राम मंदिर : नियतीचा न्याय ..!!

येत्या 5 ऑगस्ट ला एक ऐतिहासिक घटना घडत आहे . राम मंदिर भूमिपूजन !! 
आत्ता जे साधारण पासष्टी मध्ये असतील त्यांनी हा संबंध घटनेचा लेखाजोखा अगदी सुरुवातीपासून बघितला असेल . 
राम मंदिर आणि माझा तसा जास्त संबंध आलाच नाही . पण ह्या विषयाचे औसुक्य मात्र होते . लहानपणी मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीला जायचो . मामा स्वतः भाजप आणि संघ परिवारातील असल्याने त्यावेळेस ह्या विषयावरची बरीच पुस्तके नजरेखालून जात असत . वय लहान असल्याने भली मोठ्ठी पुस्तके वाचण्याच्या मोहात कधी पडलो नाही . पण त्यातील छायाचित्रे ,  ज्यात प्रामुख्याने मशिदी खालील पुरातत्व खात्याला सापडलेले मंदिराचे खांब , मंदिराचे अवशेष इत्यादी गोष्टींचे फोटो असायचे .
त्यामुळे मशीद पाडली ह्या पेक्षा मशीदच्या आधी मंदिर अस्तित्वात होते ह्या दाव्यावर अधिक भर असायचा अशी त्या पुस्तकांची साधारण मांडणी असायची . असो ...!!  

न्यायालयाने भरपूर वर्षे वेळ घेतला . कायद्याचा कीस निघाला ह्यात प्रचंड वेळ गेला पण ह्यातून एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे ह्या मुद्द्यातील गर्मी नष्ट झाली . आणि दोन्ही बाजूचा कडवटपणा काळाच्या ओघात नष्ट झाला , एक संपूर्ण पिढी पुढे सरकली . 
भाजपला सर्वाधिक ह्या मुद्द्यांचा फायदा तर झालाच पण अनेक हिरे ह्या काळात भाजपला गवसले . भाजपचे लोहपुरुष लालकृष्ण अडवाणी , नरेंद्र मोदी , मनोहर पर्रिकर अशी बरीच मोठी फळी ह्यानिमिताने घडली . 1990 साली सुरू झालेल्या आणि देशाच्या राजकारणाला धार्मिक ध्रुवीकरण प्राप्त करून दिलेल्या मुद्द्याला 5 तारखेला पूर्णविराम लागेल आणि एक अध्याय समाप्त होईल . 
मोदींनी सूड भावना सोडून लालकृष्ण अडवणींना सन्मानाने व्यासपीठावर विराजमान करावे  . हा त्यांच्यासाठी आयुष्याचा परमोच्च क्षण असेल ह्यात दुमत नाहीच . मोदी असे करतील (?) हा विश्वास !! 


राम मंदिर होतेय हे उत्तमच कारण नियतीने केलेला तो न्याय आहे . आणि ह्या चळवळीत ज्या संघटना , व्यक्ती होत्या त्यांचे मनापासून अभिनंदनच केले पाहिजे . कारण केवळ मोदी सरकार भाजप किंवा हिंदू संघटना ह्यांचे ते श्रेय नाही . अनेक वर्षे अनेक घटक , राज्यकर्ते ह्यांनी ह्याकामी योगदान दिले आहे . मशिदी खाली मंदिर होते ह्याची विस्तृत मांडणी करणारे पुरातत्व विभागाचे के. के. मोहम्मद हे मुस्लिम होते हे विशेष .. !! 
ह्याचा अर्थ राम मंदिर उभारणी ही न्याय आणि अन्याय ह्या दरम्यानची होती . ती धार्मिक लढाई नव्हती . त्यामुळे आजच्या पिढीतील तरुण पोरांनी विजयाच्या उन्मादात कुणाच्याही भावना दुखावत नाही ना ! ह्याची काळजी घ्यायलाच हवी .. तेव्हा पोरांनी व्हाट्सअप्प स्टेटस वर होणारा उन्माद थोडा आवरता घेतला पाहिजे . 

1990 साली जशी स्थिती होती तशी आत्ता नक्कीच राहिली नाही . दोन्ही बाजूची तथाकथित कट्टर पंथी पिढी आत्ता पन्नाशी साठीच्या आसपास आहे . आणि , आज जी तरुण पिढी आहे त्यांना , राम मंदिरापेक्षा रामराज्य कसे येईल ? 
आम्हाला रोजगार कसे मिळतील ? 
आमचे जीवन सुखकर कसे होईल ? 
त्यांचा ओढा ह्या प्रश्नांकडे आहे . 

माझी समस्त तथाकथित , धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी लोकांना विनंती आहे . मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आपण सन्मान केला पाहिजे . आणि आत्ता मंदिराच्या नावाने नाके मुरडणे थांबवले पाहिजे . 
व्यापक लोकभावना असूनसुद्धा देवाला सुद्धा स्वतःच्या मंदिरासाठी 150 वर्षांपेक्षा जास्त वेळ न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या तिथेच ह्या देशाची धर्मनिरपेक्षता सिद्ध झाली . आणि कायद्याचे महत्त्व अधोरेखित झाले . आणि हे फक्त भारतातच होऊ शकते ..
निर्विवादपणे ...!!!
राम मंदिर पायउभारणीस शुभेच्छा ...!! 
जय श्री राम ...!!
.......✍️निखिल सुभाष थोरवे

Comments