मराठा आरक्षण :- पुनर्विलोकन लेख : २
मराठा आरक्षण :- पुनर्विलोकन
लेखमालिका
लेख क्रमांक :- २
लेखक :- निखिल सुभाष थोरवे
मागील लेखातून मराठा समाजाच्या ' दैन्याचा ' आपण मागोवा घेतला . खरं म्हणजे मराठा समाजाचे दैन्य हे गेल्या अनेक वर्षांपासून कायम होतेच पण , कुठल्याही समाजाला आपण
' दैन्यात ' आहोत हे समजायला खूप वेळ जाऊन द्यावा लागतो . तसाच वेळ मराठा समाजाने खूप घेतला .
स्व. अण्णासाहेब पाटील यांनी ऐंशीच्या दशकात मुंबईत काढलेला मराठ्यांचा अतिविशाल मोर्च्या नंतर मराठ्यांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी तब्बल तीन दशके उजडावी लागली . मुळात आपली परिस्थिती कितीही हालाखीची असली तरी आपण स्वतःला कागदपत्री का होईना मागास म्हणवून घेणार नाही हीच मराठ्यांची मानसिकता त्यास कारणीभूत होती ही वस्तुस्थिती होती .
आज मराठा आरक्षणाला स्थगिती भेटल्यानंतर व्यापक प्रमाणात मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटताना आपल्याला सर्वत्र दिसत आहे . पण ही स्थिती मराठा समाजास प्राप्त होण्यासाठी खूप वेळ जावा लागला आहे होच खरी शोकांतिका म्हणावी लागेल .
वस्तुतः मी ही लेखमालिका लिहण्याचे जेव्हा जाहीर केले , तेव्हा ती " कारणे " आणि " उपाय " ह्या दोन भागात असेल असे म्हंटले होते . पण मराठा आंदोलन आज ज्या निर्णायक टप्प्यावर येऊन थांबले आहे . त्याचे सर्वात मोठे श्रेय जर कोणत्या गोष्टीला जात असेल ते म्हणजे लाखोंच्या संख्येने निघालेले " मराठा क्रांती मूक मोर्चे ..!! "
आज 3 वर्षांनंतर ह्या मराठा क्रांती मूक मोर्च्याचे अवलोकन आपण ह्या लेखाच्या निमित्ताने करणार आहोत . आणि त्यानंतर उपायांकडे वळूयात ..
🔴मराठा क्रांती मूक मोर्च्यांचे अवलोकन :-
साधारण कोपर्डी प्रकरण हे मराठा क्रांती मूक मोर्च्याचे तत्कालीन कारण म्हंटले पाहिजे . कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या , अट्रोसिटी मधील जाचक अटी रद्द करा आणि मराठ्यांना आरक्षण द्या . अश्या प्रमुख मागण्या त्यावेळेस अग्रक्रमावर होत्या . मला स्पष्टपणे आठवतंय बीड जिल्ह्यातून ह्या अतिविशाल पण तितक्याच शांत आणि संयमाने निघालेल्या मोर्च्यांना सुरुवात झाली . सुरुवातीला मीडियाने दखल घेतली नाहीच पण जसे जसे संपूर्ण मराठवाडा ह्या मोर्च्यांनी व्यापला तशी-तशी मीडियाला नाईलाजाने का होईना मराठा मोर्च्यांची दखल घेणे भाग पडले . आणि मराठा मोर्च्यांना नकळत पणे ग्लॅमर प्राप्त झाले .
मराठवाड्यातून ह्या मोर्च्यांचे लोन पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा आले तेव्हा त्याचे स्वरूप पूर्णपणे पालटलेले होते . मराठ्यां मधील गरिबांसाठी हे आरक्षण हे जीवन मरणाचा प्रश्न बनला होता तर , धनाढ्य मराठ्यांसाठी हा एक शक्ती प्रदर्शनाचा भाग होता . बऱ्याच मराठ्यांना हे माझे वाक्य पटणार नाही पण हीच वस्तुस्थिती होती .
महागड्या गाड्यांवर मराठा क्रांती मूक मोर्च्यांचे स्टिकर लावणे , मोठे मोठे भगवे झेंडे गाड्यांवर लावणे . अश्या गोष्टीत मराठा तरुण जास्त इंटरेस्ट घेऊ लागला . माझा पुण्यातील व्यक्तिगत अनुभव ह्या निमित्ताने सांगतो . 9 सप्टेंबर च्या मराठा क्रांती मोर्च्यात काही तरुण तर , " मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर समान नागरी कायदा लागू करा " अश्या आशयाचे पोस्टर घेऊन आले होते . एवढा वैचारिक गोंधळ असताना सुद्धा मराठा आरक्षण आणि शांततेत निघालेले मोर्च्यांना यश आले हे म्हणावे लागेल . कारण , पुढे सरकारला मराठा आरक्षण देणे क्रमप्राप्त आहे ह्याची जाणीव प्रकर्षाने झाली . नंतर फडणवीस यांनी मराठा मोर्च्यांना रीतसर हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला जरूर , पण जनमताचा रेटा एवढा होता की , फडणवीसांना हा मुद्दा कायमचा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागले .
एकंदरीत अण्णासाहेब पाटील यांच्या वेळेस असणारा मराठा समाजातील गोंधळ खूप प्रमाणात कमी झाला हे मराठा क्रांती मूक मोर्च्यांचे खूप मोठे यश होते . हे कुणालाही मान्यच करावे लागेल .
🔶मराठा समाजाला तारू शकणारे उपाय :-
🔴१) मराठा राज्यकर्ती जमात बनण्यापेक्षा व्यावसायिक जमात बनावी..
मराठा समाजाची मराठा क्रांती मोर्च्यांच्या वेळेस असणारी एकी पुन्हा दिसलीच नाही . गावकी भावकीचा शाप लागलेला मराठा समाज जोवर हा शाप वरदानात परावर्तित करीत नाही तोवर मराठा समाजाची प्रगती दिवास्वप्न ठरेल .
सिंधी , राजस्थानी ह्याप्रमाणे सिंडिकेट व्यापार मराठ्यांनी सुरू करायला हवे . कोणत्याही इतर समाजापेक्षा महाराष्ट्रात सर्वात जास्त भूमी धारण करणारी जमात मराठा आहे . आपल्या रोड लगतच्या जमिनी मराठ्यांनी स्वतः डेव्हलप करून त्या साठी एकत्रित निधी उभारून त्या मराठा समाजालाच व्यवसायाला उपलब्ध करून द्यायला हव्यात तरच मराठा समाज सार्वत्रिक प्रगती साधू शकतो . मराठा समाजाच्या तरुणांना पतपुरवठा करणाऱ्या संस्था काढणे आणि त्यातून मराठा समाजाच्या तरुणांना उद्योग उभारणी साठी मदत करणे हे इथून पुढच्या काळात आवश्यक राहणार आहेत .
ह्या सर्व गोष्टी प्रस्थापित मराठा नेते करतील अशी अपेक्षा साफ चुकीचे ठरेल .
नवश्रीमंत आणि जमीनदार लोकांनी ह्याकामी महत्वाची भूमिका बजवण्याची आवश्यकता आहे . त्यात नवश्रीमंत म्हणजे ज्यांच्या जमिनींना नुकतेच सोन्याचे भाव प्राप्त झाले आहेत . आणि राजकारणाची " खुमखुमी " ज्या लोकांना असते त्यांनी अश्या प्रकारचे कार्यक्रम मराठा तरुण तरुणींसाठी केले तर त्यातून आश्वासक अश्या प्रकारचा मतदार आणि मराठा समाजाचा एकगठ्ठा जनाधार ह्या नवश्रीमंत आणि राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या लोकांना प्राप्त होईल आणि मराठा समाजाची आर्थिक प्रगती सुद्धा साध्य होईल .
🔴२) प्रशासनात मराठा तितुका मेळवावा :-
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी असल्याने आरक्षणाची निकड माझ्यापेक्षा अधिक कुणाला असू शकते ?? पण फक्त आरक्षण भेटल्याने हा मार्ग सुकर होणार नाही . प्रशासनात फक्त हवा करण्यासाठी किंवा रुबाब मिरवण्यासाठी यायचे आहे . हा दृष्टीकोन केवळ मराठा समाजाच्या तरुणांमध्ये असतो असे नाही तो सार्वत्रिक आहे . मात्र मराठा समाजात तुलनेने तो अधिक आढळतो असे माझे निरीक्षण आहे .
दिवसा ढवळ्या स्वप्न बघायची सवय मराठा समाजाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण तरुणींना सोडून द्यायची आवश्यकता आहे .
स्पर्धा परिक्षेसाठी घरातून सकारात्मक वातावरण आणि दृष्टीकोन प्रशासनातील मराठा टक्का वाढवू शकतो असा मला विश्वास आहे . आणि मराठा आरक्षण त्यासाठी पूरक ठरेल .
🔴३) मोठे विवाह सोहळे टाळण्याची गरज :-
" जमीन विकेन पण मांडव त्याच्या घरापर्यंत घालीन " ह्या वृत्तीने सर्वात जास्त मराठा समाजाच्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक घात केला . वर-वधु दोन्ही बाजूच्या आर्थिकदृष्ट्या मान मोडणारे विवाह सोहळे हे दोन्ही बाजूस किमान 5 वर्षे तरी आर्थिकदृष्ट्या मागे घेऊन जातात .
मुळात 1000 लोकांची क्षमता असलेल्या कार्यालयासाठी 2000 हजार पत्रिका वाटणे , आणि त्याही दोन्ही बाजूने !! म्हणजे खुल्या 2000 पत्रिका वाया तर जातात ... एक पत्रिका 10 रुपयांची जरी धरली तरी होणारे नुकसान किती असेल ह्याचा अंदाज बांधा , त्यात अन्नाची नासाडी , सत्कार त्यातून होणारे रुसवे फुगवे आलेच ...
मी ह्या गोष्टी अधिकार वाणीने सांगू शकतो कारण मी स्वतः मोजक्या लोकांच्या उपस्थित साध्या पद्धतीने विवाह केला आहे . मुळात विवाह हा खाजगी बाब आहे . हे जोवर मराठ्यांना समजत नाही तोवर हे शाही विवाह सोहळे मराठ्यांना आर्थिक दृष्ट्या मागे खेचत राहतील .
🔴४) संगीत , अभिनय , क्रीडा आणि कला ह्याबद्दल मराठ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन हवा :-
मराठ्यांच्या घरातील एखादे पोरगे किंवा पोरगी चांगली नाचत असेल तर लहानपणीच त्याला चेपले जाते . त्याला " नाच्या " म्हणून हिणवले जाते . पोरींना " मुरळ्या " म्हणून हिणवले जाते . याउलट ब्राह्मण समाज आपल्या मुलांना नेहमी ह्याबाबतीत प्रोत्साहन देताना आपल्याला दिसेल . मध्यंतरी दिग्दर्शक सुजय डहाके ने केलेले विधान ह्याचीच ग्वाही देते . अगदी मराठी मालिकांमध्ये मराठा समाजाचे अभिनेते आणि अभिनेत्री कमी का आहेत !! ह्याचे मूळ कारण मराठ्यांच्या वरील वृत्तीत आहे .
मराठा म्हणजे शौर्य , मराठा म्हणजे शूरता ह्यापालिकडे मराठा म्हणजे साहित्य , मराठा म्हणजे संगीत , मराठा म्हणजे अभिनय , मराठा म्हणजे नृत्य ह्या नव्या व्याख्या मराठ्यांनी आत्मसात करायला हव्यात .
