...आणि वर्तुळ पूर्ण जाहले.
माझा परममित्र पृथ्वीराज माने याच्या अकाली मृत्यूनंतर निराशेच्या गर्तेत गेलेल्या त्याच्या आई वडिलांनी सरोगसी मदर च्या साह्याने पुन्हा आई-वडील होण्याचा निर्णय घेतला .
राजनंदनी या छोट्या परीच्या रूपाने त्यांच्या जीवनात संतती सुखाचा आनंद परत आला . त्याच पार्श्वभूमीवर कु. राजनंदनी साठी लिहलेला स्वागतपर लेख..!!
"...आणि वर्तुळ पूर्ण जाहले."
लेखक - निखिल सुभाष थोरवे
एक वर्तुळ आज पूर्ण झाले . माझ्या हातात राजनंदनीची इवलीशी आकृती होती ....
क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोर माझा दिवंगत जिवलग मित्र पृथ्वीराज वारल्यापासून गेल्या ३ वर्षातील श्री. रमेश गुलाब राव माने आणि सौ . मेघा रमेश माने अर्थात माने काका-काकू - पृथ्वीराजचे आई-वडील यांचा जीवन प्रवास तराळून गेला .
पृथ्वीचे जाणे आमच्या मित्र परिवारासाठी एक मोठा धक्का होताच पण सर्वात जास्त आघात त्याच्या आई वडीलांसाठी होता . श्वेता - पृथ्वीची मोठी बहीण हिचा देखील वयाच्या २० वर्षी अकस्मात मृत्यू झाल्यानंतर पृथ्वीराजचे २७ व्या वर्षी आम्हाला सर्वांना सोडून जाणे हे काका-काकूंसाठी एखाद्या दुःखद स्वप्नाप्रमाणे होते .
प्रत्येक संकटाला काळ हा उत्तम औषध असतो ही म्हण यासंदर्भात अतिशय तकलादू ठरत होती . उलट काळ जसा पुढे सरकत होता तशी या संकटाची छाया अधिक गडद होत होती . प्रत्येक पुढे सरणाऱ्या दिवसाप्रमाणे काका-काकूंच्या दुःखाची तीव्रता अधिक तीक्ष्ण होत होती .
कामानिमित्त मी सध्या पिंपरी चिंचवडला स्थायिक असलो तरी , बारामतीत गेल्यानंतर काका-काकूंची आवर्जून भेट घेण्याचा शिरस्ता गेल्या ३ वर्षात मी कधी मोडू दिला नाही .
काका-काकूंशी भेटण्यात , त्यांची विचारपूस करण्यात एक प्रकारे पृथ्वीराज ला भेटण्याचे सौख्य प्राप्त होत होते . माझ्या बरोबरच धनंजय , अमित , शंतनू , रणजित यांसारखे भैय्याचे मित्र , आपला सर्व व्याप सांभाळून काका-काकूंना भेटून जायचे असे कानावर येत असायचे आणि हे सर्व ऐकून एक प्रकारचे समाधान देखील वाटायचे पण , उभ्या उभ्या तासभर भेटून जाणे आणि त्या मोठ्या दुःखासह जीवन कंठणे ह्यात खूप मोठा फरक आहे .
माझ्यासकट सर्वजण आपला प्रपंच , संसार , व्यवसाय आणि नोकरी सांभाळून फार तर फार तासभर भेटण्यासाठी येऊ शकत होते . मात्र , एकटेपणाचे दुःख तर काका-काकूंना स्वतःला सहन करणे क्रमप्राप्त होते .
सहवास हा एकटेपणावर उत्तम ईलाज आहे असे म्हणतात .
एवढ्या मोठ्या घरात सोबतीला कुणीतरी हवे . हा विचार पुढे येऊन , त्या अनुषंगाने काही व्यक्तींना साद घालण्याचा प्रयत्न केला . पण काही कारणांनी तो अपयशी ठरला .
मुळात , काकू - ह्यांची नाजूक मानिसक अवस्था बघता त्यांना त्याच आपुलकीने समजून घेणारी व्यक्ती त्यांच्या सोबत हवी होती . छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांची होणारी घालमेल ह्या विषयी सहानुभूतीपूर्वक बघणारी व्यक्ती त्यांना हवी होती . पण , दुर्दैवाने तसे झाले नाही .
मला व्यक्तिगतरित्या विचारले तर , मी असे सांगेन केवळ फक्त , प्रॉपर्टीसाठी अथवा रमेश माने हे नाव पुढे चालावे यासाठी कुणी दत्तक पाहिजे यापुरता काका-काकूंचा विषय मर्यादित नक्कीच नव्हता . तर , त्यांचे उरलेले दिवस आनंदात जावे , आपल्याला कुणीतरी मुलाच्या मायने सांभाळावे , त्या दोघांची मने जपून घर आनंदी राहावे आणि उरलेले आयुष्य सुखा-समाधानाने शांतपणे व्यतीत व्हावे हा मुख्य उद्देश होता . परंतु , दुर्दैवाने तो यशस्वी झाला नाही असेच म्हणावे लागेल .
अपत्याविना जीवन म्हणजे ध्येयाशिवाय जीवनप्रवास..!!
