात लढत , फौजा पिकांची नासाडी करत , उभ्या पिकांतून तोफा , घोडदळ जात , वरून लूटमार , अत्याचार , वारंवार पडणारे दुष्काळ ह्यांनी प्रजा त्रस्त होतीच . त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची बजबजपुरी झाली होती . म्हणून मी म्हणालो तसे , शिवछत्रपतींच्या जन्मानंतरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नावारूपास आला ह्यात माझ्या मनात तरी दुमत नाही . अगदीच सुरुवातीला शहाजीराजे भोसले यांनी आदिलशाही च्या राजकीय अस्थिरतेचा फायदा उचलून स्वतः राज्यकारभार हातात घेऊन रयतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जरूर पण त्याला व्यापक यश मिळाले नाही . शहाजीराजेंनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते . त्यांनी त्यास सुरुवात देखील केली पण मस्तवाल सरदार , आणि स्वतःला राजे मानणारे मनसबदार यांची मोट बांधण्यात शहाजी राज्यांना अपयश आले जरूर ! पण स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे हेच होते हेही तितकच खरे !
शिवजन्मांनंतरचा काळ हा सुवर्ण अक्षरांच्या कोंदणात लिहण्यासारखा काळ !! जनतेमध्ये जाऊन त्यात स्वराज्याची प्रेरणा रोवून बारा मावळच्या संघटना सवंगाड्यांना एकत्र करून , शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले . राज्य विस्तार हे एकमेव धोरण न ठेवता राज्यकारभाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवली . जनतेला कर माफ केले . काही जबरदस्त शिक्षा देऊन अराजक प्रवृत्तीच्या लोकांना जरब बसवला . स्वराज्यातील धाडसी तरुणांना हेरून , त्यांच्यातील उपजत गुण ओळखले आणि अठरा पगड जातींमध्ये समन्वय साधला . शिक्षणाने अडाणी असलेले , पण मुळात काटक आणि शूर असेलेले रामोशी , कुणबी , न्हावी , डोंबारी किती-किती नावे घ्यावी अशी पिढी स्वराज्य कामात उभी राहिली . म्हणून ते रयतेचे स्वराज्य म्हणून ओळखले जाते . ज्यात जनता राज्यासाठी जीव ओवाळून टाकण्यासाठी उतावीळ होती . बलिदानाचे अग्निकुंडच जणू पेटले आणि हा हा म्हणता अनेक जीवांची त्यात आहुती पडली .
तब्बल 400 वर्षांनंतर रयतेच्या ह्या राजाबद्दलचे आकर्षण कमी का झाले नाही ? उलट ते दिवसंदिवास अधिक वाढत आहे . ह्याचे मूळ हे शिवाजी महाराजांच्या जनतेस जबाबदार बनून राज्यकारभार करण्यात दडले आहे . जनतेला आपल्या पिकांची हमी वाटली , आपल्या लेकी बाळांच्या सुरक्षिततेची खात्री पटली , जुलमी देशमुखी आणि पाटीलकी ह्यापासून मुक्तता मिळवून एक स्थिर कर पद्धती अस्तित्वात आली , आणि स्वराज्याचे दृश्य परिणाम आणि फायदे जनतेस दिसू लागले . म्हणून रयत देह भान विसरून शिवाजी राजांच्या पाठीमागे उभी राहिली .
केवळ आत्मविश्वास फुलवणे हे वक्त्याचे काम ! प्रखर भाषणबाजीने स्फुल्लिंग पेटवता येतेच !! पण त्याला कार्याची देखील जोड द्यावी लागते . तरच हवा तो प्रतिसाद साधला जातो .
महाराष्ट्राच्या आत्मलिंगात स्फुल्लिंग पेटवण्याचे काम शिवाजी महाराजांनी केलेच पण त्याला जोड होती स्थिर राजकारभराची हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे .
