मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा : लेखमाला
लेख क्रमांक :- १
शीर्षक :- मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा पर्व पाहिले :- छत्रपती संभाजी महाराज
लेखक:- निखिल सुभाष थोरवे
(प्रस्तुत लेखात मांडण्यात आलेली मते , ही {ऐतिहासिक संदर्भ वगळून} पूर्णपणे लेखकाची आहे .)
(टीप:- लेखातील सर्व ऐतिहासिक संदर्भ हे डॉ.जयसिंगराव पवार लिखित "शिवपुत्र छत्रपती राजाराम" या ग्रंथातील आहेत )
--------------------------------------------------------------------------------
शुभारंभ
--------------------------------------------------------------------------------
१७ व्या शतकात हिंदुस्तानातील घडलेली महत्वाची घटना म्हणजे शिवछत्रपतींनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज !! जे खऱ्या अर्थाने लोकांना उत्तरदायित्व मानणारे होते . म्हणून इतिहासात उल्लेख होताना ते कधी आदिलशहाच्या आदिलशाही सारखे , कुतुबशहाच्या कुतुबशाहीसारखे भोसलेशाही किंवा शिवाजीशाही म्हणून ओळखले गेले नाही . ते ओळखले गेले , मराठेशाही म्हणूनच !
इथे मराठा हा शब्द जातीच्या अनुषंगाने नसून , महाराष्ट्रात राहणारा तो मराठा ह्या अर्थाने अभिप्रेत आहे .
शिवाजी महाराजांची हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी ठराविक प्रकरणे आपल्याला माहिती आहेत , स्वराज्याची शपथ , तोरणा गड - स्वराज्याचे तोरण बांधले , अफझलखानाचा वध , पन्हाळगडचा वेढा , शाहिस्तेखानाची फजिती , पुरंदरचा तह , आग्र्याहून सुटका , सिंहगड - गड आला पण सिंह गेला आणि शिवराज्याभिषेक .
आपल्याला मुद्दामून राज्यभिषेका पर्यंतचाच इतिहास का शिकवला जातो त्या पुढील का नाही ?? ह्या बद्दल माझी नेहमी तक्रार राहिली आहे . काही ठराविक वाचन करणारी मंडळी सोडली तर राज्यभिषेका नंतर नेमके काय झाले ?? दक्षिण दिग्विजय म्हणजे नेमके काय ?? ह्या विषयी मराठी माणसात इतके अज्ञान आहे तिथे , महाराष्ट्राबाहेरील आणि देशाबाहेरील लोकांचे काय घेऊन बसलात ?? निदान स्वराज्य रक्षक संभाजी सारख्या मालिकांमुळे निदान ह्यात थोडी सुधारणा होत आहे . ही नक्कीच सुखावणारी बाब !!
तरीसुद्धा तथाकथित इतिहासलेखक , कथाकार कादंबरीकार , ह्यांच्या उड्या थेट राज्यभिषेकानंतर पेशवाई वर का पडल्या ?? ह्याचे उत्तर मी शोधण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला तेव्हा , मला जाणवले . कथा खुलवण्यासाठी जो मसाला लागतो तो , ह्या स्वातंत्र्य पर्वात अजिबात नाही . ह्यात मस्तानी नाही , कौटुंबिक कलह नाही , चापलुसी नाही , शृंगार नाही . म्हणून स्वामी , राऊ , पेशवाई ह्या कादंबऱ्या अजून का लोकप्रिय आहे त्याचे हे उत्तर मला सापडले..!!
मराठा स्वातंत्र्य युद्धात आहे फक्त धामधूम , गनिमी कावा , लढाया आणि कधी नजरेत न आलेली मराठी राजाची अतिउच्च मुत्सद्देगिरी !! पण मराठी जनांनी हे लक्षात ठेवावे जर , ही धामधूम , लढाई जर आपल्या पूर्वजांनी आरंभली नसती तर , शिवछत्रपतींचे हिंदवी स्वराज्य देखील टिकले नसते आणि महाराष्ट्राची पुन्हा मसनवाट झाली असती . ना शनिवार वाडा उभा राहिला असता ना मस्तानी आली असती . यश मिळवणे एक वेळ सोप्पे पण टिकवणे अवघड !! असे म्हणतात पण मराठ्यांच्या बाबतीत ह्या दोन्ही गोष्टी अवघडच होत्या !! अर्थात ह्या लेखमालेतर्फे त्याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोतच !!
🔴शिवछत्रपतींचा दक्षिण दिग्विजय आणि मृत्यूपूर्वी अपूर्ण राहिलेली कामे :-
राज्याभिषेका नंतर लगेचच शिवाजी महाराजांनी राज्य विस्तार मोहीम हातात घेतली , खर म्हणजे ह्यासाठी त्यांनी दक्षिण भारताची निवड करण्यामागे एक प्रकारची चलाखी होती . मराठ्यांच्या प्रभावामुळे आदिलशाही आणि कुतुबशाही जेमतेम आपल्या राजधान्या आणि आजूबाजूचा प्रदेश सांभाळून शेवटच्या घटका मोजत होती . तरीदेखील ह्या शाह्या पूर्ण न संपवता शिवाजी महाराजांनी मूळच्या शहाजी राजे यांच्या जहागिरीच्या तंजावर पर्यंत स्वराज्याला जोडणारा एक चिंचोळा भूभाग दक्षिण दिग्विजयात निर्माण केला जो जवळ जवळ 23 लक्ष होनाचा प्रदेश होता . काही ठिकाणी जबर खंडणी गोळा केली काही ठिकाणी मुत्सद्देगिरीचा वापर करून कमी मनुष्यहानी मध्ये राज्यविस्तार केला . केवळ राज्य न वाढवता त्याची योग्य ती व्यवस्था लावण्यासाठी 150 पेक्षा अधिक कारकून मंडळी सोबत घेतली . दक्षिण दिग्विजया मध्ये मिळवलेल्या भूभागावर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल हा भाग पूर्ण सुपीक होता . संपन्न होता . रायदुर्ग , चित्रदुर्ग , जिंजी ह्या प्रदेशात तुंगभद्रा , कावेरी , पेनेरू सारख्या नद्यांचे जाळे आहे . त्यामुळे ह्या सुपीक प्रदेशातून महसुल वाढ देखील चांगली मिळाली . हे लक्षात घेतले पाहिजे . आपले दोन पुत्र आणि विस्तारलेले राज्य ह्यांच्यात वाटणी करण्याचे महाराजांचे नक्कीच मनोरथ असणार . कदाचित राजारामास मूळ स्वराज्य देऊन , दक्षिणभारत संभाजी महाराजांना देण्याचा महाराजांचा कयास असावा . सोयरा राणी आणि कारभाऱ्यांच्या सत्ता लालसेची महाराजांना कल्पना नसेल असे समजणे मूर्ख पणाचे ठरेल . विशाल दूरदृष्टी लाभलेला हा राजा भविष्यातील यादवी लक्षात घेऊन त्या दृष्टीने पावले टाकणार असणार हे निश्चितच होते . त्यासाठी महाराजांच्या मनात योजना तयार असणार ! कदाचित दिल्लीचे तख्त सुद्धा शिवाजी महाराजांच्या नजरेच्या टप्प्यात असणार ! अर्थात ह्या काही काल्पनिक कथा नाही तर , रजपूत मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी महाराजांनी ठेवलेली सलगी आणि त्यांना हिंदू म्हणून दिलेली हाक ही शिवछत्रपतींचे अंतिम ध्येय हे दिल्लीचे तख्त काबीज करणे हेच होते . असे म्हणण्यास बराच वाव आहे एवढे निश्चित . कदाचित ते औरंगजेब निवर्तण्याची वाट बघत असावेत . किंवा त्याच्या वारसा युद्धाची यादवी माजण्याची वाट बघत असावेत .. अर्थात हे सर्व आपले कयास आहेत . पण शिवछत्रपतींची दूरदृष्टी विचारात घेता . वरील गोष्टी अगदीच कुणी नाकारू शकत नाही .
