प्रिय धोनीस .......
प्रिय धोनी ,
स.न.वि.वि.
पत्रास कारण की ,
आज तुझा वाढदिवस , आमच्यासाठी एकप्रकारे राष्ट्रीय सणच....!!
खरं म्हणजे तुझं दिसणं आत्ता दुर्मिळ झालंय . कधी तरी तुझा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ समोर येतो तर कधी झिव्हाशी खेळताना तू आम्हाला दिसतोस ... सोशल मीडियावर तू ऍक्टिव्ह नसतोच .. त्यामुळे एक फॅन म्हणून नेहमीच तुझे अपडेट्स भेटत नाही. तुझी भूमिका साकारलेल्या सुशांतसिंग राजपूतच्या धक्कादायक आत्महत्येनंतर सुद्धा तू मूग गिळून गप्प बसतात तसे , भावना गिळून गप्प बसलास ...
कधी कधी वाटते तू कोणत्या मातीचा बनला आहेस ?? तुला सुखाचे ना कौतुक असते . ना दुःखाचे जास्त दुःख वाटते . तू फार पुढचा विचार करत नाहीस असे मी म्हणणार नाही . पण तू जास्त वर्तमानात देखील राहत नाही . असे जाणवत राहते . तू वर्तमानाचे देखील अनेक भाग करतो आणि त्यात असतोस कारण , तुझी चटकन बदलणारी अचूक निर्णयक्षमता त्याचाच दाखला देत राहते . तू खरंच कमाल आहेस .
येत्या IPL मध्ये तुला खेळताना बघायला माझ्यासकट सगळे तुझे फॅन्स उत्सुक होते . आणि तू ह्या IPL मधील कामगिरीचे स्वतः मूल्यमापन करून T-20 वर्ल्ड कप खेळणार होता असे पण कानावर आले होते . पण करोनाने घात गेला . आणि तुझी कारकीर्द शेवटच्या टप्प्यावर आली आहे , ह्याच्या जाणिवेने अंगावर काटा उभा राहिला .
हल्ली मनात अनामिक भीती दाटून राहिली आहे . तू जसा अचानक आलास तसा अचानक निघून जाशील . ह्याची ...!!
तुला फेअरवेल ची मॅच वैगेरे च काय सोयरसुतक नसणार हे उघडच . तू फार तर एखादी प्रेस नोट काढून अचानक आपली निवृत्ती जाहीर करशील . ही भीती सतत वाटत राहते ...
कधी कधी विचार येतो , तू नसला असतास तर , आम्हा सर्वांना समजले असते का ??
शेवटपर्यंत हार नसती मानायची ते ...तुझ्याजागी एखादा सर्वसामान्य माणूस असता तर , तिकीट कलेक्टरच्या स्थिर नोकरीमध्ये आनंदी राहिला असता . पण तुला तुझे ध्येय माहिती होते . आणि ते तू कष्टाने मिळवलेस आणि तुझ्या उदाहरणातून अनेकांना प्रेरणा दिलीस ...
आपले क्षमतेला योग्य न्याय भेटेल असे काम करेपर्यंत थांबू नका हे तू आम्हाला शिकवलेस ...
तुम्ही कोणत्याही मागासलेल्या बॅकग्राऊंड वरून आलात तरी , काही फरक पडत नाही तुम्ही सर्व क्षेत्रात आपल्या हिमतीच्या बळावर सर्वोत्तम होऊ शकता हे दाखवलेस ...
संकटाच्या काळात शांत आणि आनंदाच्या काळात पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे तू शिकवलेस. ह्या सगळ्या गोष्टी जगण्यासाठी दहा हत्तींचे बळ प्रदान करणाऱ्या आहेत .
स्वतः मध्ये उच्चतम बॅटिंग चे स्किल्स असून सुद्धा , केवळ टीम च्या भल्यासाठी तू बॅटिंग ऑर्डर मध्ये खाली खेळत राहिलास . विराट कडे कॅप्टनशीप देण्यासाठी तू स्वतःच्या कॅप्टनशीप चा त्याग केलास .. आणि एक सामान्य खेळाडू म्हणून टीम मध्ये खेळत राहिलास ...
आणि आत्ता तर तुला टीम मधून कायमचे बाहेर काढण्यासाठी काही जण देव पाण्यात घालून बसले आहेत . त्या लोकांना एकच सांगतो . ते तुला टीम मधून बाहेर काढतील पण , आमच्या हृदयसिंहासनावरून तुला कसे खाली उतरवतील ??
तू खऱ्या अर्थाने त्याग मूर्ती आहेस . वैरागी आहेस . हे सहज कुणालाही जमत नाही ... हे दैवी असावे लागते . म्हणून तुला आम्ही फॉलो करतो .
सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानतात .. अनेकजण त्याला लौकिकार्थाने बाप देखील मानतात . पण तोच सचिन तेंडुलकर जेव्हा तुझ्याबद्दल बोलतो तेव्हा म्हणतो ,
" धोनी मला माझ्या वडिलांप्रमाणे भासतो ... ते सुद्धा असेच संकट आणि आनंदाच्या क्षणी शांत राहायचे "
एका बापमाणसाला तू , त्याच्या बापासारखा वाटत असशील तिथेच तुझी उंची कितीतरी पटीने वाढते . त्यामुळे तुझा मोठेपणा सांगण्यासाठी बाकी कुणाच्या वक्तव्याचे दाखले देण्याची आवश्यकता नाही .
धोनी तू माणूस नसून , जगण्याची आदर्श जीवनपद्धती आहेस . छोट्या शहरातून आलेल्यांसाठी आशा आहेस . खचलेल्यांसाठी आधार आहेस . रागीट माणसाला बर्फाप्रमाणे आहेस . आनंदात उड्या मारणाऱ्याला जमिनीवर ठेवणारा आहे .
तू उद्या खेळशील किंवा नाही खेळणार पण तू नकळत शिकवलेल्या ह्याच गोष्टी माझ्या सारख्या लोकांना आयुष्यभर साथ देत राहणार एवढं नक्की आहे .
देवाची इच्छा असेल तर तुला प्रत्यक्ष भेटण्याचा योग येईलच ...!!
त्या दिवसाची सदैव प्रतीक्षा ...
छोट्या झिव्हा ला अनेक आशीर्वाद , साक्षी वहिनींना सादर प्रणाम ..
सदैव तुझा चाहता ..
....✍️निखिल सुभाष थोरवे ..
Comments
Post a Comment