देव घरी येतो ही गणेशोत्सवाची अलौकिक भावना.!

देव घरी येतो ही गणेशोत्सवाची अलौकिक भावना.!

"देव स्वतः पाहुणा बनून आपल्या घरी येतो..." विचार करा, ही भावनाच किती अलौकिक आणि सुंदर आहे!
आपल्या वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी "हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी..." असं सांगत नामस्मरणाचे अथांग महत्त्व पटवून दिले. केवळ हिंदू धर्मातच नाही, तर मुस्लिम धर्मात 'तस्बीह' (नामस्मरण) असो वा जगातील इतर अनेक धर्मांत, ईश्वराचे नाव घेण्याला विशेष स्थान आहे. आपण देवाची प्रार्थना करतो, त्याची पूजा करतो, त्याच्या मंदिरात जातो... पण 'स्वतः देवच चालून आपल्या घरी येतो', असा सोहळा अनुभवण्याची संधी मिळणे ही अत्यंत विरळ आणि अद्भूत गोष्ट आहे! आणि हीच अलौकिक अनुभूती गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण दरवर्षी घेतो.

गणपती बाप्पा येण्यापूर्वीचे घरातील वातावरण आणि बाप्पा स्थानापन्न झाल्यानंतरचे वातावरण... यातला फरक तुम्ही कधी अनुभवलाय का? तो फरक शब्दांत सांगणे कठीण आहे!
तुम्ही अगदी कडक उन्हाळ्यात, मे महिन्यात घरात सुरेख मखर सजवले, आरास केली, धूप-अगरबत्त्या लावल्या आणि बाजारातून एखादी गणपतीची मूर्ती आणून बसवली, तरीही तुम्हाला तो 'फील' कधीच येणार नाही. तो खास, पवित्र आणि भरून आलेला भाव फक्त आणि फक्त भाद्रपदातल्या गणेशोत्सवातच अनुभवता येतो. कारण त्या दिवसांत साक्षात या सृष्टीच्या पालनकर्त्याचा वास आपल्या घरात असतो.

बाप्पा आपल्या घरी येतो, अत्यंत प्रेमाने आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात विराजमान होतो. आपण त्याच्यासमोर बसून सुख-दुःखाच्या गोष्टी सांगतो, मनातले मागणे मागतो आणि हा विघ्नहर्ता आपली सर्व दुःखं ऐकून त्यावर मार्ग दाखवतो... हा आपल्यापैकी प्रत्येकाचाच वैयक्तिक अनुभव आहे!

 घरातल्या बाप्पाशी संवाद महत्त्वाचा!

आजकाल सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप खूप व्यापक आणि भव्यदिव्य झाले आहे. उत्सव साजरा जरूर व्हावा, पण या सगळ्या गडबडीत एक गोष्ट आपण विसरतोय का?
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणे किंवा मोठमोठ्या श्रीमंत गणपतींच्या चरणी लीन होणे यात चुकीचे काहीच नाही, गणेशोत्सवाचा तो उत्साह आणि सोहळा पाहायला निश्चित जा. पण त्या मोठ्या रांगांमध्ये तास न् तास उभे राहून, कोणाचा अपमान सहन करत, धक्काबुक्की खात दर्शनासाठी ताटकळत राहण्यापेक्षा... आपल्या स्वतःच्या घरात जो बाप्पा विराजमान झालाय, त्याच्याशी मनोभावे बोला! त्याच्यासमोर शांतपणे बसा, नतमस्तक व्हा आणि व्यक्त व्हा.

जो सृष्टीचा रचयिता आहे, तो केवळ दहा दिवसांसाठी तुमच्या घरी 'पाहुणा' बनून आला आहे. तो अवघ्या दहा दिवसांत निघून जाणार आहे. जो स्वतः तुमच्या उंबरठ्यात चालून आलाय, त्याला घरात एकटं सोडून आपण भलतीकडेच देवाचा शोध घेत फिरण्यात काय अर्थ आहे.?

'देव घरी येतो' ही संकल्पना संपूर्ण जगात आणि हिंदू संस्कृतीत अत्यंत 'युनिक' (अनन्यसाधारण) आणि अलौकिक आहे. जगाचा स्वामी, ज्याच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण ब्रह्मांड चालते, तो बाप्पा एका लाडक्या पाहुण्याच्या रूपात आपल्या साध्याशा घरात येतो, ही गोष्टच मुळात थक्क करणारी आहे.
या कल्पनेचा, या पाहुणचाराचा आणि बाप्पाच्या या रूपाचा मनापासून आदर करा. आपल्या घरातल्या गणपती समोर दोन मिनिटे शांत बसा, त्याच्याशी संवाद साधा.

तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या मंगलमय गणेशोत्सवाच्या पुनश्च हार्दिक शुभेच्छा! बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्नांचे हरण करो!

- निखिल सुभाष थोरवे ®

Comments