" घुसमटी " मधला नोकरदार आणि ढासळलेला पिरॅमिड


साधारण 15 जून रोजी मी भल्या-मोठ्या गॅप नंतर मी पिंपरी चिंचवडमध्ये आलो . सर्व व्यवहार हळू हळू पूर्वपदावर येत होते . आवश्यक ती सर्व काळजी घेऊन माझ्यासारखेच अनेक नोकरदार आपल्या कामावर परतत होते . छोटे मोठे व्यवसाय देखील हळू हळू आपली गाडी रुळावर आणण्यासाठी धडपडत होते . 
चहाच्या टपऱ्या , हॉटेल आणि नाश्त्याची सोय करणारे छोटे हातगाडे पार्सल सिस्टीम वर अधिक भर देऊन तर कधी ओळखीच्या लोकांना गुपचूपपणे हॉटेल मध्ये आत बोलवून खायला घालत असलेले देखील मी या काळात पाहिले . 
अर्थात ह्या सगळ्याचा होयचा तो परिणाम झालाच आणि पुण्यासह पिंपरी चिंचवड पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या गर्तेत गेले . आणि गेले 3-4 दिवस आपण सर्व जण घरात बंदिस्त आहोत . 

माझे निरीक्षण मला थोडया वेगळ्या अनुषंगाने मांडायचे आहे . ज्याचा विचार कदाचित तुम्ही देखील केलाच असेल . किंवा ही गोष्ट अनुभवली देखील असेल .
 हातगाडीवरचा पूर्वी 12 रुपयाला असणारा वडापाव लॉकडाऊन खुले झाल्यानंतर लगेच 15 रुपयाला झाला . 
8 रुपयांचा कटिंग चहा झटकन 10 रुपयाला झाला . हे झाले पटकन लक्षात येणारे बदल , किरकोळ किराणा दुकानदारांनी डाळी , कडधान्ये ह्यात 1 -2 रुपये कधी वाढवले असतील ते तर आपल्या लक्षात देखील आले नसेल . भाज्यांची देखील तीच अवस्था !! कालचा लॉकडाऊन जाहीर झाल्या झाल्या भाज्यांच्या गगनाला भिडलेल्या किमती आपण सर्वांनीच पहिल्या .
लांब कशाला ? दररोज होणारी पेट्रोल आणि डिझेल ची दरवाढ हा देखील ह्याच समायोजित कारस्थानाचाच एक भाग.
दुसरीकडे जो ह्या सगळ्याचा खऱ्या अर्थाने ग्राहक आहे . म्हणजे तुमच्या आमच्या सारखा नोकरदार !! त्याच्या पगारात 20 टक्क्यांपासून ते 50 टक्क्यांपर्यंत कपात चालली आहे . काही जणांना तर गेले 4 महिने पगारच नाहीत आणि दुर्दैवाने काहींनी आपल्या नोकऱ्या गमावल्या . हा किती टोकाचा विरोधाभास म्हणावा !! म्हणजे ह्या सगळ्या व्यवसायांचा अंतिम भार असणारा ग्राहक वर्ग खऱ्या अर्थाने पिचलेल्या अवस्थेमध्ये गेलाय हे उघडच आहे . 

