साबणाचे जोडलेले तुकडे आणि महाराष्ट्र ..!!

प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचा अनुभव असेल , महिना अखेरच्या काळात साबणाचे तुकडे जोडून त्याचा कितीही एकसंघ साबणाचा गोळा तयार करण्याचा प्रयत्न केला तरी , त्यावर पाणी पडले आणि भरभर अंगाला साबण चोळला तरी , त्याचे व्हायचे ते तुकडे वेगळे होतातच..!! 

महाराष्ट्रातील राजकारणाचे सेम टू सेम असेच काहीसे झाले आहे. 

वरकरणी महायुती आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेमंडळी कितीही एकमेकांच्या सोबत राहण्याच्या आणाभाका घेत असले तरी ; सत्य परिस्थिती नेमकी काय आहे हे सर्वसामान्य जनतेला चांगलेच समजते.

आजच्या घडीला , सांगली , शिरूर , माढा , बारामती , मावळ रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि जे मतदारसंघ कदाचित माझ्या माहितीत देखील नसतील अश्या कितीतरी मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस आहे. 

वास्तविक ही वेळ महाराष्ट्रावर का आली ? या अश्या प्रकारची अभद्र युती किंवा आघाड्या का झाल्या ? ह्याच्या मुळाशी जर गेलो तर , त्याचे मुख्य कारण सापडते ते म्हणजे ;  महाविकास आघाडीची स्थापना..!! 

राजकारणात जर-तरला फारसा अर्थ नसतो मात्र ; तरीसुद्धा महा विकासआघाडी चा प्रयोग झाला नसता तर , पुढील पक्ष फोडाफोडी झाली नसती ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. 

निवडणूकपूर्व युती करून भाजप-शिवसेनेला महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला होता. मात्र , स्वार्थवृत्ती जेव्हा बळावते तेव्हा अश्या अधर्मी आणि अनैसर्गिक युत्या आघाड्या बनतात. दुर्दैव पहा , ज्या मुख्यमंत्री पदाच्या लालसेने उद्धव ठाकरे यांनी भाजप ची साथ सोडून काँग्रेस ला हाथ दिला. ते मुख्यमंत्री पद कोरोना काळात त्यांना व्यवस्थित उपभोगता तरी आले का ? 

का तर , कोणत्याही कृतीला नीती आणि न्यायाची जोड ही लागतेच ..!! 


जी गती आज उद्धव ठाकरेंची आहे , ती उद्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि सर्वांत वाईट दुर्दशा अजित पवार यांची होणार आहे .ज्यांनी-ज्यांनी विचारधारेला तिलांजली देऊन स्वार्थी वृत्तीने राजकारण साधले , पक्ष फोडले त्यांचा विनाश अटळ आहे.  हा प्रकार इतर ठिकाणी चालत असेल मात्र , महाराष्ट्रात चालत नाही. 

लोकांना कोणतीही एक बाजू धरून ठेवणारा नेता अथवा व्यक्ती आवडतो. मग ती उजवी किंवा डावी कोणतीही असुदे ..!! 

आपल्याला जेल मध्ये जावे लागेल , आपली प्रॉपर्टी जप्त होईल ह्या भीतीने अनेकजण पक्षांतर करत आहेत . एकट्या भाजपला दोष देण्यात अर्थ नाही . काँग्रेसने देखील हेच केले होते . जे पेरले तेच उगवते . काँग्रेसचे सरकार असताना सर्वोच्च न्यायालयाने "पिंजऱ्यातील पोपट " म्हणून सीबीआयची केलेली  हेटाळणी जाणकार मंडळींच्या स्मरणात असेल..!!

यानिमित्ताने , एक सांगतो , जे नेतेमंडळी ईडी , सीबीआय ने आत टाकले आहे त्यांच्या मागे जनतेची तिळमात्र सहानुभूती नाही . त्यामुळे काँग्रेस आणि मित्रपक्षांनी याबाबतीत तरी ऊर बडविणे थांबवावे . अरविंद केजरीवाल आत गेला काय किंवा छगन भुजबळ आतून बाहेर आला काय ! जनतेला काडीमात्र फरक पडत नाही . 

सुपारी बाज नेते आणि त्यांचे पक्ष ही पध्दत कालबाह्य झाली आहे . त्यामुळे कुणाचे कितीही संध्याकाळी ७ वाजता सभा झाल्या त्यांना एन्जॉय करा ..!! कारण ; त्यांना बिचाऱ्यांना सुपारी साठी घेतलेल्या पैश्याचा हिशोब द्यावा लागतो . 

म्हणून ; शरद पवार असतील अथवा देवेंद्र फडणवीस असतील यांचा जनाधार कायम आहे , हे त्याचेच द्योतक आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी जे मासे गळाला लावले ती सर्वस्वी चूक  माश्यांचीच..!! फडणवीसांची नव्हे.

असे मासे आत्ता पवार साहेबांच्या सुद्धा गळाला लागले आहेत . भविष्यात लागतील.

सांगायचा मुद्दा एवढाच की , विचारधारा ही "कोअर ईलमेन्ट"  आहे . 

पद , सत्ता , जेलवारी यांच्यासाठी मिळवलेली शॉर्ट टर्म अचिव्हमेंट आत्ता जरी भव्य दिव्य दिसत असली तरी , ती शाश्वत नाही  - चिरकाल टिकणारी नाही .

खरे , म्हणजे ही निवडणूक जनतेने गांभीर्याने घ्यायला हवी , जे परस्पर एकत्र होतात किंवा वेगळे होतात अश्या लोकांना चापट मारून या सर्वांची धुंदी उतरायला हवी ..!! 

आम्ही करू तीच पूर्वदिशा आम्ही ठरवू तोच कायदा , आम्ही जाऊ तिकडेच तुम्हाला सुद्धा यावेच लागेल अश्या वृत्ती महाराष्ट्रातील जनतेने गाडाव्या असे मी आवाहन करतो. 

मी महाविकासआघाडी / महायुती समर्थक अथवा विरोधक नाही . फक्त विचारधारेशी प्रामाणिक राहून काम करणारा उमेदवार जो कोणत्याही पक्षाचा असो  , जनतेने निवडून दिला पाहीजे असे माझे व्यक्तिगत मत आहे . 

....✍🏻 निखिल सुभाष थोरवे . 


Comments