शिवछत्रपतींचा आकस्मिक मृत्यू हा जसा रयतेसाठी धक्का होता तसा तो त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा होता . बेशुद्ध अवस्थेत मृत्यूने महाराजांना गाठले . महाराजांना त्यांच्या मृत्यूची कल्पना नसावी हे स्पष्टच आहे . नाहीतर एवढा दूरदृष्टी असलेला आपला राजा हा संभाव्य यादवी अथवा राज्याचे धोके जाणून त्यादृष्टीने तजवीज करून नक्कीच गेला असता . ह्या बद्दल शंका ती काय ??
महाराजांच्या मृत्यूपश्चात जे काही राजकारण झाले ते एव्हाना सर्वांना स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमुळे ज्ञात असल्याने त्याच्या खोलात पुन्हा जात नाही . पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल . अष्टप्रधान हे संभाजीराजे यांना फितूर झाले होते आणि विश्वासाचे फक्त दोन साथीदार उरले होते पाहिले म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि दुसरे कवी कलश ! अश्या स्थितीत औरंगजेबा सारख्या बलाढ्य बाह्य आक्रमणाशी तोंड देणे हे साधे काम नव्हते !!
🔴छत्रपती संभाजी महाराज :- स्वातंत्र्य पर्वाची पहिला उद्गाता
खरं म्हणजे महाराजांच्या निधना समयी मोगलांशी मराठ्यांचा संघर्ष चालू होता . दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगजेबाने शहजादा मुअज्जमच्या ठिकाणी आपल्या बहादूरखान या नामांकित सरदार खान-इ-जहान ही पदवी देऊन सोडले होते. त्याने दक्षिणेत आल्यावर मराठ्यांचे बागलान मधील किल्ले जिंकण्याची मोहीम हाती घेतली होती . त्यामुळे ही धामधूम थोरल्या महाराजांच्या मृत्यू सोबतच चालू झाली होती हे लक्षात घेतले पाहिजे .
पण प्रत्येक गोष्टीचे एक तत्कालीन कारण असते असे म्हणतात , इतिहासात आपण ह्या गोष्टीचा अभ्यास केला . मंगल पांडेने झाडलेली गोळी १८५७ च्या उठावाचे तत्कालीन कारण तसे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचे देखील एक तात्कालिक कारण होते आणि ते होते उत्तर हिंदुस्थानात !!
🔴औरंगजेब महाराष्ट्रात स्वतः का आला ???
औरंगजेबाची मराठा राज्यासह पूर्ण दक्षिण भारत जिंकायची त्याची महत्त्वकांक्षा असली तरी तो एवढा तातडीने दक्षिणेत उतरणार नव्हता पण उत्तरेतील परिस्थितीने तसे वळण घेतले की खुद्द औरंगजेबाला दक्षिणेची मोहीम हाती तातडीने हाती घ्यावी लागली .
त्याचे असे झाले की ,
औरंगजेबाचा रजपूत सरदार मारवाडचा राजा जसवंत सिंह राठोड अफगाणिस्तानात मोहिमेवर असताना 10 डिसेंबर 1679 रोजी मृत्यू पावला . तो निपुत्रिक होता म्हणून त्याचे राज्य खालसा करण्यासाठी औरंगजेबाने आपला धाकटा पुत्र शहजादा अकबर त्यांच्या हाताखाली मोठी फौज देऊन त्यास राजपुतान्यात धाडले वास्तविक जसवंतसिंह याची सारी हयात बादशहाची सेवा निष्ठेने करण्यात गेली होती . एवढेच नव्हे , तर दिल्लीच्या तख्ताच्या वारसा युद्धांत जयपूरचा राजा जयसिंग व जसवंतसिंह या दोघांनी औरंगजेबाच्या बाजूने कौल दिल्याने तो बादशहा झाला होता . पण या उपकारांचे स्मरण करेल औरंगजेब कसला ??
यावेळी जसवंत सिंहांच्या दोन राण्या गरोदर होत्या त्या लवकर प्रसूत होऊन त्यांना पुत्र झाले तेव्हा अजितसिंह ह्या एका पुत्रास गादीवर बसून मारवाडच्या स्वामीनिष्ठ पराक्रमी दिवान दुर्गादास राठोड याने मोगली फौजांशी संघर्ष सुरू केला .
