केरळ स्टोरीच्या निमित्ताने....


विषण्णता हा नवरसांपैकी एक मानवी भाव आहे. यापूर्वी हा अनुभव मला नागराज मंजुळे यांचा फँड्री बघून आला होता. जब्या ने फेकलेला तो दगड थेट प्रेक्षकांच्या पडद्यावर येऊन पडतो आणि जातीवादाने व्यतिथ झालेले आपण एक
हुरहूर लागणारी विषण्णता घेऊन थिएटर मधून बाहेर पडतो तीच कथा सैराटची आणि तीच काहीशी केरळ स्टोरीची ..!! 
लव्ह जिहाद तर्फे धर्मांतर आणि त्यानंतर दहशतवादी कार्यवाही मध्ये मुलींचा वापर याविषयी हा चित्रपट भाष्य करतो. चित्रपटाची कथा अतिशय तगडी आहे. आणि दिग्दर्शकाच्या मते ही सत्य घटनांवर आधारित आहे.
गेल्या १० वर्षात ३२,००० महिला-मुली धर्मांतर करून केरळ मधून गायब केल्या गेल्या. आत्ता ही नेमकी संख्या किती ह्यावर मतमतांतरे , वाद असला तरी , अशी एक जरी घटना घडली असेल किंवा आजूबाजूला घडत असेल तर , ती नक्कीच चीड , संताप आणणारी आहे . 
अर्थात केंद्र सरकार बदलल्यामुळे अनेक गोष्टी आत्ता उघडपणे बोलल्या जात आहेत , दाखवल्या जात आहेत. 
काँग्रेसने एका विशिष्ट समुदायाचे केलेले लांगूनचालन ह्याला कारणीभूत आहे . सोबतीला कम्युनिस्ट विचारसरणी जी प्राचीन भारतीय परंपरा यांविषयी सातत्याने शंका उपस्थित करते. याचा देखील या सगळ्यावर प्रभाव आहे . 
चित्रपटातील काही सूक्ष्म प्रसंग आणि त्याचा अन्वयार्थ मी दोन गोष्टींमध्ये माझ्या अल्पबुध्दीने पुढे मांडतोय

पहिली गोष्ट - 
चित्रपटात जेवणापूर्वी प्रार्थनेचा प्रसंग आहे . जेवणापूर्वी देवाला धन्यवाद देण्याबद्दल मुस्लिम समुदाय आणि ख्रिस्ती समुदाय मधील मुलींच्या प्रार्थना बघून हिंदू मुली फक्त त्यांच्या तोंडाकडे बघत बसतात . प्रार्थना वरून ब्रेन वॉश करू पाहणारी मुस्लिम मुलगी आणि प्रार्थने चे गांभीर्य ओळखणारी ख्रिस्ती मुलगी यांच्या मध्ये प्रार्थने वरून हास्यविनोद करणाऱ्या दोन हिंदू मुली या खरेच , निद्रिस्त हिंदूंचे प्रतीक वाटतात. जेवण्याच्या आधी " वदनी कवल घेता.." अगदी माझ्यासकट आपल्यापैकी किती जण बोलतात ? हा खरा प्रश्न आहे .
 मुळात धर्मांतरा सारखे विषय हे कधी थोपावले जात नाही केवळ जबरदस्ती करून हल्ली धर्मांतर केले जात नाहीत ते पूर्वी मुघल काळात घडायचे सध्या ते अलगदपणे एखाद्या इंजेक्शन प्रमाणे आपल्या विचारधारेमध्ये सोडले जाते.  हीच विचारधारा नंतर स्लो पॉयझन म्हणून काम करते. मग , हे षडयंत्र निष्क्रिय केव्हा होईल ? जेव्हा , आपली प्रतिकारक शक्ती भक्कम असेल. अर्थात आपली आपल्या धर्माबद्दलची निष्ठा जेवढी प्रखर  , कट्टर असेल तेवढी आपली धार्मिक बैठक पक्की होईल तेव्हा अशी धर्मांतरे होणार नाहीत. तुम्ही चित्रपट बघितल्यावर लक्षात येईल कीं, ख्रिस्ती मुलगी धर्मांतर करीत नाही कारण , तिची धार्मिक बैठक पक्की असते.

दुसरी गोष्ट -
आपल्या घरातून आपल्या मुलांवर योग्य वयात धार्मिक संस्कार व्हावे , माझी मुलगी एक वर्षाची आहे . तिला मी मध्यंतरी शेगाव ला गेलो होतो तेव्हा टाळ आणून दिला होता. आरती सुरू असताना ती टाळ वाजवते , विठ्ठल-विठ्ठल म्हणताच टाळ्या वाजवते , दिवे लागणी ची वेळ झाली की , मांडीवर येऊन बसते . दिवा लावते , अगरबत्ती ओवाळते.  हे सगळे पेरावे लागते. संस्कारातून हे शक्य आहे . अर्थात हे करत असताना , कोणत्याही धर्माबद्दल आकस अथवा द्वेष असता कामा नये . 

बाकी , केरळ मधील परिस्थिती कशी आहे . त्याबद्दल अनेक छापून आले आहे. केंद्र सरकारने या सगळ्यांची पाळेमुळे खणून काढायला सुरुवात देखील केली आहे . 
विषय गंभीर आहे . 
सावधान इंडिया...!! 
सतर्क रहे , सुरक्षित रहे..!! 
.........✍️निखिल सुभाष थोरवे 



Comments