शेगाव चे गजानन महाराज आणि मी


देव ... प्रचंड व्यक्तिगत बाब ! 
कधी ह्या प्रकरणावर आवर्जून व्यक्त व्हावे असा प्रसंग फारसा आला नाही . आज काय माहिती का !! ह्या विषयावर लिहावेसे वाटले . मी माझ्या लिखाणातून बऱ्याच पुरोगामी बाबी मांडत असलो कारणाने , मी नास्तिक आहे . असा एक दृढ समज माझ्या वाचक वर्गात आणि मित्रांमध्ये झाला आहे . तो पहिल्यांदा मला दूर करावासा वाटतो . मी पूर्णपणे आस्तिक आहे आणि मी मूर्तिपूजा देखील मानणारा आहे . मी प्रत्येक कर्मकांड , पूजा ह्यांचा सन्मान करणारा आणि फारसा ह्या बाबतीत सर्व सामान्य समाजाची जशी मते असतात त्याच पध्दतीचा मी आहे . सत्यनारायण हा प्रकार थोतांड आहे . हे किती जरी लॉजिक ने पटवून दिले तरी ते जसे आपला समाज ,
 "विषाची परिक्षा कशाला ??? " 
असे म्हणत दोन पावले मागे येतो . आणि घरात सत्यनारायण घालतोच तसा काहीसा प्रकार माझ्याबाबतीत असावा . 
            शेगाव च्या गजानन महाराजांचा मी निस्सीम भक्त ! महाराज जे करतील ती पूर्वदिशा असे मी मानतो .
            
शेवटी कसे असते आपल्याला कुठेतरी मस्तक ठेवायला चरण लागतात . त्या चरणावर श्रद्धा ठेवून मार्गक्रमण करायचे आणि अशी असीम , दैवी शक्ती आपल्या मागे आहे . ज्यांच्यामुळे आपण प्रत्येक संकटातून तावून सुलाखून बाहेर पडतो . महाराज मला योग्य मार्ग दाखवतात किंवा होणारे नुकसान सौम्य करतात हा अनुभव मला व्यक्तिगत अनेक वेळा आला आहे . 

माझी देवाची संकल्पना ही साधना ह्या व्याख्येशी जवळीक साधणारी आहे . आणि ती नेमकी कधी झाली ह्याची देखील स्पष्ट आठवण माझ्याजवळ आहे .

            Pccoe ला जॉब ला लागल्यानंतर प्राधिकरणातील गजानन महाराज मंदिरात गुरुवार सकाळच्या 9 च्या आरतीला जायचा नियम मी एक प्रकारे स्वतःला घालून घेतला . अगदी ते सगळे जमून पण यायचे . आणि आपण महाराजांच्या जवळ आहोत त्यांच्या मर्जीतील आहोत ही भावना सुखावून जात असे .
            
 पण , ह्या समजुतीला कलाटणी मिळाली ती माझा मित्र पृथ्वीराज ICU मध्ये होता तेव्हा  . तो शेवटच्या घटका मोजत असताना . आपला मित्र वाचेल ह्या भाबड्या आशेने प्रार्थना करण्यासाठी जेव्हा मी पिंपरी लिंक रोडच्या मंदिरात गेलो होतो तेव्हा आपला जवळचा मित्र जाणार ह्या कल्पनेने घाय मोकलून रडलो . विनवण्या केल्या महाराजांना , महाराज , "माझ्या मित्राला प्लिज नेहू नका हो !! " 
रडण्याचा आवेग थांबला तसा , अचानक महाराजांचा प्रसाद म्हणून आपण तीर्थ घेऊन जाऊ असा विचार करून ते तीर्थ नेण्यासाठी एखादे भांडे किंवा डबी शोधू लागलो . दुपारची वेळ असल्याने मंदिरात तसे कुणी नव्हतेच एक म्हातारे खुर्चीवर खिन्न नजरेने  बसलेले फक्त मला दिसले . त्याच्या कडे ह्या धांदलीत एव्हाना माझे लक्ष नव्हतेच .
ते तीर्थ कशात न्यावे ? हा विचार करत असताना त्या म्हाताऱ्याची मदत घ्यावी म्हणून त्याला विचारले , "बाबा तुमच्याकडे रिकामी डबी आहे का ?? किंवा भांडे ??? " 
तर ते म्हातारे माझ्यावर जोरात खेकसले . मग मी तिथंच कुठून एका कोपऱ्यात पडलेल्या छोट्या प्रसादाच्या प्लास्टिक च्या मोकळ्या पिशवी मध्ये ते तीर्थ आणि अंगारा घेतला आणि ते घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो . ते तीर्थ मी पृथ्वीच्या ओठांवर थोडे ठेवले . तोवर तो व्हेंटिलेटरवर गेला होता त्यामुळे बेशुद्ध झाला होता . महाराजांचा अंगारा त्याच्या कपाळी लावला . आणि खरं सांगायचे तर जरा निर्धास्त झालो . आपण तीर्थ पाजले , अंगारा देखील लावला आत्ता आपला मित्र नक्की वाचणार ही भाबडी आशा त्यामागे होती . पण पृथ्वीची तब्येत अतिशय बिघडत गेली आणि 24 तासात त्याचे दुःखद निधन झाले . झाले जिवाभावाचा एक हक्काचा मित्र मी गमावला आणि अक्षरशः मोडून गेलो . 