🔴असामान्य कर्तृत्व आणि महाराष्ट्राच्या आत्मलिंगाचे स्फूर्तीस्थान
शिवाजी महाराज हे असामान्य कर्तृत्ववान होतेच . आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या मर्यादित सैनिक संख्या , साधने ह्यांची त्यांना पूर्ण कल्पना होतीच . त्यामुळे गनिमी कावा हे प्रभावी शस्त्र त्यांनी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात त्यांनी बखुबीने वापरले आणि ते यशस्वी देखील केले . त्याचबरोबर बलाढ्य शत्रू समोर असताना आपल्या कोणतीही अक्षर ओळख नसलेल्या पण तितक्याच शूर असलेल्या सैन्याचे मनोबल कायम राखण्यासाठी शिवाजी राजे अनेक कृप्त्या लढवीत . त्यापैकी काही म्हणजे भवानी तलवार !
भवानी मातेने स्वतःच्या हाताने दिलेली भवानी तलवार ही महाराष्ट्राच्या एका प्रचलित आख्यायिका आहे . एवढंच काय तर, शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूरला किंवा कोल्हापूरला देखील भवानी माता शिवाजी महाराजांना तलवार देत असतानाची पूजा बांधण्यात येते . त्यामुळे हा भाग विस्तृत प्रमाणात जनमानसात लोकप्रिय आहे .
साधारण इतिहास तज्ज्ञांच्या मते अफजलखान 7000 ची मोठी फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला होता . त्यावेळेस त्याने बेबंदशाही माजवून अनेक मंदिरांची विटंबना केली , जनतेस त्राही त्राही करून सोडले . अश्या वेळेस शिवाजी आपल्या समोर येईल अशी त्याला आशा होती . पण तसे काही घडले नाही . प्रतापगडाच्या पायथ्याला जेव्हा भेट ठरली . तेव्हा खानजवळ केवळ 400 शिबंदी होती . आणि महाराजांनी खानाला मारून 7000 च्या फौजेचे एक प्रकारे शिरकाण केले . त्यापूर्वी बलाढ्य शत्रू समोर मावळ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी भवानी मातेने खुद्द आम्हास तलवार दिली असून आपला विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास सैन्यास दिला असावा . ही शक्यता नाकारता येत नाही .
भवानी तलवार ही सध्या लंडनच्या संग्रहालयात असून त्याची प्रतिकृती ही साताऱ्यात आहे . त्यावर कोरलेली पोर्तुगीज अक्षरे ही , ती तलवार पोर्तुगीज असण्याची शक्यता वर्तवतात , कारण पोर्तुगीज युद्ध शस्त्रे ही त्याकाळी निपुण समजली जायची . पण आपल्या अडाणी सैन्यास दिलासा देण्यासाठी , आणि जनतेस धैर्य व आत्मविश्वास देण्यासाठी .. खानाने केलेल्या देवतेच्या विटंबनेचा आधार घेऊन खुद्द भवानी माताच आपल्याला प्रसन्न झाली असून , त्या तलवारी द्वारेच आपण खानाचा नित्पात करणार हा आत्मविश्वास महाराजांनी जनतेस दिला नसेल काय ??
सर्वच बाबी स्व गोटातून पेरण्यात आल्या असे नाही , तर शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या काळात देखील ह्या बातम्यांनी जोर धरलेला तात्कालीन बखरीत मजकूरांवरून आढळतो .