हळू-हळू जयपूरच्या राजासह सर्व रजपूत राजे एक होऊन अजित सिंह च्या मागे उभे राहिले एक प्रकारे या संघर्षाला एकप्रकारचे धर्म युद्धाचे स्वरूप आले याच सुमारास दुर्गादास याने शहजादा अकबरची भेट घेऊन त्याला आवाहन केले की , महान अकबर बादशहाने जसे रजपुतांशी उदार धोरण ठेवून त्यांचे राज्य व धर्म सुरक्षित राखला आणि आपल्या साम्राज्याची वृद्धी केली तसेच तसेच धोरण आलमगीर बादशहा औरंगजेब याने स्वीकारावे तसे झाले तर बादशाहीची सेवा रजपुत निष्ठेने करतील
अकबरास दुर्गादास त्याचे म्हणणे मनापासुन पटले आणि रजपुतांशी सलोखा करण्यात आपल्या साम्राज्याच्या हित असल्याचे पत्र त्याने औरंगजेबाला धाडले पण या पत्राचा औरंगजेबास राग येऊन त्याने आपल्या मुलाची भ्याड , नामर्द अश्या कठोर अशा शब्दात निर्भत्सना केली या कठोर शब्दांनी शहजादयाचे मन क्रोधीत झाले . राजपुतांनी याचा फायदा घेतला आणि शहजादा अकबरास आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारण्याची प्रोत्साहित केले.
एक जानेवारीला 1681 रोजी अकबराने स्वतः तख्तारुढ होऊन आपल्या बापास पदच्युत केल्याचा जाहीरनामा काढला . यावेळी औरंगजेब आजमेरवर छावणी करून होता . अकबराने राजपूत राजांसह मोठ्या सैन्यानिशी अजमेर स्वारी केली .औरंगजेबाकडे यावेळी फारशे सैन्य नव्हते अशा परिस्थितीत त्याचा पराभव अटळ होता . पण तो रणनीती मध्ये जसा निपुण होता तसाच तो कपट विद्येतही तरबेज होता .
लढाईस फक्त एका रात्रीचा अवकाश असताना त्याने पत्र धाडले आणि ते रजपुत राजांच्या हाती पडेल अशी व्यवस्था केली .
त्या पत्रात औरंगजेबाने लिहिले होते , " शाब्बास तुझी !! इतक्या शिताफीने तू सर्व राजपूतास माझ्या तावडीत आणून सोडलेस , तू माझा पुत्र चांगला शोभशील !!! उद्या रणांगणावर तुझी माझी भेट"
रजपुतांच्या हातात हे पत्र पडताच ते बिथरून गेले . रणांगणावर आपल्याला कैचीत पकडून संपूर्ण राजपुताना नष्ट करण्याचा या पिता-पुत्रांच्या कुटील डाव आहे , असे पक्के समजून त्यांनी अकबराची साथ रातोरात सोडली व ते निघून गेले . अकबर आणि दुर्गदास राठोड एकाकी पडले .आता औरंगजेबापुढे आपला निभाव लागणार नाही हे लक्षात येताच त्या दोघांनी रणांगणातून पळ काढला . तीन-चार महिने त्यांनी राजपुताण्यात काढले . पण कुठल्याच रजपूत राजाने त्या दोघांना आश्रय दिला नाही अशा परिस्थितीत औरंगजेबाला तोंड देऊ शकणारी एकच शक्ती आहे ती म्हणजे दक्षिणेतील मराठा साम्राज्य अशी त्यांना खात्री वाटत होती त्यातूनच काही काळाने त्यांनी दक्षिणेचा रस्ता धरला .
अजमेर च्या इतिहास प्रसिद्ध लढाईत अकबराने पळ काढल्याची तारीख होती 16 जानेवारी 1681 बरोबर याच दिवशी दक्षिणेत रायगडावर संभाजीराजांनी आपला राज्याभिषेक साजरा केला हेही विशेष योगायोग !!!
9 मे रोजी अकबराने नर्मदापार केली या काळात त्याने संभाजी महाराजांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे त्यात तो म्हणतो
" राज्य करू लागल्या पासून हिंदूंनो बुडवावे असा औरंगजेबाचा निश्चय झाला आहे . राजपुतांशी युद्ध करण्याचे कारण हेच आहे . सर्व लोक ईश्वराची लेकरे असून राजा हा त्यांचा संरक्षक आहे म्हणून लोकांचा उच्छेद करणे बादशाह सोबत नाही . औरंगजेबाची कृत्य आता मर्यादेबाहेर गेली आहेत मजबद्दल आपले मन निःशंक असू द्यावे उद्या परमेश्वर कृपेने मला राज्य मिळाले तर मी फक्त नावाचा धनी राहणार सर्व राज्य तुमचे असे समजा आपण दोघांनी मिळून बादशहाचा पाडाव करू " ( दिनांक 11 मे 1681 )
संभाजी महाराजांच्या उत्तराची वाट न बघता अकबराने दुर्गादाससह आपली कुच करने चालू ठेवले आणि तो खान्देश बागलानातून त्र्यंबकच्या घाटातून उत्तर कोकणात मराठी राज्यात उतरला (दिनांक 1 जून ) रायगडाच्या उत्तरेस 25 मैलांवर पाली या ठिकाणी संभाजी महाराजांनी पाठवलेल्या अधिकाऱ्याने त्याचे स्वागत करून त्याची व त्याच्या साथीदारांची झोपड्या बांधून राहण्याची सोय केली . तिकडे उत्तरेत अकबराच्या हालचालीवर लक्ष ठेवून औरंगजेब अजमेरला छावणी करून होता . अकबर व दुर्गादास दक्षिणेकडे पळाले वार्ता समजताच त्याने आपला पुत्र शहाजादा आजम याला त्याच्या पाठलागावर पाठवले त्याचा पित्याच्या हातून ही कामगिरी पार पडेल अशी त्याला खात्री नव्हती म्हणून अकबर , दुर्गादास व मराठ्यांचा राजा संभाजी यांची राजयुती मोगल साम्राज्यास अत्यंत धोकादायक असल्याचे त्याच्या लक्षात दुसऱ्याने कोणी आणून द्यायची आवश्यकता नव्हती तो तर स्वतः कुटील राजनीती तज्ञ होता परिणामी त्याने त्याच्या पाठोपाठ दक्षिणेकडे कूच केले (दिनांक 8 सप्टेंबर ) 13 नोव्हेंबर रोजी तो तापी तीरावरील बुऱ्हाणपूर या शहराजवळ पोहोचला ....
