आंतरराष्ट्रीय धोरणाची नाचक्की

लेखक:- निखिल सुभाष थोरवे 
भारत आणि चीन यांच्यातील सध्याचे तणावग्रस्त वातावरण हे काही नवीन नाही . चीन हा प्रचंड कुरापती देश !! तब्बल 13 देशांशी सीमा लागून असलेला चीन जवळ जवळ प्रत्येक देशाशी खुसपट हा काढतच असतो . आणि केवळ सीमा वाद , विस्तार वादी भूमिका रेटून नेऊन चीनने आपल्या शेजारील जवळ जवळ प्रत्येक देशाला वेठीस धरले आहे . 
कधी अरुणाचल प्रदेश आपल्या नकाशात समाविष्ट करणे असेल कधी डोकलामचा विवाद असेल आणि सध्याच्या लडाख येथील पॅगँग लेक इथपर्यंत दावा सांगणे असेल . काल परवा दोन्ही देशांच्या झटापटीत आपल्या देशाचे 20 आणि सरकारी माहितीनुसार चीनचे 40 सैनिक मारले गेले . साहजिकच चीन विरुद्ध देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या . 
" बायकॉट चायना प्रोडक्ट " ह्या धर्तीवर बरीच निदर्शने झाली . 
राज्यशास्त्राचा विद्यार्थी आणि अभ्यासक म्हणून चीन च्या ह्या वर्तुणुकीचा ज्या वेळेस मी अभ्यास करतो त्यावेळेस मला फारसे आश्चर्य वाटत नाही . चीन हा कुरापतीकार देश आहेच पण त्याने ही वेळ का साधली ? ह्या कारणांचा उपापोह मी ह्या ब्लॉग मध्ये करणार आहे .

त्यात नेपाळ ने इतिहासात पहिल्यांदाच भारताशी संघर्षाची भूमिका घेतली . आणि राज्यकर्यांसह सर्वच भारतीयांच्या भुवया उंचावल्या . भारताच्या समोर कोणत्याच बाबतीत मेळ नसणारा नेपाळ थेट भारताला शिंगावर कसा काय घेतोय ?? चायना आणि पाकिस्तानचे एक वेळ समजू शकतो . पण नेपाळ सारखे दुर्बल राष्ट्र जेव्हा भारताशी उघड उघड पंगा घेते , तेव्हा देशाचे परराष्ट्र धोरण हे गटांगळ्या खात असून बुडून जायच्या नजदिक आहे . हे समजण्यास बराच वाव आहे . ह्या सर्वांची दोन कारणे प्रामुख्याने मला दिसतात . ती म्हणजे , 

🔴अमेरिका धार्जिणे भारताचे परराष्ट्र धोरण :- 

विकसनशील राष्ट्राला शोभणारा आणि मानावणारा अलिप्त राष्ट्रवादाचा सिद्धांत ज्यांचे जनक नेहरू , नासेर आणि टिटो होते . तो सुरुवातीच्या भारताच्या जडघडणीत महत्त्वाची भूमिका पार पाडत होता . विशेषतः सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेच्या शीत युद्धात भारताच्या प्रगतीला अगदी पोषक वातावरण जरी सोव्हिएत युनियनने प्रदान केले असले तरी सुद्धा अमेरिकेसोबत भारत सुरक्षित अंतर राखून होता . अगदी जागतिकीकरणा नंतर सुद्धा भारतातील सॉफ्टवेअर उदयोग ह्याची मुख्य बाजारपेठ ही अमेरिकाच होती . एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून व्यापार भारत करत होता . 
भारत आणि अमेरिका संबंधात जवळीक आली ती , अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात निमित्त होते , न्यूक्लिअर करार !! पुढे मनमोहनसिंग यांनी हाच करार मार्गी लावला तेव्हा , तत्कालीन विरोधी पक्ष जे आत्ता सत्तेत आहेत त्यांनी भारताचे सार्वभौमत्व धोक्यात येईल आणि भारत अमेरिकेचा मिंधा बनेल अश्या आशयाचा प्रचार केला होता . आण्विक कारारानंतर भारत अमेरिकेचा मिंधा झाला की नाही ? हे माहीत नाही पण , तेव्हा पासून भारताचे परराष्ट्र धोरण हे अमेरिके भोवती पिंगा घालू लागले . 
विशेषतः मोदी सत्तेत आल्यानंतर त्याला खऱ्या अर्थाने ज्वर चढला . संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा गटाचे कायम सदस्यत्व मिळावे म्हणून मोदींनी जंग जंग पछाडले , त्यात अमेरिकेने तोंदेखी भूमिका घेतली जरूर पण चीनच्या आडमुठेपणामुळे तो विषय मार्गी लागला नाही .अगदी नाटो ह्या लष्करी संघटनेचा भारत भागीदार नसला तरी ,अमेरिकेच्या भूमिकेला पूरक अशी भूमिका प्रत्येक वेळी भारताने घेतली . 

प्रेम दोन्ही कडून झाले तर ते , सफल होते . भारत आणि अमेरिकेच्या बाबतीत अमेरिकेची भूमिका नेहमी दुटप्पी राहिली . करोनाच्या काळात औषधां साठी ट्रम्प यांनी दिलेली धमकी असेल किंवा H1 , B1 व्हिसा साठी कडक केलेले निर्बंध असतील . प्रत्येक वेळेस भारताच्या पदरी निराशा आली . मला कधी कधी अमेरिका ही 5 प्रियकर असलेल्या मुली सारखी वाटते तिला एका वेळेस 5 जणांना खुश ठेवायचे असते . त्यामुळे कोणत्याच प्रियकराला त्या मुलीचे 100 % प्रेम मिळत नाही .आणि मग हाती येतो तो पश्चात्ताप !! 
बर भाजप आणि विशेषतः मोदींच्या काळात भारत अमेरिकेशी कमी डोनाल्ड ट्रम्प शी जास्त व्यक्तिगत पातळीशी जोडला गेला होता . ट्रम्प मुळात विचित्र आणि तुघलकी स्वभावाचे असल्याने दर वेळेस भारताला त्याचा फायदा कमी तोटा जास्त होत गेला . केवळ ' हाव डी मोदी ' आणि ' नमस्ते ट्रम्प ' सारखे इव्हेंट्स घेतले की , दोन्ही देशांमधील संबंध घट्ट होतात ..!! असे मोदींच्या कोअर टीम ने त्यांना जर सांगितले असेल तर ते अतिशय धक्कादायक वाटते . 

मुळात चीनचा राग हा भारत अमेरिकेचा मित्र म्हणून जास्त आहे . हे आपण लक्षात घेतले पाहिजे . भारताची सलगी ही चीनला अडचणीत आणणाऱ्या अमेरिकेशी झालेली चीनला कशी चालेल ?? त्यामुळे शक्य तेवढे कुरापती काढून भारताला व्यस्त ठेवणे हा चीनच्या अजेंडा आहे . त्यात मोदींनी दिलेली आत्मनिर्भर भारत ची घोषणा देखील चीनची धडकी भरवणारी आहे . भारतासारखी बाजारपेठ चीनला गमावून चालणार नाही . त्यामुळे हा सगळा दबाव तंत्राचाभाग चीन आरंभत आहे . 

🔴चीनने ओळखली भारताची कमकुवत झालेली अर्थव्यवस्था :- 

साधं उदाहरण सांगतो , आपल्या सर्वांना शेजारी हाअसतोच  कधी कंपाउंड वॉल च्या भिंतीवरून , कधी टी.व्ही च्या आवाजावरून , कधी ड्रेनेज च्या लाईन वरून तर कधी सांडपाणी येण्यावरून आपले शेजारच्याशी वाद विवाद होत असतात . 
जर आपली आर्थिक परिस्थिती नाजूक आहे असे जर शेजारच्याला समजले तर , होणारा त्रास हा दुप्पट वाढतो . हे आपल्या सगळ्यांचे अनुभव आहेत . 
आंतरराष्ट्रीय संबंधात अश्याच गोष्टी असतात , वीस लाख कोटी आणि GDP च्या आकड्यांचा कितीही मोदी सरकारने फुगा फुगवला तरी चीन सारख्या बलाढ्य देशाला भारताच्या खऱ्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज नसेल हे बोलणे बलिशपणाचे ठरेल .
त्यामुळे मी वर म्हटल्याप्रमाणे आजवर गरीब आणि हिंदुराष्ट्र म्हणून आपण ज्यांना पोसले ते नेपाळी पण आपल्यावर उडू लागले त्याचे कारण हेच !! अर्थात त्याला चीनची फूस आहे हे सुद्धा तितकेच खरे .
जेव्हा राष्ट्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनते तेव्हा त्याची ध्येय-धोरणे ही अशीच अगदी लहान राष्ट्रांकडून तुडवली जातात .
आजच मोदी आले आणि त्यांनी देशाला आश्वस्त केले की , देशाच्या सीमा सुरक्षित आहेत . सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही वैगेरे , कदाचित युद्ध होणार नाही अशी परिस्थिती आहेच ! 
पण जरी युद्ध झाले तर कोणता देश आपल्या मदतीला धावून येईल ह्याचा अंदाज बांधता येणे कठीण आहे . करोनाच्या आपत्तीमुळे अधिच प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे . त्यामुळे खुद्द अमेरिकाच काय कोणत्याही देशाला युद्ध परवडणारे नाही . 
हा सगळा दबावतंत्राचा भाग आहे . आणि काही दिवसात तो शांत देखील होईल पण आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणांची झालेली नाचक्की ह्यामुळे उघडी पडत आहे . एवढं नक्की इथून पुढे भारताने कुणाच्याही वळचळीने न राहता स्वतंत्र भूमिका घेण्याची गरज आहे . कारण स्वातंत्र्य मिळाल्यापासून जी काही मजल भारताने मारली आहे , ती अमेरिका किंवा कोणत्याही महासत्तेच्या मर्जी मध्ये राहून नाही . हे लक्षात ठेवले पाहिजे .

पुढच्या ब्लॉग मध्ये ...स्वदेशी आणि बायकॉट चायना बद्दल बोलूया !! 

जरूर वाचा !! 
तूर्तास लेखणीस अल्पविराम !!





Comments