शिवाजी जादू टोना जाणतो , तो 10 फूट उंच उडी मारू शकतो , तो गायब होतो अश्या आशयाच्या बातम्या मुघल सैन्यात देखील होत्या . त्या महाराजांनी आपल्या गुप्तहेर खात्यामार्फत पेरल्या असाव्यात . कारण परतीच्या प्रवासात ह्या बातम्यांनी गनिमाचे एक प्रकारे नीतीधैर्य कमकुवत होते . माणसास पकडणे सोप्पे पण , मायावी सैतानास पकडणे महामुश्किल !! अश्या प्रकारच्या मनोधैर्य खचलेल्या बाता मुघल सैन्यात ऐकण्यास मिळायच्या . त्यातून बऱ्याच चौकी पाहऱ्यांवर मुघलांन कडून गल्लत झाली आणि बनावट परवान्यांवर शिवाजी महाराज महाराष्ट्रात परत आले . आणि दोषी सरदारांची औरंगजेबाने बडतर्फी केली अश्या नोंदी आहेत . आपण स्वतः अलौकिक शक्तींनी युक्त आहोत आणि त्याद्वारेच अनेक असाध्य गोष्टी आपणास आणि आपल्या सैन्यास साधतात हा ही एक प्रकारचा गनिमी कावाच होता !!!
काळ्या किर्रर्र अंधारात , जावळीच्या दाट खोऱ्यात मावळे मोहिमा फत्ते करायचे त्या जंगलात मुक्काम ठोकयचे ह्या गोष्टी मुघलांना विस्मयकारक वाटल्या तर त्यात काय नवल ???
तत्कालीन स्तुती कारांनी ज्यामध्ये उत्तर भारतीय कवी भूषण आदी लोकांनी शिवाजी महाराजांना शिवाचा अवतार संबोधले आहे . त्यातून ह्या प्रतिमा जनमानसात अधिक घट्ट झालेल्या आपणास बघण्यास मिळतील .
🔴शिवरायांचे दैवत्व हितकारक की अहितकारक ??
दैवी शक्तींबद्दल , शिवाजी महाराजांच्या अवताराबद्दल संबंध कसा आला असावा ह्याचा उपापोह आपण वर केलाच आहे . शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मिती काळाच्या पश्चात अनेक राजवटी आल्या . त्यामध्ये मी मुद्दामून पेशवाईचा उल्लेख करणार नाही , कारण कार्यपद्धती वेगळी असली तरी , सातारच्या गादीच्या नामधारी अधिपत्याखाली पेशवे मराठेशाहीचेच प्रतिनिधित्व करीत होते .
ब्रिटिश सत्तेशी लढा सर्वात शेवटी देणारे हे मराठेच होते . त्यामुळे ब्रिटिश सत्तेमध्ये देखील जनतेशी असलेला शिवाजी महाराजांच्या बद्दलचा निष्ठेचे नाते जसेच्या तसे होते . छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज हा तत्कालीन जनतेच्या श्रद्धेचा विषय होता . कोल्हापूरच्या अल्पवयीन शिवाजी राजे (चौथे) ह्यांच्या क्रूर छळाबद्दल लोकमान्य टिळकांनी आणि आगरकरांनी आपल्या वर्तमानपत्रातुन वाचा फोडली . त्याला जनतेनी उदंड सहानभूती दिली . जनतेत आपल्या राजाच्या वंशजांच्या बद्दल ओढ होती , आत्मीयता होती . त्यामुळे जनतेचा वाढता रोष बघून ब्रिटिशांनी टिळकांना आणि आगरकरांना डोंगरीच्या तुरंगात कैद केले . खुद्द महात्मा फुलेंनी त्यांचा जमीन केला होता हा तर इतिहास आहेच .
शिवजयंती सुरू करणे हा लोकमान्य टिळकांच्या अतिव दूरदृष्टीचा भाग होताच . (पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरू केली असा देखील एक मतप्रवाह आहे , त्यांच्या विचारांचा मी सन्मान करतो ) त्यामुळे समस्त मराठी जन पुन्हा एकत्र आले . आणि स्वातंत्र्य लढ्याला त्यामुळे धार मिळाली . बंगालच्या फाळणी बद्दल लॉर्ड कर्झन ह्याला जबाबदार धरताना टिळकांनी त्याची तुलना औरंगजेबाशी केली . ही तुलना करण्यामागे पुन्हा जनतेला शिवकालीन मराठ्यांचा सर्वांत मोठा दुश्मन औरंगजेब ह्याची आठवण करून देऊन , पुन्हा समस्त मराठी जणांना एकत्र करणे हाच होता , आजही प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांच्या प्रचार कामी , शिवछत्रपती किती उपयोगी पडतात !! हे उघड आहे , मूळ महाराष्ट्रात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे नाव वगळून राजकारण करूच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे . शिवरायांच्या नावाने मते मागणारे नंतर औरंगजेबी राज्यकारभार करतात हे अलाहिदा !! पण कोणताही राजकीय पक्ष ह्यास अपवाद नाही हे तिकतच खरे !!