एवढा प्रसंग एवढ्या विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे , जर शहजादा अकबर महाराष्ट्राच्या दिशेने आला नसता तर , कदाचित औरंगजेब एवढ्या लवकर दक्षिणेत आला नसता . आणि राज्यभिषेका नंतर आपले प्रशासन सुधारण्यास चांगल्या आणि विश्वासू मंत्री , आणि सरदारांची शोध घेण्यास संभाजी महाराजांस उसंत मिळाली असती .
केवळ कवी कलश आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते सोडले तर स्वतः संभाजी महाराजांना स्वतः लढावे लागत होते . लष्करी मोहिमांची संयोजन , राजनीती पत्रव्यवहार ह्या सगळ्या आघाड्यांवर संभाजी राजे स्वतः लढत होते . हे बघून त्यांच्यावर किती ताण असेल हे आपल्या लक्षात येईल .
पण इतिहास जर तर चालत नसतो . तो घडतोच शहजादा अकबर स्वतः बरोबर खूप मोठे संकट घेऊन आला आहे ह्याची संभाजी महाराजांना खात्री होती म्हणून त्यांनी शहजदयास भेटण्याची घाई केली नाही .
🔴रणजुंजार संभाजीराजे छत्रपती :-
औरंगजेब बादशहा म्हणजे कोणी साधा शत्रू नव्हता काबुल पासून बंगाल पर्यंत आणि कश्मीर पासून दक्षिण भीमा नदी पर्यंत त्याचे साम्राज्य पसरलेले होते . तो 22 सुभ्याचा मालक होता त्याचे महसुली उत्पन्नच केवळ 33 कोटी 25 लाख होते .त्यावेळेसच्या औरंजेबाच्या लष्कराची संख्या फ्रेंच प्रवासी ऍबे कॅरे याने तीन लाख घोडेस्वार व चार लाख पायदळ अशी दिली आहे . खुद्द बादशहाच्या छावणीत 60000 घोडेस्वार , एक लाख पायदळ 50 हजार उंट व 3000 हत्ती असल्याचे नोंद तो करतो .
या पार्श्वभूमीवर मराठ्यांचे लष्करी सामर्थ्य नगण्य वाटावे असे होते इतिहासकार पंडित सेतूमाधवराव पगडी यांनी अंदाज बांधला आहे की , यावेळी मराठ्यांचे सर्व मिळून सैन्यबळ तीस चाळीस हजारांवर होते . ह्यावरून आपल्याला औरंगजेबाच्या प्रचंड ताकतीचा अंदाज लावता येईल .
औरंगजेबाचा प्राथमिक हेतू जरी , आपल्या बंडखोर पुत्रास शिक्षा करणे आणि त्याला साथ देणाऱ्या मराठी सत्तेस बुडवणे हा असला तरी , त्याला आदिलशाही आणि कुतुबशाहीसह पूर्ण दक्षिण भारत जिंकायचा होता . आणि मुघलांचे अनेक वर्षांपासून ते स्वप्न देखील होते .
औरंजेब अक्खा शाही दरबार घेऊन आला होता , त्यात साडे चौदा हजार उमराव मनसबदार ,
त्याचे तीन पुत्र आज्जम , मुअज्जम , कामबक्ष
दोन नातू , मुइजुद्दीन व बेदारबख्त
नामांकित सेनानी असदखान (वजीर)
जुल्फिकारखान (सेनापती)
शहाबुद्दीनखान
रुहुल्लाखान
हसनअलीखान
दाऊदखान , तरबियत खान अश्या अनेक सेनानींचा भरणा होता . सर्व पात्रे मराठा स्वातंत्र्य युद्धाच्या दृष्टीने महत्वाची आहेत म्हणून त्यांना लक्षात ठेवणे अधिक इष्ट ठरेल .
संभाजी महाराजांच्या बद्दल इतिहासात अनेक अशुद्धीनीं घर केले आहे . संभाजी महाराजांच्या वैयक्तिक शुरत्वविषयी सर्वांचे एकमत असले तरी राज्य संरक्षणाच्या कामी त्यांनी केलेल्या कामगिरीविषयी बखरकार आणि इतिहासकार यांनी भिन्न भिन्न मते प्रतिपादन केलेली आहेत . जी बऱ्याच अंशी संभाजी महाराजांवर अन्याय केलेली आहेत . पण जशी जशी इतिहासाची साधने आज उजेडात येत आहेत तशी तशी बरीच नवी माहिती आपणास प्राप्त होत आहे . सर्व आघाड्यांवर जवळ जवळ 8-9 वर्षे संभाजी महाराजांनी कसा शत्रूशी अविश्रांत लढा दिला ह्याचे बरेचसे चित्र आज आपल्यासमोर आहे .
संभाजी महाराजांनी गनिमी कावा तंत्रांनी मोघलांना जेरीस आणले . त्यांची युद्ध नीती ही "हिट अँड रन " पद्धतीची होती . संभाजी महाराजांची कर्नाटक मोहीम नुकतीच उजेडात आणली गेली . केवळ युद्धभूमी आपले स्वराज्य न ठेवता त्यांनी तत्कालीन मोघली प्रदेशातील संगमनेर , पारनेर , पेडगाव , टेंभुर्णी , सोलापूर , बीड , नळदुर्ग , खानदेश इथे मोहीम मराठ्यांनी काढल्या होत्या हे बखरेवरून स्पष्ट होते .
संभाजी महाराजांचा अधिक तडाखा बसला तो म्हणजे पोर्तुगीजांना !! तो तडाखा एवढा जबर होता की , नंतर सुद्धा पोर्तुगीज मराठ्यांच्या कधी नादाला लागले नाही , आक्रमणास तितक्याच किंवा त्यापेक्षाही जास्त तीव्रतेने प्रतिकार हे संभाजी महाराजांचे युद्धनिती होती . पोर्तुगीजांच्या कुरापतीचा बदला त्यांनी सहा हजार पायदळ व दोन हजार घोडदळ यांच्यासह त्यांचे उत्तरेकडील राज्यावर स्वारी करून घेतला .
पोर्तुगीज इतके खचले होते की , त्याचे पुढे वर्णन पोर्तुगीज कागदपत्रांच्या आधारे स. शं . देसाई यांनी केले आहे ...
