सर्वव्यापी शरद पवार
शरद पवार हे सहा अक्षरी नाव !! ह्या नावाने गेली 52 वर्षे देशाच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे . असे कोणतेही क्षेत्र नसेल ज्याला ह्या नेतृत्वाचा कंगोरा लाभला नसेल !! असे हे नेतृत्व अनेक अर्थाने सर्वव्यापी आहे , म्हणून ते सदैव लोकांच्या गराड्यात आढळते . आणि त्यांच्या गाडीच्या काचा नेहमी खाली असतात , त्या सर्वसामान्यचा हात हातात घेण्यासाठी !!
अनेक जेष्ठ पत्रकार , साहित्यिक , स्तंभलेखक , राजकिय विश्लेषक यांनी आपल्या लेखण्या पवार साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर , प्रशासकीय कौशल्यावर झिझवल्या. तिथे मी ह्या स्पर्धेचा स्पर्धक म्हणून वेगळे असे काय लिहणार ??
खरं तर पवार साहेबांवर अनेक दिग्गज मंडळींनी एवढे लिहून ठेवले आहे की , त्यापुढे मी काही अल्पमतीने लिहणे म्हणजे सूर्यासमोर काजवा चमकल्या सारखे होईल . पण असे म्हणतात , पवार साहेबांसारखे नेते हे , समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे वाटतात ! जसा पंढरीचा विठ्ठल हा सावतामाळी , संत चोखामेळा , संत नामदेव , संत तुकाराम यांना आपल्या आपल्या परीने भावला , आणि ते त्यांच्या शब्दात विठ्ठलाविषयी व्यक्त झाले . तसाच काहीसा प्रकार म्हणा हवा तर ... !
आज देखील हा लेख लिहीत असताना करोनाच्या महाभयंकर प्रकोपातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी 80 वर्षाचा हा तरुण घरा बाहेर पडलाय . प्रत्यक्ष फिल्ड वर जाऊन तात्पुरत्या उभारलेल्या रुग्णालयांची पाहणी करत आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वडीलकीच्या नात्याने आणि प्रशानाच्या अनुभव गाठीशी असल्याने मोलाचे सल्ले देत आहेत . आणि राज्याचे अर्थचक्र आणि जीवनचक्र पूर्ववत कसे होईल ? ह्या कडे साहेब लक्ष देत आहेत .खरं तर पवार साहेब हे बहुआयामी , बहुढंगी , व्यक्तिमत्त्व कला , क्रीडा , साहित्य , विज्ञान , उद्योग , कृषी , सामाजिक न्याय , संरक्षण असे कोणत्याही क्षेत्रावर तुम्ही बोट ठेवा . जिथे पवार साहेबांचा परिसस्पर्श लाभला नाही असे क्षेत्र शोधणे दुर्मिळच !!
राज्यकर्ते ! काळ बदलत गेला तसे राज्यकर्त्यांच्या भूमिका बदलत गेल्या . सुरुवातीला कायदा सुव्यवस्था , महसूल आणि राज्य संरक्षण ह्या मोजक्या कामांपुरते राज्यकर्त्यांचे काम मर्यादित होते . पण बदलत्या काळात राज्यकर्त्यांच्या कार्यकक्षा रुंदावल्या , त्या अधिक व्यापक झाल्या . समाजाच्या प्रत्येक घटकाला , प्रत्येक क्षेत्राला ह्या राज्यकर्त्यांच्या निर्णयाचा फायदा अथवा तोटा होऊ लागला . आणि खऱ्या अर्थाने राज्यकर्यांच्या यशस्वीतेचे मापदंड त्यांनी घेतलेले धोरणी पणाचे निर्णय हेच ठरू लागले . हा आधुनिक काळातील एक मोठा बदल मानावा लागेल .