खर म्हणजे शिवछत्रपती आणि त्यांचा काळ हा मराठी माणसास सदैव जागृती , आत्मविश्वास आणि बळ देण्यासाठी इंधनाचे काम करीत आला आहे . परिस्थिती 1830 च्या आसपास वेगळी नव्हती आणि आत्तादेखील नाही . आणि का नसू नये ?? जेव्हा अस्तित्व शून्य राज्याला त्याच्यातील जनांना शिवाजी महाराजांनी अस्तिव प्रदान केले , ज्याने रयतेचे राज्य आपल्या आदर्श राज्यपद्धतीने लोकप्रिय केले . अठरा पगड जातीतून शूर सरदार निर्माण केले !! त्याला प्रजा विसरेल कशी ??? आणि विसरता देखील कामा नये !!!
पण काळ हा सदैव पुढे सरकत असतो . आणि कालानुरूप त्यात अशुद्धी येत जातात . कधी त्या इतिहासकालीन असतात तर कधी त्या , सामाजिक बदलांच्या अनुषंगाने असतात . जे सदैव स्वराज्य निर्मिती कार्यात सहकारी होते . ते राज्य स्थापन झाल्यावर सरदार बनतात . सरदार पुन्हा मनसबदार ! जे उत्तर मराठेशाहीच्या काळात स्वतः राजे झाले . हा अखंड प्रवास आहे . जो शिवकाळाच्या पश्चात देखील झाला . ह्या इतिहासकालीन प्रक्रियेला शिवछत्रपती आणि शिवकाळ अपवाद कसा असेल ??
रयत ही ह्या वरील प्रक्रियेचा हिस्सा नसते . सरदार मनसबदार झाला किंवा मनसबदाराचा राजा देखील झाला तरी , रयत ही नेहमी रयतच राहत असते . रयत हा राज्यातील शेवटचा घटक . जो ह्याच आदर्श राज्यपद्धतीचे वर्णने आपल्या एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करीत असतो . ब्रिटिश राजवट आणि आधुनिक भारताचा अलीकडचा 200 वर्षाचा काळ सोडून दिला तर , अडाणी आणि शिक्षणाचा कोणत्याही प्रकारे संबंध आल्या नसलेल्या प्रजेला शिवछत्रपती त्यांची आदर्श राज्यपद्धती ही त्यांच्या पुढच्या पिढीला कशी समजली असेल ह्याचा अंदाज लावल्यास आपण थक्क होतो .
रयतेचे आपल्या राजाबद्दलच्या प्रेमाचे ते किती अतिउच्च विश्वदर्शन म्हणावे ??? नाही का ???
कालौघात अनुयायी वाढतात , आणि अनुयायी कमी झाले की , भक्त निर्माण होतात . भक्त आणि अनुयायी ह्यात मूलतः फरक आहे . अनुयायी हे महापुरुषांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करतात . हा मार्ग कठीण असतो . खडतर असतो . त्यामुळे प्रत्येक जण अनुयायी होत नाहीत . कालांतराने अनुयायी कमी होतात आणि धोपट , अतिरंजित , उथळ , कार्यसिद्धी माहित नसलेले भक्त तयार होत जातात . ज्यांना आपल्या महापुरुषांनी केलेले कार्य , त्यामागची कारणमीमांसा ह्यामध्ये स्वारस्य अजिबात नसते . किंवा ते जाणून घेण्याची अथवा त्यासंबंधी वाचन करण्याची अजिबात इच्छा नसते . केवळ ऐकीव माहिती वर हे भक्त आपले मार्गक्रमण करतात . आणि विनाशाच्या अश्या टोकाला येऊन थांबतात की त्यापुढे ते भक्त आणि दुर्दैवाने त्यांचे महापुरूष एका संकुचित कोशात अडकतात . जिथून त्यांना बाहेर पडणे अशक्य होऊन बसते .
