काळही भरू न शकणारी अजित दादांच्या जाण्याची जखम.!

‘टाइम हील्स एव्हरीथिंग’ (Time heals everything) असा एक इंग्रजी वाक्यप्रचार आहे. म्हणजे 'काळ' हा प्रत्येक जखमेवरचा उत्तम उपाय असतो, मात्र, अजित दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि झालेली जखम काही काळाच्या ओघात पुसट होण्याची शक्यता अजिबात दिसत नाहीये. उलटपक्षी, मी तर असं म्हणेन की, जसा काळ पुढे सरकतोय, तशी ती जखम अधिक चिघळत चालली आहे आणि त्याला कारणंही आहेत.


मी स्वतः एक बारामतीकर म्हणून हे जवळून अनुभवलेलं आहे. बारामतीकरांच्या आयुष्यातली कुठलीही समस्या असो, प्रत्येक बारामतीकराला मनापासून वाटायचं की, एकदा का दादांना भेटलो आणि त्यांच्या हातात निवेदन दिलं, की आपला प्रश्न मार्गी लागलाच म्हणून समजा.! मग ते कुणाचे अडकलेले उसने पैसे असोत, कुणा सावकारी-गुंडांचा त्रास असो, सार्वजनिक काम असो वा व्यक्तिगत काम असो... प्रत्येक बारामतीकराला दादांचा मोठा आधार होता. मात्र, आज दादांच्या जाण्याने एक हात मोडल्याची जी भावना आहे, ती प्रत्येक बारामतीकराच्या मनात घर करून आहे. फक्त बारामतीकरच कशाला, संपूर्ण पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र आज या भावनेला आणि दादांच्या अस्तित्वाला मिस करतोय.


ज्या पद्धतीनं दादांसमोर प्रशासन चळाचळा कापायचं, तो वचक मला नाही वाटत मुख्यमंत्री फडणवीसांचा अथवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही असेल, स्वतः दादांनीच एका मुलाखतीत म्हटलेलं आणि ते आजही रेकॉर्डवर आहे की, "जर आपण अधिकाऱ्यांकडून बदल्यांसाठी पैसे घेतले, तर आपल्या शब्दाची धार कमी होते." अधिकाऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं, हे दादांना अचूक माहीत होतं. ते कुणाच्याही अगदी चहालाही मिंधे नव्हते. बदल्यांसाठी पैसे घेणं तर लांबच राहिलं. आजच्या राजकारणाचा जो काही चिखल झालेला आहे, त्याबद्दल मी पुढील लेखामध्ये सविस्तर व्यक्त होईलच. मात्र, 'दादांच्या जाण्याने आपण नेमकं काय गमावलं.?' असा प्रश्न जर कुणी विचारला, तर याचं उत्तर एकच आहे ; आपण सर्वसामान्यांच्या हक्काचा आणि कामाचा माणूस गमावला आहे.! 


खरं सांगायचं तर, प्रॅक्टिकल पॉलिटिक्सला जन्म देणारे अजित दादाच होते, असं मी म्हणेन. शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारधारेला बगल* देत (दादा नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आवर्जून अथवा नजरचुकीने गेले नाहीत , छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख दादा स्वराज्यरक्षक असाच करायचे धर्मवीर नाही) दादा जरी महायुतीमध्ये सहभागी झाले होते आणि माझ्यासारख्या अनेक जणांना ते त्या वेळी पटलं नव्हतं; मात्र आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतेमंडळींची ज्या पद्धतीनं चाळवा-चाळवी चाललेली आहे. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वोच्च नेत्या अगदी जाहीररित्या एअरपोर्टवर हाका मारून संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांच्या पाया पडण्यापर्यंत भाजपशी भाईचारा दाखवत आहेत... हे सगळं बघताना वाटतं की, अजित दादांचं काहीच चुकीचं नव्हतं.! लोकांची कामं करायची असतील तर सत्तेत राहावं लागतं. आणि अतिशय अनैसर्गिक भ्रष्ट युत्या-आघाड्या आपल्याच दिग्गज चुलत्यानी यापूर्वी केल्या असतील, तर मग आत्ता का नाही.? हा एक अत्यंत प्रॅक्टिकल प्रश्न दादांचा होता. 

अर्थात अजितदादा महायुती सोबत जाणे ही आजही चुलत्या-पुतण्यांची खेळी होती यावर आजही महाराष्ट्रातील अनेक जणांचे एकमत आहे.


