आयुष्याच्या महामार्गावरचा 'दिशादर्शक फलक': गुरु!


आयुष्याच्या महामार्गावरचा 'दिशादर्शक फलक': गुरु!


सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!


आपल्याकडे शिक्षक, अध्यात्मिक गुरु, आई-वडील, सासू-सासरे, मित्र, सहकारी आणि अगदी 'अनुभव'... या सर्वांनाच 'गुरु' या एकाच संकल्पनेत बांधायचा आपण नेहमीच प्रयत्न करतो. पण खरं सांगायचं तर, गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिन यातील मूलभूत फरक आजही अनेकांना स्पष्टपणे समजत नाही.


हल्लीच आलेल्या 'धर्मवीर' चित्रपटातील प्रसंगानंतर गुरुपौर्णिमेला आणि विशेषतः गुरूंच्या पाद्यपूजनाच्या परंपरेला एक वेगळं आणि अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसतं. यापूर्वीही शिर्डी, शेगाव किंवा अक्कलकोटसारख्या धार्मिक ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतच आला आहे. पण या चित्रपटाने गुरु-शिष्याच्या नात्यातील एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकला.

हे सर्व पाहत असताना मनात एक द्वंद्व नक्कीच निर्माण होतं. मी यापूर्वी एका लेखात लिहिलं होतं की—"अनुभव हाच सर्वात मोठा गुरु असतो." पण खोलवर विचार केला तर 'गुरु' ही संकल्पना अनुभवापेक्षाही खूप वेगळी आणि सखोल आहे!


समर्पण आणि अढळ विश्वास


गुरु म्हणजे काय? तर गुरुप्रती असणारं पूर्ण समर्पण आणि अढळ विश्वास.! जिथे कुठल्याही शंकेला किंवा संशयाला तीळमात्रही वाव नसतो.

जसं की, मी स्वतः जेव्हा श्री गजानन महाराजांना माझा गुरु मानतो, तेव्हा "महाराज दाखवतील तीच दिशा योग्य, महाराजांची मर्जी तीच माझी मर्जी, आणि महाराज बोलतील तेच ब्रह्मवाक्य!" हा अनन्यभाव आपोआप जागृत होतो. गुरूने दिलेला सल्ला, त्यांनी सांगितलेले शब्द हे शिरसावंद्य मानल्याशिवाय गुरुप्रती निष्ठा तयारच होऊ शकत नाही.


आजच्या काळात जिवंत व्यक्तीला गुरु मानावे का.?


पण आज आपल्या आजूबाजूला जेव्हा कॅप्टन अशोक खरात यांच्यासारखी प्रकरणं घडताना दिसतात, तेव्हा एक अवघड प्रश्न उभा राहतो ; "आजच्या काळात एखाद्या जिवंत व्यक्तीला गुरु मानावे का.?"

कारण आजच्या काळात 'गुरु' हा विषय अध्यात्म आणि भोंदूगिरी यांच्या नाजूक सीमारेषेवर कुठेतरी अडकलेला दिसतो. बऱ्याच वेळा लोकांची इथेच गल्लत होते. माझ्या मते, गुरु ही निव्वळ बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट नसून ती 'अनुभवायची' गोष्ट आहे. आयुष्यात अचानक काहीतरी योगायोग घडला किंवा एखादा तथाकथित चमत्कार झाला, म्हणून लगेच कोणाच्याही पायाशी लोळण घेणे पूर्णपणे चुकीचे आहे.


याविषयीचा एक अत्यंत सुंदर प्रसंग 'श्री गजानन विजय' ग्रंथात येतो.


महाराजांचा निस्सीम भक्त पुंडलिक भोकरे याच्या शेजारी राहणारी भागाबाई एकदा त्याला म्हणते, "तुला महाराजांनी काही गुरुमंत्र दिला आहे का? चल, आपण केदाजी महाराजांच्या शिष्याकडून मंत्र घेऊ आणि त्याला गुरु मानू."

