ऑलम्पिक वीरांचे वैचारिक टॅगिंग थांबवा.

ऑलम्पिक वीरांचे वैचारिक टॅगिंग थांबवा.

एखादा कर्तृत्ववान झाला की , प्रत्येक जण त्यामध्ये आपल्याला अभिप्रेत असणारी भूमिका शोधत असतो. हल्ली जातीनिहाय महापुरुषांच्या साजरा केल्या जाणाऱ्या जयंत्या-पुण्यतिथ्या हे त्याचेच द्योतक.!

जिंकलेला / जिंकलेली ऑलम्पिक वीर आपल्या आवडत्या विचारसरणीची कशी आहे ..!! हे दाखवण्याची धडपड सध्या सनातनी आणि पुरोगामी अश्या दोन्ही गटांकडून प्रकर्षाने होत आहे. 

मनू भाकर - एकाच ऑलम्पिक मध्ये दोन पदकांना गवसणी घालणारी भारताची कन्या ..! पण ; मनुचे अभिनंदन करत असताना , तिला भगवद्गीता कशी उपयोगी पडली वैगेरे वैगेरे चे फ्लेव्हर सनातनी देत आहेत. काही महाभाग तर महिला क्रिकेटर स्मृती मंथनाच्या नावाला जोडून 'मनू-स्मृती' असे सुद्धा शब्दछल करत आहेत. 

बरं , ह्यामध्ये ; पुरोगामी सुद्धा कमी नाहीत , काल महिला कुस्तीची सेमिफायनल दिमाखात जिंकून फायनल मध्ये प्रवेश केलेल्या विनेश फोगाट हिच्या विजयला पुरोगाम्यांनी आत्तापासूनच सर्व खेळाडूंनी मागील ब्रिजभूषण सिंग विरुद्ध केलेल्या आंदोलनाचा मुलामा चढवायला सुरुवात केली आहे. 


वरीष्ठ पत्रकार देखील याबाबतीत मागे नाहीत बरं..!! दुर्दैवाने विनेश फोगाट १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने फायनल मधून बाहेर पडल्याची आत्ताच धक्कादायक बातमी समोर आली आहे. तरीसुद्धा ; विनेशने करून दाखवलेली कामगिरी कमी आखता येणार नाही.


असो , आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये पॉलिटिकल कंटेंट शोधण्याची खुमखुमी लागलेली आहे. कोणत्याही खेळ , खेळाडू यांच्याकडे आपण तटस्थपणे बघूच शकत नाही. खेळांच्या तांत्रिक बाबी , खेळाडूने केलेला सराव , त्या संबंधित खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी त्या खेळाडूने केलेली जीवापाड मेहनत , भारताच्या दृष्टीने संबंधित खेळात सुधारणा करण्यासाठी काही ठोस कार्यक्रम यांची चर्चा ओघानेच होताना दिसते. जे अतिशय दुर्दैवी आहे. 


कोणत्याही व्यक्तीला आजूबाजूच्या परिस्थितीशी संघर्ष करत आपले ध्येय हे गाठावेच लागते. मनू भाकर च्या बाबतीत हे ध्येय गाठत असताना , नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तिला श्रीकृष्ण कथित भगवद्गीतेचा आधार घ्यावा लागला असला काय किंवा विनेश फोगाट आणि तिच्या सहकाऱ्यांना जुलमी ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलनाचा स्वीकार करावा लागला असेल . यासर्व बाबी संघर्षाच्या आहेत. म्हणून या दोघींपैकी कुणीही स्वीकारलेली बाजू चूक किंवा बरोबर अथवा मोठी / छोटी ठरत नाही. या सर्व बाबी या त्या-त्या काळानुसार संघर्षाचा एक भाग असतात. 


जर , बाजूच घ्यायची असेल तर एक तटस्थपणे खेळाचे कौतुक होयला हवे. एवढी सद् विवेकबुद्धी जागृत ठेवायला हवी. कारण ; खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा खरा उपयोग खरेच होईल जेव्हा , 

नवीन पिढी एका सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चर सह क्रीडा क्षेत्रातील नव्या गवसण्या घालण्यासाठी सज्ज असेल...!!  


...✍️ निखिल सुभाष थोरवे.


Comments