महाराष्ट्रातील पुढील राजकीय दशा आणि दिशा ..!!

महाराष्ट्रातील पुढील राजकीय दशा आणि दिशा ..!! 
…. ✍🏻 निखिल सुभाष थोरवे 

उद्भव ठाकरेंपाठोपाठ , आत्ता शरद पवार साहेबांचे देखिल पक्ष , चिन्ह भाजपने ( निवडणूक आयोग ) हिसकावले . सध्याच्या भाजपकडे बघून मला २००३ सालाचा रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रिलियन क्रिकेट संघ आठवतो . भेदक , विरोधकाला नेस्तानाबूत करणारा . आणि पुरागमनाची अजिबात संधी न देणारा. 
असो , निकाल हा असाच लागणार होता . त्यात विशेष असे काहीच नाही . 
मात्र , मला मुद्दा या मधल्या काळातील महाराष्ट्रातील राजकारणाचे अवमूल्यन झाले आहे , त्याअनुषंगाने मांडायचा आहे . अजित पवार यांची ही कृती ही काका - पुतण्याची मिलीभगत आहे असे माझ्यासह अनेकांचे मत होते . मात्र जसा काळ पुढे सरकतोय तसा दुरावा वाढत चाललाय असे दिसते. राजकारणात कुणीच कुणाचा पूर्णवेळ शत्रू किंवा मित्र नसतो हे ब्रीदवाक्य आपल्याला ठावूक आहेच . त्यामुळे भविष्यात पुन्हा काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे . 
सध्याची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची वाटचाल सध्या जरी सोप्पी वाटत असली तर , भविष्यकालीन परिणामांचा विचार करता ती खडतर आहे असे स्पष्ट दिसते . 
त्यातल्या त्यात , एकनाथ शिंदे यांची परिस्थिती फार बरी वाटते . त्यांनी किमान मुख्यमंत्रीपद तरी उपोभोगले आहे . आणि स्वतः शिंदे यांना आपल्या मर्यादा - बलस्थाने यांचे ज्ञान आहेच . त्यामुळे ही आत्ता आपण जगत असलेली वेळ , पुन्हा परत येणार नाही . हे त्यांना मनोमन माहिती आहेच . 

यात , सर्वात जास्त भविष्यातील नुकसान अजित पवारांचे आहे . त्यांनी शेकोटीसाठी घराचे वासे काढून पेटवले आहेत . असे म्हंटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही . 
आत्ता जे ५० आमदार अजित पवार यांच्या मागे आलेले आहेत . ते काय अजित दादा पवार यांचे नेतृत्व मान्य वैगेरे करुन आलेले नाही . ते केवळ आपल्या पिढ्यान-पिढ्या साठी कमावलेली प्रॉपर्टी शाबूत ठेवण्यासाठी आलेले आहेत . स्वतः अजित पवार तरी कश्यासाठी आले आहेत हे मी वेगळे सांगायला नकोच. 
मी बारामती मध्ये अनेक वर्षे राहिलो आहे . येथील राजकारण मी जवळून अनुभवले आहे . आत्ता जी मंडळी अजित दादांच्या मागे पुढे करतात ती एकतर आर्थिक लाभार्थी आहेत नाहीतर पदाधिकारी आहेत . सर्वसामान्य जनता ही दादांकडे जाते मात्र , त्यांना आधी ही कोंडाळी फोडून जावे लागते . हा अनुभव सर्वसामान्य जनतेला वारंवार येत असतो .  

अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीचा लेखाजोखा पाहिला तर , दादांचे बहुतांश राजकारण हे सत्ताकेंद्री राहीले आहे . मधले २०१४ ते २०१९ हे वर्षे सोडले तर , सर्वकाळ अजितदादा सत्तेत होते . सत्ता हातात असते तेव्हा धडाडीने लोकांची कामे होतात , विकासाला निधी मिळतो . कार्यकर्त्यांची कामे होतात . दरारा राहतो . हे दादांनी आजवर बिनदिक्कत उपभोगले आहे . पण , कुणाच्या जीवावर ? तर उत्तर आहे पवार साहेबांच्या ..!! 
महाराष्ट्रात , देशात असणारा पवार आडनावाचा जो दरारा होता , जे शब्दाला वजन होते तेच वजन अजितदादांनी वापरले . अजितदादांचा वक्तशीरपणा , प्रशासनावरील पकड , स्पष्टवक्तेपणा , विकासाची दूरदृष्टी ह्या सर्व ऍडिशनल बाबी त्यांना उपयोगी ठरल्या . म्हणून अजितदादा महाराष्ट्राला ज्ञात झाले . 
एक पूर्वाश्रमीचा बारामतीकर म्हणून सांगतो , अजितदादा हे उत्तम लोकप्रतिनिधी आहेतच मात्र ; ते उत्तम लोकनेते कधीच नव्हते आणि भविष्यात देखील तशी शक्यता नाही . 
आज एकटा बारामती तालुका फक्त सोडला तर , अजितदादा म्हणतील त्याला डोळे झाकून लोक निवडून देतील अशी परिस्थिती पुणे जिल्ह्यात देखील नाही . तर , बाकीच्या जिल्ह्यातील आणि देशातील स्थितीचे तर बोलूच नका ..!! 
त्याची झलक नुकतीच मावळ लोकसभा , पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे दिसली आहे . 
त्यामुळे , व्यवस्थित वस्तुस्थिती समजून घेतली तर , आज जे दादांच्या शिव्या खातात , त्यांचा शब्द झेलतात ते एकतर आर्थिक दृष्ट्या अजित दादांकडे मिंधे आहेत किंवा बीजेपीच्या भयाने कवचाखाली आहेत . छगन भुजबळ , दिलीप वळसे पाटील यांच्या सारखे जेष्ठ नेते अजितदादांचे तापट नेतृत्व असेच मान्य करतील ? या प्रश्नातच उत्तर सामावले आहे . सध्याचा काळ अडचणीचा आहे . त्यामुळे ही राजकीय अपरिहार्यता अजितदादा यांच्यासोबत आलेल्यांनी मान्य केली आहे . 
बाळासाहेब ठाकरे , शरद पवार साहेब , गोपीनाथ मुंडे हे सर्वकालीन श्रेष्ठ लोकनेते आहेत आणि राहतील . त्यामुळे सध्या हयात असलेले लोकनेते शरद पवार साहेब नक्की काय जादू करणार ? ह्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे . 

