मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा पर्व दुसरे :- छत्रपती राजाराम महाराज
मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा : लेखमाला
लेख क्रमांक :- २
शीर्षक :- मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा पर्व दुसरे :- छत्रपती राजाराम महाराज
लेखक:- निखिल सुभाष थोरवे
(प्रस्तुत लेखात मांडण्यात आलेली मते , ही {ऐतिहासिक संदर्भ वगळून} पूर्णपणे लेखकांची आहे .)
(टीप:- लेखातील सर्व ऐतिहासिक संदर्भ हे डॉ.जयसिंगराव पवार लिखित "शिवपुत्र छत्रपती राजाराम" या ग्रंथातील आहेत )
-----------------------------------------------------
मागील लेखात आपण मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्ध त्याची पार्श्वभूमी , आणि संभाजी महाराजांचे त्याकामी आलेले अपूर्व असे योगदान अभ्यासले , लेख वाचून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या माझा उत्साह वाढवणाऱ्या होत्या .
काही सूचना देखील ह्या निमित्ताने प्राप्त झाल्या . त्यापैकी सर्वात महत्वाची सूचना होती , लेखाची लांबी कमी करण्याची . इतिहासाबद्दल लिहीत असताना काही परस्पर संबंधित गोष्टी घडत असतात त्यामुळे लेखाची लांबी कमीत कमी ठेवणे हे आव्हान असते . तरीसुद्धा आलेल्या सूचनांचा विचार करून ह्या लेखापासून ती सूचना अंमलात आणण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करणार आहे .
🔴त्यागमूर्ती येसूबाई राणीसाहेब
संगमेश्वरच्या चकमकीत जे योद्धे वाचले होते . त्यात , संताजी घोरपडे , खंडोजी बल्लाळ हे रायगडावर पोहोचले होते . व त्यांनीच संभाजीराजे कैद झाल्याची बातमी रायगडास दिली असावी असे चिटणीस घराण्याची बखर सांगते . या वेळी रायगडावर जेष्ठ अश्या सकवार मातोश्री होत्या पण बदलेल्या त्यांना राजकीय महत्त्व फारसे राहिले नव्हते . शाहू राजे अवघ्या 7 वर्षांचे होते . आणि राजाराम महाराज 19 वर्षांचे . ते तसे प्रौढ असले तरी , वयाने येसूबाई पेक्षा लहान होते . त्यामुळे राजकारभराची सर्व इथून पुढची सर्व सूत्रे येसूबाई चालवणार होत्या . संभाजी महाराज्यांच्या सुटकेच्या आशा अश्यकप्राय बनत चालल्या होत्या . त्यामुळे मराठ्यांचे खचलेले नितीधैर्य कुणी कुणी उंचावले असेल ते महाराणी येसूबाई यांनीच .!!
संभाजी महाराजांच्या सुटकेच्या आशा पूर्णपणे मावळ्यानंतर , रिकाम्या पडलेल्या राजसिंहसनावर वारसदार स्थापने आवश्यक होते . त्यासाठी मंचकारोहन करणे गरजेचे होते . त्यावेळेस महाराणी येसूबाईं समोर दोन पर्याय होते . आपले पुत्र शाहू राजे यांना गादीवर बसवून स्वतः राज्याचा कारभार हातात घेणे आणि दुसरा म्हणजे , आपला दीर राजाराम महाराज ह्यांना मंचकरोहन करून कारभार प्रल्हाद निराजी , रामचंद्रपंत अमात्य ह्या प्रमुख प्रधानांच्या हातात देऊन स्वतः बाजूला होणे .
महाराणी येसूबाई यांच्या जागी दुसरी कोणतीही सामान्य स्त्री असती तर , स्वतःच्या मुलास गादीवर बसवले असते , स्वतः राजाराम महाराजांच्या मातोश्री सोयरा राणीसाहेब यांना देखील हा मोह आवरला गेला नव्हता . तिथे महाराणी येसूबाई यांनी या कठीण प्रसंगात अत्यंत धीरोदत्तपणे वागून समस्त मराठा मंडळासमोर निस्वार्थीपणा एक आदर्श घालून दिला असेच म्हणावे लागेल .