दादा महायुती सोबत जाऊन , सत्ता आली मात्र , फक्त सत्ता हातात असून फायदा नसतो, सत्ता झुकवण्याचं आणि वाकवण्याचं सामर्थ्य लागतं; आणि ते दादांकडे खऱ्या अर्थानं होतं.! आज तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी पहा , सार्वजनिक बांधकाम खातं पहा, ऊर्जा खातं, अर्थ खातं पहा... कुठली योजना कुठल्या चौकटीत बसवायची हे पहा, दादांची इच्छाशक्ती, कामाचा दर्जा आणि वेळेचं काटेकोर नियोजन पहा. दादा हे प्रत्येक कामाबद्दल अतिशय पॅशनेट होते आणि म्हणूनच त्यांच्या हातून कामं धडाधड मार्गी लागायची. 


एक गोष्ट मात्र खरी ती म्हणजे , पवार साहेबांच्यात आहे त्या पद्धतीचा साहित्यिक किंवा संगीतिक रस दादांमध्ये नक्कीच थोडा कमी होता. मात्र, अत्यंत रूक्षपणे संपूर्ण प्रशासन हलवण्याची जी धमक दादांकडे होती, ती पवार साहेबांनाही जमणार नाही. आणि म्हणूनच अजित दादा हे पवार साहेबांच्याही चार पावलं पुढे निघून गेले की काय अशी शंका येते.


सध्याच्या भाजपच्या अथांग आणि अजास्त्र लाटेमध्ये अजित दादा आपला एक किनारा शोधत होते. ज्यांना भाजप आवडत नाही, अशा लोकांसाठी अजित दादा एक भक्कम आधार होते. आजच्या घडीला मी ज्या पिंपरी-चिंचवड शहरात राहतो. तिथे जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत, ते अजूनही डोक्याला हात लावून बसलेले आहेत की, 'आपल्याला नेमकं इथून पुढे सावरणार कोण.?' आणि बारामतीकरांची अवस्था आज अशी झाली आहे, जणू एखाद्या लेकराच्या डोक्यावरून आईचं मायेचं छत्र नुकतंच हरपलं आहे. त्या भांबावलेल्या, हतबल लेकराप्रमाणे बारामतीकर आज सुनेत्रा वहिनींकडे, पार्थ दादांकडे आणि जय दादांकडे आशेने पाहत आहेत. कधी युगेंद्र पवारांमध्ये, तर कधी रोहित पवारांमध्ये ते अजितदादांचं प्रतिबिंब शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.


आता हे सगळं बोलत असताना, इथून पुढे जसे दादांच्या करिश्म्यावर तब्बल ४० आमदार निवडून आले होते. ते पुन्हा येतील का ? याचं उत्तर दुर्दैवाने 'नकारात्मक' आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं इथून पुढचं भविष्य हे पूर्णतः अंधारात आहे. अगदी शरद पवार यांच्या गटाचंही आणि अजित पवार यांच्या गटाचंही.! त्यामुळे जर यांना लाँग टर्म राजकारण करायचं असेल, तर काँग्रेसमध्ये विलीन होणं आणि काँग्रेसला सक्षम करणं हाच एक संयुक्तिक पर्याय यांच्यासमोर उरतो. तो पर्याय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारतील की नाही मला माहीत नाही, मात्र, या सगळ्या प्रक्रियेला खरी गती ही शरद पवारांच्या निधनानंतरच येईल, असं मला वाटतं.


बाकी, सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी 'विचारधारा'सारख्या विषयावर बोलणं, हा आता अत्यंत क्षुल्लक मुद्दा ठरला आहे. कारण वेळोवेळी त्यांनी स्वतःच्या कृतीतून त्या विचारधारेचं नेमकं किती महत्त्व आहे, हे जनतेसमोर सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे भाजपविरोधाचा आव आणत स्वतःचं राजकीय अस्तित्व गमावण्यापेक्षा, थेट काँग्रेसमध्ये जाऊन आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याची संधी त्यांनी गांभीर्याने विचारात घ्यावी.


मला नाही वाटत पुढच्या १०० वर्षांत अजित दादांसारखा माणूस पुन्हा जन्माला येईल.! म्हणजे किमान आपल्या डोळ्यांना तरी भविष्यात असा व्यक्ती पुन्हा दिसणार नाही; १०० वर्षांत अशी माणसं एकदाच जन्माला येतात. बाकी दादांच्या जाण्याने महाराष्ट्राची जी अपरिमित हानी झालेली आहे, ती हानी या जन्मात तरी भरून निघेल असं मला वाटत नाही. अजित दादांना मिस करत राहणं आणि त्यांच्या आठवणीत रमणं, एवढंच आता जनतेच्या हातात उरलं आहे. आपण कदाचित आपल्या नातवंडांना सांगू की, 'अजित दादा पवार' अशी एक धडाडीची व्यक्ती होती, जो भल्या पहाटे ६ वाजता उठून कामाला लागायचा आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती घ्यायचा!


महाराष्ट्राचे लाडके, कणखर नेते स्व. अजित दादांच्या चरणी कोटी कोटी वंदन आणि त्याच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.!


....✍🏼 निखिल सुभाष थोरवे ®

Comments