मराठा आरक्षण :- पुनर्विलोकन लेख-१
मराठा आरक्षण :- पुनर्विलोकन
लेखमालिका
लेख क्रमांक :- १
लेखक :- निखिल सुभाष थोरवे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. त्याला तीन दिवस उजाडून गेले आहेत . विरोधक सरकारच्या नाकर्तेपणावर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत तर सरकार ह्या मुद्द्यावर पूर्ण बॅकफूटवर गेल्या सारखे दिसत आहेत . एकंदरित आरक्षणाची वैधता ठरविण्यासाठी " घटना पिठाकडे हा खटला देणे " हा निर्णय म्हणजे अनियंत्रित काळासाठी हा विषय लांबणीवर टाकण्यासारखे आहे . मराठा समाजाने कितीही त्रागा केला तरी अजून आरक्षण मिळण्यासाठी अजून काही वर्षे तरी नक्कीच वाट बघावी लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे . बरं आरक्षण खरेच मिळेल का ?? ह्याविषयी सुद्धा शंका आहेच . आरक्षणाने मराठा समाजाचे संपूर्ण प्रश्न सुटणार जरी नसले तरी काही प्रमाणात मराठा समाजाला दिलासा भेटणार आहे . ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही . अश्या स्थितीत मराठा समाजाने पुन्हा एकदा सगळ्या परिस्थितीचे पुनर्विलोकन करणे ही काळाची गरज आहे .
" अतिशय श्रीमंती , सत्ता " यांचा अतिरेक आणि
" खायला महाग " असलेली गरिबी अशी टोकाची रूपे मराठा सोडून क्वचितच कोणत्या समाजात बघायला मिळेल. मराठा समाजातील काही लोकं ही दोन वेळेसच्या जेवणाला महाग असतात आणि त्याच वेळेस त्यांचे काही " जवळचे नातलग " श्रीमंतीत लोळत असतात हा टोकाचा विरोधाभास एक मराठा म्हणून मी अनेकदा अनुभवला आहे . आरक्षण हे प्रत्येक गोष्टीचे उत्तर असू शकत नाही . फार तर फार स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना त्याचा अधिक आधार वाटू शकतो . पण माझ्या स्वतःच्या अनुभवावरून पण हल्ली सर्वच कॅटेगरी मध्ये वाढलेले मेरिट त्यामुळे त्या गोष्टीचा एवढा फायदा होईल अशी शक्यता फार कमी आहे .
मराठा समाजाचे दैन्य आणि त्याच्या सध्याच्या स्थितीला जर कुणी जबाबदार असेल ते बहुतेक प्रमाणात मराठा समाज स्वतः च आहे हे सत्य आहे पण कटू सत्य आहे . मी ही लेखमालिका " मराठा समाजाच्या अधोगतीची कारणे " आणि
" शक्य असणारे उपाय " ह्या दोन भागात मांडणार आहे . त्यामुळे सुरुवातीला ह्या कारणांचा माझ्या अल्प बुद्धीला आलेला परिचय ह्या लेखाच्या माध्यमातून मी मांडतोय ...
🔴करिअर प्लॅनिंग बद्दल सार्वत्रिक अनास्था :-
इथे शिक्षणाचा अर्थ प्राथमिक , महाविद्यालयीन किंवा उच्च महाविद्यालयीन शिक्षण ह्या अर्थाने मला अपेक्षित नसून . शिक्षण आणि त्या माध्यमातून येणारे " प्रोडोक्टिव्ह आऊटपुट " ह्या भूमिकेतून मी बघतो . उदाहरणार्थ जमीन विकून भूमीहीन झालेल मराठ्याचा पोरगं B.Com करतं पण कुठे खटपट करून बँकेत चिटकायला बघते . वशिला नाही लागला तर कुठे अकाउंटंट म्हणून जातं . त्यातली काही जण बँकिंगचे क्लास लावून बँकेची तयारी करतात तिथे त्याला आरक्षण आडवे येते . वास्तविक आरक्षण हा एकच मुद्दा मुळात नसून इथे गल्लत करिअर प्लॅनिंग ची आहे . आपली मराठ्याची पोरं करिअर प्लॅनिंग करण्यात सपशेल अपयशी ठरतात . काही अपवाद सोडले तर अगदी मोठी मोठी प्रॉपर्टी असणारी मराठा समाजाची मुले सुद्धा आयुष्यभर बाप-जाद्याच्या प्रॉपर्टी वर पोसली जातात त्यांची प्रॉपर्टी ना वाढते उलट पोरगं व्यसनी निघालं तरी प्रॉपर्टी कमी होण्याचीच शक्यता जास्त ... !!