येसूबाई राणीसाहेबांच्या ह्या त्यागबुद्धीने मराठा साम्राज्यात सिंहासनाच्या वारश्यावरून होणारा संभाव्य यादवीचा धोका संपला आणि मराठे एक दिलाने औरंगजेब बादशहाशी लढण्यासाठी सज्ज झाले .
हे येसूबाई यांच्या निर्णयाचे सर्वात मोठे यश !!!
🔴 मोगलांकडून रायगड काबीज आणि मराठ्यांची नवी राजधानी जिंजी
१६८६ साली आदिलशाही आणि १६८७ साली कुतुबशाही बुडवल्या नंतर आत्ता दक्षिणेत एकमेव औरंगजेबास आव्हान देणारी सत्ता होती ती म्हणजे मराठा !!
औरंगजेबाने आपले पूर्ण लक्ष आत्ता , मराठ्यांची राजधानी रायगड ह्याकडे वळवले , त्यासाठी त्याने आपला सेनापती इतिकाद खान जो स्वतः वजीर असदखान ह्याचा पुत्र होता आणि खुद्द बादशहाचा मावसभाऊ पण होता ह्यास नियुक्त केले . पुढे रायगड काबीज केल्यावर त्याला बादशहाने जुल्फिकार ही पदवी दिली आणि ह्याच नावाने तो इतिहासात प्रसिद्ध पावला .
बदलेल्या परिस्थितीत राजाराम महाराजांनी रायगडास सोडून जावे जाताना , आपल्या निवडक साथीदारास घेऊन जावे . ज्यात प्रल्हाद निराजी , धनाजी जाधव व संताजी घोरपडे आणि दोन राण्या ताराबाई आणि राजसबाई ह्यांना घेऊन जावे . असे ठरले
स्वतः येसूबाई आणि बाळ शाहू राजे रायगडावर थांबले . ते का थांबले ? ह्याचे उत्तर देताना येसूबाई म्हणतात ,
" मुलास बाहेर जाऊन राहावे यास जवळ जागा रायगडाहून बाकी ऐसी दुसरी नाहीच . त्याअर्थी मुलास व आम्हास येथील बंदोबस्त करून येथे ठेवावे . तुम्ही सर्वांनी राजरामसाहेबांसह वर्तमान बाहेर पडून , फौज जमा करून , प्रांताचा बंदोबस्त राखिला असता , हा किल्ला बेलाग वर्ष सहा महिने टिकाव पडेल !! शत्रूचे प्राबल्य विशेष त्याअर्थी चंदी - चंदावर प्रांती दम खाऊन पुन्हा मसलत करून राज्य साधावे , सर्व कुटुंब एकदाच सर्वांनी शत्रूस हस्तगत व्हावे ऐसें होईल . पल्ला पोहोचणार नाही " -- (थोरले राजाराम महाराज यांचे चरित्र , पृ. २-३ )
ह्याचा अर्थ संपूर्ण राजकुटंब शत्रूस सापडणे धोक्याचे होते . राजाराम महाराजांनी रायगडाबाहेर पडून , फौज फाटा जमा करावा , आणि योग्य वेळ साधताच पुन्हा उभारी घ्यावी . तोवर वर्ष सहा महिने आपण रायगड लढवू हा विश्वास येसूबाई देतात . जिंजी किल्ल्याचा आश्रय घेण्यासाठी सुद्धा त्या सांगतात ..
ह्या वरून एक गोष्ट स्पष्ट आहे . राजाराम महाराजांच्या जडघडणीत सुरुवातीचा जो पाठिंबा आहे तो निर्विवादपणे येसूबाई यांचा दिसतो . कारभारी , सल्लागार यांचा वाटा महत्त्वाचा तर आहेच पण , प्रसंगी स्वतः शत्रूस तोंड देऊन स्वराज्य आणि स्वराज्याचे छत्रपती शाबूत ठेवण्याचे श्रेय येसूबाई यांनाच जाते .
