करोना नंतरचे संभाव्य बदल :- पर्यटन
लेखक:- निखिल सुभाष थोरवे
आजवरचा जगाचा संबंध इतिहास उलगडून बघितल्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की , शतकामध्ये एखादे वर्ष किंवा घटना अशी घडते की , त्यानंतर संपूर्ण मानवी जीवन त्या घटनेच्या आगमनामुळे बदलून जाते , जागतिक महायुद्ध असेल किंवा पूर्वी आलेल्या साथीच्या रोगराई आणि आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर जागतिकीकरणाची लाट असेल .यासारख्या अनेक गोष्टींचा परिणाम मानवाच्या जीवनावर घडून गेला . हा परिणाम दुरोगामी होता , मानवी जीवनाला कलाटणी देणारा होता .
कोरोनाची जागतिक आपत्ती ही अश्याच प्रकारची म्हणता येईल . गेल्या 3-4 महिन्यांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ लोकांनी आपल्या लेखण्या करोनावर झिझवल्या त्यामुळे एव्हाना ह्या आपत्ती विषयी समाजात विस्तृत प्रमाणात जागृती झाली आहेच .मानवी जीवनातील जवळ जवळ सर्वच क्षेत्रे करोना सारख्या आपत्तीमुळे बाधित झाली आहेत . ह्यातील बरीच क्षेत्रे ही कायमस्वरूपी संपतील की काय ? अशी सुद्धा शंका उत्पन्न झाल्याशिवाय रहात नाही . एकंदरीतच करोनाचा विषय हा सर्वव्यापी बनला आहे . कोणतेही क्षेत्र करोनाच्या प्रभावापासून वंचित राहू शकले नाही . विशेषतः जिथे लोकांची वर्दळ जास्त प्रमाणात असते अश्या ठिकाणी तर करोना नंतर चे जग कसे असेल ह्या विषयी प्रचंड धास्ती आहे .
पर्यटन व्यवसाय त्यापैकीच एक म्हणावा लागेल .
बहुढंगी आणि बहुरंगी रोजगार उपलब्ध करून देणारे क्षेत्र म्हणून पर्यटन व्यवसायाकडे बघावे लागेल , कारण , प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार पर्यटन ह्या क्षेत्राएवढे इतर कोणत्याही क्षेत्रात व्यापक प्रमाणात उपलब्ध होत नसतील . शिवाय परदेशी चलनाचा एवढा मोठा ओघ विकसित देशांकडून विकसनशील देशांकडे येण्याचा तो एक मोठा मार्ग आहे . स्वाईन फ्लू असेल किंवा जागतिक महायुद्ध असेल ह्या सगळ्या बाबींचा थेट परिणाम पर्यटन ह्या क्षेत्रांवर झाल्याचे आपल्याला दिसून येईल . पण मानवी स्वभाव हा पूर्वीपासून पर्यटनाच्या बाजूने झुकणारा असल्याने ह्या सगळ्यातून पर्यटन क्षेत्र आवश्यक बदलांसह तावून सुलाखून बाहेर येईल .हा मला एक पर्यटक म्हणून विश्वास आहे .
सर्व सामान्य भारतीय लोकांच्या बाबतीत पर्यटन हा तसा चैनीचा विषय प्रकारात येतो . सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंब हे वर्षातून किमान दोनदा तरी धार्मिक कारणांसाठी म्हणा किंवा हवा पालटासाठी पर्यटन हे करतातच .
साधारण जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर विविध ट्रॅव्हल्स कंपन्या ह्या जोमात कार्यरत झाल्या . सर्वसामान्य नागरिकांना सुरुवातीला केवळ अश्यकप्राय वाटणारे परदेश प्रवास हे विमान प्रवासाच्या किमती कमी झाल्यामुळे आवाक्यात आले .केवळ देशीच नाही तर विदेशी पर्यटन ह्या काळात मोठ्या प्रमाणात फोफावले . वयोगट , पर्यटनाचा उद्देश , आणि आर्थिक बजेट ह्या वर आधारित विविध ग्रुप करून ट्रॅव्हल्स कंपन्या पर्यटकांना देश आणि विदेश ह्यांच्या सैर घडवू लागल्या . पण सध्याची कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता , असे ग्रुप करून पर्यटन आत्ता काही काळ तरी अडचणीचे ठरू शकेल . "सोशल डिस्टनसिंग " हा परवलीचा शब्द बनल्याने केवळ एका कुटंबा पुरते ट्रॅव्हल्स पॅकेज घेण्याकडे लोकांचा कल वाढू शकेल . अर्थात हे पॅकेज अधिकाधिक स्वस्त ठेवण्याची कसरत मात्र ट्रॅव्हल्स कंपन्यांना करावी लागणार आहे . त्यात हॉटेल्सचा खर्च किंवा प्रवासी वाहने आणि प्रवासी ठिकाणे यांचा खर्च नियमित करून यात्रा घडवून आणणे हे सर्वात मोठे आव्हान पर्यटन क्षेत्रापुढे असेल पण माझ्यामते हा ग्रुप ऐवजी कुटंबकेंद्रित पर्यटन हे नजीकच्या काळात अनिवार्य असेल . आणि हा एक महत्त्वाचा बदल असू शकेल .
