नारी शक्तीचा आडोसा… आणि संसदेत लागलेला ब्रेक!
नारी शक्तीचा आडोसा… आणि संसदेत लागलेला ब्रेक!
काल संसदेत जे घडलं, ते पाहताना एक गोष्ट स्पष्ट जाणवली ; भावना कितीही उंचावल्या, घोषणांचा आवाज कितीही मोठा झाला, तरी शेवटी निर्णय हा विवेकावरच घेतला जातो. नारी शक्तीच्या नावाने एक मोठं विधेयक मांडलं गेलं, ज्यात महिलांचा सन्मान, प्रतिनिधित्व आणि न्याय यांचे प्रभावी शब्द गुंफले गेले होते. पण जेव्हा प्रत्यक्ष मतदानाची वेळ आली, तेव्हा या सगळ्या भावनिक आवरणामागची वास्तवता समोर आली आणि बहुमत असूनही विधेयक फेटाळलं गेलं.
ही घटना केवळ एका विधेयकाच्या पराभवाची नाही, तर एक स्पष्ट संदेश देणारी आहे ; लोकं आणि विरोधी पक्ष दोघंही मूर्ख नाहीत. केवळ संवेदनशील विषय पुढे करून कोणताही मोठा आणि दूरगामी निर्णय सहज पार पडणार नाही, हे संसदेनं दाखवून दिलं.
महिला आरक्षण हा नक्कीच अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, पण इथे एक महत्त्वाची बाब दुर्लक्षित करता येत नाही की महिला आरक्षणाचा निर्णय देशाने आधीच २०२३ मध्ये घेतलेला आहे. त्यामुळे त्याच मुद्द्याच्या नावाखाली पुन्हा वेगळ्या स्वरूपात आणि परिसीमनासारख्या मोठ्या बदलांसह विधेयक पुढे आणले गेले, तर त्यावर प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे.
कारण ; हा फक्त आजचा राजकारणाचा विषय नाही, तर पुढील अनेक दशकांचा सत्तासंतुलन ठरवणारा मुद्दा आहे. आणि याच ठिकाणी पुन्हा एकदा घटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी प्रकर्षाने जाणवते. त्यांनी संविधान लिहिताना सत्तेवर नियंत्रण ठेवणारी आणि कोणत्याही घाईघाईच्या निर्णयाला अडवणारी यंत्रणा तयार केली. म्हणूनच काही निर्णयांसाठी विशेष बहुमताची अट ठेवली गेली, जेणेकरून देशाच्या रचनेवर परिणाम करणारे निर्णय व्यापक सहमतीशिवाय होऊ नयेत.
कालच्या घटनेत हेच तत्त्व जिवंत झालेलं दिसलं. भावना उभ्या केल्या गेल्या, घोषणा दिल्या गेल्या, पण शेवटी संसदेनं आपली जबाबदारी निभावत विवेकाने निर्णय घेतला. संसदेबाहेर आंदोलनं सुरू आहेत, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, पण नारी शक्तीचा खरा सन्मान हा घोषणांनी होत नाही ; तो प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि सर्वानुमतेने घेतलेल्या निर्णयांमधूनच दिसतो.
या सगळ्या घडामोडींनी एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली , भारतीय लोकशाही अजूनही जिवंत आहे. इथे कुणीही अंतिम नाही, कुणाचंही वर्चस्व पूर्ण नाही. इथे प्रत्येक निर्णयाला प्रश्न विचारले जातात आणि तेच या व्यवस्थेचं खरं सौंदर्य आहे. हा देश भावनेवर नाही, तर विवेकावर चालतो आणि संविधान हे फक्त पुस्तक नसून प्रत्येक निर्णयामागे उभं असलेलं एक भक्कम आणि सजग भान आहे.
- निखिल सुभाष थोरवे ®
Comments
Post a Comment