फक्त वर वरचा संताप कशाला ???
केरळ मधली घटना मन अतिशय विषण्ण करणारी आहे . एखाद्या मुक्या प्राण्याला एवढ्या दुर्दैवीपणे जीव गमावावा लागणे खरच दुर्दैवी आहे . प्रत्येक जण व्हाट्सअप्प स्टेटस ठेवून आपला संतापव्यक्त करतोय आणि ते अतिशय सहाजिकच आहे . त्यात ती हत्तीण जिचं नाव आंबा आहे , असे मला आत्ताच व्हाट्सअप्प द्वारे समजले , ती बिचारी गरोदर होती अश्या प्रकारे माय लेकरांचा मृत्य खरंच माणूस म्हणून अस्वस्थ करणारा आहे . ट्विटर पासून संपूर्ण सोशल मीडिया ह्या प्रकरणावर शोक व्यक्त करीत असताना , एक गोष्ट प्रत्येकाच्या बोलण्यात येत आहे की , त्या हत्तीणीला मुद्दामून फटाके भरून ठेवलेले फणस देण्यात आले . का तिने ते अपघाताने ग्रहण केले . बहुतांश लोकांचा समज ते मुद्दामून त्या हत्तीणीला दिले गेले असा झाल्याने ह्या नेटकरांच्या संतापाची धार अतिशय तीव्र आहे .
त्या भागात रानडुक्करांचा वावर जास्त असल्याने शेतीला बरेच नुकसान सहन करावे लागते . त्यामुळे स्थानिक शेतकरी अश्या पर्यायांचा उपयोग करतात . त्यामुळे रानडुक्करासाठी उपाय म्हणून केलेले ते फणस हत्तीणीने खाल्याची शक्यता नाकारता येत नाही . अर्थात मुद्दामून असे प्रकार कोण करणार नाही ह्याची मला एक व्यावहारिक विचारांती खात्री वाटते . मध्यंतरी अवनी नरभक्षक वाघिणीच्या शिकारी बद्दल पर्यावरण प्रेमींनी असाच संताप व्यक्त केला होता . आणि त्या वाघिणीची शिकार झाल्यानंतर तिथल्या गाव कऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता . हा नेमका टोकाचा विरोधाभास बघता ,
खरी समस्या जंगलाचा ऱ्हास होणे हीच आहे . आज घडलेली घटना ह्या प्रासंगिक आहेत . माणूस आणि प्राणी ह्यांचा जेव्हा सामना होईल तेव्हा मृत्यू मुक्या प्राणाच्याच होणार हे ठरले असते . असे प्रकार टाळण्यासाठी मानवी वस्तीचे जंगलात होत असलेले अतिक्रमण प्रामाणिकपणे थांबविणे हाच दीर्घकालीन उपाय आहे .
मला आठवतंय चौथी -पाचवी मध्ये असताना , पर्यावरणाचा ग्रेड मार्क्स असलेला एक पेपर होयचा . त्यात प्रदूषण , जंगलतोड वैगेरे वैगेरे स्वरूपाचे प्रश्न असायचे . त्या पेपर मध्ये मला नेहमी पैकी च्या पैकी मार्क्स पडायचे , कारण एवढेच की , पर्यावरणाच्या पेपर मध्ये माणसाला येथेच्छ शिव्या घातल्या की , पैकी च्या पैकी मार्क्स फिक्स !! आजच्या लोकांचे व्हाट्सअप्प स्टेटस बघून मला माझ्या त्याच पेपरची मला आठवण आली . मुळात मूळ मुद्दा लक्षात न घेता . ह्या पर्यावरण रुपी जटील प्रश्नाला माणुसकी , आई , माता , माणूस नालायक अश्या टॅग्स मारून त्या पोस्ट करण्यात काय अर्थ आहे ??
हा प्रश्न माणुसकी चा वैगेरे नसून प्राणी की माणूस ह्यांच्या सहअस्तित्वातुन उभा झालेल्या परिस्थितीचा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे .
बाकी स्टेटस ठेवायला ना नाहीच त्याला कुठे पैसे पडतात ???
.......✍️निखिल सुभाष थोरवे
Comments
Post a Comment