आयर्नमॅन सतिश ननवरे यांचा ५० वा वाढदिवस : कर्तृत्व, क्रीडा आणि सामाजिक योगदानाचा प्रेरणादायी प्रवास
आयर्नमॅन सतिश ननवरे यांचा ५० वा वाढदिवस : कर्तृत्व, क्रीडा आणि सामाजिक योगदानाचा प्रेरणादायी प्रवास
५० वर्षे म्हणजे केवळ आकडा नाही; ती असते अनुभवांची शिदोरी, संघर्षांची कहाणी आणि यशाची उंच भरारी. आज माझे दाजी-मित्र-मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान सतीश ननवरे आपल्या आयुष्याच्या अर्धशतक पूर्ण करत आहेत.
खरं तर हा दिवस अधिक जल्लोषात साजरा झाला असता; परंतु बारामतीच्या खंबीर नेतृत्वाचा आधार असलेले अजितदादा पवार यांच्या निधनाच्या दुःखाने वातावरण अजूनही भारलेले आहे. त्या वेदनेच्या छायेतही दाजींच्या कर्तृत्वाचा गौरव करणं आवश्यक आहे, कारण त्यांचा प्रवास हा प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.
संघर्षातून उभा राहिलेला उद्योजक
अतिशय सामान्य परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करताना त्यांनी आपली उपजत चित्रकलेची आवड जपली. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय येथे जी.डी. आर्टचे शिक्षण पूर्ण करताना त्यांच्या मनात मोठी स्वप्ने होती. चित्रकलेचा शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी वेगळा निर्णय घेतला ; स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा. त्या काळात हा निर्णय धाडसी होता. पण बदलत्या काळाची नाडी ओळखत त्यांनी ‘वैष्णवी ग्राफिक्स’ आणि ‘अभिषेक पब्लिसिटी’सारखे उद्योग उभे केले.
आज आपण बऱ्याच ठिकाणी भव्य 3D कमानी, आकर्षक स्टेज डिझाईन्स आणि नावीन्यपूर्ण ग्राफिक्स पाहतो, त्यामागे मूळ दाजींची कल्पकता आणि मेहनत आहे. पुणे रेसकोर्सवर झालेल्या शरद पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त उभारलेली भव्य स्टेज प्रतिकृती असो किंवा विविध महत्त्वाच्या प्रसंगी साकारलेले कलात्मक ग्राफिक वर्क या सर्वामध्ये त्यांच्या दृष्टीचा ठसा स्पष्ट जाणवतो.
आयर्न मॅन – आयुष्याचा टर्निंग पॉईंट
प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण येतो, जो संपूर्ण दिशा बदलून टाकतो. दाजींसाठी तो क्षण होता आयर्न मॅन स्पर्धा.
व्यायामाची उपजत आवड त्यांनी जपलीच; पण आयर्न मॅनच्या तयारीने त्यांच्या आयुष्याला नवा आकार दिला. सलग तीन वेळा त्यांनी ही कठीण स्पर्धा पूर्ण केली. एवढंच नाही, तर त्यांचा मुलगा अभिषेक आणि मुलगी वैष्णवी यांनीही ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली.
खऱ्या अर्थाने ‘आयर्न मॅन फॅमिली’ म्हणून ननवरे कुटुंबाचा गौरव झाला. कुटुंबाला सोबत घेऊन स्वप्न पूर्ण करणं हीच दाजींची खासियत आहे.
बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन – आरोग्याची चळवळ
व्यक्तिगत यशापेक्षा समाजासाठी दिलेलं योगदान मोठं असतं. २०२० साली दाजींनी बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन ची स्थापना केली आणि बारामतीत आरोग्याची नवी चळवळ उभी केली.
‘गडकिल्ले सायकल राईड – पेडल फॉर ग्लोरियस हिस्ट्री’, ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’, तसेच जुलै महिन्यात अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली जाणारी पुणे ते बारामती १०० किमी ‘आरोग्यवारी’ ग्रुप रिले रन – या उपक्रमांमधून हजारो युवकांना फिटनेस आणि इतिहास यांची जोड मिळाली.
खेळ, शिस्त आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडवणारे दाजी आज अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत.
आयुष्याचे तीन टप्पे – एक बहुआयामी व्यक्तिमत्व
सतीश ननवरे यांचा प्रवास पाहिला, तर तीन स्पष्ट टप्पे दिसतात
शून्यातून उभा राहिलेला धडपडा उद्योजक
आयर्न मॅन स्पर्धेत गाजवलेला क्रीडापटू
बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचा दूरदृष्टी असलेला संस्थापक
प्रत्येक टप्प्यात जबाबदारी वेगळी, भूमिका वेगळी; पण जिद्द आणि प्रामाणिकपणा कायम एकच.
अजित दादांच्या जाण्याने बारामती अजूनही सावरत असताना, स्वतःचा ५० वा वाढदिवस रक्तदान शिबिराच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय हीच दाजींची खरी ओळख आहे.
समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
पुढील इनिंग्स अजून बाकी आहेत…
५० वर्षे पूर्ण झाली असली, तरी दाजींची इनिंग अजून रंगात आहे. पुढे मुलांची लग्नं, कुटुंबातील नवे टप्पे, समाजकार्यातील नवे प्रकल्प अनेक स्वप्ने अजून पूर्ण व्हायची आहेत.
रिटायरमेंट हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही. कारण काम करणं, स्वप्न पाहणं आणि ती पूर्ण करणं हाच त्यांचा स्वभाव आहे.
दाजी, तुम्ही अशीच अनेक इनिंग्स खेळा. आम्ही तुमच्याकडून शिकत राहू, प्रेरणा घेत राहू.
मनापासून वाढदिवसाच्या आरोग्यदायी, यशस्वी आणि समाधानाच्या शुभेच्छा.!
— ....✍🏻निखिल सुभाष थोरवे
Comments
Post a Comment