एकंदरीत पैसे नसलेले आणि असलेले सुद्धा करिअर प्लॅनिंग च्या बाबतीत शुन्य असतात हे निर्विवादपणे खरे आहे .
आपल्या मुलाने कुठे करिअर करावे ह्याबद्दल ब्राह्मण समाज आणि इतर अठरापगड जमात ठाम असते तसा मराठा समाज ठाम नसतो हे अत्यंत खेदाची बाब म्हणावी . मराठा समाजाच्या प्रमुख दैन्याच्या कारणात मला हे पहिले कारण वाटते .
🔴स्वाभिमान आणि संयम यात गल्लत :-
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आपल्याला स्वाभिमान , करारी बाणा !! त्याच करारी बाण्याने त्यांनी आलमगीर औरंगजेब बादशहाला भर दरबारात खडसावले होते . त्याची भर दरबारात बेअब्रू केली होती . मराठा म्हणजे त्याच छत्रपतींच्या करारी बाण्याच्या वारसा सांगणारी जात ..!! त्यात एक राज्यकर्ती जमात म्हणून करारी बाणा आणि स्वाभिमान उपजत आलाच .. !!
पण बऱ्याच वेळा स्वाभिमान , करारी बाणा आणि इगो ह्यात एक पुसट रेषा असते आणि त्याच रेषेच्या मागे पुढे मराठा तरुण हेलकावे खात असतो .
ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबापुढे सिंहगर्जना केली होती . पण , त्याच्या अगदी उलट सबुरी दाखवून परिस्थिती बिकट आहे हे समजून उमजून पुरंदरचा तह केला होता . युद्धात हरले आणि तहात कसे जिंकायचे हे सुद्धा छत्रपतींनी आपणास शिकवले हे मराठा तरुण सहज विसरून जातो . जिथे माघार घायची आहे तिथे माघार घेतलीच पाहिजे हे शिवछत्रपतींनी शिकवलेली गोष्ट आपणास खूप उपयोगी पडू शकते .
मराठा एक राज्यकर्ती जमात म्हणून इतर जण खूप आशेने मराठा समाजाकडे बघत असताना मराठा तरुणाने उन्मादात न जाता संयमाने , सबुरीने परिस्थिती हाताळली तर मराठा तरुण आणि संपूर्ण समाजाला खूप फायदा होऊ शकतो .
🔴आर्थिक बाबतीत निरक्षरता :-
काही सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य मराठा तरुण तरुणी आर्थिक बाबतीत निरक्षर असण्यासारखी स्थिती आहे . विविध बँकांचे लोन प्रोसिजर कशी करावी ?? , शेअर मार्केट , आय टी रिटर्न भरणे , कंपन्यांची नोंदणी करणे त्याचा रितसर टॅक्स भरणे , धंद्यामध्ये नको त्या वेळेस मैत्री आणि नाती आणणे अश्याह्या गोष्टी तरुणांनी आत्मसात केल्या पाहिजे . मराठा तरुणांनी जरूर टाळल्या पाहिजे . एका मराठा तरुणाने चहाचे दुकान जरी टाकले तरी त्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला तो पुढच्या कित्येक महिन्याचे नफा खर्चून टाकतो . कुठला मारवाडी , किंवा गुजराती माणसाचे अश्या प्रकारचे " ग्रँड ओपनिंग " आपल्याला दिसणार नाही आपल्याला डायरेक्ट त्याचे सुरू झालेले दुकानाच दिसते असे तुमचे निरक्षण नक्कीच असेल . ह्या सगळ्या गोष्टी बघून मला प्रश्न पडतो की , मराठा तरुण नेमका व्यवसाय कश्यासाठी करतो ?? नातलगांच्या देखाव्या साठी की स्वतःच्या आर्थिक उनत्ती साठी ?? असा प्रश्न पडावा अशी स्थिती बिकट आहे . एकंदरीत व्यवसाय हा व्यावसायिक भूमिकेतून केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होईल ह्यात दुमत नाही .