परदेशी पर्यटन हा परकीय चलन मिळवून देणारा महत्त्वाचा घटक जरी असला तरी , देशांतर्गत पर्यटन व्यवसाय जोमात चालणे हे कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी पूरक ठरते . सध्याची घडी आणि इथून पुढची काही वर्षे बघता , परकीय प्रवास करणे हे केवळ आपल्या देशातीलच नाही तर परदेशातील नागरिक सुद्धा टाळू शकतील . त्यामुळे आपल्या देशातीलच आजवर अज्ञात असलेली किंवा सोयींनी कमी विकसित असलेली पर्यटन स्थळे लोकांपर्यंत पोहोचवणे , त्याचा प्रसार करुन जास्तीत जास्त देशी पर्यटकांना अश्या पर्यटन स्थळांकडे आकर्षित करणे हे येणाऱ्या काळात सरकारचे प्रमुख ध्येय असण्याची गरज आहे . ह्या बाबतीत न्यूझीलंड देशाच्या प्रधानमंत्री "जेसीनदा आर्डन " ह्यांचा निर्णय अतिशय उल्लेखनीय आहे . नुकताच करोना मुक्त झालेल्या न्यूझीलंड सरकारने नागरिकांना कामाचा आठवडा हा केवळ 4 दिवसांचा करून उरणारे 3 दिवस हे नागरिकांना फिरण्यासाठी , पर्यटन करण्यासाठी उद्युक्त केले . त्याचा फायदा असा झाला देशांतर्गत पर्यटक आपल्याच देशातील ठिकाणांना नव्याने भेटी देऊ लागले . ह्यातून पर्यटन व्यवसाय उभा राहण्या बरोबरच अर्थव्यवस्था आणि नागरिकांच्या मानसिक आरोग्यास देखील त्याचा फायदा झाला .लोकसंख्या आणि क्षेत्रफळ ह्याची तुलना विचारात घेता भारतात हा निर्णय राबवणे जरी अवघड असले तरी , किमान आजवर दुर्लक्षित राहिलेली पर्यटन स्थळे उजेडात आणणे . आणि विकसित असलेली पर्यटन स्थळे भविष्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि पर्यटनाच्या गरजा विचारात घेऊन अधिक विकसित करणे हे योग्य ठरेल .
भारतात धार्मिक पर्यटन हे मोठ्या प्रमाणात केले जाते , विशेषतः चार धाम यात्रा , अमरनाथ यात्रा ह्या विशेष प्रसिद्ध आहेत . त्यातही जेष्ठ नागरिक या यात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात . महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर , नाशिक येथील कुंभ मेळा , पंढरपूर यात्रा , ज्योतिबा यात्रा किंवा अतिशय दुर्गम ठिकाणी होणाऱ्या नाशिक वणी येथील सप्तश्रृंगी देवीची यात्रा या ठिकाणी येणाऱ्या बहुसंख्य भाविकांची आरोग्यासाठी भक्कम वैद्यकीय सुविधा उभारणे किंवा चार धाम यात्रा यांसारख्या जेष्ठ नागरिक बहुसंख्यने उपस्थित असणाऱ्या ठिकाणी त्या अनुषंगाने वैद्यकीय पथके सुसज्ज ठेवणे हे सरकार बरोबरच सर्व ट्रॅव्हल्स कंपन्यांची येणाऱ्या काळात जबाबदारी असेल . प्रत्येक ट्रॅव्हल्स कंपनीला ह्यापुढे वैद्यकीय पथक बाळगणे किंवा तश्या लोकांची आपल्या संस्थेत भरती करणे हे अनिवार्य असणार आहे . हा देखील एक प्रमुख बदल करोना नंतर होऊ शकेल .
अमेरिका सारख्या देशात कोरोनाची अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे . पर्यटनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर , समुद्रातील क्रूझच्या सफरी ही अमेरिकन लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय ! अमेरिकास्थित नामांकित क्रूझ कंपनी "रॉयल कॅरिबियन " ह्या कंपनीने व्यवसाय वाचवण्यासाठी काही दंडक स्वतःस घालून घेतले . उदाहरणार्थ सोशल डिस्टनसिंगसाठी 4000 लोकांच्या क्षमतेच्या जहाजावर केवळ 2500 लोकांना प्रवेश देणे , सध्या तरी 60 वर्षांवरील लोकांना समुद्र प्रवासाची परवानगी न देणे , काटेकोर आरोग्य तपासणी नंतरच प्रत्येकाला प्रवेश देणे इत्यादी .