" इकडे व्हीसेरेने (व्हाइसरॉय) जुवे बेटातून पळून येऊन शहरात प्रवेश केला , तेव्हा शहरात सर्वत्र घबराहट माजल्याची त्याला आढळून आली . सैनिकांचे मनोधैर्य खचले होते ते मराठ्यांशी लढण्याच्या मनस्थितीत नव्हते . ते पाहताच व्हाइसरॉय देखील गर्भगळीत झाला त्याला काही सुचेना , शेवटचा उपाय म्हणून त्यांनी सेंट झवियरला शरण जाण्याचे ठरवले . तर सेंट झवियर कडे गेला त्याच्यामागे लोकांचा एक मोठा घोळका होता त्याने सेंट झवियरची करुणा भाकली नंतर सगळेजण मशाली पेटवून सेंट झवियरची शवपेटी ठेवली होती तेथे गेले त्यांनी ती उघडली आणि व्हाइसरॉयने आपला राजदंड आणि इतर राजचिन्हे सेंट झवियरच्या पायापाशी ठेवली त्या राजचिन्हंबरोबर व्हयसरायच्या सहीचा एक कागद होता . त्याने पोर्तुगीज राजाच्या वतीने गोव्याचे राज्य सेंट झवियरला अर्पण केले आणि तुम्हीच शत्रूला माघारी पाठवावे अशी याचना केली . तुम्हीच शत्रूला पळवून लावावे अशी त्याच्या डोक्यावर जवळ जाऊन डोळ्यात पाणी आणून याचना केली . "
मराठ्यांनी 24 नोव्हेंबर 1683 रोजी जुवे बेत काबीज केले व नंतर त्या दोन दिवसांनी 26 नोव्हेंबरला तेथून माघार घेतली . पोर्तुगीजांना वाटले सेंट झवियरच पावला .. पण खरे म्हणजे शत्रू चारी दिशेने आल्यामुळे संभाजीराजेना एक ठिकाणी लक्ष देणे शक्य नव्हते . म्हणून त्यांनी पोर्तुगीजांशी तह केला . आणि मोगलांचा समाचार घेण्यासाठी ते पुढे निघून गेले . संधी साधून तह मोडून मोघलांना मदत करणाऱ्या पोर्तुगीजांना संभाजी महाराजांनी चांगलीच अद्दल घडवली !!
सिद्धी जोहरने औरंगजेबाच्या फुसीमुळे सन 1681 च्या अखेरीस पनवेलपासून चौल पर्यंतचा प्रदेश उद्धवस्त केला त्याचा बदला म्हणून स्वतः राजांनी वीस हजार सैन्यानिशी सिद्दीच्या दंडराजपुरी कोटावर हल्ला चढवला . सततच्या हल्ल्याने सिद्धी बेजार झाला .. गडकोट ढासळू लागला लोकांनी पडकोटात आश्रय घेतला पण तेवढ्यात मोघल सरदार हसन अली खान उत्तर कोकणात कल्याणवर चालून आला . त्यामुळे रघुनाथ प्रभू ह्यावर सिद्धीची जबादारी सोडून राजांना स्वतः तिकडे जावे लागले .
एकाच वेळेस आपले दुसरे छत्रपती अहोरात्र लढाई करत होते , मोहिमा काढत होते . त्याच बरोबर स्वकीय आणि परकीय ह्या दोघांशी कसे एकहात करत होते , हे बघून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही .
खर म्हणजे सन 1680 ते 1685 लगातार त्यांनी मोघल , सिद्धी , पोर्तुगीज यांच्याविरोधात मध्य महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र , कोकणपट्टी , व गोवा या प्रदेशात आक्रमक व बचावात्मक अशी दुहेरी लढत देऊन या सर्व शक्तींना संभाजीराजांनी हैराण केले , ही बाब युद्धशास्त्रीयदृष्ट्या किती कौतुकास्पद आहे !!!
🔴छत्रपती संभाजी महाराजांची कैद आणि हत्या :-
स्वातंत्र्य युद्धातील सर्वात काळाकुट्ट भाग म्हणावा असा हा भाग ...
औरंगजेब आल्यानंतर त्याने सर्वात आधी जर काय केले असेल तर ते , इथल्या पूर्वीच्या वतनदारांच्या वतनाच्या इच्छा गोंजारल्या आणि बऱ्याच जण त्यात गळाला लागले त्यात कोकणातले शिर्के आणि खेम सावंत हे आघाडीवर होते .
दक्षिण कोकणात शृंगारपुरच्या शिर्क्यांनी उठाव केला आणि कवी कलशास पळवून लावले . ह्यामध्ये प्रल्हाद निराजी व इतरांकडून शिर्क्यांना साह्य लाभले कारण , आजच्या सारखा उत्तर भारतीय लोकांबद्दल त्यावेळेस सुद्धा अढी हो होतीच . कवी कलशाचे राज्यांच्या इतके जवळ जाणे कुणालाही विशेषतः महाराष्ट्रातील कारभाऱ्यांना मानवनारे नव्हते .. त्यामुळे शिर्क्यांच्या तर्फे कवी कलशाचा काटा काढला गेला तर उत्तमच !! हा मनोदय कारभाऱ्यांचा असणे हे स्वाभाविकच ... कवी कलशाच्या पराभवाची बातमी समजताच संभाजी महाराज रायगडावरून धावतच खेळण्या किल्ल्याला आले . व त्यांनी शिर्क्यांशी लढाई करून त्यांना पळवून लावले .
ह्या घटना घडत असतानाच औरंगजेबाने आपला सरदार मुकर्रबखान उर्फ शेख निझाम ह्याला 25 हजारांची फौज घेऊन पन्हाळा किल्ल्या घेण्यासाठी पाठवले होते . त्यादृष्टीने तो कोल्हापूर मुक्कामी होता . शिर्क्यांनी पराभव होताच त्याच्या छावणीत आश्रय घेतला .
संभाजी महाराजांच्या हालचालींवर औरंगजेबाचे लक्ष होतेच त्याने तातडीने मुकर्रबखान ह्याला संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी पाठवले . त्याने तातडीने हालचाल करून शिर्क्यांच्या साहाय्याने फौजा चुकवत आडवाटने कूच करत 45 कोसांचे अंतर कापले . शिर्क्यांच्या माहिती शिवाय हा परिसर माहिती असणे खानाला अश्यक होते . संभाजी महाराजांचा लढा हा परिकीयांपेक्षा स्वीकीयांशी होता . हे त्याचेच द्योतक म्हणावे !!