स्वतः राजाराम महाराज रायगडावरून निसटून , पाहिले प्रतापगडस आले . प्रतापगडाच्या पायथ्याशी मोघलांशी छोटी लढाई झाल्याची नोंद आढळते . परिस्थिती बिकट बनल्यानंतर प्रतापगड सोडून , विशाळगड आणि शेवटी पन्हाळा इथे पोहोचून जिंजीच्या प्रवासाची तयारी राजाराम महाराजांनी पूर्ण केली . बादशहाचे सरदार पन्हाळ्यास एव्हाना वेढा घालून बसले होतेच . त्याची तजवीज औरंगाबजेबाने आधीच केली होती . मराठ्यांचा नवा राजा दक्षिणेत पळून जाण्याचा तयारीत असल्याचे त्याने दक्षिणेकडील सर्व मोघल ठाणेदार , किल्लेदार यांना कळवले होते त्या कामी चौकी पहारे अधिक कडक करण्यासंबंधी तंबी देखील दिली होती . याकामी किनारपट्टीच्या भागावर मोघलांनी पोर्तुगीजांची मदत देखील घेतली होती . बेळगाव चा बहादुरखान ह्याने पोर्तुगीज व्हाईसरॉय ला पत्र लिहून किनारपट्टी अधिक सतर्क ठेवण्याबद्दल पत्र लिहले होते .
थोडक्यात सांगायचे तर , शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा परतीचा प्रवास जसा जोखिमांनी भरून होता . तसाच प्रवास त्यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी सुद्धा केला .
या समयी राजाराम महाराजांच्या सोबत कोण कोण होते ?? ह्याबद्दल अधिक माहिती आपल्याला केशव पंडित देतो त्याने राजाराम महारांजाच्या ह्या जिंजी प्रवासावर एक छोटेखानी काव्यच रचले आहे . त्याने राजाराम महाराजांच्या सोबती लोकांची नावे सांगितली आहेत ती , म्हणजे
मानसिंग मोरे , प्रल्हाद निराजी , कृष्णाजी अनंत , मोरेश्वर त्याचा भाऊ बहिरो मोरेश्वर , चित्रगुप्त कायस्थ , बाजी कदम , खंडोजी कदम , नीलकंठकृष्ण , गिरजोजी यादव , खंडोजी दाभाडे नरसिंह पंडित आचार्य , तिमाजी रघुनाथ हणमंते व कान्होजी आंग्रे
ह्या वरील दिग्गज नावांवरून हा अंदाज बांधणे सहज शक्य आहे की , मराठ्यांच्या तिसऱ्या छत्रपतींना जिंजी ला राजधानी स्थापन करून . बादशहास शह द्यायचा होता . ज्यात ते प्रचंड यशस्वी झाले .