दोष भक्तांचा नाहीच मुळी , दोष अनुयायी लोकांचा आहे . कारण त्यांची संख्या कमी झाली . ज्यांना शुद्ध स्वरूपात महापुरुष ज्ञात झाले , त्यांनी ह्या भक्तांना सावरणे हे आद्य कर्तव्य आहे . आणि दुर्दैवाने शिवछत्रपतींच्या बाबतीत हे तसेच घडले . आज विविध भक्त हे इतिहासाच्या विकृत लिखाणास , नेत्यांच्या भडखाऊ भाषणाना बळी पडत आहेत हे त्याचे कारण ..
आज इटालियन नेपोलीन बोनपोर्ट जगभरा पोहोचतो
मेसोडेनियन अलेक्झांडर सिकंदर जगभरात पोहोचतो
जर्मन विचारवंत क्लार मार्स जगभरात पोहोचतो
अमेरिकन मार्टिन ल्युथर किंग हे जगभरात पोहोचतात
तर ह्या सगळ्याहुन बरेचसे श्रेष्ठ असणारे , आपले शिवछत्रपती ज्यांनी जुलमी राजवटींच्या काळात आदर्श जनतेच्या हिताची राज्यपद्धती चालवली . जे आज 400 वर्षांनंतर देखील जनतेच्या अधिमनावर राज्य करीत आहे ते जगभरात का नाही पोहचू शकत नाही ?? ह्याचा विचार प्रत्येक मराठी माणसाने करायलाच हवा !!
आपण आपल्या कपाळ करंटेपणामुळे शिवछत्रपतीना केवळ महाराष्ट्र आणि आत्ता तर केवळ एक जातीपुरते बांधून ठेवले . आपल्या सारखे कपाळ करंटे आपणच !!
केवळ शिवगंध लावून , शिवाजी महाराजांन सारखी दाढी ठेवून , रोज मूर्तीला नमस्कार करून , मुसलमानांना शिव्या घालून ( कोरेगाव भीमा नंतर त्यात अजून एका समाजाची भर पडली आहे ) फार तर फार कल्पोकल्पित , अतिरंजित , नाट्यमय कादंबऱ्या वाचून आपल्याला शिवछत्रपती समजले असे भक्तांना वाटते अश्या भक्तांच्या अंगावर चाबकाचे फटकेच ओढणे इष्ट !!
जोडीला पाहिजे तसा इतिहास सांगणारे , आणि जाती-जाती , धर्मा धर्मात भेद वाढवणारी गांडूची अवलाद ह्या महाराष्ट्रात निपजते आणि त्यांना हा महाराष्ट्रा खत पाणी घाततो ह्या सारखे दुर्दैव ते काय असावे ???
मुळात एखाद्या व्यक्तिमत्वास दैवत्व प्राप्त होते म्हणजे , त्याच्या कार्यकर्तृत्वाला दुय्यम महत्त्व प्राप्त होते . त्या व्यक्तीच्या योजना , युद्धनीती केलेले राजकारण ह्याला दुय्यम महत्त्व प्राप्त होऊन . त्याच्या दैवी व्यक्तिमत्वा भोवती सगळा समाज पिंगा घालत बसतो . त्याच्या प्रत्येक कृतीला चमत्कार स्वरूप प्राप्त होते .त्या महापुरुषांचे स्थान देवळात असते , त्यांचे टाकाचे देव बनवले जातात आणि समाजाच्या धार्मिक , आणि सामाजिक कार्यात महापुरुषांना स्थान देण्यासाठी चढाओढ लागते .
