बायकॉट छे.. छे..! हा तर , हा अखिल भारतीय चित्रपटसृष्टीचा उदय..!!

सध्या बॉलिवूड मध्ये , बायकॉट हा शब्द परवलीचा बनला आहे . कोविड नंतर ज्या व्यवसायाला सर्वाधिक फटका बसला त्या क्षेत्रात चित्रपटसृष्टी नंबर एक ला असेल . 
त्यानंतर , सुशांतसिंग राजपूतच्या धक्कादायक आत्महत्येने (?) बॉलिवूड त्यातले नेपोटीझम ह्यावर सर्वसामान्य जनता व्यक्त होयला लागली आणि कधी काळी सुपरस्टारवर जीव ओवाळून टाकणारी जनता त्यांचा टोकाचा तिरस्कार करू लागली . 
हे सगळे दोनच वर्षात बदलेले का ? तर त्याचे उत्तर माझ्यामते " नाही " 
बॉलिवूड साईड लाईन सुरुवात खूप आधी पासून झाली होती. अगदी संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायचे झाले तर , गेल्या 5 वर्षात सोनी मॅक्स , स्टार गोल्ड आणि इतर तत्सम फक्त चित्रपट दाखवणाऱ्या वाहिन्यांवरील सातत्याने दाखवले जाणारे साऊथ कडील चित्रपट ह्याला प्रथमदर्शनी कारणीभूत वाटतात. अर्थात त्यात त्या वाहिन्यांचा दोष नाहीच तर , जनतेचा उदंड प्रतिसाद ह्या चित्रपटांना लाभला आणि साऊथ मधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री या उर्वरित भारताला ओळखीच्या झाल्या . 
त्यासोबत " फ्रेश कंटेंट क्रिएशन " जन्मास घालणारे साऊथ मधील गुणवंत लेखक , दिग्दर्शक यांची गुणवत्ता आणि बॉलिवूड मधील कॉपी पेस्ट , रिमेकवाली चापलुसी जनतेला आरश्याप्रमाणे स्वछ दिसायला लागली . ज्या वॉन्टेड फ्लिम ने सलमान खान च्या करिअर ला गती दिली त्याचा महेशबाबूचा मूळ पोकोरी चित्रपटाचे मूळ हे साऊथ चे आहे अशीच ढीगभर उदाहरणे आपल्याला सांगता येतील . 
कुणी कितीही नाकारले तरी , भारताचे एकांगी धार्मिक ध्रुवीकरण होत आहे . ही गोष्ट आत्ता लपून राहिली नाही . त्यामुळे हिंदू देव देवता यांची बॉलिवूडने पूर्वी केलेली हेटाळणी आत्ता बहुल हिंदुत्ववादी मानसिकता स्वीकारलेली जनता सहन करत नाही . यासंबंधीच्या प्रतिक्रिया ह्या समाज माध्यमांवर तातडीने उमटत असतात . पीके मध्ये अमीर खानने ज्या आक्रमकपणे हिंदू धर्मातील प्रथा परंपरा यांना टार्गेट केले त्याच आक्रमकपणे बाहुबली मध्ये शिवलिंग खांद्यावर घेऊन , प्रभासने हिंदू धर्माची महती संपूर्ण जगासमोर आणली . दुर्लक्षित घटकांकडे लक्ष वेधून देणारी " जय भीम " सारखी क्रिएटिव्हिटी बॉलिवूडला जमली असती का ?? हा जर प्रश्न बॉलिवूडच्या निर्माते आणि दिग्दर्शकांना योग्य वेळी पडला असता तर बॉलिवूडची हानी झाली नसती . 
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे , पिढी बरीच पुढे गेली आहे . राजेश खन्ना , अमिताभ बच्चन , खान बंधू यांचे स्टारडम पाहून त्यांच्यावर आंधळ्यासारखे प्रेम करणारी पिढी इतिहासजमा झाली आहे . चातकासारखी सलमानच्या ईद निमित्त येणाऱ्या  , शाहरुखच्या दिवाळीच्या निमित्ताने येणाऱ्या चित्रपटाची वाट बघणारे फॅन्स आज नष्ट झालेत . 
आज स्मार्टफोन वर कोरियन , इटालियन ते जगभरातील प्रत्येक चांगला कंटेंट चित्रपटप्रेमी पर्यंत पोहोचत आहे . ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे तर , आपल्या सोयीने अगदी पर्सनल लेव्हल वर , चित्रपट अथवा वेबसिरीज बघणे , अगदी आरामदायी झाले आहे . 
त्यामुळे ब्लॅक तिकिट , थिएटर शोधा हा विषय एकप्रकारे इतिहासाजमा झाला की काय ? असे वाटते . 
आत्ता , तुम्ही म्हणाल ह्याला उत्तर काय ? मुळात आत्ता बॉलिवूड- टॉलीवूड ही स्पर्धा नष्ट होयला पाहिजे. भारतीय चित्रपट सृष्टी या बॅनर खाली सर्व चित्रपट आले तरच , भारतीय सिनेमा जगभरात पोहचेल . 
बॉलिवूडने आपण केवळ राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी चित्रपट बनवतो या एका सबबीखाली भारतीय चित्रपट म्हणजे सबकुछ बॉलिवूड हा टॅग सोडून देण्याची गरज आहे . अर्थात हा टॅग काळाच्या ओघात पुसला गेलाच आहे . आणि तसेही एक चित्रपट आत्ता किमान 4 भाषांमध्ये डब होतोच त्यामुळे भाषा ही अडचण राहिली नाहीच . जर भारतीय चित्रपट सृष्टीचे नेतृत्व टॉलीवूड कडे येत असेल तर , ही वस्तुस्थिती सर्वांनी स्वीकारायलाच हवी. बाहुबली  KGF , पुष्पा , या चित्रपटांनी ही बाब एव्हाना सिद्ध केलीच आहे . त्यामुळे हा महत्वाचा बदल बॉलिवूडने स्वीकारावा कदाचित बॉलिवूड , टॉलीवूड , मराठी , भोजपुरी , पंजाबी आणि भारतातील इतर प्रादेशिक भाषांतील चित्रपटसृष्टी मधील एकत्रीकरणातुन एक नवी - "अखिल भारतीय चित्रपट सृष्टी " आकारास येईल . ज्याला ऑस्कर साठी भीक मागावी लागणार नाही . किंबहुना ऑस्कर , ग्रॅमी अवॉर्ड स्वतः चालतच आपल्याकडे येतील . 
एक चित्रपट रसिक म्हणून , चित्रपट आणि चित्रपटसृष्टीवर पोट अवलंबून असणाऱ्या प्रत्येक घटकाबद्दल मला सहानभूती आहे . म्हणूनच बायकॉट ट्रेंड वर व्यक्त व्हावे असे वाटले . 
- ✍️निखिल सुभाष थोरवे 

Comments

Post a Comment