भारतातील "आंग्ररिया " नावाच्या मुंबई-गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या क्रूझ साठी हीच मार्गदर्शक तत्वे आदर्श ठरू शकतील . भारतात क्रूझ व्यवसाय भलेही प्राथमिक अवस्थेत असला तरी , अमेरिकेतील ह्या गोष्टी समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत .
करोनाच्या महाभयंकर आपत्तीत जर प्रशासनाला करोना पेशंटच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील लोकांना क्वारनटाईन करण्यासाठी हॉटेल्सची खूप मदत लाभली . पर्यटन व्यवसाय ठप्प असल्याने सध्या प्रत्येक स्तरातील हॉटेल अडचणीत आहे. मग ते पंचतारांकित असुदे अथवा साधे लॉजस् ! करोनाच्या पार्श्वभूमीवर जसे , "प्रत्येक अपार्टमेंटला आग लागल्यानंतर लोकांना वाचविण्यासाठी रेफ्युजी एरिया अनिवार्य आहे ." त्याचधर्तीवर , भविष्यातील करोना ग्रस्तांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक हॉटेल मध्ये काही रूम राखीव ठेवणे इथून पुढे अनिवार्य असणार आहे . जेणेकरून हॉटेल मधील प्रवासी हा करोना बाधित आढळला तर त्याचे विलगिकरण करणे सहज शक्य होईल .
रेस्टॉरंटच्या बाबतीत सुद्धा बसण्याचे टेबल्स मधील अंतर जास्त ठेवणे आणि पार्सल सुविधा साठी अधिक भर देणे हे देखील बदलेल्या परिस्थितीमध्ये अनिवार्य असणार आहे .
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा ह्या येणाऱ्या काही दिवसात सुरू कराव्याच लागतील भलेही हौशी पर्यटक त्यात नसतील तरी सुद्धा कामानिमित्त किंवा शिक्षण ह्या निमित्ताने विविध प्रवासी विमानाद्वारे प्रवास करतात . अश्या वेळेस सोशल डिस्टनसिंग साठी विमान प्रवासी क्षमतेपेक्षा कमी भरणे अथवा देशांतर्गत प्रवासातील अंतर कमी असल्यास रोगाचा प्रसार रोखण्यासाठी विमानातील टॉयलेट वापरण्यास मज्जाव करणे . ह्या गोष्टी सध्याच्या काळात बदलू शकतात .
पर्यटनात खाणे ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे .फक्त खवय्येगिरी साठी भटकंती करणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाही . त्यात आत्ता अर्धवट शिजवलेले चायनीज पदार्थ आत्ता लोकांच्या पसंतीस उतरणार नाही . पूर्ण शिजवलेले भारतीय अन्न पदार्थ किंवा वेगवेगळ्या देशातील पूर्ण शिजवलेल्या अन्ना कडे लोकांचा कल असू शकतो . आणि त्यातून भारतीय अन्नपदार्थ जागतिक पातळीवर लोकप्रिय ठरू शकतील हा मला विश्वास आहे .
"सोशल गॅदरिंग" हा पर्यटनाचा अविभाज्य घटक !! विविध देशातील अथवा प्रदेशातील लोकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण ह्या निमित्ताने होत असते . एकत्र जमणे गप्पा-गोष्टी करणे , गाणी म्हणणे , नृत्य करणे अथवा आधुनिक भाषेत बोलायचे झाले तर , पब अथवा पार्टी ह्या पर्यटनाच्या टाळता न येणाऱ्या बाबी .
बंद खोलीत , Dj च्या तालावर थिरकणारी तरुणाई ही आपण सर्वत्र बघितो .
बंद हॉल ऐवजी ह्याच पब , पार्ट्या जर खुल्या मैदानात अथवा समुद्र किनारी घेण्यास प्राधान्य दिले तर , सोशल डिस्टनसिंग पाळणे सहज शक्य आहे .आणि करोना नंतर हा मोठा बदल ह्या बाबतीत होऊ शकतो .
एकंदरीतच पर्यटन हे मानवाच्या जीवनासाठी वर वर चैनीचे क्षेत्र वाटत असले तरी , अनेक जणांचे रोजगार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ह्या क्षेत्रावर अवलंबून आहेत . साधी पंढरपूर यात्रा रद्द झाल्याने कोट्यवधी रुपयांचे झालेले व्यापाऱ्यांचे नुकसान आपण ऐकून असाल . त्यामुळे अगदी वर ह्या क्षेत्रात होणाऱ्या बदला बद्दल सांगितलेल्या सर्वच गोष्टी होतील असा काही माझा दावा नाही . पण पर्यटन व्यवसाय वाचविण्यासाठी आणि त्याला पुन्हा तेजीत आणून अर्थव्यवस्था आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांचे जनजीवन सुरळीत आणण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरू शकतील असा मला विश्वास वाटतो .
त्यामुळे पर्यटन व्यवसायचा आत्मा असणाऱ्या अतिथी ला आपण पुन्हा म्हणूया !!
" अतिथी देवो: भव: , पण जरा दुरूनच !! "
Comments
Post a Comment