शिवछत्रपतींचे वेगळे काय होऊन बसले आहे सांगा ??
देवळे झाली , देवाचे बनवतात तसे मी काही दिवसांपूर्वी छत्रपतींचे टाक बनवलेले पाहिले , लग्न पत्रिका आणि मंगलाअष्टक ह्या मध्ये शिवछत्रपतींचा जयघोष आपल्याला बघायला मिळतो .आर्थिक , सामाजिक कोणतीही बाब जनतेसमोर भावनिक रित्या शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने पुढे आणली जाते . दैवत्वास पोहोचण्याची ही पायरी आहे . किंबहूना ह्या गोष्टी पूर्णत्वास देखील गेल्या आहेत . परंतु ह्याचा अंत अतिशय गंभीर होणार आहे . आणि तो महाराष्ट्रास न परवडणारा आहे .
एकदा दैवत्वास महापुरुष पोहोचले की , त्यांना पुराण कथा चिकटतात , पुराण कथा चिकटल्या की , संभ्रम तयार होतो . उदाहरणच देतो ,
श्री कृष्ण निर्विवादपणे देव आहे . त्याने आपल्या करंगळीवर उचलेला गोवर्धन पर्वत ही एक पौराणिक कथा ! आपल्या समस्त मथुरा वासीयांना वरुण राजाच्या अवकृपेवरून वाचविण्यासाठी कृष्णाने केलेला भव्य पराक्रम ! ह्या पराक्रमाचे महत्त्व अचाट आणि अफाट !! पण जण मानसात एक चमत्कार ह्या पलीकडे ह्या कथेचे स्थान ते काय !!
लोकांना एका करंगळी वर पर्वत उचलण्याचे आश्चर्य फारसे वाटत नाही , कारण एका देवतेला ते फारसे अवघड नाही . देवता सर्वशक्तिमान असते . तिच्या पुढे सर्व तुच्छ !! हा भक्तांचा भाव असल्यामुळे ह्या करंगुळीवर पर्वत उचलण्याचे फारसे महत्त्व राहत नाही .
हाच प्रकार आपल्या शिवछत्रपतींबद्दल घडणार नाही कश्या वरून ???
ही जर स्थिती अशीच कायम राहिली आणि शिवछत्रपती एकदा दैवत्वास प्राप्त झाले की , काही दिवसांनी अफझल खानाचा वध महाराजांनी दिव्य अस्त्राने केला होता किंवा आग्राहुन सुटका महाराजांनी पुष्पक विमानात बसून केली . अश्या आशयाचा इतिहास आपल्या पुढच्या पिढ्यांना काही वर्षांनी वाचायला मिळू शकतो .आणि काही मंडळी ह्याही साठी सज्ज आहेतच .
काळाच्या ओघात असेच अंध भक्त तयार झाले आणि खोट्या शिव इतिहासाला बळी पडले तर आपल्या छत्रपतींचा पराक्रम हा केवळ चमत्कार बनून राहील !!
असे जर झाले तर शिवचरित्र , शिवछत्रपतींचा अपमान तर असेलच पण समस्त मराठी जनाच्या दुःखाला पारावार तो काय रहावा !!!
अजून सुद्धा युवकांनी शिवछत्रपती आणि त्यांच्या राज्यपद्धतीचा सखोल अभ्यास करावा , रयतेस पोटाशी धरणे काय असते ? हे समजून घ्यावे . मदारी मेहतर ची सेवा जाणावी , मागासवर्गीय आणि दरोडेखोर रामोशी समाज गुप्तहेर खात्यात कसा बदलला ते अभ्यासावे , न्हावी समाजाच्या शिवा काशीद कडे आपल्या राजावर जीव ओवाळून टाकावा एवढी निष्ठा कुठून आली , त्यांनी नरवीर तानाजी मालासुरे यांचे बलिदान अभ्यासावे . गनिमी कावा अभ्यासावा , शिवछत्रपतींची आज्ञा पत्रे अभ्यासावी त्यातून शिवछत्रपती त्यांना खरे समजतील .