पण ; अडचणी आत्ता उद्भव ठाकरे आणि पवार साहेब दोघांकडे जास्त आहेत . नवीन नेतृत्वाची पिढी घडवायला एवढा वेळ दोघांकडे नाही आणि तशी लाट देखील नाही . त्यातल्या-त्यात फ्लिड वर्कच्या बाबतीत , उद्भव ठाकरे अतिशय कमजोर वाटतात. त्यांच्याकडे चांडाळ चौकडी सोडली तर , सध्या तरी लोकांमध्ये फिरणारा आणि कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा एकही नेता दिसत नाही . शिंदे गद्दार असले तरी , त्यांना समर्थ पर्याय त्यांच्यापुढे नाही . 
त्यादृष्टीने बरी स्थिती शरद पवार गटाची आहे . अजूनही जयंत पाटील यांच्या सारखा हुशार माणूस त्यांच्या कडे आहे . अमोल कोल्हे यांची संसदेमधील भाषणे ही अभ्यासपूर्ण असतात . ह्यासर्वाला एक वैचारिक अधिष्ठान आहे . सोशल मीडियाचे प्रेझेन्स जास्त चांगला शरद पवार गटाचा आहे . पवार साहेबांच्या वयाची सहानभूती त्यांच्याकडे आहे . त्यांची वैचारिक बैठक पक्की आहे . 
याउलट ; 
अजित पवार आधी बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावत होते . आत्ता यशवंतराव चव्हाणांचा लावतात . ह्यात त्यांचा वैचारिक गोंधळ दिसून देतो . बर आमच्यावर अन्याय झाला असे म्हंटले तर , त्यातही जास्त तथ्य नाही . त्यामुळे उद्भव ठाकरे यांच्या पेक्षा पवार साहेबांच्या गटाची स्थिती अधिक मजबूत वाटते . 

पुढील राजकीय दशा-दिशा 

भारतीय जनता पार्टी सध्या शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देऊन , अजितदादांकडे उपमुख्यमंत्रीपद , अर्थखाते , पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊन काय साधत असेल ? तर , ते सध्या तरी फक्त महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार आणू ईच्छितात. आणि मोदींना पुन्हा निर्विवादपणे पंतप्रधान बनवू ईच्छितात . 
पुढचे पुढे बघू ही त्यांची भूमिका आहे . 
शिवसेना उद्भव ठाकरे गट , शिवसेना शिंदे गट , मनसे यांच्यात लढाई झाली तर , अप्रत्यक्ष फायदा भारतीय जनता पार्टीलाच आहे . कारण ; ह्यांचा मतदार वर्ग सामायिक आहे . तीच गत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट , वंचित आघाडी आणि एमआयएमची आहे . ह्यांच्या भांडणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा बीजेपीलाच आहे . 
एकंदरीत महाविकास आघाडीचे विजयी मेरिट कमी करणे हा मागील उद्देश ..!! 
जागा वाटप हा एक कळीचा मुद्दा आहेच , भाजप आत्ता चार राज्यातील निकालामुळे , राम मंदिरामुळे फ्रंट फूट वर आहे . त्यांच्या जागा आणि मित्र पक्षांच्या जागा ह्यात जमीन-अस्मानाचा फरक असणारच आहे . आणि शिंदे अजित पवारांनी देखील मान्य केले आहे . 
जोडीला , भाजपमध्ये होत असलेली खोगीर भरती , बंडखोरांची संख्या , अपक्ष ही सर्व गणिते आहेतच . हेच भाजप मधले नाराज घटक जर उद्भव ठाकरे आणि शरद पवारांच्या हाताला लागले तर , २-४ सीट्स इकडे तिकडे होऊ शकतात . अन्यथा फार काही बरे निकाल महाविकासआघाडी आणि दोन्ही शिंदे - अजित पवार गटाला बघायला मिळतील अशी शक्यता नाही . 
सध्यातरी वरळी मधून आदित्य ठाकरे यांचा पराभव आणि बारामती मधून सुप्रिया सुळे यांचा प्रभाव हा प्रातिनिधिक स्वरूपात भाजपसाठी राजकीय सूड असेल . 

ह्यात एक उल्लेखनीय बाब आहे . ती म्हणजे , सर्वकालीन श्रेठ अश्या मराठा राजकारण्यांनी भाजपचे मांडलिकत्व पत्करणे. याचा वृत्तांत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आवर्जून केला जाईल . एवढे मात्र नक्की ..!! 

…. ✍🏻 निखिल सुभाष थोरवे

Comments