कुणीतरी डोळे उघडून बघायला हवे.

२०१६ पासून , मराठा क्रांती मोर्च्याचा मी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिस्सा राहिलो आहे. एक मराठा समाजाचा तरुण म्हणून मराठा समाज सामोरे जात असलेल्या प्रत्येक सामाजिक , राजकीय , आर्थिक समस्येला मी देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामोरे गेलेलो आहे. मी पश्चिम महाराष्ट्रातील त्यातही पुणे जिल्ह्यातील सधन पट्ट्यातील असल्यामुळे कदाचित आर्थिक चणचण एवढी जाणवली नसेलही. 


मात्र , मराठवाडा , विदर्भ हा प्रादेशिक भागात मराठा समाजाच्या तरुणांची स्थिती भयावह आहे. आज पेट्रोल पंपावर काम करणारा , उन्हा पावसात झोमॅटो-स्वीगीच्या डिलिव्हरी मारणारा , १२-१२ तास ओव्हर टाईम करून , पोटाला चिमटा काढून घरी पैसे पाठवणारा मराठा युवक बहुतांश याच पट्ट्यातील आहे. हा मराठा युवक अवस्थ आहे. त्याला मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून निश्चित काही तरी मिळेल अशी आशा आहे. मला असे वाटते हा सर्व लढा त्या तरुणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी होयला हवा.


सामूहिक एकत्रित शक्ती नेमकी कुठे वापरायची हे नेत्याला उमगले पाहिजे. ते 'डोके' समाजाला नसते. त्यामुळे आंदोलनाच्या या टप्प्यावर एका नेत्याला अभिप्रेत असणारी भूमिका घेणे मनोज जरांगेना क्रमप्राप्त आहे. खरे तर खालील मुद्द्यांनुसार सर्वच बाबींचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. 


१) मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे हा हट्टवाद सोडायला हवा. त्याने मराठा समाजाला काडीचाही फायदा होणार नाही. मराठयांना स्वतंत्र EWS आरक्षण जे आर्थिक निकषांवर आधारित आहे . ते सर्वस्वी योग्य आहे. जे आरक्षण केंद्र सरकार द्वारे निर्धारित आहे. 

ज्यात मराठा समाजासारख्याच मूळ व्यवसाय शेती असलेल्या मात्र क्षत्रिय असलेल्या भारतातील गुज्जर , पाटीदार , पटेल असे जाती समुदायांचा समावेश आहे. भारतातील इतर आरक्षण आंदोलने या आरक्षणानंतर शांत झाली ही वस्तुस्थिती आहे.


२) जर EWS आरक्षण नसेल घ्यायचे तर , केंद्र सरकार मधून आरक्षणाची मर्यादा वाढवून (जे सध्या तरी अश्यक्य आहे) घ्यावे. 

ज्यासाठी लागणारे दिल्लीतील लॉबिंग सध्याच्या कोणत्याच मराठी नेत्यांत नाही . घरातील डाळ कोणती घेऊ हे विचारण्यासाठी राज्यातील नेते दिल्लीच्या वाऱ्या जिथे करत असतील तिथे दिल्लीवर दबावतंत्र आणण्याचा विषयच सोडून द्या.


मनोज जरांगेना ह्या तांत्रिक बाबी कटकटी टाळून , डायरेक्ट ओबीसी मध्ये समाजाला समाविष्ट करायचे आहे. भोळ्या-भाबड्या समाजाला सुद्धा हे समजले पाहिजे की , हे लॉजिकला धरून नाही. जरांगे पाटलांचा संपूर्ण जोर हा , कुणबी - मराठा एक आहे ह्यावर आहे. अर्थात ते सत्यच आहे . मात्र , त्यामुळे मराठयांची खरीच स्थिती सुधारेल अशी स्थिती नाही. एकंदरीतच , मात्र , मराठ्यांची एवढी विशाल लोकसंख्या सरसकट ओबीसी प्रवर्गात घुसवणे लॉजिकल नाही. आणि मुख्य म्हणजे समाजाला त्याचा काही फायदा होणार नाही. संख्येने बहुसंख्य असणारा समाज जेव्हा ओबीसी कॅटेगरी मध्ये समाविष्ट होईल तेव्हा , बाकीच्या सर्व प्रवर्गातील लाभ तो गमावून बसेल आणि मराठा समाजाच्या संधी या अधिक मर्यादित होतील. ही भूमिका रास्त आहे.


