विठ्ठल काय देतो ???

दरवेळी आषाढी एकादशीची शासकीय महापूजा उरकल्यावर मुख्यमंत्री प्रतिक्रिया देतात , " मी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून साकडे घातले " . आजवरचा प्रत्येक मुख्यमंत्री खोट बोलला असावा असे मला व्यक्तिगत सतत वाटत राहते  कारण , 
पांडुरंग अशी देवता आहे जिच्याकडे आपण काही मागत नाही , तिच्या समोर गेले की आपण तृप्त होतो ... 
मनात कसलीही भाव-भावना काही शिल्लक राहत नाही ... 
अपेक्षा शिल्लक राहत नाही ... 
ती अखंड चैतन्य स्वरूप मूर्ती कितीही वेळ पाहत राहिली तरी , डोळे शांत होत नाही ...
जेव्हा-जेव्हा विठ्ठल दर्शनाचा मला योग येतो तेव्हा ही भावना मी बऱ्याच वेळा अनुभवली आहे. 
विठ्ठलाची मूर्ती म्हणजे , अखंड चैतन्य , निर्विकार , एखाद्या खोल डोहा प्रमाणे शांत .... 
त्यामुळे , " माझं चांगलं होऊ दे , बंगला मिळू दे , माझं व्यक्तिगत दुःख नाहीसे होउदे " असे कोण सहसा मागत नाही .आणि ज्यांनी मागितले  त्यांना विठ्ठल सुद्धा तसं काही देत नाही . हे विशेष !!
मी नेहमी विचार करतो की , विठ्ठल नेमके काय देत असेल बरं ?? 
ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज यांच्या पर्यंत प्रत्येक संताने भौतिक सुख अनुभवले नाहीच .. त्यांच्या वाट्याला आले ते , प्रियजनांच्या मृत्यूचे दुःख आणि आर्थिक आणि सामाजिक निर्भसना तरी सुद्धा लोककल्याणाची कास त्यांनी सोडली नाही . लोकांचा अव्हेर त्यांनी कधी केला नाही . मला वाटतं हाच विचार कदाचित विठ्ठल देत असावा . ते संत होते म्हणून त्यांनी हा विचार विठ्ठलाकडून घेतला आणि वारकरी संप्रदायामार्फत , त्यांच्या ग्रंथरचनेमधून आपल्यापर्यंत पोहोचवला . तो विचार म्हणजे ,
" आपल्या पायाखालील कमकुवत आणि हतबल मुंगीच्या सुद्धा जगण्याचा अधिकार मान्य करण्याचा .. आणि एकमेकांशी सहिष्णू वागण्याचा !! " 
.....✍️निखिल थोरवे

Comments