थरारक प्रवास सुरू झाल्यावर त्यांनी वाटेत बेदनुरच्या राणीचे चेन्नम्माचे साह्य घेतले हे राजाराम महाराजांच्या धोरणीपणाचे किती मोठे उदाहरण होते . तुंगभद्रा नदीच्या किनारी मोगलांशी राजाराम महाराजांचा आणखी एक संघर्ष उडाला त्यातूनही , राजाराम महाराज सुखरूप बाहेर पडले . आणि त्यांनी जिंजी गाठली . (२८ ऑक्टोबर १६८९)
एकीकडे जिंजी किल्ल्याची परिस्थिती देखील सामान्य नव्हती तिथे शिवाजी महाराजांचे जावई हरजीराजे महाडिक यांची ती जहागीरच झाली होती . एव्हाना ते स्वर्गवासी जाऊन बराच कालावधी उलटला होता . आणि त्यांची पत्नी अर्थात शिवाजी महाराजांची मुलगी आणि राजाराम महाराजांची बहीण अंबिकाराजे हिच्या ताब्यात जिंजी किल्ला होता . राजाराम महाराज वेल्लोर ला पोहोचल्यानंतर त्यांनी दूत पाठवून आपल्या बहिणीला जिंजी किल्ला आपल्या ताब्यात देण्याविषयी निरोप धाडला पण , हाती असलेली संपत्ती , सत्ता व मुलुख अंबिकाबाईस सोडवेना . एवढेच नव्हे तर , जिंजीच्या किल्ल्यासाठी तिने राजाराम महाराजांसोबत लढण्याची देखील तयारी सुरू केली . शेवटी तिच्याच सैन्यातील अधिकारारी वर्गाने तिचे मतपरिवर्तन करून तिला ह्या अविचारापासून परावृत्त केले . राजाराम महाराज स्वतः दक्षिणेत आल्यामुळे दक्षिणेतील मराठी सरदार , मुलकी अधिकारी यांनी राजाराम महाराजांचा पक्ष उचलून धरला त्यामुळे अंबिकाराजे ह्यांना माघार घ्यावी लागली असणार हे निश्चित आहे .
तरी सुद्धा स्वराज्याच्या तिसऱ्या छत्रपतीस मुघलांबरोबर स्वकीय अगदी स्वतःच्या बहिणीबरोबर देखील संघर्ष करावा लागला त्यावरून त्यावेळसच्या बिकट परिस्थितीचा आपणास अंदाज येईल .
इकडे रायगड कित्येक महिने लढत लढत शेवटी , परिस्थिती बिकट झाल्यानंतर अधिक मानहानी व मनुष्यहानी होऊ नये म्हणून महाराणी येसूबाई यांनी अब्रू व जीवितास धोका उत्पन्न होऊ नये ह्या अटी शर्थीवर तो वाटाघाटी करून शत्रूच्या ताब्यात देण्याचे निश्चित केले . या कामी मल्हार रामराव व सूर्याजी पिसाळ जो , संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वीच मोघलांना वाई च्या सुभेदाराच्या अमिषात जाऊन मिळाला होता , याची मध्यस्थी कामी आली . आणि राज परिवार बादशहाच्या छावणीत सन्मानाने नजरकैद झाला . त्यांच्या सोबत संभाजी महाराजांचा विश्वासू सहकारी ज्योत्याजी केसरकर होता अशी नोंद आहे . बादशहाने राजपरिवरची गुललालबार या शाही निवासस्थानी सोय केली व शाहू राजास सप्तहजारी मनसब दिला व त्यांच्या सरंजाम आणि शिक्षणासाठी खास अधिकारांची नियुक्ती केली ह्या नोंदी मल्हार रामराव ह्याने केल्या आहेत
जिंजी चा वेढा आणि राजाराम महाराजांची मुत्सद्देगिरी
राजाराम महाराज जिंजी ला स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी आजूबाजूच्या इंग्रज , डच आणि फ्रेंच यांना सक्तीचे नजराणे पाठविण्याचे हुकम सोडले . एक प्रकारची ती खंडणीच होती . राज्य आर्थिक दृष्ट्या बिकट अवस्थेमध्ये होते . त्यांची बहीण अंबिकाराजे यांच्या कडून देखील त्यांनी दीड लाख होन वसूल केल्याची नोंद आहे .
कर्नाटकात मूळ रहिवाशी याच्चपा नाईक हा मुघलांचा शत्रू झाला होता . त्याला महाराजांनी मैत्रीचा प्रस्ताव पाठवून त्यास सोबत घेतले व मराठ्यांचे लष्करी सामर्थ्य वाढवले .
जिंजी मध्ये येण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यकारभारचा भार अमात्य रामचंद्रपंत आणि शंकराजी नारायण ह्या कारभाऱ्यांवर सोपवला त्यांच्या खाली संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या नियुक्त्या केल्या व महाराष्ट्राची व्यवस्था लावून ते जिंजीस रवाना झाले हे विशेष !!