ह्याच सर्व मापदंडाचा विचार करता पवार साहेबांची हिमालया सम कारकीर्द ही खूप उजवी ठरते आणि बाकीच्या राजकर्त्याना अतिशय पथदर्शी सुद्धा ठरते . म्हणून पवार साहेबांच्या कारकिर्दीचा आढावा त्यांनी घेतलेले धोरणी पणाच्या समाजपयोगी निर्णयाच्या अनुषंगाने आणि त्यामागच्या त्यांच्या भूमिका ह्या समजून घेऊन आपणास करावा लागेल. त्यातील काही प्रमुख क्षेत्रातील निर्णयांची चिकित्सा आपण पुढे ह्या लेखाच्या निमित्ताने करणार आहोत
स्त्री आणि पुरुष खरे म्हणजे एका चाकाच्या दोन बाजू . अनेक देशांप्रमाणे भारतात सुद्धा पुरुषप्रधान संस्कृती असल्याने हीच चाके लहान मोठी होती . हीच चाके समान करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले , गोपाळ गणेश आगरकर , महर्षी कर्वे यांनी केला . पण त्यांच्याच विचारांवर चालणाऱ्या पवार साहेबांसारख्या राज्यकर्यांने प्रत्यक्षात ह्या गोष्टी अमलात आणल्या . म्हणून त्यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांचे स्त्री विषयक निर्णय पहिल्यांदा आठविण्याचा मला मोह झाल्या शिवाय राहत नाही .
साहेब मुख्यमंत्री असताना १९९३ मध्ये त्यांनी केलेली महिला आयोगाची स्थापना आणि त्याद्वारे जाहीर केलेले देशातील पाहिले महिला धोरण ही महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक घटना होती . महिलांच्या हक्कांच्या बाबतीतले निर्माण झालेले ते एक सरकार मान्य व्यासपीठ म्हणून नावारूपास आले . खरं तर 1993 आणि 1994 साल हे महाराष्ट्राच्या पुरोगामी विशेषणाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे वर्ष होते . ह्याच वर्षी कॅबिनेटमध्ये मध्ये महिला व बालविकास विभाग या स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणुन स्थापना झाली . आणि ह्याच विभागाच्या मार्फत आजही बऱ्याच योजना राबवल्या जातात .आदिवासी महिला आणि बालकांना त्याचा लाभ सर्वाधिक होतो ही वस्तुस्थिती आहे . ह्या सगळ्याचा मेरूमणी म्हणजे १९९४ साली महिला, मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देण्याचा कायदा !! . हा कायदा पुढे २००५ मध्ये भारत सरकारनेही राबवला . एकप्रकारे सह्याद्रीचे अनुकरण हिमायलायने केले . अनेक महिला , मुली यांना ह्या निर्णयामुळे आर्थिक आधार मिळाला आणि भारताच्या पुरुष प्रधान संस्कृतीला एकप्रकारे खीळच बसली एवढे ह्या निर्णयाचे महत्त्व आहे . पुढे १९९३ साली राज्यात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुढे २०११ मध्ये हे प्रमाण ५० टक्के केले. त्यामुळे उंबरठ्याच्या आत आयुष्य घालवणाऱ्या महिलांना “समान संधी समान सत्ता” या न्यायाने गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा कारभार करण्याची संधी मिळाली.
केंद्रीय संरक्षणमंत्री असताना त्यांनी महिलांना तिन्ही सैन्यदलात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. संरक्षण खात्यात महिलांना ११ टक्के आरक्षण हा त्यांचा क्रांतिकारी निर्णय ठरला. आज संरक्षण दलात महिला मानाने देशसेवा करत आहेत.
महिलांकडे आपल्याला दिलेले कुठलेही काम काळजीपुर्वक करण्याची दृष्टी असते याची नोंद घेऊन पवार साहेबांनी महिलांना हवाई दलात वैमानिक म्हणुन संधी मिळावी यासाठी संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांचे मन वळविले. महिला वैमानिक म्हणुन रुजु झाल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या अपघाताच्या संख्येत लक्षणीय घट झाली हे त्याचेच द्योतक असल्याचे हवाई दलाचे अधिकारी सांगतात. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात महिलांची भरती करण्याचा निर्णय असाच महत्त्वाचा . ब्रिटिश व्यवस्थेचे द्योतक असणारी हाफ पॅन्ट फुल करण्याचा निर्णय साहेबांचाच !!!
