अखंड "चिऊताई" गिरीचे लक्षणे.!
अखंड "चिऊताई" गिरीचे लक्षणे.!
स्वातंत्र्यलढ्या दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, विशेषतः १९४३–१९४५ दरम्यान आझाद हिंद फौज (INA) आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी निधी उभारण्यासाठी भारतीयांकडे सोने, दागिने आणि आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यांनी आग्नेय आशियातील (बर्मा, सिंगापूर, मलेशिया इ.) भारतीय समाजाला आवाहन करताना असे सांगितले होते की स्वातंत्र्यासाठी “तन, मन आणि धन” अर्पण करावे. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि अनेक महिलांनी स्वतःचे दागिने व सोन्याचे दान केले.
त्या आधी लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याच्या चळवळीसाठी लोकांकडून वर्गणी, देणग्या आणि जनसहभाग मागितला होता. पुढे महात्मा गांधी यांनी “टिळक स्वराज्य निधी” नावाचा प्रसिद्ध निधी १९२१ मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ सुरू केला होता. या निधीसाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर पैसे, दागिने आणि देणग्या जमा करण्यात आल्या. एवढी सगळी इतिहासाची उजळणी करायची बाब म्हणजे , स्वातंत्र्य लढा हा कोणत्याही मजबूत संसाधने अथवा रिसोर्स शिवाय जनतेच्या सहभागातून सुरू झालेला लढा होता. एखाद्या सार्वभौम सरकार एवढी तत्कालीन स्वातंत्र्य संग्रामातील नेत्यांकडे संसाधने अथवा रिसोर्स नव्हते.
आज संपूर्ण देशाचे संसाधन आणि निर्णयाचे सार्वभौमत्व एका व्यक्तीकडे केंद्रित झाले असताना , त्याने असे अगतिकता दाखवून पेट्रोल , डिझेल कमी वापरा , तेल कमी खा असे दुर्बलतेचे सल्ले देण्यात धन्यता मानावी ह्यातून सांप्रत देशाचे दुर्दैव ते काय ?? हे खरे तर पूर्णपणे राज्यकर्ते अपयशी ठरल्याचे द्योतक आहे.
युद्धजन्य परिस्थितीची झळ ही जगभरात प्रत्येक देशाला कमी अधिक प्रमाणात भोगावी लागत आहे. मात्र , केवळ ४-५ राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून परिस्थिती सगळी नॉर्मल असल्याचे भासवले गेले. इतकेच काय तरी गोदी मीडियातुन इराण-अमेरिका युद्धाच्या बातम्या मुद्दामच हद्दपार केल्या गेल्या आणि आत्ता कार्यभाग उरकल्यावर राष्ट्रनिर्मितीची सूत्रे मंडळींना आठवली. मुळात भारतासारख्या देशाने आपले परराष्ट्र धोरण किती अमेरिका धार्जिणे आहे हे सप्रमाण दाखवून दिले. नुसत्या परदेशी जाऊन तिथल्या राष्ट्रप्रमुखांच्या बळजबरीने मिठ्या घेतल्याने आणि बळेच स्वतः मोठ्याने हसत हलकेफुलके वातावरण कॅमेऱ्या समोर दाखवल्याने परराष्ट्र धोरण सक्षम होत नाही. ह्या सगळ्यात भारताने आपला इराण सारखा मोठा मित्र गमावला आणि ह्याची किंमत भारताला अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांप्रमाणे मोजायला लागत आहे.
मोठ्या मालकाने , राष्ट्रनिर्मितीची सूत्रे सांगितल्याप्रमाणे कुणी ईव्ही गाडी घेतली , कुणी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या आज तर कमालच झाली राज्याचे प्रमुख चक्क बुलेट वर आले. काही दिवसांनी भाजपच्या नेत्यांचे मेट्रो , बेस्ट बस , एस.टी. महामंडळ असे प्रवास बघायला भेटले तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका. मी शीर्षकामध्ये सांगितल्याप्रमाणे अखंड चिऊताईगिरीचे लक्षणे त्याच्या सर्वोच्च पातळीवर सध्या आहेत. आम्हाला आमच्या राष्ट्रप्रमुख , राज्यप्रमुख अथवा कोणत्याही मंत्र्या-संत्र्याची कमी झालेली सिक्युरिटी नको आहे. ते अपेक्षित सुद्धा नाही. फक्त ज्या अपयशी परराष्ट्रीय धोरणांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. ती फिक्स करा कारण तो उपाय लॉंग टर्म आहे. ही शोबाजी कायमस्वरूपी टिकणारी नाही.
फक्त दुर्दैव एकाच गोष्टीचे आहे , सर्वसामान्य माणूस हे कष्टप्रद जीवन रोज जगतोय . जी.एस.टी. च्या ओझ्याखाली सर्वसामान्य माणसाच्या प्रत्येक खरेदी , सुख आणि दुःखात सरकार त्यांची हफ्ता वसुली करत आहेच. कोविड नंतर पुन्हा सावरलेल्या अर्थव्यवस्थेला जर तुम्ही वर्क फ्रॉम होम चे ब्रेक लावू पाहत असाल तर ते मूर्खपणाचे ठरेल.!
मूर्खांचे राज्य आहे..!
मूर्ख बनून रहा..!!
....✍🏻 निखिल सुभाष थोरवे ©
Comments
Post a Comment