त्यांनी मराठी मुलुख अक्षरशः हादरून सोडला पण त्याचा सविस्तर आढावा आपण पुढच्या लेखात घेऊ ...
एकीकडे आर्थिक दृष्ट्या राज्य सक्षम करतानाच राजाराम महाराजांनी वतानदाराचे पुनरुज्जीवन केल . खर तर थोरल्या महाराजांनी आणि त्यानंतर संभाजी महाराजांनी वतानदारांच्या विरुद्ध मोठी आघाडी उघडली होती . पण परिस्थिती चा रेटा असा होता की आत्ता सर्व सत्ता राज परिवारात केंद्रित ठेवून चालणार नाही हे त्यांनी ओळखले होते .
जर लोकांना वतनदारी जर दिली तर ते वतनदारीच्या आमिषाने मोघलांना जाऊन मिळत होते . त्यात गणोजी शिर्के , कोकणचे खेम सावंत , म्हसवड चे नागोजी भोसले यांसारखे अनेक सरदार होते . आत्ताच्या जमण्यासारखी एक प्रकारची ती पक्ष गळतीच !!
हीच गळती थांबविण्यासाठी राजाराम महाराज यांना वतनदारीचे पुनर्जीवन करावे लागले . ह्या वतनदारांकडे स्वतःच्या फौज असत . त्यामुळे स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घ्यावा हा व्यावहारिक विचार त्यांनी केला असावा . इतकेच काय तर , आधी मोघलांना फितूर झालेले अनेक सरदार देखील स्वराज्य रक्षणाला बळ देण्यासाठी पुन्हा त्यांनी सेवेत घेतले . त्या काळी वतनदारी मिळविण्यासाठी जिंजीला राजाराम महाराजांच्या दर्शनाला जायचे . आणि ती वतनपत्रे घेऊन महाराष्ट्रात परत यायचे असा सरदारांमध्ये रिवाजच बनला होता . बऱ्याच वेळा राजाराम महाराज शत्रूच्या मुलखातील वतन सुद्धा सरदारांस देत त्यामुळे शत्रूचा मुलुख काबीज करण्यासाठी त्यांच्यात चढाओढ असत.
ऐन केन प्रकारे स्वराज्य पुन्हा उभारी घ्यावे . हा एकच उद्देश ठेवून राजाराम महाराज काम करत होते .
दुसरीकडे राजाराम महाराजांना जेरबंद करण्यासाठी औरंगजेबाने आपला देणापाटी जुल्फिकारखानस जिंजीला पाठवले . (१६९०).
इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की , समांतर काळात महाराष्ट्रात संताजी घोरपडे आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या आघाडीवर मोघलांना जेरीस आणले जात होते . त्याचा आढावा वेगळेपणाने आपण पुढच्या लेखात घेणे योग्य ठरेल . म्हणून तो घटनाक्रम आपण मुद्दामून इथे टाळत आहोत .
जिंजी चा वेढा हा तब्बल 9 वर्षे चालला ... किल्ला अवघड होताच पण हे त्याचे दुय्यम कारण होते असे म्हणता येईल खरे कारण होते , राजाराम महाराजांची त्यामागे खूप मोठी खेळी होती . संताजी घोरपडे यांनी जिंजीच्या भोवतीच्या फौजांना सळो की पळो सोडून ठेवले असताना जुल्फिकारखानाने त्याच्या फौजांसकट राजाराम महाराजांना बंदीवाश पर्यंत सुरक्षित माघार घेण्याची याचना केली त्यावेळेस महाराजांनी त्याला त्यास सेनापती संताजी घोरपडे ह्याचा खानाचा पूर्ण खात्मा करावा हा सल्ला डावलून त्यास माघार घेण्यासाठी अनुमती दिली . ह्यावरून संताजी नाराज होऊन जिंजी किल्ला सोडून निघून गेला अशी नोंद आहे .
जुल्फिकारखानाला माघार घेऊन देण्यामागे खूप मोठे राजकारण राजाराम महाराजांनी खेळले . औरंगजेब मेल्यानंतर दक्षिणेत जुल्फिकार खानस वेगळे राज्य स्थापन करण्यासाठी राजाराम महाराज साह्य करतील आणि त्याबदल्यात जिंजीचा वेढा त्याने रेंगाळत ठेवायचा असे अंतस्थ सूत दोघांचे जमले होते . त्यामुळे ह्या 9 वर्षात जुल्फिकार खान वेढा कधी वेढा सैल करत कधी जिंजी पासून लांब दूरच्या प्रांतात लुटी साठी जात ..तर कधी किल्ल्यातून रसद आत येताना बघून दूर्लक्ष करी . औरंगजेबस ह्या गोष्टीचा संशय आला .पण तो हतबल होता कारण जुल्फिकारस दूर करावे तर तो बंड करण्याची त्यास भीती होती आणि त्याच्या एवढा पराक्रमी सरदार त्याच्याकडे सध्यातरी कोण नव्हता ..अश्या कात्रीत तो सापडून शेवटी त्याने शहजादा कामबक्ष ह्याला जुल्फिकार खानाच्या मदतीला धाडले .. त्याला मदत करण्यापेक्षा त्यावर लक्ष ठेवण्यासाठीच त्याला धाडले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . पण राजाराम महाराजांनी ह्यावर सुद्धा मात केली . शहजादा कामबक्ष हा मराठ्यांशी फितूर आहे . त्याला बादशहा पश्चात होणाऱ्या वारसायुद्धात मराठ्यांकडून साह्य अपेक्षित आहे अश्या बातम्या त्याने मुघल सैन्यात पसरवल्या . त्यामुळे मुघल सैन्यात प्रचंड गोंधळ माजला ... शेवटी खुद्द शहजदयास फौजांचा गोंधळ टाळण्यासाठी जुल्फिकार खानस नजरकैदेत ठेवावे लागले .
जुल्फिकार खानाच्या दुर्दैवाने औरंगजेबाजी जीवन रेषा इतकी चांगली होती की , वेढा संपल्यानंतर सुद्धा औरंगजेब तब्बल 11 वर्षे जिवंत राहिला हे विशेष !! शेवटी , वेढ्याच्या 9 वर्षानंतर शेवटी औरंगजेबाच्या अंतिम इशाऱ्यावर नाईलाजाने जिंजीवर स्वारी करावी लागली .
पण त्या पूर्वीच त्याने राजाराम महाराज आणि त्यांच्या अखंड कुटंब कबिल्याला जिंजी किल्ल्याच्या बाहेर सहीसलामत काढून महाराष्ट्राच्या वाटेवर लावून दिले . आणि त्यानंतरच जिंजी किल्ला ताब्यात घेतला .
एक प्रकारे राजाराम महाराज आणि जुल्फिकार खानाची ही मैत्री मराठा स्वराज्याला किती फायदेशीर ठरली पहा !!
🔴 राजाराम महाराज महाराष्ट्रात परतले
तब्बल 9 वर्षांच्या जिंजीतील वेढ्यातून राजाराम महाराज महाराष्ट्रात सुखरूप पोहोचले . त्यांचा हा परतीचा प्रवास हा त्यांच्या जिंजीस जाण्याच्या प्रवासापेक्षा खूप सुखद होता . कारण आत्ता मोघलांचे नितीधैर्य पूर्णतः खचले होते . संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर मराठे हा हा म्हणता माघार घेतील अशी त्यांची आशा आत्ता लोप पावत होती .
खुद्द औरंगजेब मरावा !! अशी प्रार्थना त्याचे शहजादे , नातवंडे आणि सरदार मंडळी करीत होती . पूर्ण मुघल साम्राज्यच जणू मराठ्यांनी खिळखिळे करून सोडले ...
