Romancing with Corona
शिर्षकाने जरूर गोंधळा असाल पण ,
लोकं करोनाने मेली नाहीत तर , भुकेने मरतील अशी स्थिती निर्माण झाली आहे .
आत्ता रेडझोन हा जिल्हा , तालुका , गाव , गल्ली पर्यंत नाही तर रुग्णांच्या घरापर्यंत मर्यादित ठेवायला हवा .
एच.आय.व्ही एड्स 1981 साली आला होता तेव्हा सुद्धा ती एक महामारीच होती . अजूनही त्यावर ठोस औषध नाही . तरीसुद्धा आपण त्यासोबत जगायला शिकलोच ना !
दाढी , कटिंग करताना न्हाव्याच्या दुकानात बदलले जाणारे
'ब्लेड' चे पान आणि इंजेक्शन देताना प्रत्येक वेळेस बदले जाणारे ' सिरिंग्ज ' हे त्याचेच उदाहरण !
तसेच मास्क वापरणे , सतत हात साबणाने धुणे , सोशल डिस्टन्स ठेवणे हे आत्ता आपल्या जीवनशैलीचा भाग येणारी दोन वर्षे बनणार आहे ह्याची मानसिक तयारी प्रत्येकाने करायला पाहिजे .
२००० लोकांमध्ये होणारे भव्य विवाह सोहळे , मोठ्या जत्रा ,देवदर्शन , प्रचारसभा , मेळावे , सिनेमागृह ह्या गोष्टी काळापुरत्या आपल्याला विसरायलाच लागणार ! हीच वस्तुस्थिती आहे . त्याला सध्या पर्याय नाही .
राजस्थानचा 'भिलवाडा पॅटर्न ' बारामती मध्ये यशस्वी झाला कारण , बारामती छोटे शहर आहे . तसाच पॅटर्न प्रत्येक ठिकाणी चालणार नाही .
One Fits to All हे करोनाच्या बाबतीत शक्य नाही .
मुंबईसाठी वेगळा , पुण्यासाठी वेगळा , नाशिकसाठी वेगळा , मालेगाव साठी वेगळा असे प्रत्येक शहराचे स्वतंत्र पॅटर्न आत्ता आपल्याला विकसित करावे लागतील . प्रशासन त्याबाबतीत जरूर विचार करीत असेल . ह्याची एक नागरिक म्हणून खात्री वाटते .
लॉकडाऊन चा एक्सिट प्लॅन आपल्याला आत्ता तयार ठेवावाच लागणार आहे . मुळात आलेली आपत्ती ही जगासाठी नवीन आहे . केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्या त्यांच्या परीने ह्यावर मार्ग काढत आहेतच पण आपत्ती नवीन असल्याने निर्णय प्रक्रियेत प्रचंड गोंधळ आहे . विशेषतः आर्थिक आघाडी की सार्वजनिक आरोग्य ह्या मध्ये द्वंद्वदव अधिक आहे . ह्याबाबतीत वीस लाख कोटींची चिरफाड मी मागील लेखात केली होतीच ! त्याचा उल्लेख अधिक टाळतो .
प्रत्येकाच्याच समोर बरेच प्रश्न आ वासून आहेत . त्याला सामना करण्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण होणे जास्त गरजेचे आहे . तो विश्वास लोक प्रत्यक्ष लोक कामाला सुरुवात करीत नाही . पूर्वीसारखी रस्ते वाहतूक , रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतूक पुन्हा सुरू होत नाही . तोवर निर्माण होणार नाही .
शेवटी 'काळजी घेणे' हे सर्वस्वी आपल्या हातात आहे . ज्या प्रमाणे आपण चालत्या मिक्सरमध्ये हात घालत नाही , पेटत्या गॅस वर बसत नाही तसेच स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना धोका उत्पन्न होईल असे वर्तन प्रत्येकाने जबाबदारीने टाळले तर बराच धोका टळू शकतो .
मुंबई सारख्या ठिकाणी विशेषतः लोकल ट्रेन मध्ये सोशल डिस्टन्स ही अश्यकप्राय गोष्ट वाटत असली तरी , त्यावर देखील ऑफिसमध्ये कामाचे तास वाढवून , दोन दिवसाआड कामावर येण्याची मुभा असेल किंवा शक्य असेल तिथे 100 % Work From Home चे अवलंबन असेल ते करणे . आणि मुंबईची गर्दी काही कालावधीसाठी का होईना नियंत्रित करणे आत्ता काळाची गरज आहे .
करोना आपत्तीच्या निमित्ताने विशेष करून बिहार , उत्तर प्रदेश , पश्चिम बंगाल ह्या राज्यातील मजुरांना परत रोजगारासाठी महाराष्ट्र किंवा गुजरात सारख्या प्रगत राज्यात जायला लागू नये ही जबाबदारी त्या संबंधित राज्यांनी घेतली पाहिजे . एक प्रकारे ह्या मागास स्वतःच्या औद्योगिक क्रांती साठी मुबलक प्रमाणात आणि गरजू मनुष्यबळ आयतेच उपलब्ध झाले आहे . त्याकडे संबंधित राज्याच्या प्रमुखांनी व्यापक दृष्टीने बघण्याची गरज आहे .