🔴मराठ्यांची सामाजिक रचना :-
मराठा समाज ही राज्यकर्ती जमात होती . आणि आधुनिक काळात सुद्धा ती राज्यकर्तीच जमात आहे ह्यात दुमत नाही . पण जेव्हा मी मराठा समाजाच्या सध्याच्या सामाजिक रचनेकडे बघतो . तेव्हा एक गोष्ट जाणवते शेती करणारा आणि प्रसंगी रणांगणात शौर्य गाजवून सरदारकी , सुभेदारी , सरनोबत , पाटील की मिळवणारा मराठा समाज आधुनिक युगात शेती आणि जमीनदारी पर्यंत मर्यादित बनून राहिला . काळाच्या ओघात ज्यांनी जमिनी टिकवला ते जमीनदार बनून कायम राहिले . आणि ज्यांना जमिनी राहिल्या नाहीत त्यांना स्वतःचा असा कोणताही व्यवसाय शिल्लक राहिलाच नाही . उदाहरणच देतो , न्हावी समाजाचा मुलगा काहीच जमले नाही तर पिढीजात व्यवसाय तरी करतो . तसेच अठरा पगड जातीचे ..!! पण मराठा समाजाला स्वतःचा म्हणावा असा व्यवसायच नाही . त्यामुळे मराठा तरुण गणपती मंडळे , सोसायट्या , कंपन्या-कामाची ठिकाणे ह्यामध्ये ती राज्यकर्यांची स्पेस शोधत राहतो . हीच सामाजिक रचना मराठा समाजाला राजकारणाच्या अधिक ओढीकडे प्रेरित करीत असावी , असे मला वाटते . सत्ताधीश व्यक्तीकडे असणारी उपजत बेफिकिरी मराठा समाजाच्या तरुणांमध्ये असते . त्यातून बऱ्याच अंशी मराठा तरुण ओढला जात आहे . ज्यात राजकारण्यांच्या मागे फिरणे असेल अश्या गोष्टींचा समावेश आहे .
याशिवाय लग्न समारंभ ह्यावर होणारा मराठ्यांचा खर्च , हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा गणला जाऊ शकतो .
आरक्षण ह्या केवळ एकाच मुद्याभोवती मराठा समाज गुंतून कधीही पडला नव्हता . इथून पुढे देखील पडणार नाही . पण , खूप मोठ्या प्रमाणात आशा मराठा समाजाच्या तरुणांच्या मनात जागृत आहे . विशेषतः मराठवाडा , विदर्भ भागातील मराठा तरुण अस्वस्थ आहे . त्याच्या मनात प्रचंड खदखद आहे . आरक्षण हा दीर्घकालीन उपाय जरी नसला तरी सध्याच्या मराठ्यांच्या भळभळत्या जखमेवर फुंकर नक्कीच आहे .
वरील सर्व कारणे बिनचूक असतील असा माझा दावा नक्कीच नाही . पण मराठा समाजाच्या समग्र अधोगतीला नक्कीच ह्या गोष्टी कारणीभूत आहेत एवढे नक्की .. !! इथून पुढची मराठा समाजाची वाटचाल कशी असावी ह्याबद्दल काही निश्चित ठोकताळे माझ्या मनात आहेत ते पुढच्या लेखात मांडण्याचा प्रयत्न करेल .
तूर्तास लेखणीस अल्पविराम पुन्हा भेटू पुढच्या लेखात ..
जयोस्तु मराठा .... !!!
एक मराठा.... लाख मराठा.....!!!
...........✍️ निखिल सुभाष थोरवे
Comments
Post a Comment