...अशी वाचेल काँग्रेस..!!
काही दिवसांपूर्वी , ममता दिदींच्या मुंबई दौऱ्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले . ह्या सर्व चर्चेचा मुख्य रोख होता , काँग्रेस विरहित भाजप विरोधी आघाडी ..!!
ममता दीदींनी , " काँग्रेस पक्ष युपीएच्या केंद्रस्थानी नाही आत्ता , रस्त्यावर उतरून लढणारे लोक पाहिजे !! " असा एल्गार मुंबईत दिला . त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सोबत सत्तेत सहकारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली . मात्र , काँग्रेसकडे मुद्दामून दुर्लक्ष केले आणि एकप्रकारे अवहेलना केली.
सध्याची काँग्रेसची परिस्थिती पाहता ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच माही मात्र , काँग्रेसचे देशातील महत्त्व चाणाक्ष शरद पवारांनी ओळखून सावध प्रतिक्रिया व्यक्त केली .
एक काँग्रेसप्रेमी म्हणून विशेषतः २०१९ सालापासून माझ्या मनात काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेबद्दल उद्विग्नतेची भावना आहे . पण , काँग्रेसवर काही वाक्ये खर्ची करावीत अशी कधी इच्छा निर्माण झाली नाही . त्याला कारणही काँग्रेसची निद्रिस्त स्थिती हेच होते .
पण , ममता दीदी यांनी काँग्रेस विरहित भाजप विरोधी आघाडी याविषयी व्यक्तव्य करून , बऱ्याच दिवसांपासून माझ्या डोक्यात असलेल्या विषयाला मूर्त स्वरूप दिले . त्याबद्दल ममता बॅनर्जी यांना मनापासून धन्यवाद..!!
तर , विषय होता - ....अशी वाचेल काँग्रेस !!
हिंदू - हिंदुत्ववादी आणि काँग्रेस -
स्वातंत्र्याच्या पूर्वी काँग्रेसला प्रामुख्याने हिंदू बहुल पक्ष म्हणूनच गणले जाते होते . अगदी तुरळक संख्या मुस्लिम नेत्यांची होती . त्याचाच फायदा ब्रिटिशांनी पुढे घेऊन भारतीय काँग्रेसमध्ये फूट पाडली आणि मुस्लिम लीग ची स्थापना करण्यात आली . काल परवा चे राहुल गांधी यांचे वक्तव्ये बघता भाजपच्या हिंदुत्ववादी अजेंड्याला कसे रोखायचे ह्या प्रश्नावर अजूनही उत्तर सापडले नाही ह्याचेच द्योतक म्हणावे लागेल . मुळात उजव्या विचारसरणी न मानणारा , पुढारलेला आणि उदारमतवादी हिंदू हा काँग्रेसचा आधीपासूनच मतदार राहिला आहे ह्याचा विसर काँग्रेसला पडून चालणार नाही . त्यामुळे भाजप हिंदुत्ववादी भूमिका घेत असल्याने आपण सुद्धा सॉफ्ट अथवा हिंदुत्व स्वीकारायचे हे धर्माला महत्त्व न देणाऱ्या आणि काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेल्या घटकांसाठी हितावह नाही असेच म्हणावे लागेल . मुळात हिंदुत्व अथवा हिंदू याविषयावर भाजपच्या अनुषंगाने भूमिका मांडण्यापेक्षा सामान्य जनतेच्या हिताच्या गोष्टीवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यास जनतेच्या पसंतीस ते नक्की उतरू शकते .
अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे -
या मुद्द्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी मला मराठा साम्राज्याचे एक ऐतिहासिक उदाहरण द्यावे वाटते . जहागिरीदारी चा अंत करणारे म्हणून राजाशिवछत्रपती ओळखले जातात . राजाच्या अपरोक्ष निर्णय प्रक्रिया राबविण्याऱ्या जहागीरदार लोकांच्या मनमानीला चाप बसावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जहागिरदारीला निर्बंध बसवला . आणि एककेंद्री व्यवस्था निर्माण केली . जी तत्कालीन राज्य चालविण्यासाठी सुयोग्य होती . पण , स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वलय होते प्रशासनावर पकड होती . तेवढीच छत्रपती संभाजी महाराजांची देखील होती . मात्र , जहागिरदारी प्रवृत्तीचा ते पूर्णपणे बिमोड करू शकले नाही . किंबहुना त्यांच्याच कारकिर्दीत परकीय आणि जहागिरदारीसाठी किंचित जास्त स्वकीय यांनी त्यांना प्रचंड त्रास दिला . ह्या सगळ्याची परिणीती म्हणजे संगमेश्वरला संभाजी महाराज यांना ह्याच जहागिरीच्या अमिषापोटी पकडून देण्यात आले . हे सर्वश्रुत आहे .
संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर जेव्हा आणीबाणीच्या परिस्थितीत छत्रपती राजाराम महाराज मराठ्यांच्या गादीवर आले तेव्हा , त्यांनी जहागिरदारीची , वतने देण्याची परंपरा पुन्हा सुरू केली . तत्कालीन स्थिती बघता ते अनिवार्य होते कारण , एककेंद्री नियंत्रण ठेवून राज्य चालविण्याची क्षमता आपली नाही . आपल्याला आपल्या वडील अथवा थोरल्या बंधूच्या प्रमाणे तेजस्वी व्यक्तिमत्त्व लाभले नाही . ह्याची सुप्त जाणीव छत्रपती राजाराम महाराज यांनी होती म्हणूनच त्यांनी गडकिल्ले यांचे संरक्षण करण्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण केले . सरदार , अमात्य मंडळी यांना सैन्य-फौजफाटा बाळगण्यासाठी मुभा दिली . त्यांना अधिकार दिले , बक्षिसे दिली , वतने जाहीर केली त्याच्या असंख्य नोंदी इतिहासात आहे .
त्याचेच फलित म्हणून संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यासारखे शूरवीर योद्धे आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्यासारखे चाणाक्ष आणि औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी लढा दिला . काळ जसा पुढे सरकला तसे मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व महाराणी ताराराणी यांच्या सारख्या रणरागिणी कडे आले आणि मराठ्यांना गाडण्यासाठी आलेल्या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात मराठ्यांनी खोदली ..!!
सांगायचा मुद्दा एवढाच की , नेहरू , इंदिरा गांधी किंवा आई सोनिया गांधी यांच्या सारखे प्रभावी नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे नाही ही कटू वस्तुस्थिती आहे . त्यामुळे या नेत्यांनी राबविलेले हायकमांड कल्चर राहुल गांधी यांच्या कारकिर्दीत चालणे अवघड आहे आणि ते काळाच्या प्रतलावर सिद्ध झाले आहे . ज्या पद्धतीने राजाराम महाराजांनी जहागिरदारी , वतनदारी पध्दती तत्कालीन नाजूक परिस्थिती बघून पुन्हा सुरू केली त्याच पद्धतीने राहुल गांधी यांनी स्थानिक नेत्यांना सर्वाधिकार देण्याची आवश्यकता आहे . हायकमांड संस्कृती मोडून काढलीच पाहिजे . " जो राज्य जिंकून आणेल त्याला राज्याचे सर्वस्व अधिकार मिळतील " ही पद्धती काँग्रेसला नवसंजीवनी नक्कीच देऊ शकते . अन्यथा काँग्रेसचे वाटोळे कुणीही टाळू शकणार नाही किंबहुना ते होतच आहे .
उदाहरणार्थ पंजाब राज्य जिथे केवळ आणि केवळ कॅप्टन अमिंदर सिंग यांच्या करिष्म्यामुळे एवढ्या मोठ्या विरोधकाला पराभूत करून पंजाब राज्य काँग्रेसने मिळवले पण , थोड्याच दिवसात काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या यांमुळे नेतृत्वबदल होऊन चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री पद मिळाले . तशीच अवस्था राजस्थान काँग्रेस मधील अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधत सचिन पायलट अधून मधून वार-प्रतीवर करत असतातच तर , मध्यप्रदेश मध्ये जेष्ठ आणि हायकमांडच्या निकटवर्तीय कमलनाथ यांना जवळ करण्यात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखा फायरब्रॅंड नेता काँग्रेसने गमावला . ह्या सर्व गोष्टी काँग्रेसचे बुडत्याचा पाय खोलात असण्याची स्पष्ट लक्षणे आहेत .
काँग्रेसचा कार्यकर्ता आहे ??