नोकरीवर भागणार नाही हे लक्षात घेऊन बऱ्याच जणांनी घरगुती व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले . नोकऱ्या सांभाळून काही जणांनी केक बनवण्याच्या ऑर्डर्स घेतल्या . काही जण बिर्याणीच्या ऑर्डर्स घेतायेत . बदलेल्या नाजूक परिस्थितीमध्ये प्रत्येकजण व्यवसाय करू इच्छिणार हे निश्चित !! 
पण ह्या सगळ्याचा ग्राहक वर्ग जो आहे . तो मर्यादित झाला आहे .आणि दिवसेंदिवस आर्थिक दृष्ट्या कमकुवत बनत चालला आहे .  ही वस्तुस्थिती आहे . अगदी सधन मानले गेलेले आय . टी वाले सुद्धा जे यापूर्वी बेंच वर होते ते डायरेक्ट घरी गेले . मेकॅनिकल इंडस्ट्रीच्या लोकांची अवस्था तर न विचारलेलीच बरी बरेच कारखाने प्लान्ट बंद करतायेत . ह्या सगळ्यात जरा बरा आणि जॉबची हमी असणारा वर्ग म्हणजे सरकारी नोकरदार त्यांना सुद्धा पगाराच्या कपातीला सामोरे जावे लागत आहे .विद्यार्थ्यांकडून फी मिळत नसल्याने शैक्षणिक संस्था चालक हवालदिल झाले आहेत . त्यात अनुदानित शिक्षण संस्थांना सरकार कडून येणाऱ्या अनुदानाची वाट पहात तिष्ठत बसावे लागते . त्यामुळे शिक्षक-कर्मचारी वर्ग देखील खचला आहे .त्यामुळे अश्या दुर्बल होत असणाऱ्या ग्राहक वर्गाकडून अजून किती भार उचलला जाणार ही शंका आहे . 

प्रत्येक घरगुती उद्योग करणाऱ्या लोकांबद्दल मला व्यक्तिशः आदर आहेच . पण खरे सांगायचे तर नोकरीला काही घरगुती उदोगाची जोड देणे हे अल्पकालीन उपाययोजनेचा मला भाग वाटतात . केक , बिर्याणी त्याचबरोबर मोठ्या आशेने साध्याच्या काळात सुरू होणारे इतर अनेक व्यवसाय ह्याचा भार आणि सतत वाढणाऱ्या महागाईचा भार अजून किती काळ संख्यने अल्प असणारा नोकरदार वर्ग सहन करत राहणार ? 
ह्याकडे आत्ता जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे . 

खर म्हणजे , आर्थिक बाबतीत चुकलेली गणिते सावरण्याची जबादारी सर्वस्वी सरकारची असते . मंदीच्या काळात मोठे मोठे उदयोग धंदे देशात , राज्यात वसवणे त्यांना सुविधा प्राप्त करून देणे . आणि अधिकाधिक विदेशी देशी गुंतवणूक वाढवणे आणि व्यापक प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देणे हा यामागचा दीर्घकालीन उपाय आहे  असे मला व्यक्तिशः वाटते . 

शेवटी अर्थशास्त्र हा पिरॅमिड असतो .. त्याचा पाया हा भक्कम असेल तरच पिरॅमिड व्यवस्थित टिकून राहतो . सध्याच्या उदयोग धंद्याचा पिरॅमिड बघितला तर त्याचा जो ग्राहक आहे तो दिवसेंदिवस कमकुवत आणि अरुंद होत असलेला आपल्याला दिसेल . त्यामुळे वरचे स्तर कितीही वाढले तरी पाया भक्कम नसेल तर पिरॅमिड ढासाळयला वेळ लागणार नाही हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही हे आरश्याएवढे स्पष्ट आहे . त्यामुळे काही व्यवसाय तेजीत जरी चाललेले दिसत असतील तरी त्याचा फुगा ही परिस्थिती अशीच राहिली तर लवकरच फुटेल अशी स्थिती आहे . 

त्यामुळे , व्यावसायिक मंडळींनी नोकरदारावर भार टाकणे असेच कायम ठेवले तर हा वर्ग पेटून उठेल आणि मोठा उद्रेक करेल अशी भीती मला सतत सतावत असते . 
त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना लवकर सरकारने केल्या नाहीत तर ...
सावधान ..... वणवा पेट घेत आहे ....!!! 
.....✍️निखिल सुभाष थोरवे

Comments

  1. निखिलजी तुमच लिखाण अगदी वास्तवदर्शी आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद , आपले हार्दिक आभार

      Delete
  2. Nice overlooking on current situation Nikhil.

    ReplyDelete

Post a Comment