आम्ही चायना बायकॉट करू , पण पुढे काय ??
लेखक :- निखिल सुभाष थोरवे
सध्या देशभरात चीन विरुद्ध संताप आहे . त्यामुळे बायकॉट चायना हा परवलीचा शब्द बनला आहे .
मी मागे एकदा "आत्मनिर्भर चे स्वप्नरंजन " नावाच्या ब्लॉग मध्ये स्वदेशी ह्या संकल्पने बद्दल टिपणी केली होती . आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ती वाचली असेल अशी अपेक्षा .
स्वदेशी वस्तू वापरा ही संकल्पना केवळ चायना वस्तूंच्या बाबतीत आपल्याला कशी बरं ग्राह्य धरता येईल ?
Tiktok unistall करुन काय साधेल ??
ह्याच सगळ्या गोष्टींची चर्चा आपण भारत-चीन संबंधातील ह्या ब्लॉग मालिकेमधील दुसऱ्या आणि शेवटच्या ब्लॉग मध्ये करणार आहोत .
त्यासाठी खालील मुद्यांच्या आधारे आपल्याला जावे लागेल .
🔴आपण मागे आणि चीन पुढे का ??
गेल्या 65 वर्षांची स्वतंत्र भारताची वाटचाल आपण पहिली तर , प्राथमिक क्षेत्र ज्यात शेती येते , द्वितीय क्षेत्र ज्यात उद्योग-धंदे येतात आणि तृतीय क्षेत्र ज्यात सेवा क्षेत्र येते . भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वरील तीन क्षेत्रांची सध्याची ज्ञात टक्केवारी पुढील प्रमाणे :-
शेती क्षेत्र - सुमारे 60 %
उदयोग क्षेत्र - अवघे 12 %
सेवा क्षेत्र - सुमारे 23 %
वरील आकडेवारी वर नजर टाकली तर , आपल्या लक्षात येईल जवळ जवळ 72% शेतीवर अवलंबून असलेले लोक सध्या 60 % वर स्थिरावले असले तरी , लोकसंख्या देखील त्याच पटीने वाढली आहे . 135 कोटीं लोकांपैकी अजून 60 % लोक शेती करतात म्हणजे 20 वर्षांपूर्वीच्या 73% शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या तुलनेने कितीतरी अधिक सध्या लोकसंख्या अजूनही शेतीवर अवलंबून आहे .
सर्वात वाईट गोष्ट म्हणजे शेतीतुन पिकवणारा कच्चा माल पक्का करणाऱ्या आणि ज्याला नेहरूंनी आधुनिक भारताची मंदिरे म्हंटले ते - कारखाने ज्याची अर्थव्यस्थेमधील टक्केवारी सर्वात जास्त असायला हवी होती ती गेल्या काही वर्षांपासून अवघी 12 टक्क्यांवर अडकून पडली आहे . सर्वाधिक ग्राहक तयार करणारे हे क्षेत्र एखाद्या खोलवर चिखलात चाक अडकून पडावे तसे अडकून पडले आहे . आणि भारत चायनाच्या मागे असण्याचे हेच मुख्य कारण आहे .
आपली कारखानदारी केवळ 12 % आहे .
वर वर सेवा क्षेत्राची प्रगती आपल्याला डोळ्यात भारत असली तरी , सॉफ्टवेअर आणि इतर तत्सम सेवा ह्या कारखानदारी मध्ये काम करणाऱ्या कामगार आणि त्यातील नोकरदारांवर अवलंबून असतात हे मी वेगळे सांगायला नको . सेवा क्षेत्राचा ग्राहक वर्ग प्रामुख्याने द्वितीय क्षेत्रांतूनच येतो , त्यामुळे सेवा क्षेत्राच्या वाढीस जर कारखानदारी क्षेत्राचे पूरक साह्य नसेल तर , सेवा क्षेत्र वाढून तरी काय फायदा ?? कालांतराने त्यात मंडी निर्माण होऊन सेवा क्षेत्राच्या वाढीचा फुगा फुटतो . जसा IT क्षेत्राचा गेल्या 7 वर्षात फुटलेला फुगा आपण बघितला . एकंदरीत बाकीच्या दोन क्षेत्रांना जर व्यवस्थित तोलून धरून ठेवणारे क्षेत्र असेल तर , ते द्वितीय क्षेत्र म्हणजे " उद्योग " क्षेत्र किंवा Manufacturing Industry हेच आहे .
त्यात भारताचा सर्वात मोठा सॉफ्टवेअर आयात करणारा देश असलेला अमेरिकेची भारताच्या बाबीतीत धरसोडवृत्ती ही ह्या क्षेत्राची चिंता वाढवणारी आहे . व्हिसा मधील अनेक निकष असतील किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचे Make Great America Again सारखे अभियान असेल . त्यामुळे भारतातील सेवा क्षेत्राला खूप फटका बसत आहे . ही वस्तुस्थिती आहे .
या उलट ,
गेल्या 10 वर्षात चीन च्या कारखानदारी चा त्यांच्या अर्थव्यवस्थेचा हिस्सा होता सुमारे 40 %
आज जगातील प्रत्येक गोष्ट केवळ चीन मधून येतीय की काय ! अशी अवस्था आहे .
आणि त्याचेच कारण चीन च्या अर्थव्यवस्थेत तब्बल 10 % वाढ गेल्या 10 वर्षात नोंदवली गेली .
मी जास्त आकडेवारी देऊन तुम्हाला गोंधळून टाकू इच्छित नाही . पण , ज्याला अर्थव्यवस्थेचा कणा म्हणतात ते उद्योग क्षेत्रच जर भारताचे अतिशय कमकुवत असेल . अश्यावेळेस , घसा कोरडा होई पर्यंत जरी बायकॉट चायना च्या घोषणा दिल्या तरी फरक काय पडणार ?
वरील बाबतीत लोकांचा युक्तिवाद असू शकतो . भारत चीनचे मोठे मार्केट आहे . आणि जर भारताने चिनी माल बायकॉट केला तर , चीन आर्थिक दृष्ट्या कोलमडून पडेल . पण मला वाटतं हे अर्धसत्य आहे . कारण आपली चौथ्या क्रमांकाची सर्वात जास्त निर्यात ही चीनला होते .
ज्याला आकडेवारी बघायची असेल त्यांनी
http://dashboard-commerce.gov.in/import-export
ह्या वेबसाईटवर वर जाऊन बघावी .
🔴कितीही नाकारले तरी भारतातले आळशी मनुष्यबळ :-
मुळात जागतिकीकरणामुळे सर्व जग एका सूत्रात बांधले गेले . आणि आपली उत्पादकता वाढवून चीनने जगात दबदबा निर्माण केला .
मुळात उदोगधंद्याची संख्या चीनच्या तुलनेत कमी त्यात आळशी मनुष्यबळ ही आपली सर्वात मोठी समस्या !!
चीन मधले कामगारांची ड्युटी जर सकाळी ९ ते ५ असेल तर , अक्षरशः रोबोट सारखे त्यांना काम करावे लागते . चीन साम्यवादी राष्ट्र असल्याने भारतातील लोकशाही सारखे कामगार हितकल्याण कायदे आणि नियम चीन मध्ये जवळ जवळ अस्तित्वात नाही . त्यामुळे चीन ची उत्पादकता जास्त आहे .
हेच उदाहरण जर आपल्या इथे घेतले तर , ड्युटी जरी 5 ला संपणार असेल तर कामगारांची घरी जाण्याची मानसिकता साडे 4 वाजल्यापासूनच सुरू होते . हा गुणात्मक फरक चीन आणि आपल्यात आहे .