हे ऐकून पुंडलिक थोडा चलबिचल होतो. त्याच रात्री श्री गजानन महाराज त्याच्या स्वप्नात येतात आणि त्याला समजावतात ; "अशा कानात गोष्टी सांगितल्याने जर कुणी गुरु बनत असतं, तर एकमेकांच्या कानात बोलणारे सगळेच एकमेकांचे गुरु झाले असते!"

महाराज त्याला विचारतात, "तुला काय पाहिजे?" पुंडलिक अत्यंत भावुक होऊन म्हणतो, "महाराज, माझी सर्व चिंता मिटली आहे, मला फक्त तुमच्या पूजनासाठी पादुका द्या."

स्वप्न भंगल्यावर पुंडलिक विचारात पडतो की पादुका कुठून मिळणार.? की मी विकत घेऊन त्याचे पूजन करायचे आहे.? 

पण आश्चर्य म्हणजे, त्याच्या आधीच्या दिवशीच शेगावला गेलेल्या झामसिंग राजपूत याच्या हाती महाराजांनी स्वतःच्या पादुका सुपूर्द केलेल्या असतात आणि त्या मुंडगावला जाऊन पुंडलिकाला देण्यास सांगितलेल्या असतात.!


सांगायचे तात्पर्य हेच की, खऱ्या गुरूची आपल्या भक्तावर आणि शिष्यावर एवढी प्रचंड निष्ठा आणि आस्था असते. गुरु हा फक्त आध्यात्मिकदृष्ट्या उच्च असतो असं नाही, तर तो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला मार्ग दाखवणारा एक 'दिशादर्शक फलक' (Signboard) असतो!


भोंदू गुरु की अधिकृत 'दिशादर्शक'.?


आता प्रश्न उरतो ; भोंदू गुरु ओळखावा कसा.?

तर हा ज्याच्या त्याच्या सत्सद्विवेक बुद्धीचा विषय आहे. पण मी गुरूची तुलना एका 'दिशादर्शक फलकाशी' (Signboard) करेन. हा बोर्ड आयुष्याच्या महामार्गावर शांतपणे उभा असतो आणि आपल्याला योग्य दिशा दाखवतो. त्या बोर्डाकडे पाहायचं की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जर आपण त्या अधिकृत दिशादर्शक फलकावर विश्वास ठेवून मार्गक्रमण केलं, तर आपण निश्चितच योग्य ध्येयापर्यंत पोहोचतो.


याउलट, अधिकृत बोर्डाकडे लक्ष न देता, जर आपण चौकात थांबलेल्या, तंबाखू मळणाऱ्या किंवा पान खाणाऱ्या कोणाही अनभिज्ञ व्यक्तीला रस्ता विचारत सुटलो, तर आपण भरकटणार हे नक्की.!


माझा दिशादर्शक...

म्हणूनच, आपल्या आयुष्याच्या प्रवासातला हा 'दिशादर्शक फलक' प्रत्येकाने वेळेवर ओळखायला हवा.

श्री गजानन महाराजांच्या असीम कृपेने मला माझा दिशादर्शक फलक भेटलेला आहे. मी श्रद्धाळू आहे, नास्तिक अजिबात नाही.! आणि याच फलकावर, म्हणजेच महाराजांच्या चरणांवर पूर्ण निष्ठा ठेवून मी माझे आयुष्य आनंदात व्यतीत करत आहे.


तुम्हाला गुरु तुमच्या आई-वडिलांमध्ये सापडो, शिक्षकांत, मित्रात, एखाद्या आध्यात्मिक गुरूमध्ये, की अगदी शिव, पार्वती, गणपती किंवा विष्णू यांच्या रूपात सापडो... हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाव आहे. तुम्हाला तुमचा खरा 'दिशादर्शक फलक' लवकरात लवकर सापडो (जर अजून सापडला नसेल तर) हीच सदिच्छा.!


पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा.!

✍🏼 निखिल सुभाष थोरवे ©

Comments