ग्रामसभा मध्ये गावातील ७५ टक्के महिलांनी मागणी केल्यास गावातील दारुचे दुकान बंद होईल हा कायदा त्यांनी केला. गांधीजींच्या दारूबंदीचा हा पुढचा टप्पा होता
मुलगी सुप्रिया यांचा जन्म झाल्यानंतर स्वतःची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन त्यांनी समाजापुढे आदर्श मांडला. एका मुलीवर कुटुंब नियोजन करुन त्यांनी वंशाचा दिवा, वगैरे समजुतींवर जोरदार प्रहार केला. मुलींना मुलांप्रमाणेच दर्जा मिळावा म्हणुन त्यांनी घेतलेला हा निर्णय आदर्श आहे.
कोणत्याही शासकीय खरेदीविक्रीत (जमीन, घर किंवा इतर) पतीसोबत पत्नीचेही नाव लावणे कायदेशीररित्या बंधनकारक करण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला. यामुळे महिलांना निर्णयप्रक्रियेत महत्वाचे स्थान मिळाले.
साहेबांनी घेतलेले निर्णय हे स्वतः मध्येच त्याची उद्धिष्ट स्पष्ट करतात . आणि स्त्रियांच्या जीवनात घडून आलेले आमूलाग्र बदल त्याची ग्वाही देतात . चूल आणि मूल ह्यात अडकून पडलेल्या स्त्रिया संरक्षण दलात , पोलीस दलात , ग्रामपंचायत , नगरपालिका कार्यालयात दिसू लागल्या हे एका राज्यकर्तेचे केवढे मोठे यश म्हणावे !!
एखाद्या स्त्री मुक्ती कार्यकर्त्यांच्या तोडीचे हे यश आहे असे मला वाटते . सामाजिक कार्यकर्ते हे मागणी करू शकतात समाजाला नवीन दिशा देऊ शकतात . फार तर फार तसे निर्णय घेण्यासाठी सरकारवर दबावगट निर्माण करू शकतात पण जेव्हा एखादा राज्यकर्ता स्वतः अश्या प्रकारचे निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतो , त्यावेळेस त्याची दूरदृष्टी आणि महिलांबद्दची असणारी त्याची पुरोगामी भूमिका ही त्याच्या धोरणीपणाच्या निर्णयातून झळकत असते . पवार साहेबांची हीच भूमिका बघून त्यांना मला आधुनिक स्त्री मुक्तीदाता म्हणावेसे वाटते
कृषी हा पवार साहेबांचा आवडता प्रांत , आपले बंधू कृषीतज्ञ आप्पासाहेब पवार यांच्या जोडीने त्यांनी बारामती येथे ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट स्थापन करून उजाड माळरानावर नंदनवन फुलवले . अगदी सुरुवातीला साहेब जेव्हा युवक काँग्रेसचे काम करत असत तेव्हा बारामती तालुक्यात विक्रमी पाझर तलाव साहेबांनी श्रमदानातून उभारले होते . तिथं पासून साहेबांची नाळ शेतीशी जुळलेली आहे . स्वतः साहेब आपल्या घरातील शेतमाल बाजारपेठेत विकायला घेऊन जायचे त्यामुळे शेती , शेतकरी ह्या विषयी साहेबांच्या मनात अतिशय आपुलकी आणि आपलेपणाची भावना आहे . खरं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक ढेकळाला आपला पदस्पर्श लागलेला असा हा नेता दुर्मिळच म्हणावा !!
पवार साहेब कृषिमंत्री असताना भारत तांदूळ निर्यातीमध्ये क्रमांक एकचा देश बनला होता . कधी काळी अन्यधान्याच्या चणचणीत असणारा आपला देश निर्यातक्षम बनला तो पवार साहेबांच्या धोरणी निर्णयामुळेच ! स्वतः तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मुख्य इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी पवार साहेबांना भारताच्या "तिसऱ्या हरितक्रांतीचे जनक " मानले आहे , त्यातच त्यांच्या कार्याचा यतार्थ गौरव आहे . अगदी विदर्भातील शेतकरी अडचणीत असताना साहेबांनी घेतलेला 68,000 कोटी रुपयांची विक्रमी कर्जमाफी करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक असा होता . कोणताही फॉर्म न भरता सरसकट कर्जमाफी करणे , आणि शेतीला नवी उभारी देणे म्हणजे पवार साहेबांच्या अतीव कार्यकर्तृत्वाचा एक अतिउच्च आलेखच म्हणावा लागेल . केवळ कर्जमाफी न करता साहेबांनी संस्थात्मक पतपुरवठा शेतकऱ्यांना करण्यासाठी व्याजदर हा जिल्हा बँकांच्या माध्यमातून शून्य टक्क्यांवर आणला , विजेच्या दरांमध्ये सवलत दिली . भगिरथाने गंगा भूतलावर आणणे आणि पवार साहेबांनी शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढणे ह्या मध्ये फारसा फरक नाही . मी कदाचित अतिशयोक्ती लिहीत असेन असा आरोप होऊ शकतो पण , ज्या काळात सरकारचा पूर्ण भर हा परदेशी गुंतवणूक आपल्याकडे खेचून त्याद्वारे उदोगधंद्याना बळकटी देणे हा होता , त्याकाळात पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे केवळ भगिरथी प्रयत्नानांचाच भाग म्हणावा लागेल !!!