मग प्रश्न पडतो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे का ?? हो नक्कीच आहे . आज धर्मनिरपेक्ष , पुरोगामी विचारांचे युवक , वकील , विचारवंत , डॉक्टर , विद्यार्थी आणि सर्वात मुख्य म्हणजे मोदी सरकारच्या महागाईला वैतागले , त्यांच्या हिंदुत्ववादी पोकळ थोतांडापणाला वैतागलेले असंख्य नागरिक हे काँग्रेसचे एक निष्ठावान मतदार म्हणून समोर येऊ शकतात . सरकारी आस्थापना मध्ये खाजगीकरणामुळे वैतागलेले सरकारी कर्मचारी थेटपणे विरोधात उतरू शकले तरी , त्यांच्या कुटुंबियांच्या मार्फत , ओळखीच्या लोकांच्या मार्फत ते आपला असंतोष व्यक्त करू शकतात . कृषी कायदे यांमुळे भ्रमनिरास झालेले शेतकरी , छोटे उद्योजक असे देशातील कितीतरी घटक काँग्रेसला नक्कीच साथ देऊ शकतात .
काँग्रेस हाच भाजप ला पर्याय आहे .
कुणीही काँग्रेसला कितीही वाईट बोलो . काँग्रेस हाच भाजपला पर्याय आहे ही वस्तुस्थिती आहे . देशभर काँग्रेसचे जाळे आहे . कार्यकर्ता आहे , नेते आहेत , संघटना आहे पाहिजे ती फक्त इच्छाशक्ती ..!! वाईट काळ प्रत्येक पक्षाचा येत असतो , जात असतो . पण , ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नच न करणे माझ्यामते सर्वात घातक..!!
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा देशव्यापी दौरा आवश्यक.
काँग्रेसच्या नेतृत्वाने देशव्यापी दौरा आखला पाहिजे . प्रत्येक राज्यातील किमान निम्म्या तरी जिल्ह्यात पोहोचले पाहिजे , कार्यकारणी ने कार्यकर्त्यांना भरीव असा कार्यक्रम दिला पाहिजे . दुरावलेले मित्र पक्ष यांना कवेत घेतले पाहिजे . युपीएची मजबूत मोट पुन्हा बांधली पाहिजे . व्यावहारिक तडजोडी साधल्या पाहिजे .
भाजप विरोधात प्रचंड असंतोष आहे . गरज आहे ती फक्त केंद्रित करण्याची . काँग्रेसने जुन्या संघटना काळसुसंगत करायला हव्या . गोदी मीडियाच्या नाकावर ठोसे मारून शेतकरी आंदोलन यशस्वी होऊ शकते . तर , काँग्रेसचे कार्यक्रम का यशस्वी होऊ शकत नाही ?? सध्याचा मीडिया साथ जरी देणार नसला तरी , सोशल मीडिया सेल च्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे देश ढवळून काढता येईल . नव्या दमाचे युवक पक्षात सामील करून , त्यांना ताकत देण्याची आवश्यकता आहे . काँग्रेस हा नेहमीच जनतेचा पक्ष होता . भारताच्या जनतेने मनापासून काँग्रेसला स्वीकारले आणि आजही भारताची जनता काँग्रेसच्या शोधात आहे , उद्योगपती शोधत आहे , नोकरदार शोधात आहे आणि या सर्वांना एकच व्यावहारिक पर्याय आहे तो म्हणजे - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस..!!
भाजप सारख्या अजस्त्र पक्षाला पराभूत करणे एखाद्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्याचे काम नक्कीच नाही आणि भारतातील जनता आत्ता अश्या कुबड्यांच्या आधारे चालणाऱ्या सरकारला मत नक्कीच देणार नाही . त्यांना मोदींच्या सारखा प्रभावशाली नेता जरी हवा नसला तरी , एक विचारशील , मजबूत बांधणीचे सरकार हवे आहे आणि काँग्रेस पक्ष ही गरज निर्विवादपणाने पूर्ण करू शकतो .
गरज आहे फक्त भारतातील लोकांना साद घालण्याची मला विश्वास आहे , लोकं भारतीय काँग्रेसला नक्कीच प्रतिसाद देतील .
एक निस्सीम काँग्रेसप्रेमी युवक
निखिल सुभाष थोरवे
मो. 9764796699.
Comments
Post a Comment