🔴आपली उत्पादने जागतिक दर्जाची का होऊ शकत नाही ??
अगदी सोप्प विषय सांगतो , जर तुमच्या खिश्यात दहा हजार रुपये असतील तर , तुम्ही इंटेक्स , मायक्रोमॅक्स , कार्बोन किंवा लावा ह्यांचा मोबाईल घेणार का रेडमी चा मोबाईल घेणार !! उत्तर प्रामाणिक पणे दिल्यास मी काय म्हणतोय ते समजेल .
सध्या चीनच्या वस्तू वापरणारे आपले नागरिक देशद्रोही नाहीत तर ते जागतिक मार्केट मधले ग्राहक आहेत . त्याला कमीत कमी किमतीत चांगल्या सुविधा असलेला आणि तेवढाच आश्वासक प्रॉडक्ट हवा आहे . जर भारतीय ब्रँड ने त्या सगळ्या गोष्टी दिल्या तर कोण कशाला चीनच्या वस्तू वापरतील ? लॉजिक सिम्पल आहे .
प्रामाणिक पणे सांगा बरं , आजवर कोणत्या भारतीय कंपनीने चीन किंवा इतर कोणत्याही देशांच्या ब्रँड समोर आव्हान उभे केले आहे ते ??
ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देणार आहोत की नाही ??
🔴बायकॉट ची झळ मध्यमवर्गालाच :-
आजवर इतिहास साक्षी आहे . ज्या काही क्रांत्या आणि महत्त्वाचे बदल जगात घडले त्याची सर्वात मोठी झळ मध्यमवर्गीय लोकांनाच बसली .
आत्ता उदाहरण घ्या ना ,
रियलमी किंवा Mi कंपन्यांचे सर्वात स्वस्त LED TV मार्केट मध्ये आले . मला वाटतं त्या टी.व्ही. ची किंमत 12 हजारांपासून पुढे असेल . अगदी गोर गरीब लोकांच्या आवाक्यात 32 इंची LED TV आले . मोबाईलची सुद्धा तीच गत ..
म्हणजे जो Sony Bravia , Samsung हे सुद्धा विदेशी ब्रँड चे TV घेत होता . किंवा जो आधीपासूनच महागडा Aaple चे फोन वापरत होता त्याला झळ बसली का ??
तर नाही ...
झळ बसली तुमच्या-आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना !!
ठिकये , आम्ही देश हितासाठी ती झळ खाऊ देखील , पण स्वदेशीचा फॉर्म्युला हा चीन पुरताच का ??
तोच फॉर्म्युला अमेरिकेच्या Apple ला वापरा , कोरिया च्या samsung ला वापरा , फिनलँड च्या Nokia ला वापरा... इतर अनेक युरोपियन आणि महागडे ब्रँड आहेत त्यांच्या पुरता स्वदेशीचा झेंडा खाली का ठेवला जातो ??
ही स्पष्टपणे दुटप्पी भूमिका आहे .
मुळात ,
आपण आपले ब्रँड मोठे कधी करणार ...?? हा मुख्य अजेंडा असायला हवा .
कोणत्याही देशाचा नागरिक हा देशद्रोही नसतो .जर त्याच्या देशातले उत्पादन जर त्याला दर्जेदार मिळत असेल तर चीनच काय कोणत्याही परदेशी ब्रँड का वापरेल ??
अमेरिकेत कुणी Oppo किंवा Mi वापरता का ??
कारण त्यांचा देशी ब्रँड Apple हाच ग्लोबल ब्रँड आहे .
आत्ता तुम्ही म्हणाल , मोदी साहेबांनी घोषणा केली ना ,
" लोकल को ग्लोबल बनाओ "
" अरे पण 12 % कारखानदारी असलेल्या देशात लोकल ब्रँड बनणार तरी कधी आणि ग्लोबल बनणार तरी कधी ??? "
आपण वर वरच्या फांद्याच तोडत बसणार का ?? की मुळावर घाव घालणार ???
