विरोधाभास
ज्यांच्या वर कुणीही कितीही अश्लाघ्य टीका केली तरी , कुणाच्या भावना दुखावल्या जाऊन या देशात वादंग निर्माण होत नाही . ज्यांच्या मागे कोणत्याही समाजाच्या मतांची गणिते अवलंबून नाहीत . ज्यांच्या पुतळ्याची असंख्य वेळा विटंबना होऊन देखील फारसी मोठी दंगल झाल्याचे आढळत नाही . ज्यांचा फोटो नोटेवर असल्याने बऱ्याच जणांना काहीही सोयरसुतक नाही . राष्ट्रपिता ही कदाचित राष्ट्राची सर्वोच्च उपाधी मिळून देखील , सार्वजनिक व्यासपीठ आणि कार्यक्रम वगळता ज्यांच्या बद्दल खाजगीत क्वचितच चांगले बोलले जाते . ज्यांच्या विचारधारेला प्रमाण मानून आयुष्य जगणारा माणूस भारतात षंढ किंवा बुळगा समजला जातो . अश्या महात्मा गांधी यांची आज जयंती ..!!
पण , विरोधाभास बघा , आज भारतातील बहुतांश आंदोलने-मोर्चे त्यांनीच दाखवलेल्या सत्याग्रहाच्या मार्गानेच काढले जातात . एखाद्या व्यक्तीचे-प्रशासनाचे-सरकारचे म्हणणे पटले नाही तरी , उपोषण , धरणे आंदोलन , निवेदन , आत्मक्लेश इत्यादीच उपाय केले जातात आणि ते लोकमान्यता प्राप्त असून ते कमालीचे लोकप्रिय देखील आहेत . म्हणजेच वर वर्णन केलेला भारतातील समाजच त्यांनी सांगितले उपाय मनोभावे पूजतो , त्यानुसार मार्गक्रमण करतो. फक्त गांधी हा शब्द त्याला बोचतो आणि अपमानजनक वाटतो . गांधी हे हे नाव त्याला स्वतःशी जोडून घेणे षंढपणाचे वाटते . आणि दुर्दैव बघा , गांधी जयंती दिवशीच #गोडसे हा ट्रेंड ट्विटर वर झकळतो , ह्याहून अधिक विरोधाभास जगात नसावा .
सशस्त्र क्रांतिकारकांच्या बलिदानाचा आदर ठेवून बोलतो , जेव्हा निर्णायक लढाई लढायची असते तेव्हा गांधींनी सांगितलेला सत्याग्रहाचा मार्गच निर्विवादपणे सर्वोत्तम आहे ..
आणि दिवसेंदिवस हे अधिक सिद्ध होत आहे .
.....✍🏻 निखिल सुभाष थोरवे
Comments
Post a Comment