दादा , अति होतंय आणि हसू पण येतंय

दादा , अति होतंय आणि हसू पण येतंय 


अजितदादा यांचा मी व्यक्तिगत चाहता आहे. दादांची निर्णय क्षमता , त्यांची अहोरात्र काम करण्याचा उरक , प्रशासनावर त्यांची असलेली घट्ट पकड आणि पुढील ५० वर्षांचा विचार करून , आखलेली धोरणे ..!! ज्या गोष्टींचा प्रत्यय पिंपरी चिंचवडकरांना आणि बारामतीकरांना विशेषतः येत असतो. 

"Real Dada" असेच आहेत. जनतेला देखील असेच भावतात. 


राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात. म्हणून एखादा काही वाईट ठरत नसतो. अर्थात तेवढा 'पोक्तपणा' महाराष्ट्रात अजून शाबूत आहेत. शिवाय राजकीय महत्वकांक्षा असण्यात देखील काही गैर नाही. 


मात्र , दादांनी अरोरा नामक कुणाच्या तरी नादाला लागून जो त्यांची ' मुळात नसलेली ' बाजू मांडण्याचा जो उद्योग सुरू केला तो हास्यास्पद आहे. मी व्यक्तिशः एक सोशल मीडिया कंपनी चालवतो. त्यामुळे ह्या गोष्टी मी साहजिकपणे रिलेट करू शकतो. 

प्रत्येक बॅनर वर गुलाबी रंग वापरणे , मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरात जाहिरातबाजी करणे , गुलाबी सदृश रंगाचा कोट घालणे , बारामतीत नियोजनबद्ध सभा आयोजित करणे. हे एक पूर्वाश्रमीचा बारामतीकर म्हणून खूप हास्यास्पद आणि सर्वांत महत्त्वाचे कृत्रिम वाटते.


दादांनी जर त्यांनी केलेला पिंपरी चिंचवडचा , बारामतीचा विकास आणि त्यामागील त्यांची दूरदृष्टी , त्यांचा वक्तशीरपणा , कणखरपणा , निर्णयक्षमता , प्रचंड कष्ट घेण्याची ताकत ह्या गोष्टी प्रमोट केल्या तर , त्याचा फायदा निश्चितच दादांना होऊ शकेल. 


सोशल मीडिया , इमेज बिल्डींग करण्यात काहीच गैर नाही. माझ्या मते सोशल मीडिया कंपनीचे काम हे पुरातत्व खात्यासारखे असावे , जे वास्तूच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता त्या वास्तूचे उपजत सौंदर्य खुलवेल. याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मूळ व्यक्तिमत्त्वाला धक्का लागता कामा नये.


मूळात , राजकारणाच्या पटावर अजितदादा सध्याच्या काळात सर्वांत धोकादायक स्थितीत आहेत. जे अर्थात होणार होतेच , त्यांच्या सोबत आलेले (?) दिग्गज नेतेमंडळी कुठपर्यंत टिकतील हा मोठा प्रश्न आहे. सत्तेच्या लालसेने गुळाला मुंगळा चिटकावा तसे चिकटलेले कार्यकर्ते उदयाला सत्ता जाताच अलगद बाजूला होतील. शिवाय लोकसभेतील निराशाजनक कामगिरीने महायुती मधील दादांची 'बार्गेनिंग पॉवर' कमी झाली आहे. हे एव्हाना लपून राहिलेले नाही. दादांना , 'साहेबांना का सोडले ?' ह्याचे समर्पक उत्तर लोकांना अद्याप देता आलेले नाही. भाजप चे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते अजितदादा आमच्या उरावर नको म्हणून , अक्षरशः त्यांच्या पक्षश्रेष्ठींच्या कानात भुंगा लावत आहेत. 


त्यामुळे एवढ्या नाजूक परिस्थितीत एक भक्कम स्ट्रॅटेजीने पुढे जाणे दादांच्या 'थिंक टॅंक' कडून अपेक्षित होते. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाहीये. याचे एक अजितदादांचा चाहता म्हणून प्रचंड वाईट वाटते.


असो , अजितदादा अति होतंय आणि नाइलाजाने हसू पण येतंय ..!! 


✍🏻 निखिल सुभाष थोरवे.

Comments