मोदी साहेबांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींचे काय झाले ?? कुठले क्षेत्र सध्या उपजारी घेत आहे ?? आज जवळ जवळ एक महिना होत आल्या घोषणा करून , निदान कोणती कर्जे सर्व सामान्य उद्योजक लोकांपर्यंत आली ?? त्या सगळ्यांच्या योजना लोकांपर्यंत अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्या ??? ह्याचा कुणी जाब विचारायला नको का ??
केवळ आपले मूळ प्रश्नांवरून लक्ष विचिलीत करायचे आणि बायकॉट चायना ह्या मोहिमेला बळ देऊन आपले आलेले देशाच्या सीमा सुरक्षित राखण्याचे राजनेतिक अपयश झाकायचे असा सगळा प्रकार सुरू आहे
एकंदरीतच.....सगळी धूळफेकच !!
🔴आत्ता गोष्ट Tiktok आणि Pub-G ची
सध्या Tiktok शिवी बनली आहे . मध्यंतरी आपल्या सर्व देशप्रेमी लोकांनी Tiktok चे Google Play Store वरील Rating कमी करण्याचा भीम पराक्रम गाजवला ..
आणि आपल्या फोन मधून TikTok Unistall करण्याची जणू स्पर्धा लागली .
Tiktok हे चायना चे App आहे म्हणून त्याला बायकॉट करू हे म्हणणे मान्य !!
पण Tiktok हे ग्लोबल App आहे हे देखील विसरता कामा नये . आणि जश्या नाण्याची एक बाजू असते तशी दुसरी पण असतेच ..
काही जन्मजात बावळट लोक Tiktok वर आहेतच ते मी नाकारणार नाहीच , त्या जन्मजात बावळट लोकांमध्ये मध्यमवयीन अगदी प्रसिद्धी साठी महिलांचा गाऊन घालणारे महाभाग असतील , एकमेकांना शिव्या देणारे काही लोक असतील किंवा अंगप्रदर्शन करून प्रसिद्ध होऊ पाहणाऱ्या काही प्रसिद्धीपिपासू मुली-महिला असतील त्यामुळे साहजिकच माझ्यासकट ह्या लोकांचे चाळे बघितल्यानंतर अंगात शिरशरी आणि किळस येऊन गेल्या शिवाय राहत नाही . असा सगळं असताना , दुसरीकडे
साध्या साध्या गरीब घरातील टॅलेंट हे लोकांसमोर आले . अनेक गरीब अगदी झोपडपट्टी मध्ये राहणारे गरीब घरातील डान्सर असतील , अभिनय करणारे लहान लहान मुले-मुली असतील अश्या लोकांना Tiktok च्या माध्यमातून एक मंच मिळाला , आजूबाजूचे लोक त्यांना ओळखायला लागले . काही जणांना तर देशभरात ओळख मिळाली .
हौशी कलांकरांची अभिनयाची हौस भागली , बरेच डमी कलाकारांना एक प्रकारचा फ्लॅटफॉर्म भेटला .
ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नर ला धुळ्यातील गरीब जोडप्याचा डान्स समजला . केवढी ही एका App ची किमया म्हणायची !!
अनेक हौशी आणि चित्रपट क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात संधी न भेटलेले कलाकार TikTok माध्यमातून आपली कला प्रेक्षकांना दाखवू लागले . त्यातील काही जणांना त्या माध्यमातून उत्पन्न देखील सुरू झाले .
30 सेकंदाच्या व्हिडीओ मध्ये लोकांना हसवणे किंवा अंतर्मुख विचार करायला भाग पाडणे हे काही खायचे काम नाही .
सगळेच विरोधात आहेत म्हणून मी Tiktok च्या चांगल्या बाजू मांडायला मागे पुढे बघणार नाही .