उपलब्ध इतिहासावरून असे दिसते की , संगमेश्वरी संभाजी राजांकडे केवळ 400-500 शिबंदी होती . आणि मोघलांकडे 2000- 3000 . कितीही शौर्य गाजवले असते तरी , मराठ्यांचा पराभव अटळ होता . कारण शत्रू संख्या 5 ते 6 पट अधिक होती .
वास्तविक एका छोट्या तुकडीला शत्रूच्या तोंडाशी देऊन , संभाजी राजे स्वतः तिथून निसटायला हवे होते . पूर्वी देखील शिवाजी महाराजांनी ह्याच प्रकारचा अवलंब पन्हाळगडच्या वेढ्यात केला होता . पण कदाचित संभाजी महाराजांना त्याचे भान राहिले नाही ते बेभानपणे गनिमावर तुटून पडले . म्हाळोजी घोरपडे व इतर अनेक मराठा त्यात ठार झाले . लढाईच्या धुंदळीत मराठ्यांची पळापळ चालू झाली . संताजी घोरपडे व खंडो बल्लाळ यासारखे सेवक ही ह्यात वाट दिसेल तिकडे पळू लागले . कदाचित संभाजीराजे आणि कवी कलश या दोघांना सुरक्षित वाटणाऱ्या मार्गाने त्यांना पळण्यास सांगून त्यांनी पलायन केले असेल . संभाजीराजे नावडी (पेठ संगमेश्वर) या गावी पकडले गेले ह्याचा उल्लेख पेशवे दप्तरात आहे . नावडी ह्या बंदरात तारव्यातून पळून जाण्यासाठी ते या ठिकाणी आले असावेत पण त्यापूर्वीच मोगलांनी त्यांना पकडले (3 फेब्रुवारी 1689)
मुकर्रबखान ज्या वेगाने आला त्याच वेगात संभाजी राजे आणि कलश यांना घेऊन बादशहाच्या छावणीकडे निघाला ह्याकामी अर्थात शिर्क्यांनी मदत केली आसणार ह्यात दुमत नाही . अंत्यत वेगाने तो घाटमाथ्यावर आला तिथे त्याला कोल्हापूर मधली कुमक येऊन मिळाली आणि तो कऱ्हाड-वडूज-दहिवडी फलटण-बारामती या मार्गे बहादुरगडास पोहोचला .
15 फेब्रुवारी 1689 रोजी मुकर्रबखानाने संभाजी महाराज व कवी कलश यांना बादशहा समोर हाजीर केले . आग्रा भेटीत शिवाजी महाराजांना जिवंत सोडून त्याने फार मोठी चूक केली . असे तो वारंवार म्हणायचा .. आणि त्यामुळे तो संभाजी महाराजांना सोडणार नव्हता . खरे तर औरंगजेब खूप मोठी घोडचूक पुन्हा एकदा करत होता . ते म्हणजे संभाजी राजे यांना ठार मारून .
एक वेळ मराठ्यांचा हा राजा जिवंत ठेवला असता तर कदाचित त्याला त्यांचे राज्य भेटले असते . पण त्याला मारून औरंगजेबाने स्वतःचे राज्य तर गमावलेच पण सुख , समाधान , चैन , संपत्ती आणि शेवटी जीव सर्व काही गमावले ...
बादशहाची छावणी भीमा नदीच्या काठी तुळापूरपासून कोरेगाव पर्यंत 5 ते 7 मैल पसरली होती . ह्याच छावणीच्या कारागृहात राजबंदयाचा अनन्वित छळ सुरू होता . शेवटी बादशहाच्या हुकुमाने छावणीच्या बाहेर नेऊन वढू या गावच्या रानात तलवारीच्या साह्याने ठार मारले गेले (11 मार्च 1689).
मृत्यूनंतरही बादशाहने संभाजी महाराजांच्या बद्दल वैराची भावना सोडली नाही , संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले . त्यांचे मस्तक औरंगाबादहुन बुऱ्हाणपूरपर्यंत मिरवण्यात आले , यानंतर ते दिल्लीला नेण्यात येऊन शहराच्या द्वारावर लटकवण्यात आले .
अश्या प्रकारे , मराठ्यांची सुरू असलेल्या संघर्ष नाटकाचा पहिला अंक संपला बादशहाला वाटले की , संघर्ष नाट्यावर शेवटचा पडदा पडला पण मोघल इतिहासकार खाफीखानाने यथार्थ उद्गार काढले आहेत
" परमेश्वरी संकेत असा होता की त्या दृष्टीने मराठ्यांनी सुरू केलेली उच्छादाची मुळे दक्षिणेतून उपटली जाऊ नयेत आणि बादशहाची भरलेले हयात मोहीम करण्यात आणि मराठ्यांचे किल्ले घेण्यात जावी "
खाफीखान या सारखा मोघल इतिहासकाराने संभाजी महाराजांच्या पराक्रमाने कडे पाहून उद्गार काढले आहेत की ,
" संभाजी राजा शिवाजीराजा पेक्षा औरंगजेब बादशहाला दहा पटीने अधिक तापदायक शत्रू ठरला "
🔴धर्मवीर की स्वराज्य रक्षक ??
" औरंगजेबाने संभाजी महाराजांना छावणीत इस्लाम धर्म स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला होता , तो संभाजी महाराजांनी नाकारला आणि म्हणून त्याने संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली " ही बाब जवळ जवळ प्रत्येक मराठी माणसाच्या मुखोद्गत आहे . आणि कडव्या हिंदुत्ववादी संघटनांनी ह्या गोष्टीचा इतका अतीव लाभ उठवला आहे की , बोलण्यास सोय नाही . धर्मवीर संभाजी महाराज ही उपाधी संभाजी महाराजांना चिटकविण्यासाठी जेवढी मेहनत ह्या मंडळींनी खर्ची घातली तेवढी मेहनत जर , त्यांनी शंभू चरित्र शुद्धीकरणासाठी खर्ची घातली असती तर , शंभू चरित्र नको त्या आरोपांच्या डागाळले नसते . पण संभाजी महाराजांच्या मृत्यचे ह्या पद्धतीने विशेषतः गेल्या 50 वर्षात उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी संघटनांनी भांवडल केले ते केवळ आणि केवळ लांच्छनास्पद आहे !! आणि ह्या भांडवलास साधे भोळे हिंदू तरुण ज्यात बहुजन समाज जास्त आहे . ते बळी पडले . आपण संभाजीराजे यांना ज्या वेळी धर्मवीर संबोधतो त्यावेळेस आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एक प्रकारे अपमान करीत असतो हे प्रत्येक हिंदूंनी लक्षात घ्यावे . आजही संभाजी राजास हिंदू मुस्लिम संघर्षाच्या मध्ये उभे केले जाते आणि क्रूर हत्येचे भांडवल करून तरुणांची माथी भडकवली जातात हे त्रिवार सत्य आहे .