आपल्या मनासारखे घडले नाही की आपण देवाला दूषण देतो हा मनुष्य स्वभावच ! त्याप्रकारे मी महाराजांशी काही दिवस फारकत घेतली . गुरुवारची आरती चुकवायची नाही हा दंडक जवळ जवळ सोडूनच दिला . आणि मंदिरात येणे जाणे कमी केले . पण महाराज जास्त काळ आपल्या भक्तांना दूर सारत नाही . यथावकाश अश्याच एका गुरुवारी कुणाच्या तरी आग्रहाखातर मंदिरात गेलो आणि त्या दिवशीचा सगळा घटनाक्रम डोळ्यासमोरून चमकून गेला . तो म्हातारा माणूस त्याचे माझ्यावर खेकसणे कश्या साठी असेल ?? जन्म मृत्युच्या फेऱ्यात तुझी लुडबुड कशाला ?? जे विधिलिखित आहे ते घडणारच ..मी देखील त्यात बदल करू शकत नाही . हे त्या म्हाताऱ्याला म्हणजेच गजानन महाराजांना सुचवायचे नसेल ना .. असं विचार चक्र माझं चालू होत .. आणि क्षणात साक्षात्कार झाल्यासारखं सगळं डोळ्यासमोर स्पष्ट झाले . महाराजांवर राग असा नव्हताच की भक्ती कमी झाली होती . अश्यातला देखील काही भाग नव्हता पण आधी सारखा उत्साह अजूनही नाही . आत्ता फारसे दर गुरुवारी मंदिरात गेलेच पाहिजे असा दंडक स्वतःला घालून घेतला नाही . गुरुवारची आरतीची वेळ पण ओढाताण करून गाठायला जात नाही . एक प्रकारे मी कर्मकांड सोडून साधनेकडे वळलो . तोच हा प्रसंग 

माझ्या दृष्टीने देव मानणे किंवा न मानणे हा ज्याचा त्याचा प्रश्न ! म्हणून मी वर बोललो ती अतिशय व्यक्तिगत बाब !! पण माझ्या आयुष्यातील वरील प्रसंगावरून एक बोध मी नक्कीच घेतला की , देवाशी संवाद साधायचा असेल तर , साधना करणे हे उत्तम तुम्ही पोथी वाचा , नामस्मरण करा , त्याचे नाव मुखात घेत रहा , आपल्या हातात नसलेल्या सर्व गोष्टी त्याच्या मर्जीवर सोडून निर्धास्त व्हा !! आणि त्याला चालवू द्या काय चालवायचे ते !! तो नक्कीच तुमच्यासाठी योग्य असेल तेच करणार . त्याच्या चरणाशी पूर्ण आपली निष्ठा ठेवा तू तुम्हाला दूर सारणार नाही . कर्मकांड करणे , पूजा करणे ह्याचा मी विरोधात नाही . अन तसे असायचे काही प्रश्न देखील नाही . 

पण देवाला खेटे मारणे , रात्र रात्र भर गाडी चालवून शनी साठी अमावस्या , दत्त महाराजांसाठी गुरुवार , खंडोबा साठी रविवार , देवीसाठी शुक्रवार किंवा मंगळवार गाठणारी अनेक मंडळी आपल्या नजरेत असतील . ही गोष्ट त्यांच्या साधनेचा भाग जरूर असेल आणि त्याबद्दल मला पूर्ण आदर आहेच पण , ह्या खेट्या पेक्षा घरी रोज आपल्या आराध्य देवतेला हात जोडून केलेला नमस्कार आणि त्याच्याशी साधलेला संवाद हा खूप ऊर्जा वाढवणारा असतो ह्याचा व्यक्तिगत अनुभव मी गेल्या दोन वर्षांपासून घेत आहे . 

माझ्या दृष्टीने भक्ती म्हणजे आपल्या देवाशी केलेले हितगुज !! आपण आपल्या आई वडिलांच्या जवळ असतो , त्यांच्यावर प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो त्यांची आस्थेने चौकशी करतो.त्यांची सेवा करतो . तसेच आपल्या देवतेविषयी आहे . आपण त्याच्याशी रोज संवाद साधला तर तो आपल्या अधिक जवळ येणार आहे . त्यामुळे साधनेचा हा मार्ग मला अधिक सोप्पा आणि सरळ वाटतो .

गजानन महाराजांशी हा माझा रोज घडत असलेला संवाद कधी एका गुरू शिष्याचा संवाद असतो तर कधी बाप लेकाचा संवाद असतो , कधी तो मित्राच्या रूपातील संवाद असतो . आजही मन फार उदास खिन्न झाले की किंवा कोणताही आनंदाचा प्रसंग असला की मी महाराजांच्या पुढे जातो आणि डोळे मिटून त्यांच्याशी संवाद साधतो . महाराज मला मार्ग दाखवतात आणि ह्यापुढेही ते दाखवत राहतील हे माझ्या मानस पक्के ठाऊक आहे . 
त्यामुळे आपण आस्तिक असाल तर , आपल्या आराध्य देवतेशी संवाद साधने लवकर सुरू करा . खूप मोठया ऊर्जेची अनुभूती आपल्याला प्राप्त होईल असा मला विश्वास आहे .
तूर्तास लेखणीस पूर्णविराम .. 

.......✍️निखिल सुभाष थोरवे

                             पृृथ्वी आणि मी

Comments

Post a Comment