आजही पवार साहेबांच्या प्रत्येक मुलाखती , सभा ह्यामध्ये शेती आणि त्याच्या संबंधित प्रश्नांचा उल्लेख येत नाही . असे होत नाही .
पवार साहेबांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये मराठवाडा नामांतर विस्तार हे प्रकरण आल्याशिवाय त्यांच्या सामाजिक न्यायचा पैलू उजेडात येऊ शकत नाही . केवळ पाटीवर नामविस्तार करून काय साधले ?? किंवा मराठवाडा नामविस्तार होऊन औरंगाबाद भागात बळकटीस आलेली शिवसेना , धार्मिक राजकारण ह्यांचे झालेले ध्रुवीकरण ह्या पलीकडे आपण ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करावयास हवा !
चवदार तळ्यावर एक घोट पाणी पिऊन आंबेडकरांनी काय साधले ? अथवा दांडी यात्रेत मीठ उचलून गांधीजींनी काय साध्य केले ?? अश्या प्रश्न सारखेच नामविस्ताराने काय साधले ?? अश्या प्रकारचा प्रश्न अनेक जण विचारतात ! केवळ मूठभर मीठ उचलून इंग्रज पळून जाणार नाही . किंवा घोटभर चवदार तळ्याचे पाणी पिल्याने अस्पृश्यता आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था मिटणार नाही हे ह्या दोन महान व्यक्तींना माहीत नव्हते असे नाही , पण त्यांनी केलेल्या कृती ह्या प्रतिकात्मक होत्या . त्याने खूप विस्तृत प्रमाणात सामाजिक अभिसरण घडून आले . संस्थेचे नाव हे त्याचे कार्यक्षेत्र आणि कार्यउद्दीष्ट ध्वनित करीत असते . त्यामुळे आधुनिक पिढी घडवणारी ही विद्यामंदिरे ही ह्या महत्तम लोकांच्या नावांनी सुशोभित व्हावी हा किती उदात्त हेतू म्हणावा !! एक वेळ कितीही राजकिय किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर पण आपल्या मूळ उद्दिष्टपासून अजिबात मागे सारकायचे नाही हे पवार साहेबांसारखा एखादा धोरणी राज्यकर्ताच करू शकतो ! एवढे निश्चित !! लोकसंख्येच्या बहुसंख्य असणाऱ्या आणि शिक्षणाचा फारसा प्रसार न झालेल्या , शेती आदी साधनांची उपलब्धता कमी असणाऱ्या ह्या वर्गाला मंडल आयोगाच्या शिफारशी नुसार आरक्षण प्राप्त करून साहेबांनी दिले . हे विसरून आपणास कसे चालेल ?? मुळात पुरातन चातुर्वर्ण्य व्यवस्था हीच आरक्षणावर बेतलेली आहे . हे पवार साहेबांचे धोरण त्यांनी अनेक वेळा मांडले . आणि धैर्याने कितीही राजकीय किंमत मोजून ते प्रत्यक्षात आणले . हेच साहेबांचे मोठेपण !!