ज्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना राजाच्या चारित्रावरचे डाग ज्यांना पुढे होऊन पुसावेसे वाटले नाही . स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची व्यसनी आणि स्त्रीलंपट अशी प्रतिमा ज्यांना संशोधन करून पुसावीशी वाटली नाही . त्यांनी बेंबीच्या देठावर ओरडून ओरडून संभाजी महाराजांची धर्मवीर ही प्रतिमा घट्ट केली आणि संबंध महाराष्ट्राने ती बिनदिक्कतपणे स्वीकारली सुद्धा ह्या एवढे ते दुर्दैव काय ???
त्यातल्या त्यात अमोल कोल्हे यांना धन्यवाद द्यावे वाटतात कारण , त्यांनी मालिकेचे नाव " स्वराज्य रक्षक संभाजी " ठेवले ज्याने संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा उचित सन्मान केला आहे . आणि शिर्षकामधूनच संभाजी महाराजांचा जीवन उद्देश ध्वनित होत आहे .
मुळात औरंगजेब ही सापाची जातच !! ज्याने आपल्या सख्या भावांची सिंहासनासाठी हत्या केली , आपल्या वडिलांना कारागृहात डांबून ठेवले आणि तिथेच त्याला मृत्यू प्राप्त झाला अश्या औरंगजेबाकडून अशी अट घालणे केवळ हास्यास्पदच म्हणावे लागेल . संभाजी महाराजांची हत्या हा पूर्णपणे औरंगजेबाच्या राजकीय डावपेचांचा भाग होता . त्याने ऐन केन प्रकारे संभाजी महाराजांना मारले असतेच .. त्याचा तो इरादा जेव्हा मुकर्रबखानाने जेव्हा संभाजीराजे यांना कैद केले ही बातमी बादशहाच्या छावणीत पाठवल्या पाठवल्याच निश्चित झाला होता . उशीर फक्त अंमलबजावणीची होता .
ह्या साठी आपल्याला समकालीन इतिहासकार भीमसेन सक्सेना आणि साकी मुस्तेदखान ,खाफीखान , ईश्वरदास नागर , मनुची (इटालियन प्रवाशी) इत्यादी लोकांनी संभाजी राजेंच्या अटकेचे सविस्तर वर्णन केले आहे . हे सर्व औरंगजेबाच्या छावणीत हजर होते हे विशेष ! त्यामुळे त्यांच्या नोंदी अधिक गांभीर्याने घेणे आवश्यक आहे . १५ फेब्रुवारी १६८९ रोजी जेव्हा मुकर्रबखानाने संभाजीराजे आणि कवी कलश ला बादशहा समोर हाजीर केले तेव्हा , लगेच बादशहाच्या हुकमाने त्या दोघांची विदूषकाचे कपडे घालून , बाजारपेठतुन धिंड काढली व जाहीर विटंबना करण्यात आली . त्यामुळे बादशहाचा इरादा हा पहिल्या पासून संभाजीराजे यांना कष्ट देण्याचाच होता हे स्पष्ट होते .
मोगलांचा आणखी एक इतिहासकार ईश्वरदास नागर म्हणतो की ,
" बादशाह समोर हजर केल्यावर एखलास खान व हमिदुद्दिनखान या सरदारांनी संभाजीराजास बादशहास ताजीम ( मुजरा ) देण्यास वारंवार सुचवले पण त्याचा उपयोग झाला नाही संभाजीराजा इतका "गर्विष्ठ " होता की त्याने बादशहासमोर यत्किंचितही मान लवविली नाही "
यावरून संभाजी राजांचा बाणेदारपणा सिद्ध होतो .
ईश्वरदास नागर पुढे म्हणतो , " बादशहाने काही क्षण राजबंदयांना न्याहाळून छावणीतील कारागृहात धाडले . त्यांच्यावर सक्त पहारा ठेवला गेला .कुणालाही बादशहाने आपल्या मनाचा थांगपत्ता लागू दिला नव्हता . दोनच दिवसांनी बादशहाने आपला सरदार रहुउल्लाखान या सरदारास संभाजीराजांकडे पाठवले रहुल्लाखानने मार्फत बादशहाने राजास दोनच प्रश्न विचारले
" तुझ्या खजिने जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे ? "बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करुन संबंध ठेवीत होते ? "
या प्रश्नांच्या उत्तरादाखल संभाजीराजांनी औरंगजेबाला शिव्यांची लाखोली वाहिली . संभाजी राजे काय बोलले , हे बादशहास सांगण्याची देखील रुहल्लाखानास हिम्मत झाली नाही .पण त्याने ते बोलणे कशा प्रकारचे होते याचा त्याने बादशहास इशारा दिला यावर बादशहाने आज्ञा केली की , " संभाजीराजांच्या डोळ्यात शेळी फिरवून त्याला नवीन दृष्टी द्यावी "
ईश्वरदास नागर हा मोगल इतिहासकार औरंगजेब बादशहा चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहे विशेष म्हणजे त्यावेळी छावणीत हजर होता त्यामुळे त्याच्या नोंदी आपण महत्त्वाच्या धरल्या पाहिजेत . यादरम्यान औरंगजेबने कधीही संभाजीराजे धर्मपरिवर्तनास संदर्भात विचारले नाही हे विशेष !