आरमाराचे जनक शिवछत्रपती , करप्रणालीचे जनक शिवछत्रपती , वतनदारीचे कर्दनकाळ शिवछत्रपती हे युवक आणि शिवभक्त अभ्यासत नाहीत तोवर सगळे निष्फळ आहे . शिवाजी महाराज हे केवळ वेशभूषा धारण करून समजत नसतात तर ते समजतात केवळ , शिवविचार आत्मसात करून , त्यांच्या दृष्टीकोन अभ्यासून जो काळाच्या खूप पुढे होता . पुरोगामी होता . मग ते नेताजी पालकरचे स्व धर्मात परत घेणे असो किंवा जिजाऊंच्या सती जाण्याला विरोध करणे असो .
आपला राजा किती महान होता . हे आपल्या मराठी तरुणांना व्यवस्थित समजले तर मराठी तरुण आपल्या आणि आपल्या आप्तस्वकीय यांच्या उत्कर्षासाठी आकाश पाताळ एक करेन ह्यात माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही
🔴इतिहास संशोधकांचा अक्ष्यम अपराध !! आणि केवळ युध्दस् रम्य कथा...
शिवछत्रपतींच्या जीवनातील एक अजरामर पर्व म्हणजे शिवछत्रपतींनी केलेला दक्षिण दिग्विजय !! तब्बल 20 लाख होनांचा प्रदेश महाराजांनी जिंकला आणि फक्त जिंकला नाही तर ह्या सगळ्या मूलखाची व्यवस्था लावण्यासाठी 150 कारकून सोबत घेतले . त्यांची जागोजागी नेमणूक केली पण ह्यातील एकाला सुद्धा ह्या ऐतिहासिक मोहिमेचा इतिवृत्त लिहावेसे वाटले नाही केवढे हे दुर्दैव !! आज जो काही दक्षिण दिग्विजय बद्दलचा वृत्तांत इतिहासात शिल्लक आहे तो , पोंडेचरीचा गव्हर्नर मार्टिन याच्या रोजनिशी मध्ये आणि त्यांचा मद्रास किनारपट्टीवरील इंग्रजांशी होत असलेला ह्यादरम्यानचा पत्रव्यवहार ह्यावरूनच समजा ह्या परकीयांनी महाराजांच्या हालचाली नोंदवल्या नसत्या तर ???
मुळात मराठा साम्राज्याचा पहिला वृत्तांत लिहणारा लेखक होता जेम्स ग्रँड डफ .त्याने मराठ्यांच्या स्वराज्य स्थापनेपासून त्यांच्या अस्तापर्यंत मराठ्यांचा इतिहास तीन खंडात लिहून प्रसिद्ध केला. मराठ्यांचा इतिहास लिहिणारा हा पहिलाच इतिहासकार म्हणावा लागेल . तो सातारा येथील रेसीडेंट होता . त्याला वाटले ज्यांच्यापासून आपण राज्य जिंकून घेतले त्या मराठ्यांनी राज्य स्थापन केले कसे ? वाढवले कसे ?? व घालवले कसे ?? हे आपण राज्यकर्ते म्हणून जाणून घ्यायला हवे कारण , कोणत्याही समाजाची गुणदोष समजून घेण्यात त्यांच्या इतिहासाच्या शिवाय अन्य कोणतेही साधन असू शकत नाही म्हणून डफच्या या मनोदयास मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एलफिस्टन या चे मोठे प्रोत्साहन मिळाले .डफचा ग्रंथ तीन खंड इंग्लंडमध्ये 1826 मध्ये प्रसिद्ध झाला त्यानंतर अवघ्या तीन वर्षात कॅप्टन केपन पण याने 1829 साली या ग्रंथाचे मराठी भाषांतर " मराठ्यांची बखर " या नावाने प्रसिद्ध केले हीच बखर वेगवेगळ्या रूपात मुंबई इलाख्यातील शाळांमधून मराठ्यांचा इतिहास म्हणून शिकवले जाऊ लागली अव्वल इंग्रजी माध्यमात शिकलेल्या पहिल्या भारतीय पिढीने ह्याच ग्रंथांच्या माध्यमातून आपला इतिहास जाणून घेतला पुढे साठ-सत्तर वर्षे या ग्रंथातील त्रुटी , चुका महाराष्ट्रीय विद्वानांच्या नजरेस येऊ लागल्या त्याची एक स्वाभाविक प्रतिक्रिया न्यायमूर्ती रानडे यांच्या " राईज ऑफ दि मराठा पावर " या ग्रंथाच्या रुपाने सन 1940 उमटली . आधुनिक काळात मराठी विद्वानांनी लिहिलेला मराठा इतिहासावरील हाच आद्यग्रंथ होय !!
