ही विचारांची ' धूळ ' पुसली कधी जाणार ???


लेखक :- श्री. निखिल सुभाष थोरवे
मो. 9764796699.

गेले 5-6 दिवस मॉर्निंग वॉक जातोय , इथून पुढे सुद्धा मी जात राहावे यासाठी तुमच्या सदिच्छांची आणि आशीर्वादांची आवश्यकता आहे .
हल्ली ड्रायव्हिंग क्लास जॉईन केल्यामुळे आणि चार चाकी घेण्यासाठी उत्सुक असल्याने प्रत्येक चार चाकी आणि विशेषतः जुन्या गाड्यांकडे लक्ष लवकर जाते .
" नवीनच गाडी शिकणाऱ्या लोकांनी हात साफ करायला आधी जुनी गाडी चालवलीच पाहिजे..!! " , अशी एकंदर आपल्या समाजात दृढ अंधश्रद्धा असल्याने त्याच अनुषंगाने मी हल्ली जुन्या गाड्यांचे निरीक्षण थोडे अधिक बारकाईने करीत असतो .
असेच , मॉर्निंग वॉक दरम्यान 2 दिवसांपासून धूळ खात पडलेली टाटा इंडिगो लक्ष वेधून घेत होती . गाडी वरकरणी बरी दिसत असल्याने असे काय कारण असेल ?? जेणेकरून मालकाने  एवढी धूळ खात ती गाडी पडून दिली असेल ?? , असे विचारचक्र डोक्यात घोळत असताना अचानक लक्ष ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या धुळीमुळे पुसटश्या पांढऱ्या रेडियम च्या आकृतीकडे गेले .

युगप्रवर्तक आपल्या महाराजांची प्रतिमा अशी धूळ खात पडून बघून जीव कासावीस झाला . क्षणाचाही विलंब न करता हाताने ती धूळ साफ केली . पुढे बघितले तर तशीच महाराजांची प्रतिमा आणि भैरवनाथ आणि खंडोबा या देवतांच्या नामावलीचे रेडियम स्टिकर चिटकवलेले दिसले ते देखील मी साफ केले . चालत पुढे गेलो तसे विचारचक्र सुरू झाले .
आपल्या देवता आणि देवतेसमान महापुरुषांच्या प्रतिमा आपण अभिमानाने गाड्यांवर  किंवा स्वतःच्या अंगावर मिरवतो त्यांची चाड आपण ठेवतो का ??
धूळ खात पडलेली महाराजांची प्रतिमा हे फक्त उदाहरण म्हणून आपण समोर ठेवू पण ,
नंबर प्लेटवर पावसाळ्यात चिखलाने माखलेल्या महाराजांच्या प्रतिमा किंवा स्वेटर/जर्किंग वर जाणता राजा आणि त्यावर कोरलेले महाराज जेव्हा जर्किंग खराब होऊन कचरा कुंडीत जाते आणि ते नजरेस पडते त्यावेळेस आपल्या मराठी मनास किती वेदना होत असतील त्याचा विचार न केलेला बरा ..!!
किंवा देव देवतांचे फोटो असलेले किचेन जेव्हा पायाखाली येतात तेव्हा त्या देवतांचा किती अपमान होतो . ह्याचा कधी विचार केलाय का ??


मुळात आपण आपले महापुरुष आणि त्यांच्या प्रति असलेली आपली निष्ठा ही आचरणात आणण्यापेक्षा त्याचा दिखाऊपणा करण्यात व्यस्त आहोत . आपल्या गाडीच्या मागे , काचेवर रेडियमने महाराजांची प्रतिमा कोरण्या आधी ती गाडी कोणत्या बिअर बारच्या समोर किंवा कलाकेंद्राच्या समोर तर उभी  राहणार नाही ना , ह्याची खबरदारी आपण घ्यायला नको ??
किंवा कपाळावर शिवगंध , मस्तकावर महाराजांप्रमाणे केशभूषा ठेवण्याआधी त्याच मस्तकात शिवविचार आहेत का ?? ह्याचा ज्याने त्याने विचार करण्याची गांभीर्याने गरज आहे .
किंवा मोबाईल स्क्रीन वर वॉलपेपर लावण्याआधी त्या स्क्रीन वर आपण काही वाईट तर बघणार नाही ना ?? ह्याचे आत्मपरीक्षण ज्याचे त्याने करायला हवे !!

मुळात आपल्या मराठी माणसांना युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज हे समजलेच नाही असे दुर्दैवाने आपल्याला म्हणावे लागेल , आपण त्यांना दरवेळेस आपल्या सोयीने वापरतो कधी असीम शौर्याचे प्रतिक म्हणून वापरतो तर कधी बिगर हिंदू लोकांच्या द्वेषाला खतपाणी घालण्यासाठी काही संघटना जाणीवपूर्वक वापर करतात , तर काही छत्रपतींच्या नावाने आशिर्वाद मागून राज्य हस्तगत करतात .

आपल्या मराठी माणसाला एक वेळ कोणतेही ज्ञान मिळाले नाही तरी चालेल पण , " सर्व चांगल्या गोष्टींचे सार असणारे शिवचरित्र आणि शिवछत्रपती संपूर्ण समजायला हवे " त्यांचा जीवन उद्देश , त्यांचे राजकारण आणि रयतेच्या प्रति त्यांचे असणारे ममत्व समस्त मराठी जनास समजले तर , आपल्या संबंध मराठी मूलखाचे कल्याण झाल्या शिवाय राहणार नाही .

कारण , शिवचरित्र आणि शिवछत्रपती हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय तर आहेच .. पण त्याहुन अधिक डोक्यात घालण्याचा विषय आहे ...
तेव्हा गांभीर्याने विचार करा , विचार पटले तर , जरूर फोन करा
नंबर पेज वर आहेच..!!

.......✍️ श्री . निखिल सुभाष थोरवे . 


Comments