1990 साली प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंहराव आणि अर्थमंत्री आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग ह्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला आणि परिस्थिती वेगाने बदलली . मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि आर्थिक केंद्र हे एव्हाना गिरणी कामगारांच्या संपामुळे आणि कापड उदयोग मोडकळीस आल्यामुळे आकसत चालले होते . त्यामुळे मुंबईला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पवार साहेबांच्या दूरदृष्टीपणातून BKC (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) उभारणी झाली . अनेक जग विख्यात बँका , संस्था यांनी आपली ऑफिसेस BKC मध्ये उभारली आणि मुंबई हे सेवा केंद्राचे माहेरघर म्हणून नावारूपास आले . एक मुख्यमंत्री म्हणून बदलेल्या परिस्थिती मध्ये कसा निर्णय घ्यायचा असतो ह्याचा वस्तुपाठच पवार साहेबांनी घालून दिला . राज्याची विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन एन्रॉन प्रकल्प आणण्याचा पवार साहेबांचा प्रयत्न होता . पण तत्कालीन राजकीय अपरिपक्वतेमुळे महाराष्ट्राचे किती अविरत नुकसान झाले आणि त्यातून सावरायला महाराष्ट्राला 2011 साल उजाडले हा इतिहास आपण जाणतो . उदयोग धंद्याच्या बाबतीत पवार साहेबांचा दृष्टीकोन हा चार इंच टाच वर करून बघण्याचा असतो , भविष्यातील येणारे धोके ओळखून त्यापुढे मार्गक्रमण करणे . हे पवार साहेबांच्या दूरदृष्टी पणाचे द्योतक आहे . ब्रिटिशांनंतर एकही हिल स्टेशन आपण उभारले नाही . त्यामुळे आपला पर्यटन व्यवसाय यथा-तथाच होता . ह्यासाठी लवासा ला प्रोत्साहन देण्याचा साहेबांचा निर्णय हा अतिशय काळाच्या पुढे होता . इथे आवर्जून लिहावेसे वाटते ते म्हणजे उदयोग धंद्याबद्दलचा पवार साहेबांचा दृष्टीकोन स्पष्ट आहे आणि तो दृष्टीकोन त्यांच्या अनेक मुलाखती मधून स्पष्ट झाला आहे . शेती वरील अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण कमी करणे आणि शेतीपूरक उदयोग धंदे वाढीस लावणे असे दुहेरी धोरण पवार साहेबांच्या बोलण्यातून नेहमी व्यक्त होत असते . पुणे , मुंबई , नाशिक ह्या शहरांच्या पलीकडे आत्ता हा उदोगधंद्याचा कॅरीडॉर नेण्याची जबादारी आत्ता पुढील राज्यकर्त्यांची आहे .काही प्रमाणात त्यात यश आले असले तरी , ते व्यापक करण्याची गरज आहे .
मध्यंतरी राज ठाकरे यांनी घेतलेले पवार साहेबांच्या प्रकट मुलाखती मध्ये कोल्हापूरच्या जुन्या रणजी क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर ह्यांचा किस्सा ऐकण्यास मिळाला . समोरची बॉलिंग टाकणारी टीम पळून गेल्याने , सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्याची भाऊसाहेबांची संधी हुकली . असा तो किस्सा होता . सर डॉन ब्रॅडमन याचा रेकॉर्ड मोडण्याच्या जवळपास गेलेल्या जुन्या क्रिकेटपटू वर म्हातारपणात आज कसे बसे जीवन जगावे लागत आहे हे बघून पवार साहेब व्यतिथ झाले आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी जुन्या रणजी खेळाडूंसाठी पेन्शन सुरू केली . एकेकाळी सुवर्ण काळ गाजवलेल्या ह्या खेळाडूंना त्यांच्या उत्तरार्धात चांगले आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करणारा हा निपुण प्रशासक निराळाच !! आज गर्भ श्रीमंत झालेल्या BCCI ला IPL सुरू करण्याची मूळची प्रेरणा देणारे आणि त्या बद्दलच्या लोकांच्या मागे प्रशासक म्हणून उभे राहणारे पवार साहेब उत्तम क्रीडा प्रशासक ठरतात . आणि केवळ क्रिकेटचं कशाला ??
कुस्ती , खो-खो , कब्बडी अश्या देशी खेळांना सरकारी दरबारी आश्रय देण्याचे काम सुद्धा पवार साहेबांचेच !! देशात सुप्रसिद्ध झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल !! पवार साहेब नेहमी काळाच्या पुढे चालतात आणि खेळाला सुद्धा त्यांनी काळाच्या पुढे नेलें हे त्यांच्यातील नेत्याचे यश !!
गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या कडून लाभलेला साहित्यिक वारसा पवार साहेबांनी केवळ जोपासला नव्हे तर , तो अधिक समृद्ध केला . बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान ह्या शिक्षण संस्थेच्या मुख्य सभागृहाचे नामकरण त्यांनी मित्र ग.दी. माडगूळकर यांचे नावे केले . शास्त्रीय संगीत , लोककला , यांची अचूक समज असलेला राजकारणी म्हणजे पवार साहेब ! स्वतःच्या लोक माझे सांगाती ह्या पुस्तकात त्यांनी पु . ल देशपांडे , गदिमा पासून सध्याच्या नव्या दमाच्या लक्ष्मण माने , दया पवार आदी लेखकांच्या प्रति अतिशय ममत्वाने उल्लेख केला आहे .
पवार साहेब त्यांच्या वयाची 80 वर्षे गाठत असताना , त्यांनी त्यांच्या संसदीय कारकीर्दत करून ठेवलेल्या कामाचा आढावा मी माझ्या बुद्धीला झेपेल एवढा घेतला . पण त्यापलीकडे देखील एक माणूस म्हणून पवार साहेबांचे गुण मला अधिक भावतात . तल्लख स्मरणशक्ती हा त्यापैकी एक गुण , उभा आडवा महाराष्ट्र अनेक वेळा पालथा घातलेला . महाराष्ट्रातील स्थानिक नेते , तेथील प्रश्न यांची अचूक जाण असलेला हा नेता . अनेक जुन्या सवंगाड्यांना अगदी बिनचूक ओळखतो . हा स्मरणशक्तीचा अद्भुत चमत्कारच आहे . स्मरणशक्ती प्रमाणेच नवीन शिकण्याची त्यांची उर्मी आणि आवड आणि त्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी ही नवीन पिढीस खूप मार्गदर्शक आहे . स्वतः पवार साहेबांनी ह्या बद्दल सांगितलेला एक किस्सा खूप प्रसिध्द आहे . जेव्हा पवार साहेबांनी संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारण्या पूर्वी त्यांना आर्मी बद्दल माहीत नसलेल्या रँकस , पदाची अधिक्रम ह्याबद्दल माहिती कोल्हापूरच्या एका निवृत्त मेजर कडून एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे शिकून घेतली होती . आणि नंतरच मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला .हा किस्सा अनेक छोट्या छोट्या गोष्टी विचारायला लाजणाऱ्या माणसांसाठी केवढा मोठा धडा आहे ..!! भल्या-भल्यांना गार करणाऱ्या कॅन्सर सारख्या आजाराला चितपट करून पुन्हा तितक्याच उत्साहाने कार्यरत झालेल्या ह्या य योद्धा कडे पाहताना डोळे भरून येतात ... आणि ऊर अभिमानाने भरून येतो . आपत्ती व्यवस्थापन हा पवार साहेबांच्या कारकिर्दीतील महत्वाचा पैलू म्हणावा . लातूर भूकंप , मुंबई बॉम्बस्फोट , दंगल आणि गुजरातचा भूकंप ह्याकामी साहेबांनी केलेल्या कामाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत . आत्ता सुद्धा करोनाच्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारला त्यांचे मार्गदर्शन लाभते आहे . हा सुदैवी योगच म्हणावा लागेल . खरं म्हणजे साहेबांचे पैलू इतके असल्याने , ते मर्यादित शब्दात व्यक्त करणे खरंच आव्हान आहे .
आजही पवार साहेब एखाद्या तरुणाला लाजवेल अश्या उत्साहाने कार्यरत आहेत . वयाची 80 वर्षे पार करणे हा त्यांच्यासाठी केवळ एक आकडा आहे .. ह्या माझ्या मतावर मी ठाम आहे .. आणि पुढे 100 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा केव्हा ही स्पर्धा आयोजित होईल त्यावेळेस देखील अश्याच प्रकारचा लेख लिहताना मी माझ्या मतावर ठाम असेल एवढ नक्की !!
तूर्तास लेखणीस पूर्णविराम !!
आणि पवार साहेबांना उदंड , निरोगी आयुष्य लाभो ह्या सदिच्छा !!
........✍️निखिल सुभाष थोरवे
Nice one
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete