जगातले सर्वात मोठे मोटिव्व्हेशन - पैसा आणि नाव

जगातले सर्वात मोठे मोटिव्हेशन - पैसा आणि नाव
लेखक :- निखिल सुभाष थोरवे 
नमस्कार ! बराच दिवसांतून आपल्या सर्वांशी लेखाच्या माध्यमातून संवाद साधतोय , हल्ली व्यावसायिक जबाबदाऱ्या वाढल्याने स्वतःसाठी असे काही लिहायला वेळ मिळत नाही . आणि त्यातल्या त्यात खरे सांगायचे म्हणजे , दर्जेदार असे काही लिहावे असा विषय देखील दुर्दैवाने सापडत नाही . राजकारण आणि त्याचा ढासळलेला दर्जा , सामाजिक तेढ , काही मंडळींकडून जाणीवपूर्वक केली जाणारी महापुरुषांच्या बद्दलची वादग्रस्त विधाने आणि त्यामागील राजकीय गणिते ह्याबद्दल सगळ्यांनाच सगळे माहिती असल्याने काय व्यक्त व्हावे ? त्यामुळे , ते लिहून वेळ कशाला वाया घालवा ? असो , आजचा विषय आपला तो नाहीच , 
हल्लीच्या माझ्या व्यावसायिक बाबींमुळे सध्या समाज एका वेगळ्या चष्म्यातून बघतोय. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या  ऍक्टिव्हिटी मागील त्याची भूमिका , प्रामाणिकपणा याबद्दल कधी नव्हे ते मी सूक्ष्मपणे विचार करायला लागलोय . मानवी भावभावना , प्रेम ओढ आपुलकी ह्या सर्वांबद्दल गेले काही दिवस माझे स्वतःचे असे एक मत तयार होत आहे . ते या ब्लॉग / लेखाच्या निमित्ताने आपल्या समोर मांडू इच्छितो . 
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी वैगेरे बनायचे असेल तर , मोटिव्हेशन हा शब्द कधी न कधी कानावर पडतोच आपल्याला यशस्वी बनायचे असेल तर , सर्वात आधी आपल्याला मोटिव्हेटेड राहिले पाहिजे असा एक रिवाज जणू समाजात आहे . हे फक्त मी भारतीय समाजाबद्दल बोलत नाहीये तर , संपूर्ण जगाबद्दल बोलतोय..!! 
बर , मी म्हणतोय त्याला कोणतेही क्षेत्र अपवाद नाहीच , मला आठवतंय , आम्ही MPSC / UPSC चा अभ्यास करायचो त्या वेळी आणि आत्ताची पोरं-पोरी देखील Youtube उघडून नांगरे पाटील पासून ते भरत आंधळे , अन्सार शेख ते अजून कुणी कुणी किती जणांच्या सक्सेस स्टोरी बघून स्वतःला मोटिव्हेट ठेवतात . 
पुस्तकांची तर , खूप मोठी इंडस्ट्री या जगात याच मोटिव्हेशन या सेक्टर भोवती फिरून करोडो रुपयांची उलाढाल करत आहे . मी मागे सुद्धा एका लेखात म्हंटले होते की , मोटिवव्हेशनल पुस्तके किंवा व्हिडीओ ही एखाद्या पेन किलर गोळ्यांसारखी असतात . तेवढ्या पुरते पोरं-पोरी चार्ज होतात आणि नंतर विषय खल्लास..! 
हीच वस्तू स्थिती आहे . तसे नसते तर , ओप्रा विनफे पासून ते शिव खेरा पर्यंत यांना सर्व जण वाचून , ऐकून , बघून सगळेच मोटिव्हेटेड झाले असते . 
या सर्वांमध्ये इमोशनल मॅनेजमेंट म्हणून अध्यात्मिक बाबींकडे नव्याने बघणारा , पॉडकास्ट ऐकणारा एक वेगळा युथ देखील तयार होतोय , त्यामध्ये सद्गुरू ते गौरगोपाळदास ते अगदी रामायण महाभारत सीरिअल मधील काही संवाद याचे रिल्स स्टेटसला ठेवणाऱ्या लोकांचा समावेश आहे . अर्थात ही मंडळी वेगळी काहीच करीत नाही . जी गोष्ट आपल्या पूर्वज मंडळींनी भगवद्गीता , ज्ञानेश्वरी , तुकाराम गाथा यात मांडली आहे तीच गोष्ट ही सर्व मंडळी आजच्या युथला त्यांच्या भाषेत समजून सांगत आहेत .  अर्थात या गोष्टीचे स्वागत आणि कौतुकच ..!!
शेवटी जे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात झाले तेच , आत्ता देखील होत आहे हे समाधान अतिशय मोठे .. 
Connect With Mases - जनता जनार्दनाला समजेल अशा भाषेत तत्वज्ञान सांगणे . 
तर , मोटिव्हेशन आणि आध्यत्मिक बाबींमधून येणारे इमोशनल मॅनेजमेंट या सर्वांमधून बुडून सुद्धा माझ्या सकट पोर-पोरी ही मोटिव्हेटेड का होत नाहीत ? किंवा त्या पेन किलर च्या गोळ्या खाऊन परत परिस्थिती जैसे थेच का बरे होती ? ह्याचा ज्या वेळेस मी विचार करतोय त्याचे उत्तर मला माझ्या अल्पबुद्धिने समाजात वावरत असताना आणि व्यक्तींचे बारीक निरीक्षण करीत असताना जाणवले आहे ते म्हणजे ; 
जगातील सर्वात मोठे मोटिव्हेशन म्हणजे " पैसा आणि नाव " 
आज पहाटे 4 वाजल्यापासून दूध आणि पेपर टाकणाऱ्यापासून ते रात्री 2 पर्यंत पोहे - चहा सिगरेट विकणाऱ्या पर्यंत प्रत्येकाला ती गोष्ट करण्यासाठी भाग पाडणारी बाब म्हणजे अर्थात पैसा..!! 
टपरी वालेच कशाला ? ऑफिस मध्ये जास्त वेळ थांबून प्रेझेंटेशन बनवणारे कॉर्पोरेट्स ते तासन तास शिकवणाऱ्या घेणारे शिक्षक सगळ्यांचे मोटिव्हेशन एकच - पैसा..!!
माझ्या मते , कार्य करण्याची प्रेरणा म्हणजेच मोटिव्हेशन..!! 
तुम्ही म्हणाल , हे तर पोटापाण्यासाठी करावे लागते इच्छा असो किंवा नसो ..! ह्यात कसले आलाय डोंबल्याचे मोटिव्हेशन ? 
पण , खरी गल्लत दुसरी बाब जेव्हा फोकस मध्ये येते तिथे आहे ! ती दुसरी बाब म्हणजे ' नाव ' , ज्याला आपण प्रसिद्धी , मान सन्मान असे म्हणू शकतो . 
जेव्हा माणसाला पैसा आणि प्रसिद्धी मिळायला लागते तेव्हा तो प्रचंड मोटिव्हेटेड राहतो हे माझे सुक्ष्म निरीक्षण आहे . तुम्ही अगदी आजूबाजूचा कोणताही व्यक्ती घ्या .. तुमच्या आजूबाजूच्या सगळ्याच व्यक्ती या काही टाटा-अंबानी , सचिन तेंडुलकर , लता मंगेशकर , अमिताभ बच्चन , अब्दुल कलाम वैगेरे नसतील पण , तरी देखील त्या व्यक्ती खूप पॉझिटिव्ह आणि मोटिव्हेटेड राहतात.. माझ्या मते ह्याची दोनच कारणे - पैसा आणि नाव ..!! 
मात्र ,  ह्या दोन गोष्टी एकाच वेळी आवश्यक आहेत बर ..!!
तुमच्या आजूबाजूची या दोन्ही गोष्टी असणारी कोणतीही व्यक्ती घ्या जी ठीक ठाक कमावत आहे आणि समाजात नाव देखील जपून आहे मग ते नाव तो राहणाऱ्या कॉलनी पुरते का असेना ती व्यक्ती मोटिव्हेटेड असते , उत्साही असते..!!
अशी व्यक्ती जगात यशस्वी वैगेरे असते असे मला मुळीच म्हणायचे नाही पण ; शेवटी यशस्वी होण्यासाठी सर्वात आधी मोटिव्हेटेड राहावे लागते. किंबहुना ती पहिली पायरी आहे , हे मी सुरुवातीलाच सांगितलेच की ...!!! 
तुमचं काय निरीक्षण आहे मग ?? 
......✍️ निखिल सुभाष थोरवे 
मो.9764796699.

Comments