अश्या , अवस्थेत पुढे जायचे कसे ? हा काकू-काकूंच्या पुढचा सर्वात मोठा यक्ष प्रश्न होता . काका बाहेरच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने त्यांना दुःख विसरण्यासाठी अनेक मार्ग होते . पण , काकूंची अवस्था अत्यंत नाजूक बनत चालली होती . मी जेव्हा जेव्हा बारामतीला यायचो तेव्हा याविषयी काकांच्या आणि माझ्यात चर्चा नक्कीच होयची . काकूंची ढासळलेली मानसिक अवस्था सावरण्यासाठी काहीतरी ठोस करण्याची आवश्यकता होती .
काका , माझ्याशी बोलताना एक खंत नेहमी बोलून दाखवायचे ते म्हणायचे ,
निखिल , " आमचे दुःख जेव्हा खरेच वाटून घेण्याची गरज होती तेव्हा , कुणीही पुढे आले नाही . ही खंत आयुष्यभर असेल ."
ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा , आयुष्याला काहीतरी दिशा देणे हे क्रमप्राप्त होते . म्हणून लहान बाळ दत्तक घेण्याचा निर्णय त्यांच्या मनात कुठेतरी पक्का होत होता . पण , परत विचार आला . दत्तक बाळ घेतले तरी , त्याचे सर्वकाही सुरुवातीपासून करावेच लागेल त्यापेक्षा स्वतःचे का नको ???
कुठेतरी , " रक्ताच्या नात्याची ओढ ही नातेवाईकांच्या ओढीपेक्षा अधिक असते " हा अनुभव स्वतः काका-काकूंनी घेतला होताच त्यामुळे स्वतःचे बाळ हवे हा विचार त्यांचा पक्का झाला .
विचार येणे हे वेगळे आणि त्यावर प्रत्यक्ष कृती करणे हे खूप वेगळे असते . स्वतःचे बाळ असण्यासाठी बऱ्याच अडचणी समोर होत्या . त्यामुळे त्या संदर्भातील सर्व तपासण्या सर्वप्रथम करण्यात आल्या . मुंबई मधील तज्ञ डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच काका-काकूंना विश्वास प्राप्त झाला आणि त्यांच्या जीवनात एक आशेचा किरण पुन्हा एकदा परत आला तो म्हणजे सरोगसी मदर च्या रूपाने ..!!
पुण्यातील नामांकित डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरू झाली आणि प्रयत्नांना यश आले आणि ९ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुदृढ बाळ काकूंच्या कुशीत विसावले .
बाळ आले आणि त्याबरोबर आली ती त्याला मोठे करण्याची जबाबदारी .. !! खरे तर , देवाच्या कृपेने आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने काकूंची कूस पुन्हा उजवली गेली आणि संततीचा आनंद पुन्हा या दाम्पत्याला प्राप्त झाला . काका-काकूंचे इथून पुढे जेवढे आयुष्य विधिलिखित आहे तेवढे या बाळाच्या संगोपनात आनंदात जाईल . नातवंडाच्या बाललीला बघण्याच्या वयात स्वतःच्याच मुलीच्या बाललीला बघण्यात ते दोघे दंग होतील हे माझ्यासारख्याला अंत्यत समाधान प्रदान करणारे आहे .
ह्या वयात हा निर्णय का घेतला ?? किंवा ,
घ्यायला हवा होता का ??
हा चर्चेचा मुद्दा नक्कीच होऊ शकतो मात्र , मला असे वाटते की , प्रत्येक माणसाला त्याचा आनंद शोधण्याचा निसर्गदत्त अधिकार आहे . जेव्हा काका-काकू कोणत्याही व्यक्तीच्या रुपात आधाराच्या शोधत होते . तेव्हा , दुर्दैवाने कुणीही त्यांची ही गरज पूर्ण शकले नाही आणि हा निर्णय त्यांना घ्यावा लागला , अर्थात स्वतःची संतती आपल्या कवेत असणे हे सुख खूप वेगळे आहे आणि एवढे डोंगराएवढे दुःख पचवल्या नंतर काका-काकू या सुखाचे दावेदार नक्कीच आहेत .
वास्तविक श्वेतादीदी आणि पृथ्वीराज यांची सर कुणीही भरून काढणार नाही मात्र , काका-काकूंच्या जीवनाला उद्दिष्ट्य मात्र छोटी राजनंदनी नक्कीच प्राप्त करून देणार आहे . त्याबद्दल माझ्या सारख्याला मनस्वी आनंद आहे . छोट्या राजनंदनीच्या इथून पुढच्या प्रवासात मी बापाच्या मायेने तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार ह्यात तिळमात्र शंका नाही .
शाहरुख खानच्या ओम शांती ओम मध्ये एक सुप्रसिद्ध डायलॉग आहे .
" हमारे हिंदी पिक्चरों के जैसे हमारे लाइफ में भी सब कुछ अंत में ठीक हो जाता है..!! हैप्पी एंडिंग्स..!! "
तसंच काहीसं ...हो ना..!!
...✍🏻निखिल सुभाष थोरवे
Comments
Post a Comment