सुरुवातीला राजाराम महाराज विशाळगडाला थांबले . तिथे काही काळ विश्रांती घेऊन त्यांनी तळ कोकणचा दौरा करून किल्ल्यांची व्यवस्था यांचा आढावा घेतला . त्यानंतर त्यांनी तुंगभद्रा नदीपर्यंत पुन्हा कर्नाटक मोहीम काढली असे नव्याने पुरावे आढळतात . पूर्व खान्देश , नाशिक आणि नंदुरबार ह्या मोहिमा दरम्यान त्यांनी मोघल प्रदेश बेचिराख केला . व युद्ध भूमी महाराष्ट्र न ठेवता तत्कालीन मुघल प्रदेशच कसा राहील ह्याकडे लक्ष दिले . ह्या दरम्यानच त्यांची प्रकृती खालावली असल्याची नोंद आहे .
जिंजी नंतर त्यांनी स्वराज्याची राजधानी सातारा बनवली . तिथे आपले बस्तान बसवत असतानाच खुद्द औरंगजेब साताऱ्यास चाल करून येत असल्याची त्यांना वार्ता समजल्यावर त्यांनी पुण्याजवळच्या सिंहगडावर कूच केले . सिंहगडाच्या वास्तव्यदरम्यानच देवी च्या आजाराने त्यांचा ३ मार्च १७०० रोजी मृत्यू झाला . मृत्यसमयी त्यांचे वय होते अवघे 30 वर्षे . आणि मराठा स्वातंत्र्याचे दुसरे पर्व समाप्त झाले .
🔴 इतिहासात असलेली तिसऱ्या छत्रपतींची अस्तित्वशून्याता : अर्थात राजाराम महाराजांच्या कामगिरीचे मूल्यमापन
होय !!!
अस्तिवशून्यता हाच शब्द दुर्दैवाने मला वापरावा लागतोय .. ज्या ग्रँड डफ ने मराठेशाहीचा इतिहास लिहला . त्याच्या मागोमाग ज्या इतिहासकारांनी मराठेशाहीचा इतिहास लिहला त्यांनी शिवछत्रपती यांच्या नंतर पुढच्या छत्रपतींची कारकीर्द जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही . खुद्द दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल शराबी , स्त्रीलंपट , शिग्राकोपी अश्या मथळे लिहले गेले तिथे राजाराम महाराजांच्या बद्दल कमकुवत , अशक्त , कारभाऱ्यांच्या हातातील कठपुतले अश्या संभावना केल्या गेल्या ..
त्यामुळे आपल्या सारखे कपाळकरंटे आपणच ...
संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांचे मनोधैर्य जर कुणी उंचावले असेल तर , राजाराम महाराज यांनीच ..!!
रायगडापासून आणि महाराष्ट्रापासून मराठ्यांची राजधानी दूर नेहून त्यांनी औरंगजेब आणि मोघली फौजांना विचलित केले . आणि संपूर्ण स्वराज्य बुडण्यापासून वाचवले !! केवढे हे चातुर्य म्हणावे !!!
जुल्फिकार खानाशी संधान बांधून महाराष्ट्रतील लढा लांबवला व यामुळे संताजी व धनाजी जाधव आणि इतर कारभाऱ्यांना सवड मिळवून दिली ह्या दरम्यान आपल्या गनिमी काव्याने मराठ्यांनी मोघलांना सळो की पळो करून सोडले . आणि मोघल सैन्याचे खच्चीकरण झाले .
वतनदारी चे तोटे आहेतच त्याविषयी वेगली चर्चा होईल देखील पण तत्कालीन नाजूक परिस्थिती मध्ये स्वराज्याला लागलेली गळती थांबविण्यासाठी तोच मार्ग उत्तम होता . आणि तोच राजाराम महाराजांनी निवडला .. अर्थात त्याचे दुरोगामी परिणाम महाराष्ट्रावर झाले हे ओघाने आलेच ..!!
