सकल मराठा समाज !! कृपया , जरा इकडे लक्ष द्या

मनोज जरांगे यांनी दिलेली ४० दिवसांची मुदत उलटून एव्हाना एक आठवडा झाला आहे. या दरम्यान सरकारने एकही कागद इकडचा तिकडे हलवला नाही अथवा मराठा आंदोलनकर्त्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याची तसदी दाखवली नाही . मग प्रश्न पडतो या दरम्यान सरकारने नेमके केले काय ? 

सरकारने बनवली रणनीती ..! 

कोणती रणनीती तर , मराठा आंदोलन हिसंक पातळीवर घेऊन जाऊन ते चिरडून टाकण्याची..!! 

ज्याची चुणूक आपल्याला सध्या होत असलेल्या स्फोटक परिस्थिती मध्ये दिसते आहे. वातावरण एवढे स्फोटक बनवायचे की , आंदोलन हिंसक होईल आणि एकदा का आंदोलन हिंसक झाले की ; ते आर्मी आणि SRP च्या मदतीने चिरडणे सोप्पे होईल . मोदींच्या बैठकीत कदाचित हीच रणनीती ठरली असावी आणि तीच कदाचित सरकारची अगतिकता असावी.

सरकारची मराठयांना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती आहे का ? तर , माझ्यामते ती नक्कीच आहे . मात्र ; समोर बरेच घटनात्मक पेच आहेत . मनोज जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणे सरसकट कुणबी दाखले दिले तर , मराठ्यांची प्रचंड लोकसंख्या ही ओबीसी प्रवर्गात समाविष्ट होईल. जे ओबीसी समाजाला मान्य होणार नाही . कदाचित ते कोर्टामध्ये टिकणार नाही . आणि सर्वांत महत्त्वाचे मराठा - ओबीसी संघर्ष उभा ठाकेल. 

आत्ता प्रश्न राहिला आरक्षण मर्यादा वाढविण्याचा , कदाचित त्यासाठीच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घाईघाईने दिल्ली वारी केली . मात्र , केंद्र सरकार एकट्या महाराष्ट्रासाठी आरक्षण मर्यादा वाढवून , राजस्थान , गुजरात , हरियाणा आणि इतर राज्यातील झोपलेली आरक्षण आंदोलने पुन्हा जीवित करू इच्छित नाही . किंबहुना कोणतेही सरकार असले तरी , त्या सरकारने ही चूक केली नसती . 


मग ; आत्ता उरते काय ? हिंसक आंदोलने चिरडणे . गेल्या काही वर्षांतील प्रत्येक सरकारची आंदोलने हाताळण्याची पद्धत पहिली तर , हे समर्पक वाटते . हुकूमशाही द्वारे दमनशाही..!! 

त्यामुळे मराठा आंदोलन निःसंकोचपणे चिरडले जाईल . 


मी स्वतः मराठा असून , व्यक्तिगत रित्या मी मनोज जरांगे यांच्या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट होण्याच्या मताशी सहमत नाही . मराठ्यांना आरक्षण हे स्वतंत्र प्रवर्गातून मिळाले तर , त्याचा अधिक फायदा समाजाला होईल . असो , 

मात्र , खूप वर्षांनी मनोज जरांगे यांच्या रूपाने एक निस्वार्थी योद्धा तयार झाला आहे . चांगले वातावरण तयार झाले आहे . अश्या गोष्टी जुळून यायला कदाचित ५-१० वर्षे लागतात . 

एवढे सगळे जुळून आलेले असताना , आंदोलन हिंसक होऊ नये म्हणून मी सर्व मराठा समाजाला शांततेचे आवाहन करतो . कारण ; एकदा का आंदोलन भरकटले तर , ते सावरणे मनोज जरांगे पाटील काय , कुणालाही शक्य होणार नाही . आणि सर्वांत मोठे दुर्दैव सर्व मथुरा पाण्यात जाईल . 

त्यामुळे,  सकल मराठा समाजाला माझे आवाहन आहे , संयम ठेवा... दबाव वाढवत ठेवा...मात्र ; हिंसक आंदोलन करू नका.

✍️ निखिल सुभाष थोरवे - पाटील.

Comments