आणि माझं स्वतःच Tiktok वर अकाऊंट असून , मी स्वतः जरी कोणताही व्हिडीओ बनवत नसलो तरी , आपल्याच देशातील होतकरू कलाकारांची कला मनोरंजनासाठी बघत असतो .
कारण माझा तो व्यक्तिगत अधिकार आहे . त्याबाबत कुणाला काही आक्षेप असतील तर नोंदवू वैगेरे नका .
कारण , जे खरे ते खरे !!
जी कथा TikTok ची तीच Pub-G ची
आख्या जगाला वेड लावणारा असा एक सुद्धा गेम आपल्या भारतीय लोकांना का बनवता आला नाही ??
ह्याचे आपण उत्तर कधी शोधणार आहोत का नाही ???
आज अक्ख्या जगाला वेड लावणाऱ्या ह्या Pub-G गेम मध्ये असे आहे तरी काय ??
त्यात आहे स्ट्रॅटेजी , युद्धकौशल्य जे आपल्या पुराणकथा , महाभारत , मध्ययुगीन काळातील अनेक लढाया ह्यात शिकवले गेले .
आपल्या भारतातील गेम विकसित करणाऱ्या मंडळींनी ह्या गोष्टींचा आधार घेऊन Pub-G आधी का नाही कोणता अश्याच धर्तीवर गेम विकसित केला ??
Pub-G प्रसिद्ध असलेला Clash Of Cane नावाचा गेम आठवत असेल तो सुद्धा युद्धकौशल्य , बचाव ह्याच बाबींचा भाग होता ना !!
अहो अगदी लांब कशाला भारताने जगाला ओळख करून दिलेला बुद्धिबळ किंवा चेस हा खेळ युद्धकौशल्याचे केवढे मोठे उदाहरण ...!!!
केवळ नाके मुरडून किंवा Pub-G खेळणाऱ्यांची टिंगल टवाळी उडवण्याआधी तो गेम इतका जगभरात लोकप्रिय का झाला ?? ह्याच्या खोलात आपण जाणार आहोत का नाही ???
जगाच्या बदलत्या आवडीनुसार , आपल्या उदोगधंद्याना त्यानुसार बदल करायलाच हवा की नाही ??
आपल्या फोन मधून केवळ App uninstall करून प्रश्न सुटणार नाही ..
जे चायना ने केले ते आपण का नाही करू शकत !! हा मुख्य चर्चेचा मुद्दा असायला हवा ....
चीनला आपण हरवू शकतो , पण स्वतः एक राष्ट्र म्हणून सक्षम बनूनच !!
आपण एकदा सक्षम झालो की , चीन गलवान खोऱ्यासारखी आगळीक करण्यापूर्वी हजार वेळा विचार करील ..
ती म्हण आहे ना , " बळी तोच कान पिळी "
तसाच काहीसा प्रकार म्हणा हवा तर ...
केवळ बायकॉट चायना बायकॉट चायना म्हणून आत्ता जमणार नाही .आपली प्रत्येक गोष्ट ही चायना मालाच्या तुलनेत स्वस्त आणि टिकाऊ भेटायला लागली तर कोण कशाला चीन च्या वस्तू वापरेल ??
जर जागतिक बाजारपेठेची नस जर चीनला समजू शकते तर आपल्याला का नाही ??
हे जितक्या लवकर आपल्याला समजेल तितक्या लवकर देश खऱ्या अर्थाने चीनला हरवेल !
तो दिवस तुमच्या - आमच्या डोळ्यासमोर उजडावा ...आणि भारत पुन्हा एकदा जगाचा भाग्यविधता बनावा ...!!!
ह्या पोझेटिव्ह विचारांसह तूर्तास ह्या ब्लॉग मालिकेस पूर्णविराम !!
पुन्हा नव्या विषयासह भेटू !!
.......✍️निखिल सुभाष थोरवे
Very well said👍
ReplyDeleteछान..
ReplyDelete