थांबा...थोडे चुकतंय इकडे लक्ष द्या..!!


कोरोनावर एवढे लिखाण झालाय की , शाहरुख खान सुद्धा क..क..क.. किरण नाही तर , क..क..क..कोरोना म्हणायचा त्यामुळे वाचकांची त्यावर काहीही वाचाण्याची मानसिकता नसेल हे देखील मला मान्य आहे पण ,अजूनही परिस्थिती जैसे थे आहे .आणि त्यामध्ये तसूभरही फरक पडला नाही ही वस्तुस्थिती आपण मान्यच करायचा हवी . त्यामुळे नाईलाजाने लिहावे लागतंय कारण , मानवी जीवन अंतर्बाह्य बदलून टाकणाऱ्या शतकातील एका मोठ्या घडामोडीचा आवाका हा खूप मोठा आणि विविधाअंगी आहे ह्यात दुमत नाही . गेल्या वर्षभरातील प्रश्न बरेच आहेत जे तुम्हाला-आम्हाला पडले तेच खाली मांडतोय , 

लॉकडाऊन ने कोरोना कमी झाला का ? , तर नाही 
सॅनिटायझर ने कोरोना कमी झाला का ? , तर नाही 
आयुर्वेदिक औषधाने  ने कोरोना कमी झाला का ? , तर नाही 
अहो , एवढेच काय , तर लसीकरण होऊन सुद्धा कोरोना कमी होत नाही हे थोडेसे निराशाजनक चित्र आहे . 

मग , नेमके करायचे काय ? सुशांतसिंग , कंगना , सचिन वाजे , संजय राठोड की संजय राऊत यांच्यामध्ये लक्ष अडकून ठेवायचे की परत IPL आले की सगळे तात्पुरते विसरून Dream 11 वर टीम लावत बसायचे !! असा प्रश्न माझ्यासकट सर्वानाच पडला असेल . 

पण , ह्या सगळ्यामधील मेख आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे , गेल्या वर्षभरापासून बातम्या सांगताना कोविड योद्धा आणि कोरोनाशी लढा वैगेरे असे शब्दप्रयोग आपण ऐकले-वाचले असतील अर्थात हे शब्द प्रयोग कोरोनाकाळात आरोग्य कर्मी , सफाई कर्मचारी आणि पोलीस यांच्या शूरते साठी यथायोग्य असले तरी , ते परिस्थितीसुसंगत नाही . हे देखील तितकेच खरे ..!! आत्ता तुम्ही म्हणाल ते कसे ?? सांगतो , मुळात आपण कोरोनाला हरवू जगातील शेवटचा पेशंट बरा करू त्याच्याशी युद्ध करू वैगेरे-वैगेरे हे सर्व काल्पनिक आहे असे माझे मत आहे . युद्ध हे ठराविक कालावधीपर्यंत असते . त्यामुळे त्यातील सहभागी असणाऱ्या व्यक्तींना योद्धा वैगेरे म्हणणे ठीक आहे . पण कोरोना आपल्याशी युद्ध करायला आलाच नाही तर , तो आपल्याशी सहजीवन व्यतीत करायला आला आहे .( हे कोरोनाने स्वतः माझ्या कानात सांगितले आहे , जेव्हा मी 14 दिवस त्याच्यासोबत होतो तेव्हा...आणि नंतर सुद्धा हलगर्जीपणा मुळे मी आजारी पडलो तेव्हा.. ) हे , जोवर आत्मसात करीत नाही तोवर आपली दिशा चुकलेलीच राहील असे वाटते . 

उदाहरण , देतो म्हणजे कदाचित आपणास पटेल , HIV अर्थात एड्स या देखील कोणतेही प्रभावी औषध नसलेला आजार . पण प्रतिबंधात्मक उपायांनी आणि व्यापक समाज जागृतीने आपण त्यावर नियंत्रण मिळवले आहे . आजही केस कापायला किंवा दाढी करायला नाव्ही नवीन ब्लेड नकळत वापरतो ह्यातच सगळे आले . ह्याचाच अर्थ प्रतिबंधात्मक उपाय आपण आपल्या सर्वांच्या जीवनशैलीचा हिस्सा बनवले . 
त्याचप्रमाणे मास्क वापरणे , सुरक्षित अंतर ठेवून बोलणे आणि अनावश्यक गर्दी टाळणे हे आपल्याला आत्ता आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावा लागणार आहे . कारण युद्ध हे लगेच संपते आणि सहजीवन हे अमर्याद कालावधीसाठी असते . 
लॉकडाऊन वैगेरे आज-उद्या उघडेल , समारंभ सुरू होतील पण वारंवार हात धुणे , मास्क वापरणे आणि दो गज की दुरी नकळत आपल्या जीवनाचा हिस्सा बनेल हे आत्ता जवळपास निश्चित आहे .  
.......✍️ निखिल सुभाष थोरवे 

Comments