आज स्वतः जरांगे सत्ताधारी पक्षाचे खासदार पाडल्याच्या उन्मादात आहेत. ज्याचा फायदा प्रत्यक्ष राज्यातील विरोधी पक्षाला होतो आहे. अर्थात जरांगेच्या सांगण्यानुसार सत्ताधारी पक्षाचे ११३ हुन अधिक आमदार जरी पाडले तरी , मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही . कोणताही राजकीय पक्ष ही भूमिका घेणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मग असे असताना , विरोधी पक्षाच्या 'तळ्या' मराठा समाजाने का उचलायच्या ? मुळात त्याने समाजाला काय फायदा होणार आहे ? हे कुणीतरी विचारण्याची वेळ आली आहे . 


पहिल्या सिंघम मध्ये शेवटी एक डायलॉग आहे जो , ए.सी

.पी. तावडे , जयकांत शिक्रे ला मारतो , "पुलिस से ना दोस्ती अच्छी ना दुष्मनी , तुने तो दोनो कर दि ..!!  मुझसे दोस्ती और इससे दुष्मनी  "


जरांगेनी तशी भूमिका घेतली आहे . सत्ताधारी पक्षाशी दुष्मनी आणि विरोधकांशी दोस्ती जी समाजाच्या काडीचीही कामाची नाही . विरोधक त्यांची सत्ता आणून घेतील आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न वाऱ्यावर सोडून देतील. कोणीही ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याची चूक करू इच्छित नाही. आणि भविष्यात देखील करणार नाही. काँग्रेस सारखे पक्ष फार तर फार मराठ्यांच्या सोबत मुस्लिम , ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक समाजाला १५ ते २० % आरक्षण देतील आणि सर्वांत मुख्य ते आरक्षण कोर्टात टिकणार नाही. होईल तो पुन्हा बट्याबोळ ..!! 


आत्ताच्या , भव्य सभा , स्वागत सोहळे , स्टेज , ड्रोन फुटेज , नजर जाईल तिकडे डोक्यांची गर्दी हे बघायला बरे वाटले तरी ते , समाजाच्या हिताचे नाही. गर्दीच्या व्हिडीओज व्हिज्यु पाहून समाजाचे प्रश्न सुटत नसतात . त्याने समाजातील तरुणांचा फक्त बहुसंख्यवादाचा उन्माद वाढत असतो. श्रीमंत मराठ्यांचे , स्थानिक नेतेमंडळी यांचे काम आहे , जोरदार स्वागत करायचे कारण , त्यांना समाजाचा रोष पत्करून घ्यायचा नाही. जे चालले आहे ते चालू द्या . अशी एकंदरीतच स्थिती आहे . मात्र कुणीतरी बोलले पाहिजे , लिहले पाहिजे .


या परिस्थितीत खरी जबाबदारी नेत्याची आहे. सगळे राजकारणी सारखेच.. त्यांचा मतलब साधला की , मराठ्यांना टॉयलेट पेपर सारखे डब्यात टाकतील . 


आपल्या समाजाला काय हिताचे आणि काय योग्य हे शोधणे काम नेत्याचे ..!! 

मनोजदादा जरांगे पाटलांच्या बद्दल व्यक्तिशः आदर आहेच , ते समाजासाठी करत असलेल्या त्यागाला सॅल्युट आहेच मात्र , मराठा समाजाच्या कुणीतरी ह्या सगळ्याकडे डोळे उघडून बघायची आवश्यकता आहे. 


त्या गरीब , गरजवंत मराठा युवकांसाठी जीव तुटतो म्हणून पोटतिडकीने लिहले. समाजाने वाचावे ... डोळे उघडून नीट पहावे..!! 


✍️ निखिल सुभाष थोरवे . 






Comments