🔴५) अठरा पगड जातीचे व्यवसाय करण्यात लाज नसावी :-
केस कापण्याची मक्तेदारी फक्त न्हावी समाजाची , मटण चिकन फक्त खाटीक समाजाची , किंवा चपलीचे दुकान चांभाराचे ..!! वरील प्रत्येक व्यवसायात मराठ्यांनी उतरायला हवे आणि ते ही कोणतीही लाज न बाळगता . कारण मुळात चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडकळीस आली असल्याने मराठा समाजातील तरुणांनी ह्या व्यवसायात उडी घेतली नाही तर , ते खूप मोठे पाप ठरेल .
व्यवसायाला जातीचा शिक्का मारणे हे आत्ता बंद होण्याची आवश्यकता आहे . तरच तळागाळातील मराठा समाज प्रगती साधू शकेल .
🔴६) मराठवाडा , विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा एकत्र यावा :-
गरिबी , बेकारी आणि अज्ञान ह्याची सर्वात जास्त झळ जर कोणत्या भागातील मराठ्यांना बसली असेल ती , म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातील !!
म्हणून मी वर उल्लेख केल्याप्रमाणे मराठा क्रांती मूक मोर्च्यांची सुरुवात त्याच भागातून झाली .
याउलट पश्चिम महाराष्ट्रातील मराठा तरुण तुलनाने सधन आहे . त्याला औद्योगिक संधी उपलब्ध आहे . पश्चिम महाराष्ट्रातील जमीन खूप सुपीक आहे . कृष्णा , भीमा , कोयना , पंचगंगा ह्या नद्यांनी हा भाग सधन केला आहे .
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठ्यांबद्दल असूया बाळगून असतात त्यांच्यात रोटी-बेटीचे व्यवहार होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
हीच दरी आणि असूया महाराष्ट्रातील सबंध मराठा समाज एकत्रित होण्यासाठी मुख्य अडचण आहे . भागा-भागातील चालीरीती वेगळ्या-वेगळ्या असतात हे मान्य पण जोवर वैवाहिक संबंध ह्या तीन भौगोलिक भागांमध्ये प्रस्थापित होत नाही तोवर मराठा समाज एकसंध होऊ शकत नाही .
खरं म्हणजे वर्षानुवर्षे एखाद्या मानवी समूहाची चालीरीती , व्यवसाय , सवयी ह्या बनत जातात त्याला अनेक घटक कारणीभूत असतात . उदाहरणार्थ मारवाडी , सिंधी समाज ह्या लोकांच्यात व्यवसाय भिनलाय . आणि त्यामागे गेल्या अनेक वर्षांची तपश्चर्या आहे . मी वर मांडलेल्या सर्वच गोष्टी प्रत्यक्षात येण्यासाठी मराठ्यांच्या अनेक पिढ्या खर्ची घालायला लागतील पण , हळू हळू का होईना ह्या गोष्टीला सुरुवात होणे फार गरजेचे आहे . तरच सध्याच्या परिस्थितीत मराठा समाज तग धरू शकेल . मराठ्यांना आरक्षण मिळावे आणि ते मिळालेच पाहिजे . हा हट्टवाद तर मराठ्यांनी ठेवलाच पाहिजे पण त्यासोबतच आपल्या वागणुकीत , आचरणात , व्यवसाय आणि विचार पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची वेळ मराठा समाजावर येऊन ठेपली आहे . हे प्रत्येक मराठ्याने लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे .
मराठा ही येणाऱ्या वर्षात सर्वात सक्षम आणि इतर जातीस नेहमीच मार्गदर्शक भूमिकेत मोठ्या भावाप्रमाणे असावी ह्या मनस्वी शुभेच्छांसह आपल्या सर्वांची तूर्तास रजा घेतो . पुन्हा एखाद्या नवीन विषयावर लिहता होईन .
सध्या लेखणीस पूर्णविराम ...
जयोस्तु मराठा ...!!!
एक मराठा....लाख मराठा...!!!!
_____✍️ निखिल सुभाष थोरवे
Comments
Post a Comment