सतराव्या शतकात उदयास आलेल्या मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक झालेला उद्रेक नसून त्यामागे तीनशे चारशे वर्षे सामाजिक आर्थिक धार्मिक व राजकीय घटक आपापल्या परीने कार्यरत होते हे त्याचे मुख्य प्रतिपादन होते थोडक्यात न्यायमूर्ती रानडे यांचा ग्रंथ भाष्यरूप होता डफला अशी चिकित्सा करण्याची आवश्यकता भासली नव्हती , कारण तो कितीही केले तरी परकाच म्हणा !!
तत्कालीन इतिहासकार भाष्यकार ह्यांची ही अनास्था पाहिल्यावर आपण मराठ्यांच्या किती अमूल्य अश्या पर्वाला मुकलो आहे ह्याची आपणास जाणीव होते . त्यात अनेक अशुद्धी विशेषतः संभाजी महाराज ह्यांच्याबद्दल लिहून ठेवल्या गेल्या . वी. स. बेंद्रे यांच्या नंतर संभाजी महाराज जनतेस समजले ते वसंत कानेटकरांच्या नाटकांमधून आणि सध्या अमोल कोल्ह्यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतुनच !!
एकंदरीतच अतिशय कमकुवत इतिहास लेखनामुळे अर्ध्याहून अधिक शिवकालीन इतिहास काळाच्या पडद्याआड असताना आणि त्यात एवढा गोंधळ असताना आपण किती जबाबदारीने वागले पाहिजे !
आपल्या इतिहासातील अंत्यत गौरवपूर्ण अध्याय असणाऱ्या शिवछत्रपतीं बद्दल कोणताही भ्रम , पुराण कथा , अतिरंजित कविकल्पना ह्यांना थारा न देता . !!
आपला राजा किती थोर होता !! त्याची राजपद्धती किती आधुनिक होती ...
एका प्रकारे लोकशाहीची ती पायभारणीच होती असे म्हणल्यास अतिशयोक्ती ठरू नये ...
इथून पुढे आपली जबादारी एकच !!
शिवछत्रपती दैवत बनता कामा नये !!
ते आपल्या जगण्याचा श्वास बनावा !!
ध्येय बनावे !!!
दिनक्रम बनावा !!!
शिवछत्रपती आचरणात आणावे !!!!!
पण दैवत बनू नये ! ही हात जोडून कळकळीची विनंती !!
आणि तरी सुद्धा आपण अंधभक्तीने हे प्रकार सुरू ठेवले तर , येणाऱ्या कित्येक पिढ्या आपल्या राजाचा आपल्या मराठाशाहीचा गौरवपूर्ण इतिहास त्यांच्यापासून हिरावून घेतल्याबद्दल माफ करणार नाही !!!
तूर्तास लेखणीस पूर्णविराम !!!
.....✍️निखिल सुभाष थोरवे
खुप सुंदर लेख आहे. मला आवडला..👌👌
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteअप्रतिम लेख🙏नक्कीच सर्वांनी शिवचरित्र आचरणात आणावे🙏🙏🔱
ReplyDelete