मुळात औरंगजेबास संभाजीराजास ठार मारायचे होते आणि त्याला यासाठी कोणती वेळ दवडायची नव्हती आग्र्यामध्ये शिवाजीराजांना जिवंत ठेवून त्याने जी चूक केली होती ती चूक त्याला आता या वेळेस सुधारायची होती . औरंगजेबाच्या भोवती नेहमी मुल्ला मौलवींच्या कोंडाळे असायचे आपणा आरंभलेल्या साम्राज्यविस्ताराला औरंगजेब
" जिहाद " असे गोंडस नाव द्यायचा . औरंगजेब पूर्ण धर्मांध असल्यामुळे काफरास कुराणात कोणती शिक्षा दिली आहे त्या नुसार त्याने आपल्या राजास त्याने हाल हाल करून त्याने मारले .
त्यामुळे औरंगजेबाने धर्म बदलण्या संबंधी संभाजीराजास काही विचारणा केली असेल असे वाटत नाही . निदान तसे पुरावे नाही
आणि जरी काही लेखकांच्या कल्पना विस्तारास ग्राह्य धरून आपण हे खरे मानले तर ,
नक्कीच संभाजी राजे हे काही निधर्मी नव्हते , किंवा सेक्युलर किंवा लिबरल नव्हते . त्यामुळे असा प्रस्ताव जरी औरंगजेबाने दिला असेल जरी , तरी संभाजीराजांनी त्यास केराची टोपली दाखवली असेल एवढं नक्की !!!
मुळात औरंगजेबाला संभाजी राजा जिवंत ठेवायचेच नव्हते , त्याला वाटले मराठ्यांचा राजाच एवढ्या क्रूरपणे आपण मारून टाकला तर , मराठे गलितगात्र होतील . त्याची राणी तिचा छोटा पुत्र आणि पोरसवदा त्याचा भाऊ राजाराम ज्याने बहुतेक काळ नजर कैदेत घालवला आहे . तो काय करू शकणार आहे ?? राजा मेला की , प्रजा मरते ह्या सूत्राने मराठे चालतील हा हेतू मनात ठेवूनच त्याने हा राजकीय निर्णय घेतला असावा .
औरंगजेब हा कपटी , धर्मांध आणि निच होताच त्याचे कृत्य तर त्याहूनही निच होते .
पण तत्कालीन राजकिय निर्णयामुळे मराठे पेटून उठले . ज्यांनी औरंगजेबास आपली कबर महाराष्ट्रातच शोधण्यास भाग पाडले ..!!
🔴संभाजी महाराजांची इतिहासातील कामगिरी :-
मराठ्यांच्या इतिहासातील छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या कालखंडातील एक तेजस्वी पर्व मानायला हवे संभाजी महाराजांच्या कामगिरीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष औरंगजेब बादशाह दिलेला आठ-नऊ वर्षांच्या लष्करी संघर्ष !!!
रायगडावर सिंहासनाधिष्ठित झाल्यावर थोड्याच कालावधीत त्यांना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या स्वारीचा सामना करण्याचा प्रसंग आला . दक्षिणेत मराठा राज्यावर बादशाही सरदार चालून येणे व प्रत्यक्ष बादशाह चालून यात मोठा फरक होता .
पाठवलेला सरदार यशस्वी ठरू अथवा अपयशी त्याला केव्हा तरी परत येण्याचा हुकूम निघत असे पण प्रत्यक्ष बादशाह दक्षिणेत मराठ्यांचे राज्य बुडवण्याचा हेतू घेऊन उतरल्यानंतर त्याला परत फिरण्याचे फर्मान कोण काढणार ??
बादशाह यशस्वी झाल्याशिवाय म्हणजे मराठा राज्य पूर्ण बुडल्याशिवाय तो परत जाऊ शकत नव्हता .
दक्षिणेच्या मोहिमेतील अपयशी बादशहा , मराठ्यांकडून हतबल झालेला बादशहा म्हणून तो दिल्लीला परत जाऊ शकत नव्हता तसा प्रयत्न म्हणजे त्याचे साम्राज्य , त्याच्या प्रतिष्ठेवर त्याने आपणहून निखारा ठेवल्यासारखे होणार होते .मोगल मराठा युद्ध संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांच्या बाजूने बंद होऊ शकले नाही याचे रहस्य बादशहाच्या प्रतिष्ठा संरक्षणात होते.
1681 झाली तेव्हा बादशाह आपल्या पुत्राच्या पाठलागावर दक्षिणेत आला त्यावेळी त्यांची मनोभूमिका मोठी उत्साहाची होती प्रचंड आत्मविश्वास बाळगून आला होता . आपल्या प्रचंड लष्करी शक्तीपूढे मराठा सत्ता हा-हा म्हणता उडून जाईल अशी त्याची खात्री होती आणि हा त्याचा आत्मविश्वास चुकीचा होता असे नाही आपल्या प्रचंड फौजफाट्यासह तो जेव्हा दक्षिणेत उतरला तेव्हा मराठा सोडून दक्षिणेतील सर्व सत्ता भयचकित होऊन गेल्या होत्या हेही तितकेच खरे...
तीन तीन सत्तांशी लढून संभाजी राजे अजरामर झाले ... आणि धर्मांध औरंगजेबाच्या क्रूर हत्येमुळे ते हुतात्मा झाले .
असे म्हणतात , हुतात्म्याचे कार्य मरणाने संपत नाही . खरे तर , त्याचे कार्य मरणानंतर सुरू होते कारण आपल्या बलिदानाने तो आपल्या लाखो देशबांधवांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी चेतना देत असतो पुढच्या अनेक पिढ्यांच्या "चेतना केंद्र " बनलेला असतो संभाजी महाराजांचे कार्य त्यांच्या मृत्यूने संपले नाही
तसे ते संपेल ह्या आशेने औरंगजेबाने त्यांना ठार केले पण त्याच्या आशेची ची निराशा झाली .
महाराष्ट्रात संभाजी महाराजांचे कार्य दुप्पट चौपट वेगाने वाढले...
महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्याचा अग्निकुंड पेटला होता ... आणि त्याच्या ज्वाळा आत्ता औरंगजेब आणि त्याची संपूर्ण मोगलाई गिळंकृत करून शमणार होत्या ....
ह्या लेखमालेतील लेखाचा पुढचा भाग लवकर ............
लेखक:- ......✍️निखिल सुभाष थोरवे
(टीप:- लेखातील सर्व ऐतिहासिक संदर्भ हे डॉ.जयसिंगराव पवार लिखित "शिवपुत्र छत्रपती राजाराम" या ग्रंथातील आहेत)
Good written ....very informative ...
ReplyDeleteThank You...
ReplyDelete