आपण हे मूल्यमापन करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की , राजाराम महाराजांना आपल्या मर्यादा माहीत होत्या .. ते काही शिवछत्रपतीं सारखे युगपुरुष नक्कीच नव्हते . संभाजी महाराजांसारखे शुर योद्धा नव्हते . त्यांच्या जवळ होती शिवछत्रपतींची वारश्याने आलेली मुत्सद्देगिरी आणि चलाखी !!
स्वराज्य रक्षणाच्या कामी त्यांनी ह्याच गुणांचा उपयोग अगदी व्यवस्थित करून घेतला हे लक्षात घेतले पाहिजे . आणि गुणांवर त्यांनी स्वराज्य वाचवले ... सुस्थितीत आणले ... आणि दिल्लीवर झेप घेण्याची त्यात उर्मी पेटवली . राजाराम महाराजांची मुत्सद्देगिरी ही आधुनिक काळाशी इतकी मेळ खाणारी आहे की , सध्याच्या राजकारण्यांनी आणि राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांनी त्यांच्या चरित्रापासून धडे घेण्याची आवश्यकता आहे .
सुरुवातीच्या अडचणीच्या काळातून स्वराज्य बाहेर आल्यानंतर , राजाराम महाराजांनी बरेच आक्रमक धोरण स्वीकारले .. त्याबद्दल राजाराम महाराजांची अस्सल सनद उपलब्ध आहे .(दि.४ जून १६११ )
त्यात हणमंत घोरपडे यास राजाराम महाराजांनी संरजाम पेश केला आहे . त्यात अनुक्रमे रायगड जिंकल्यानंतर किती ? , विजापूर जिंकल्यानंतर किती ? असे करत करत शेवटी दिल्ली जिंकल्यानंतर किती मनसब मिळेल ? ह्याची सविस्तर नोंद आहे .
राजाराम महाराज ह्यांना कमकुवत समजनाऱ्या लोकांना ती एक सणसणीत चपराक आहे .
राजाराम महाराजांची नजर ही अंतिमतः दिल्लीवर होती हे त्यातून स्पष्ट होते .
शिवचरित्रकार त्र्यं . शं . शेजवलकर यांच्या मते ही सनद प्रत्येक माहाराष्ट्रीय मुलाने तोंडपाठ केली पाहिजे ... एवढे ह्या सनदेचे महत्त्व आहे .
रायगडावर २४ फेब्रुवारी १६७० ला पायकडून जन्मलेल्या ह्या तिसऱ्या छत्रपती बद्दल बऱ्याच शंका कुशंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या . त्याकाळी पायकडून जन्मणे अपशकुन समजले जायचे त्यावेळेस शिवाजी महाराज उत्तरले होते , " आमचा पुत्र बादशाह्या पालथ्या घालेन !! "
आणि वरील सनद बघता ही भविष्यवाणी खरी वाटावी की काय ?? अशी शक्यता निर्माण झाली होती . पण दुर्दैवाने आपले तिन्ही छत्रपती अल्पजीवी निघाले .. नाहीतर खरा साम्राज्य विस्तार हा राजाराम महाराज यांनीच केला असता ह्यात शंकाच नाही .
महाराष्ट्राच्या ह्या तिसऱ्या छत्रपतींनी संभाजी महाराजांनकडून मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा बॅटन अवघड परिस्थितीत हातात घेतला आणि जवळ जवळ 11 वर्षे अथक परिश्रम करून पळवला .. आणि हाच बॅटन पत्नी ताराबाईंकडे सुपूर्द करून निघून गेले ...
शिवपुत्र राजाराम महाराज यांचे स्मरण करण्याचा हा छोटासा प्रयत्न फळास येवो ...
ह्या सदिच्छासह , लेखमालेच्या पुढच्या लेखात भेटू !!
धन्यवाद !!
.......✍️निखिल थोरवे
Comments
Post a Comment