आणि ह्या मुळे महाराष्ट्रासारख्या राज्यात लोकसंख्या विकेंद्रीकरण तर घडून येईलच शिवाय स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध नक्की होतील . पण ह्या साठी मुख्य गरज आहे ती मागास राज्यांनी कंबर अधिक कसण्याची !! लोकसंख्या वाढवायची आणि महाराष्ट्राच्या जीवावर जगण्यासाठी सोडून दयची ही दळभद्री वृत्ती ह्या मागास राज्यांनी आत्ता सोडली पाहिजे . आधीच प्रांतवाद महाराष्ट्रात प्रचंड वाढीस लागला आहे . त्यामुळे हे मजूर जेव्हा परत महाराष्ट्रात यायला बघतील तेव्हा त्यांच्या परत हल्ले झाले तर नवल वाटायला नको !! परप्रांतीय लोकांचे रोजगारासाठी महाराष्ट्रावरील अवलंबित्वव कमी झाले तरच महाराष्ट्रा सारख्या राज्याचा भार हलका होईल !!
करोना आपत्तीच्या निमित्ताने 'नगर नियोजनाचे ' महत्त्व देखील अत्यंत अधोरेखित झाले आहे . पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या जुळ्या शहरातील करोना ग्रस्त रुग्णांच्या संख्येतील तफावत ही गरज अधिक अधोरेखित करते . वास्तविक ह्या दोन्ही शहरात करोनाचे रुग्ण एकाच वेळेस सापडले होते . मुळात पिंपरी चिंचवड हे महानगर उपनगरांमध्ये विभागले आहे . तर पुणे हे मुख्य शहरातील पेठांमध्ये केंद्रीत झाले आहे . हा त्यातील मुख्य फरक ! अगदी पुण्यात मूळ पेठा सोडून नदीच्या पलीकडील कोथरूड , शिवाजीनगर , औंध , वारजे , कर्वेनगर ह्या शहराच्या सुनियोजित विकसित झालेल्या भागात करोना रुग्णांची संख्या खूप कमी आहे . हे लक्षात घेतले पाहिजे .
एकंदरीत इथून पुढे नगर विकसित करताना करोना सारख्या महामारी विचारात घेऊन राज्यकर्यांना आराखडे बनवावे लागतील . आणि शहर वाढत असताना ते आडवे न वाढता उभे कसे वाढेल ?? ह्या कडे अधिक लक्ष दिले पाहिजे . एकंदरीत पुणे हे आजूबाजूच्या उपनगरांमध्ये विस्तारने ही काळाची गरज आहे . आजही शहरातील नागरिक हे भांडी घेण्यासाठी रविवार पेठ गाठतात किंवा कपड्यासाठी लक्ष्मीरोड ला जातात . जी बाब त्याचेच प्रतीक आहे . पुण्याच्या आजूबाजूच्या उपनगरांमध्ये अधिक मोठ्या बाजारपेठा ह्या आपल्याला येणाऱ्या काळात वसवाव्या लागतील जेणेकरून शहराचा ताण कमी होऊ शकेल .
मीडियाने देखील अधिक जबाबदारीने वार्तांकन करणे अपेक्षित आहे . करोना ग्रस्तांची संख्या रोज प्रेक्षकांच्या माथी मारून त्यांना घाबरून सोडण्यापेक्षा . जे लोक करोनातून बरे झाले आहेत . त्यांच्या मुलाखती रोज दाखवणे , करोना बाबतच्या संशोधनावर अधिक वृत्तांत प्रसारित करणे . आणि व्यापक जागृती घडवून आणणे ह्या गोष्टी जबाबदार मीडिया कडून आत्ता अपेक्षित आहे . प्रेक्षकांना घाबरून सोडणे ही जबादारी न्युज चॅनेल्सनी भुतांच्या मालिका आणि पिक्चर वर सोडली तर अधिक योग्य ठरेल असे मला वाटते .
करोना निर्विवादपणे संकट आहेच पण प्रत्येक संकट येताना आपल्यासोबत एक संधी घेऊन येत असते . ती आपण ओळखायला हवी . आणि माझ्या सारख्या तरुणांनी तर अधिक ओळखला हवी .
उदाहरणार्थ , येणाऱ्या वर्षात वैयक्तिक स्वच्छता , संस्थात्मक स्वच्छता ह्याबरोबरच आरोग्य क्षेत्राला अधिक मागणी वाढू शकते आपण युवकांनी ह्या संधी आत्ता शोधायला हव्या .तरच बदलेल्या स्थितीत आपला निभाव लागू शकतो . आणि तीच काळाची गरज आहे . माझी नोकरी गेली किंवा मला अर्धाच पगार चालू आहे . माझा धंदाच बसला आहे असे रडून पडून काही होणार नाही .
अडचणीत पुन्हा उभारी घेण्याची महाराष्ट्राची जुनी सवय आहे . आणि शिवरायांच्या मावळ्यांना ही सवय विसरून चालता कामा नये .
आपण पुन्हा उभारी घेऊ ह्या आशावादासह लेखणीस तूर्तास पूर्णविराम !!
...........✍️निखिल सुभाष थोरवे
Comments
Post a Comment