2020 : मागे वळून बघताना

मला नीटसे आठवत नाही . पण सातवी का आठवी ला इंग्लिश विषयाच्या पुस्तकात Vision : 2020 असा डॉ. अब्दुल कलाम यांचा धडा होता . भारत 2020 साली महासत्ता बनेल वैगेरे-वैगेरे असा त्यात आशय होता. 
माफ करा पण , 2020 मध्ये , भारत महासत्ता नाही तर 
" दारूचा गुत्ता " बनला . कारण सगळ्यात जास्त महसूल त्यातूनच मिळाला , असो..!!
आज डिसेंबर महिन्याच्या 28 तारखेला लिहीत असताना , भारत महासत्ता ह्या शब्दापासून तर कोसो दूर निघून गेला आहे .
काल परवा फेब्रुवारी महिना असावा असे वर्ष निघून गेले . त्यामुळे गेलेल्या वर्षाची उजळणी करायला फार कष्ट लागत नाही . 

कोरोना माहामारीत अनेक घरच्या घरे उद्ध्वस्त झाली अनेकांनी आपले सगे सोयरे गमावले . त्यांना शेवटचा निरोप देखील देता आला नाही . शेवटचे बघता आले नाही , ह्याहून वाईट काय घडणार ?? 
मजुरांना पायपीट करावी लागली . फाळणी नंतरचे सर्वात भयानक स्थलांतर देशाने अनुभवले . जालन्याजवळ रेल्वे खाली चिरडले गेलेले मजूर बघून मन हेलावून गेले . 
सुशांतसिंग राजपूत ने आत्महत्या केली . इतिहासात भारतीय मीडियाच्या कार्यकाळातील अतिशय किळसवाणा आणि लज्जास्पद काळ अशी नोंद होईल अशी कामगिरी अर्णब गोस्वामी आणि त्याच्या सारख्या अनेक कथित पत्रकार मंडळींनी करून दाखवली . 
ड्रग्ज त्याचे बॉलिवूड कनेक्शन हे धक्कादायक जरी नसले की , जी नावे समोर आली ती आश्चर्यकारक जरूर होती . 
ह्या जगात कुणीच चांगले नाही ह्या उक्तीवर जनतेचा ठाम विश्वास बसला . 
राम मंदिर झाले पण रामराज्य अजूनही कोसो दूर आहे . 
वीस लाख कोटी , आत्मनिर्भर वैगेरे शब्द विनोदाचा भाग झाले . अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अजूनही पगार कपात सुरू आहे . छोटा मोठा प्रत्येकजण व्यवसाय करू इच्छित आहे . यश मिळेल का ?? आणि मुख्य म्हणजे ग्राहक वर्ग मिळेल का ?? हा देखील मोठा प्रश्न आहेच .. 

ह्या 2020 एक गोष्ट शिकवली ती म्हणजे , 
" काहीच कम्पलसरी नाही..!! " 
पालखी सोहळा , गणेशोत्सव , दिवाळी सगळेच सण आपण साजरे करतो म्हणून असतात अन्यथा ते नसतात ..!! 
त्या लग्नाला मला गेलेच पाहिजे , मला वारीला गेलेच पाहिजे त्याला मला भेटलेच पाहिजे वैगेरे वैगेरे सगळे फोल आहे . 
जग थांबू शकते हे 2020 ने दाखवून दिले . 
जगणे महत्वाचे आहे . आणि जिवंत राहणे हेच अंतिम सत्य आहे . आणि तेच शाश्वत आहे . 
जान है तो जहां है !! 

बाकी , तुम्हाला 2021 व्यवस्थित जावो !! 2020 ने दिलेल्या कडू , गोड आठवणी विसरून नव्या उमेदीने सर्वजण कामाला लागो ह्या शुभेच्छा..!! 
आपला 
.....✍️निखिल सुभाष थोरवे

Comments